मं मं केली काय (कविता)

मं मं केली काय
लेखन: मधुरा दामले
चित्रं: अपुर्वा देशमाने

--------------------------

ओळखा पाहू ओळखा पाहू
मं मं केली काय
तपासुनी का बघता माझे
हात आणखी पाय?

चमचा आला तोंडापाशी
मं मं घेऊन छान
पडदे दिसले रंगीत सुंदर
गर्रकन वळली मान

मं मं लागली गालाला, ती
पटकन टाकली पुसून
स्वच्छ केला गाल, आईच्या
खांद्यावरती घासून

करकर आवाज वेलक्रोचा
लाळेरं टाकलं काढून
घास खाऊन फुरफुर केली
झबलं टाकलं माखून

अंगठा घातला तोंडात, लगेच
डोक्याला लावला हात
शहाणा मुलगा, मोरया करतो
मं मं खात खात

अजून एकदा चमचा आला
मारली एक डावली
मं मं सांडली फरशीवरती
आई चांगलीच कावली

पाय मारले फरशीवरती
मजेमजेने जोरात
पावलं धरून दोन्ही हातात
घातली चटकन तोंडात

पोटाला कशी लावू मं मं
विचार होतो करत
तेवढ्यात ओला रुमाल घेऊन
आई आली पळत

हात धुतले, चेहरा धुतला,
पुसून काढले पाय,
ओळखून दाखवा बरं आता
मं मं केली काय