बायो बबल - भाग १ (प्रस्तावना)

बायो बबल - भाग १ (प्रस्तावना)
लेखन: विद्याधीश केळकर

व्हॅक्सीन, अ‍ॅंटीबॉडी, अ‍ॅंटीजेन, इम्युनिटी वगैरे शब्द काही आता आपल्याला नवीन नाहीत. जवळपास गेलं वर्षभर आपण हे शब्द ऐकतोय, वापरतोय. काहीजणांनी त्याबद्दल अधिक खोलात माहितीही घेतली असेल, तर काही जणांनी व्हॉट्स-ॲपवरून घेतली असेल. पण, एक तोंडओळख तर नक्कीच आहे या शब्दांची. याबद्दल बर्‍याच तज्ज्ञांनी लिहिलं, व्हिडिओ केले. तेव्हा, मी काही परत तेच सांगत बसणार नाही. मी काही त्यातला जाणकारही नाही. मीही त्याबद्दल अजून जाणून घेतो आहे. नुसतं त्याचं वर्तमानच नाही तर त्याचा भूतकाळसुद्धा. गेल्या काही महिन्यात या Immunology अर्थात ’रोगप्रतिकारशास्त्रा’नी मला चांगलीच भुरळ पाडली. आणि माझी एक खोडच आहे, मला काहीही आवडलं, पटलं की मला ते सगळ्यांना सांगायचं असतं. बघा तुम्हालाही आवडतंय का ते...!


सन १७५७-५८, बर्कली, इंग्लंड.


लहानगा एडवर्ड आपल्या आईला घट्ट बिलगून उभा होता. त्याला काय चाललंय तेच समजत नव्हतं. गेली ५-१० मिनिटं तो समोर बसलेला माणूस, एडवर्डच्या आईला काहीतरी सांगत होता. कुठल्यातरी आजारबद्दल आणि त्यावरचा उपाय वगैरे... काहीतरी गमतीदारच नाव होतं. 'स्मॉलपॉक्स'! एडवर्डला हसूच आलं. त्यानी आईकडे बघितलं. तिचा चेहरा गंभीर होता. ती हळूच त्याच्याकडे वळून म्हणाली, "एड, हे डॉक्टरकाका तुझ्यासाठी एक औषध घेउन आलेत."
"पण आई, मला तर अगदी बरं वाटतंय. त्यापेक्षा तूच घे ते. बघ तुझे केसही पांढरे व्हायला लागलेत", लहानगा एडवर्ड म्हणाला. आईला त्याचं कौतुक वाटलं. ती हसून म्हणाली, "अरे हे वेगळं औषध आहे. तुला काही होऊच नये ना म्हणून! पण थोडंसं दुखेल बरं का!?"
"मी नाही घाबरत कशालाच! द्या काका, ते औषध मला!"


डॉक्टरांनी त्याला पलंगावर झोपायला सांगितलं आणि त्यांच्या पेटीतून एकेक करून वस्तू काढल्या. एक छोटी सुरी, एक काडी आणि एक कसल्यातरी पांढर्‍या द्रवानी भरलेली बाटली. एडवर्ड ते सगळं मन लावून पहात होता. डॉक्टरांनी सुरी उचलली, तसे एडवर्डनी डोळे घट्ट मिटून घेतले. डॉक्टरांनी त्याच्या दंडाला एक छोटासा छेद दिला. हलकेच बाटलीतला थोडासा द्रव काडीवर घेउन त्या जखमेत भरला आणि जखम बांधून टाकली. "झालं!", डॉक्टर म्हणाले, "धीट आहे तुमचा छोकरा मिसेस जेन्नर! अजिबात घाबरला नाही. आता फक्त पुढचे दोन दिवस त्याची जरा काळजी घ्या. थोडा ताप येईल त्याला, पण काळजी करु नका. फार वाढलाच तर कोणालातरी लगेच माझ्याकडे धाडा. पण एक नक्की, स्मॉलपॉक्सपासून त्याला आता धोका नाही. येतो मी."

मिसेस जेन्नर डॉक्टरांना दरवाज्यापर्यंत पोहोचवून आल्या. आत येत त्यांनी लहानग्या एडच्या कपाळाची पापी घेतली आणि त्याला निजायला सांगून आपल्या कामाला लागल्या. एडवर्ड मात्र अजूनही नक्की काय घडलं या विचारात होता...

हा लहानगा एडवर्ड, म्हणजे 'एडवर्ड जेन्नर'! हो तोच स्मॉलपॉक्सची (देवीची) ’लस’ शोधून काढणारा. त्याचीच ही आख्यायिका. मला माहितीये, आता ही आख्यायिका वाचून, तुम्हाला एडवर्डसारखेच बरेच प्रश्न पडले असतील. डॉक्टरांनी नक्की केलं तरी काय? त्या बाटलीत काय होतं? त्यानी एडला स्मॉलपॉक्सपासून कसं वाचवलं? म्हणजे पहिली लस तयार करणारा कोणी दुसराच होता का? आणि असे बरेच! पण त्यांच्या उत्तरांसाठी थोडी कळ सोसावी लागेल. कारण, त्यासाठी आपल्याला अजून थोडं मागे गेलं पाहिजे. फार नाही एक हजार भर वर्षं!

(क्रमश:)
चित्र: आंतरजालावरून साभार (चित्रस्रोत


अटक मटकच्या मॉनिटरकडून:
ही एक नवीन लेखमालिका सुरू केली आहे. एकुणच लसीचा शोध आणि त्याचा इतिहास समजून घेणं अत्यंत रंजक आहेच तितकंच माणसाच्या चिकाटीबद्दल कौतुक वाटायला लावणारंही आहे. तेव्हा तय्यार रहा. दर बुधवारी या मालिकेतील पुढील भाग प्रकाशित होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर किंवा फेसबुक कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही ते लेखकापर्यंत पोचवू. त्याचं उत्तर पुढील भागांत असेल किंवा आम्ही ते पुढील भागात देण्याची विनंती करू