आम्ही गोष्ट लिहून रायलो ३ - माकड घरात शिरलं

माकड घरात शिरलं

लेखन : प्रज्वल इटनकर वर्ग ७वा, जि. प. उ. प्राथमिक शाळा,गोवरी, जिल्हा चंद्रपूर

चित्र: प्रज्ञा ब्राह्मणकर

माकडं गावात आली की आमा पोराला मस्त मजा येते. माकडाले हाकलतानी ते कसं दात काढते तव लय भेव लागते.
माकडाची शेपूट मले मस्त आवडते. त्याच्यावाणी लांब शेपूट आणि कोणत्या जनावराची नाय दिसली मले आतावरी.


झाडाले फळ आले का माकडाची टोळी गावात शिरते. समदे झाड,फांद्या, फळ,पान, फुल नावनाव कचरा करून टाकते. पाणी प्यासाठी तर टाक्यामंदी तोंड घालून नाव पाणी घाण करून टाकते. कपडा वाळू घालची दोरी तर त्याले का वाटते, का माहीत नाय! नसती  वडवत रायते, तोडून टाकते, कपडे घेऊन जाते. कुत्रे मस्त मागं लागते माकडाच्या. करत काहीच नाय हे कुत्रे निव्वळ भूकते, कल्ला सगळा. जवळ रायलं माकड तर कुत्रं त्याचायवर कवा बी जावून पडलेलं मले दिसलं नाय. 

आमी दार लावून टाकतो माकड आली म्हणजे. आदी आमी असे नाय करो, पण माकडाच्या का मनात आलं असलं का त्याईन फळ खान सोडलं अन सैपाक घरात घुसून पोळी गिन तर खान सुरू केलं.

त्या दिवशी एक भल मोठं माकड आमच्या घरात शिरलं,  अन घरभर फिरलं नि निघून गेलं.पुन्हा दुसऱ्या दिवशी आलं अन पाण्याच्या हंड्यावरच झाकण काढलं.

एक वेळ आई पोळ्या करत होती, माकड कवा आलं तिले पत्ता नाय, ते आईनं पोळी टोपलीत टाकली का खाये, अस करू करू चार पोळ्या खाल्या त्यानं.आईच्या लक्षात आलं तवा ते घाबरून गेली. तिले तर पराले बी जागा नोयटी,खाते त खा बाप्पा म्हणून ते जागीच पोळ्या टाकत रायली, पण माकड गेलं ४ पोळ्या खाऊन.

त्या माकडाले सवय लागली का आमच्या घराची .एक दिवस घरात आलं, डबे ठेवलेल्या कपाटा वर जाऊन बसला अन का तपास केला का त्यानं, शेंगदाण्याचा डबा घेऊन गेलं. आई मस्त वरडे, हाकलले करे, पण ते कोणाले ऐकते? समोरच्या भीतीवर बसून समदे शेंगदाणे खाऊन डबा फेकून गेलं ते.

आता मले माकड अजिबात आवडत नाय, ते तरास देणारा प्राणी हाय. कोणाच्या कोणत्याच कामच नाय माकड. मले तं आता त्याची शेपूट धरून आदरूशा वाटते.

पण एक गम्मत हाय, एक डाव माकड मस्त्या करता करता लाईट च्या dp वर चढलं शाक बसून दणकून पडलं अन मेल. तवा समदे माकड त्याच्याभोवती जमा झाले,खाणं पिण सोडून मस्त्या सोडून समदे गोलगोल बसून रायले, गावात मयत झाल्यावर लोक गोळा होते तसेच.
तवापासून मले वाटते माणूस माकडपासून बनला हाय.