आम्ही गोष्ट लिहून रायलो ४- दारूबंदी

दारूबंदी
लेखक: पायल लोहे,  वर्ग ६वा, जि. प. उ. प्राथमिक शाळा,गोवरी, जिल्हा चंद्रपूर
चित्र: विशाल माने

चंद्रपुरात दारूबंदी होणार म्हणून सगळ्याले खबर झाली. अन आमच्या गावात घरोघरी दारू आली. दारू बंद होवाच्या आधी मन भरून पिऊन घ्यावं म्हणून लगीत लोकायन बाटल्या आणून ठेवल्या. नंतर प्याले भेटावं म्हणून
घराच्या आडावर, पलंगाखाली , शिबल्यात बाटलाच होत्या. घरात निसता वास घुमत होता.

आमच्या बाबाले दारूचा तसा शौक नाही, पण पुन्हा प्याले भेटणार नाही म्हणून त्या दिवशी ते लय पिऊन आले.  घरी आले तसेच दारामंदी पडले. आम्हलले का माहीत का हे दारू पिल्याने पडले, आई तर लडतच बाहेर आली.  चार लोक मिळून बाबाले उचलून बाजेवर ठेवले, तवा ध्यानात आलं हे दारूचं काम आहे म्हणून!

थोडा येळ झाला नाही झाला, बाबा उलट्या करायले लागले. छि बाप्पा , किती घाण वास घरात, मले बी उलटी आल्यावाणी वाटे. सांगताना बी कसचं होतंय. आईचं मले नवल वाटे, ते समदी घाण पुन्हा पुन्हा साफ करे, बाबाच तोंड धुवून दे, तिले कशी किळस नाही ये अन तिचा जीव कसा उलटीवणी नाही लगे समजेना.
आई मले जवा मने, "जा बाई, गिलासभार पाणी आन" मले नेऊशा नाही लगे. पण का करते, बाबा मले लय लाड करते, आई मारते पण बाबा कवा बी नाय मारत. मले बाबाची कीव बी ये अन राग बी ये.

रातभर बाबा उलट्या करत होते, आई रातभर जागली, दारू विषारी तर नाय न म्हणून चार घरी विचारून आली, डाक्टर ले बी बलावली. रातभर आई उपाशीच राहिली. आमाले बी त्या वासान जेऊशा नाही लागलं.
आमी समदे जण उपाशीच रायलो.

बाबाकडं पाहून कसकाच वाटे. मले तर रडू आलं,  जवा काही लोक जहरिली दारू तर नाय पेली यानं म्हणून बोलत होते. मजा लहान भाऊ मले विचारला, "दादा बाबा मरंल का रे?"
मी म्हणालो ,"चूप आई आयकल तर?"
आजी बी होती ओसरीवर ते मनली, "नाय मरायचा तुआ बाप! त्याले पचत नाय दारू, त्याले माहीत होतं, तरी ढोसली त्यानं. एकडाव 'इलेक्शन'मंदी पेली होती अशीच,तवा बी असाच रातभर उलटया करे. जिवाले घोर! तुमी लडू नका, काय नाय होत, जावा अन जेवून घ्या." पण आजीले बी काय बरं लागेना, ते बी उलटी झाली की धावू धावू जाये अन बाबाच्या पाठीवरून हात फिरवे. आमी बी नाय झोपलो.

सकाळी बाबाची दारू उतरली तर बाबा कसतारीच दिसत होता, घाणेरडा वास अन लाल लाल डोळे.
आजीनं च्या दिला , घर आईनं धुवून काढलं. घरात उद पेटवली, रातच्याला केलेला सैपाक गरम करून आमले दिला. बाबाले गरम पोळी अन अंड्याची भुजी दैली. बाबा उलटयान कमजोर झाला म्हणे. आम्ही बाबसंग त्या दिसी बोलची हिम्मत नाय केली.

तवापासून बाबानं दारुले हात नाय लावला हाये.