काळी कोंबडी- पांढरी पिल्ले (माहिती)

काळी कोंबडी- पांढरी पिल्ले.
लेखन व छायाचित्रे: साधना गुलदगड

बालमित्रांनो, तुम्ही कधी पाळलेली कोंबडी आणि तिची पिल्लं नक्की बघितली असतील. हो ना? कोंबडी अंडी घालायला कधी सुरुवात करते, कोंबडीला किती पिल्लं होतात, पिल्लांचा जन्म कसा होतो, कोंबडीची पिल्लं कधी वेगवेगळ्या रंगाची, तर कधी एकाच रंगाची कशी असतात, ती कायकाय खातात असे खूप प्रश्न तुम्हाला पडत असतील ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. हे निरीक्षण आणि लेखन माझ्याच घरी म्हणजे ‘पळशी’ या गावी केले. यातील फोटोसुद्धा आमच्याच कोंबडीचे व तिच्या पिल्लांचे घेतले आहेत.

चला तर, आता आपण आपल्याला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं बघूयात.

१. या कोंबड्या अंडी घालायला कधी सुरुवात करतात?


कोंबड्यांची पिल्लं मोठी झाली की, त्यातील कोंबडा कोणता व कोंबडी कोणती हे ओळखता येतं. कोंबड्याला मोठा तुरा असतो, कोंबडीला नसतो. कोंबडीला अंड्यावर येण्याअगोदर तलंग असे म्हणतात. कोंबडा व कोंबडी जुळल्यानंतर, कोंबडी अंड्यावर येते - म्हणजेच कोंबडी अंडे घालण्यास सुरुवात करते. थोडक्यात काय तर हा कोंबडा या कोंबडीचा नवरोबा असतो. कोंबडीने अंडी दिल्यावर, ती अंडी एकत्र साठवून ती खुडूक कोंबडीखाली उबवायला दिली तरच अंड्यामधून पिल्लं येतात.

२. खुडूक कोंबडी म्हणजे काय ?


खुडूक कोंबडी म्हणजे जिने थोडे दिवस अंडी घालणे बंद केलेले असते व ती फक्त एका जागेवर बसून राहते. म्हणजे ती तिची पिल्लं उबवण्याची स्थिती असते. कोणतीही कोंबडी खुडूक कोंबडी होऊ शकते. अंडी घालणे बंद केल्यावरच ती खुडूक बनते. साधारणत: १०- १५ दिवस एक कोंबडी खुडूक स्थितीमध्ये असते - म्हणजे ती इतके दिवस एकाच जागी बसून असते. नंतर, काही दिवसात पुन्हा ती अंडी घालण्यास सुरुवात करते. जेव्हा तिची अंडी घालण्याची एक खेप (एक round/बारी) पूर्ण होते, तेव्हाच ती खुडूक होते. जेव्हा ती अंडी घालत असते, तेव्हा तिची अंडी इतर खुडूक कोंबडी घाली उबवायला दिली जातात.

३. कोंबडी किती दिवसात पिल्ले काढते?


कोंबडी ३ आठवडे अंड्यावर बसते म्हणजेच २१ दिवस कोंबडी अंडी उबवते / घोळते तेव्हा अंड्यामध्ये पिल्ले तयार होऊन बाहेर येतात. या २१ दिवसात कोंबडी रात्र व दिवस अंड्यावरच बसून असते. तिथेच झोपते. या दिवसात अंड्याची रचना बदलत असते. म्हणजेच खालची बाजू वर व वरची बाजू खाली होत असते. कोंबडी एकाच दिशेला तोंड करून बसते. दिशा बदलत नाही. ती फक्त दिवसातून एकदाच दाणा-पाणी खाण्यासाठी बाहेर येते. त्याच वेळेस ती शी करते. ती अंड्यावर घाण (शी) करत नाही. दाणा-पाणी खाऊन झाले की परत अंड्यावर जाऊन बसते.

पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाल्यवर २ दिवसात कोंबडी सर्व पिल्ले बाहेर काढते - म्हणजेच ती आपल्या चोचीने अंड्याचे टरफल हळूच फोडते व पिल्लाला अंड्यातून मोकळे करते.

४. कोंबडीची पिल्ले वेगवेगळ्या रंगाची तर कधी एकाच रंगाची कशी असतात?


जेव्हा इतर कोंबड्यांची अंडीपण एकाच कोंबडी खाली उबायला दिली तर पिल्ले वेगवेगळ्या रंगाची जन्माला येतात. तर काही वेळेस कोंबडी माणसांच्या नकळत अडोशाला जाऊन अंडी घालते व अंडी घालून झाली की तीच खुडूक होते आणि आपल्याच अंड्यावर जाऊन बसते. ३ आठवड्यानंतर पिल्ले घेऊनच बाहेर येते. तेव्हा ती सर्व पिल्ले एकसारखीच म्हणजेच एकाच रंगाची असतात. कारण ती अंडी एकाच कोंबडीची असतात व तिनेच त्यांना उबवले असते.

५. कोंबडीने काढलेली सर्व पिल्ले जगतात का?


कोंबडीच्या पिल्लांना घार, कावळा, भैरया या पक्ष्यांपासून धोका असतो, हे पक्षी संधी मिळताच पिल्लांना उचलून घेऊन लांब जातात व खाऊन टाकतात. असा धोका जाणवल्यास कोंबडी आपल्या सर्व पिल्लांना स्वतःच्या पंखाखाली घेऊन बसते. तर कधीकधी पिल्लं पाण्याने भरलेल्या भांड्यात पडून मरतात तर कधी आजाराने मरतात.

६. कोंबड्या व त्याची पिल्ले काय खाऊन जगतात?


कोंबड्या व पिल्लं बाजरी, तांदूळ, हिरवं छोटंछोटं गवत, छोटे किडे व उरलेलं शिळे अन्न खातात.

७. पिल्ले किती दिवस कोंबडीसोबत राहतात?
अंड्यातून बाहेर आल्यवर पुढील ३-४ महिने पिल्लं कोंबडीसोबत असतात. त्यानंतर कोंबडी पिल्लं सोडून राहायला लागते. तसेच पिल्लं पण आपापली फिरायला लागतात व स्वत:चे अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात.

--------

मॉनिटरकडून:
तुम्हाला ही माहिती वाचून आणखी काही प्रश्न पडले असतील तर ते आम्हांला monitor.atakmatak@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा किंवा फेसबुक पानावर कॅमेमटमध्ये जरूर विचारा.