बुलबुल आणि दगड (कथा)

बुलबुल आणि दगड 
लेखन : वैशाली सूर्यवंशी
चित्र : प्रीता

“शी बाबा! कंटाळा आला एके ठिकाणी बसून-बसून! किती दिवस झालेत मी हा इथेच...! रस्त्याच्या कडेला, उन्हाचे चटके खात, गाड्यांचे कर्कश आवाज ऐकत-ऐकत पडलोय. कंटाळा आला नुसता.” रस्त्याच्या कडेचा दगड स्वतःशीच बडबडत होता. इतक्यात जवळच्या झाडावरील बुलबुलमावशी येऊन त्याच्यावर आपली चोच आपटू लागली.

“अगं, अगं बुलबुलमावशी, हळू जरा... डोकंबिकं फोडशील ना माझं! आधीच पुरता वैतागलोय. त्यात तू आलीस त्रास द्यायला” दगड ओरडला. आवाज कुठून येतोय, हे न कळल्यामुळे बुलबुल जरा दचकलीच. इकडं तिकडं आपली मान फिरवू लागली.

“इकडं तिकडं काय बघतेयस? इथं, खाली बघ... खाली. माझ्यावर बसलीयेस ना तू?” वैतागून दगड बोलला. बुलबुलमावशीला जरा नवलच वाटलं. हे असं कधी झालं नव्हतं. यापूर्वी कितीतरी वेळा ती तिथं बसली होती. पण, आज हे काहीतरी भलतंच घडत होतं.


“कोण रे तू? तुझं काय नाव?”
“अगं, मी दगड! द ग ड म्हणतात मला!”
“सॉरी दगडा, पण तूला इतकं वैतागायला काय झालं ते जरा सांगशील का?”
“काय करू गं मावशी? आधीच एके ठिकाणी पडून-पडून पुरता पकलोय मी. त्यात तू तुझी चोच माझ्यावर आपटतेय. मग वैताग तर येणारच ना? इथं रस्त्यावरच्या गाड्यांचे ते आवाज सारखे ऐकायचे. तो धूर… जाम कंटाळा आलाय मला. किती दिवस असं एके ठिकाणी पडून राहायचं?” दगड अजूनही वैतागून बोलत होता.
“तुझं एक बरंय. वाटेल तिकडं फिरता येतं तुला. माझ्या आजूबाजूच्या कितीतरी वस्तूंची हालचाल होताना मला दिसते, पण मी मात्र नुसताच ढिम्म पडलेलो. हालचाल नाही की हिंडणंफिरणं नाही. अवघडल्यासारखं झालय नुसतं!”
"खरंय रे दगडू, तुझं! पण, तू निर्जीव आहेस ना! मग तुला कसं बरं फिरता येईल?”

आपण निर्जीव आहोत हे ऐकून दगडाला जरा वाईटच वाटलं .

बुलबुल मावशी हिरमुसलेल्या दगडाला म्हणाली, “आपण असं करू या का? तुला मी पिसं लावते माझ्यासारखी म्हणजे तुला उडता येईल. परवाच्या दिवशी त्या उंच इमारतीवरची मुलं पतंग उडवत होती. त्यांच्या पतंगाच्या मांजाने पिंपळाच्या झाडावर राहणाऱ्या कावळेदादांचा गळा चिरला. बिच्चारे! त्यातच त्यांचा जीव गेला. तुला माहितीये का... अरे, फार गप्पा मारायचे ते. आपण असं करू या, त्यांची पिसं तुला लावू या, म्हणजे तुला उडता येईल. इकडेतिकडे जाता येईल.”

“बुलबुलमावशी, आयडिया छान आहे, पण मी नक्की वरती उडेन ना? नाहीतर वजनाने यायचो खाली बद्दिशी आणि व्हायचा गोंधळ! कुणाच्या डोक्यात आपटलो, तर टाळकंच फुटायचं त्याचंही नि माझंही! नि वरून बोलणी बसतील ती वेगळी.”
“हे बघ, तुझं हे असं. तुला मदत करायला मी तयार आहे. पण, तूच नाही म्हणतोयस. अरे, पण मी तुझ्याशी बोलत काय बसलीय? माझं पिलू माझी वाट बघत असेल.”
“अय्या बुलबुलताई, तुला पिलू पण असतं? माझं का नाही गं मग छोटं पिलू?”
बुलबुलमावशी मोठ्याने हसली.
"धत वेड्या! दगडाला कधी पिलू होतं का? मी सांगितलं ना तुला, तू निर्जीव आहेस म्हणून! ना तुला हलता येत. ना तू मोठा होतोस, ना तुला भूक लागते आणि ना तुला पिलू होतं. चल बाबा, बोलत काय बसले मी तुझ्याशी!
मला होतोय उशीर. भेटेन पुन्हा. मला माझ्या पिलासाठी अळ्या गोळा करायच्या आहेत.”
बुलबुल मावशी भुरकन उडून निघून गेली.

दगड एकटाच विचार करत होता.


तेवढ्यात काही कुजबूज त्याच्या कानावर पडली.

“अरे, हा बघ. हा दगड छान आहे. अगदी मला हवा तसा!” एक मूर्तिकार आपल्या मित्राशी बोलत होता, “मी हाच दगड घेतो मूर्ती बनवायला. अगदी छान मूर्ती होईल याच्यातून.”
मुर्तीकाराने दगड उचलून गाडीवर ठेवला.

इतका वेळ ढिम्मच असलेल्या दगडाचा आता नवा प्रवास सुरू होणार होता.

रस्त्यावरील गाडीच्या आवाजाने मनुली झोपेतून जागी झाली. खिडकीत येऊन बसलेल्या बुलबुलमावशीकडे बघून नि स्वप्नातील दगडाची गंमत आठवून ती गालातल्या गालात हसत होती.