आणि कोरोना पळाला... (गोष्ट)

आणि कोरोना पळाला...

संकल्पना: वेदांत जोशी, इयत्ता १ ली, वुडरिज हाय स्कूल, औरंगाबाद
शब्दांकन: मुक्ता कुलकर्णी, औरंगाबाद
चित्र: निहार ओंकार डबीर, वय ११ वर्षे

 एक होता तुमच्यासारखाच छोटासा आणि चुणचुणीत मुलगा. त्याच नाव ‘वेदांत’. एके दिवशी घरात खेळत असताना दारावरची बेल वाजली. कोण आहे, ते वेदांतने दाराच्या फटीतून बघितले, तर त्याला एक गोलमटोल मोठ्ठा पाहुणा दिसला. त्याच्या डोक्यावर छोटीशी शिंगे होती.

सध्या सुरू असलेल्या साथीमुळे वेदांतला बाहेरून आलेल्या पाहुण्यांशी कसे वागायचे आणि आपण काय काळजी घ्यायची हे चांगलेच ठाऊक होते. 

दार उघडण्याआधी वेदांतने तोंडावर मास्क घातला. या नव्या पाहुण्याला भेटायला, तो अगदी उतावळा झाला होता. पण, त्याला एकदम लक्षात आले, की पाहुण्याने तर तोंडाला मास्क लावलाच नव्हता. वेदांतने ओरडून आतूनच सांगितले, “आधी मास्क लाव आणि बाहेर ठेवलेले सॅनिटायझर हातावर लाव.मगच आत ये.”
पाहुण्याने हाताला सॅनिटायझर लावताच त्याच्या हाताची आग आग झाली .

आत आल्यावर त्याने पाहुण्याला विचारले, “कोण रे तू, कुठून आलास?”
पाहुणा म्हणाला, “मी आलोय खूप दुरून. शेजारच्या देशातून.”
या पाहुण्याला कुठेतरी  खूप बघितल्यासारखं वेदांतला वाटत होते आणि मग एकदम त्याला आठवले. अरेच्या! सध्या वर्तमानपत्र आणि जाहिरातीमधून सतत दिसणारा हा तर ‘कोरोनाचा विषाणू’! आधी तो घाबरला, पण नंतर त्याने या पाहुण्याला चांगलाच धडा  शिकवायचे  ठरवले.

वेदांतने त्याला लिंबू पाणी प्यायला  दिले. इतका लांबचा प्रवास करून त्याचे मळलेले कपडे बघून त्यालासरळ आंघोळीलाच पाठवले आणि आंघोळीला दिले गरम पाणी , डेटॉल घातलेले. मग त्याला गरमागरम काढा प्यायला दिला, तो देखील कडुलिंबाचा.तोंड वाकडे करत पाहुण्याने तो कसाबसा पिऊन टाकला. 

या सगळ्या गडबडीत वेदांतला समजले की पाहुण्याचा आकार थोडा लहान झाला आहे. जेवताना त्याने हिरव्या पालेभाज्या, लिंबू आणि टोमॅटो खायला दिले. व्हिटॅमिन 'सी' शरीराला प्रतिकारशक्ती देते, हे त्याला माहीत होते. कोरोना आता आणखीनच लहान दिसू लागला. 

मग दोघे गेले उन्हात खेळायला गच्चीवर. उन्हामध्ये  कोरोनाच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली. तासभर खेळून दमून दोघे घरात परतले. आईने दोघांना मोसंबी खायला दिली. आता मात्र कोरोना अगदी छोटासा दिसू लागला. तो वेदांतला म्हणाला "मला बरं नाही वाटत रे."


वेदांतने त्याला सांगितले, “आपण डॉक्टर काकांना बोलावू, ते तुला छान लसीचे इंजेक्शन देतील, अजिबात दुखणार नाही तुला. तसा तू आम्हाला वर्षभर खूप त्रास दिला आहेस. आता तुझी पाळी!”
कोरोना म्हणाला, “नको नको, मला इंजेक्शन नको. मला भीती वाटते. मी या घरातून काय, या देशातून -  नाहीतर या पृथ्वीवरूनच पळून जातो.”
असे म्हणून तो असा काही धूम पळाला, की परत कोणालाच दिसला नाही.

 

मित्रांनो, तुम्ही देखील वेदांत सारखी काळजी घ्या, मग बघा, हा कोरोना कसा पळून जातो.