आम्ही गोष्टी लिहून ऱ्हायलो - १: घाबरट भुऱ्या (गोष्ट)

घाबरट भुऱ्या 

लेखक- निशा चांदेकर, वर्ग-५वा

चित्रे - विशाल माने

संकलन व संपादन: कृत्तिकाताई

रोहित दिसायला खूपच सुंदर होता, त्याचा पांढरा रंग पाहून त्याला सगळे भुऱ्या म्हणत होते. त्याच्या सुंदर दिसण्यामुळे त्याला नाटकात हिरॉईनचे काम टीचरने दिले होते. अभ्यासात भुऱ्या नंबर एक होता. पण भुऱ्या दुनियाभरचा घाबरट होता. त्याला साप ,पाल विंचू, गाय, बैल, कुत्रा यांची भीती तर होतीच, पण तो मांजर, बकरी, कोंबडी, पोपट, कोळी, मुंगीला पण घाबरत होता. त्याला चिडवायचे झाले तर सगळे डरपोक डल्या म्हणायचे. एकदा वर्गात त्याच्याच दप्तरावर पाल पडली, मस्त मजा आली! भुऱ्या जोरजोरात ओरडत सगळ्या वर्गाभर धावला आणि रडू लागला. आम्ही पाल मारून टाकली आणि भुऱ्याला दाखवली तरी भुऱ्या दप्तराला हात लावायला तयार नाही. 

शाळा सुटली पण भुऱ्या दप्तर न्यायला तयार झाला नाही. भुऱ्याची आई आली आणि तिने दप्तर नेले. दोन दिवस भुऱ्या शाळेतच आला नाही. पाल पडते शाळेत म्हणून त्याने शाळा सोडली, त्याला बोलवायला टीचर गेली, सर गेले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गेले, केंद्रप्रमुख गेले पण भुऱ्या शाळेत येण्यास तयार झाला नाही.


भुऱ्याची भीती घालविणे हा एकच उपाय होता.
टीचरने भुऱ्याला म्हटले, "आपण वर्गात नाही बसू, बाहेर मैदानात सावलीत बसू, आता तरी येशील काय?"
भुऱ्या तयार झाला, पण त्याने नवीन दप्तर घेऊन मागितले. टीचरने त्याला नवी प्लास्टिकची थैली दिली. टीचर रोज मोबाइलवर वेगवेगळे प्राणी, पक्षी यांची विडिओ दाखवत होती. पांढरा मोर, पांढरा सिंह, सुंदर सुंदर पक्षी खूप मजा यायची. 'किती सुंदर, व्वा, छान, मला हा पक्षी आवडला.' असे सगळेजण म्हणायचे, ओरडायचे. भुऱ्या हळूहळू आमच्यात सामील झाला. 

त्याला रंगीतवाला पोपट खूप आवडला, असे तो टीचरजवळ म्हणाला. मांजरी, कुत्रे, वेगवेगळे प्राणी कसे माणसासोबत वागतात आणि मजा येते हे टीचर दाखवत होती.  सुंदर मांजरी आणि कुत्रे पाहून मजा वाटायची. आमच्या गावातल्या मांजरी आणि कुत्रे कसेतरीच वाटत त्यांच्यापुढे. वेगवेगळ्या व्हिडीओतुन प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या हालचाली पाहून आम्हाला प्राणी पक्षी आवडायला लागले. पाहुणे आले तरी घरची कोंबडी पण कुणी कापू देईना! भुऱ्याला मांजरी आवडायला लागल्या, पण मोबाईल मधल्या. त्याची भीती मात्र कमी झाली होती, तो आता घाबरत असला तरी ओरडत नाही की पळत नाही, की शाळा सोडून जात नाही.

मला तर पांढरा मोर खुप आवडला होता.