अटक मटक बालनाट्य एकांकिका लेखन स्पर्धा २०१९

अनेक मुलांना मोठमोठ्या नाट्यगृहात टाळ्या देणाऱ्या अंधारापुढे उभं राहण्याची ऊर्मी, ईर्ष्या आणि वरदान देणाऱ्या, केवळ अभिनयच नाही तर नाटकातील प्रत्येक अंगाची ओळख करून देताना मुलांची भाषा बोलणाऱ्या आणि मुख्य म्हणजे बालनाट्याला आवश्यक तो पूर्ण आदर देत नाट्यचळवळ उभारणाऱ्या सुधाताई करमरकर आजच्या दिवशी बरोबर एका वर्षापूर्वी गेल्या!

बालनाट्यांऐवजी बालिश नाटके येणाऱ्या या काळात त्यांची कधी नव्हे इतकी गरज आहे. खूप काही घोंगावतंय डोक्यात.. ती नाट्यशिबिरं, ताईंची बालनाट्याविषयीची कळकळ, त्यावेळच्या बालनाट्यांचा दर्जा, (हल्ली मोठ्याच्याही नाटकात हावभाव नि संवादफेक म्हणजे अभिनय असे समीकरण रुळण्याच्या काळात) शारीर रचना, प्रकाश, वेषभूषा, रंगभूषा आदी अंगांकडे लक्ष देत नाटक ऐकू येण्यासोबत दिसेलही नेमकं याचं अवधान बाळगत स्टेजवर असणारी प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्ट ही नाटकाचा तितकाच महत्त्वाचा भाग असते - एक कलाकार असते- अश्या प्रकारचे विचार रुजवणाऱ्या ताई; असं बरंच काही एकाच वेळी डोक्यात फिरतंय. 'त्या काळच्या' बालनाट्याशी नातं टिकवून ठेवणाऱ्या बहुधा त्या शेवटच्या राहिल्या होत्या. काही मोजके अपवाद वगळले तर, आता केवळ चेहऱ्याला रंग लावून कार्टून कॅरेक्टर्सचे कपडे घालून केलेल्या दंग्याला बालनाट्य म्हणायचा मोठा कठीण काळ मागे राहिलाय या विचारानेच खिन्नता येते!

अटक मटक तर्फे सुधाताई करमरकरांना मन:पूर्वक आदरांजली!

मात्र केवळ आदरांजली देऊन भागायचं नाही याचं भान बाळगून आहोत. त्यामुळे आज या निमित्ताने बालनाट्य एकांकिका लेखन स्पर्धा घोषित करत आहोत.
विजेत्यास पुढील प्रमाणे रोख रकमेचे बक्षीस मिळेल:
प्रथम क्रमांक: रुपये ३००० फक्त
द्वितीय क्रमांक: रुपये २००० फक्त
तृतीय क्रमांक: रुपये १००० फक्त

याबद्दलचे नियम पुढील प्रमाणे

१. लहान मुलांसाठी (शालेय मुलं हा प्रेक्षकवर्ग) लिहिलेल्या एकांकिकांची संहिता (लेखन) स्पर्धेसाठी पाठवायचे आहे. लेखकाच्या वयाबद्दल कोणतीही अट नाही
२. सदर लेखन हे लेखकाचे स्वत:चे असणे अनिवार्य आहे.
३. अ. अनुवादीत/इतर कथांवरून स्फुरलेल्या नाटकांना बंदी नाही, मात्र मूळ लेखक/नाटककाराच्या परवानगीचे पत्र सोबत जोडावे लागेल. व सदर एकांकिका कशावरून स्फुरली आहे/कशाचा अनुवाद आहे याचा स्पष्ट उल्लेख अनिवार्य आहे.
    ब. स्वत:च्या पुर्वप्रकाशित नाटकांना बंदी नाही, मात्र प्रकाशकाच्या परवानगीचे/आक्षेप नसल्याचे पत्र सोबत जोडावे लागेल. 
४. प्रताधिकाराचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.
५. विजेत्या एकांकिका अटकमटकवर प्रकाशित केल्या जातील. त्यासाठी विजेत्यांची परवानगी आताच गृहीत धरली आहे. मात्र त्या संहितांचा प्रताधिकार (कॉपीराइट) हा केवळ लेखकाचा असेल. त्या एकांकिकांचे प्रयोग करायचे असल्यास किंवा कोणत्याही माध्यमांत पुनर्प्रकाशन किंवा वाचन किंवा कोणतीही कलाकृती करायची असल्यास लेखकाची परवानगी आवश्यक असेल. त्यासाठी लेखकाची संपर्क व्यवस्था प्रकाशित केली जाईल (लेखकाने आम्हाला प्रताधिकार मुक्ततेबद्दल कळवले तर ते तसे संहितेसोबत घोषित केले जाईल)
५. विजेत्या एकांकिकांव्यतिरिक्त आम्हाला पाठवलेल्या अन्य एकांकिकांचा प्रताधिकारही सर्वतोपरी लेखकाचा असेल. लेखकाच्या परवानगीने आम्हाला या एकांकिकांची संहिता प्रकाशित करायला आवडेल. मात्र तो निर्णय आणि प्रताधिकार अंतिमतः लेखकाचा असेल.
६. निकाल घोषित झाल्यावर व एकांकिका अटकमटकवर प्रकाशित झाल्यावर एका महिन्याच्या आत बक्षिसाची रक्कम विजेत्याच्या बँक अकाउंटमध्ये थेट वर्ग (ट्रान्स्फर) केली जाईल. त्यासाठी सध्या तरी कोणताही सोहळा नियोजित केलेला नाही.
७. नाटकाच्या संहिता युनिकोडमध्ये असणे बंधनकारक आहे. लिखित संहिता कागदावर असेल तर खालील ईमेल पत्त्यावर आमच्याशी संपर्क करा.
८. सदर संहिता ५ एप्रिल २०१९ पर्यंत आमच्या monitor.atakmatak@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवाव्यात.
९. तीनही विजेते घोषित होण्यासाठी किमान ७ संहिता आम्हाला मिळणे अपेक्षित आहे. त्याहून कमी संहिता आल्यास किती क्रमांकांना बक्षीस द्यायचे याचा निर्णय अटक मटक व्यवस्थापन मंडळाचा असेल.
१०. या स्पर्धेबाबत सर्व प्रकारचा अंतिम निर्णय अटक मटक व्यवस्थापन मंडळाचा असेल.