कावळ्यांचे श्रमदान (गोष्ट)

कावळ्यांचे श्रमदान
लेखन - श्री. गुलाब रमेश बिसेन, कोल्हापूर
चित्रेः सोमनाथ अलकुंटे


उन्हाळ्याचे दिवस होते. रखरखत्या उन्हात एका जंगलात तहानेने व्याकुळ झालेला एक कावळा पाणी शोधत होता. पाणी शोधत असताना कोरडा पडलेल्या तलावात त्याला पाण्याने भरलेले एक डबके दिसले. पाण्याने भरलेले डबके बघून त्याला खूप आनंद झाला. क्षणार्धात तो पाणी पिण्यासाठी डबक्याजवळ उतरणार एवढ्यात तिथे एक भला मोठा गवा आला आणि गटागट पाणी पिऊ लागला. काही क्षणातच पोटभर पाणी पिऊन तो गवा निघून गेला. तोपर्यंत कावळा शेजारच्या पळसाच्या झाडावर सावलीला बसून त्याच्या जाण्याची वाट बघू लागला.

गवा तिथून निघून जाताच तो त्या डबक्याजवळ आला. डबक्याजवळ आल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला. मगाशी काठोकाठ भरलेले डबके गव्याने पाणी प्यायल्याने निम्मे रिकामे झाले होते. मगाशी काठावरून सहज पाणी पिता येईल असे वाटत असताना, आता मात्र पाणी पिण्यासाठी कावळ्याला कसरत करावी लागणार होती. पाणी पिण्यासाठी काही करता येते का? हे तो बघू लागला.

काठावरून पाणी पिणे शक्य नसल्याने कावळ्याने पपईच्या झाडाची एक मोठी फांदी तोडून आणली. त्या पोकळ फांदीचा स्ट्राॅ सारखा वापर करण्यासाठी त्याने ती पाण्यात टाकली.
तोच त्याच्या कानावर, "आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा! आम्हाला जीवदान द्या." असा आवाज ऐकू येऊ लागला. अचानक आलेल्या या आवाजाने कावळा दचकला. तो दचकून अवतीभवती बघू लागला. परंतु, त्याला कोणीच दिसले नाही. तो परत पाणी पिण्यासाठी सज्ज झाला. परत तोच आवाज! त्याला काहीच कळेना.

तो परत अवतीभवती बघू लागला. त्याला अवतीभवती कसलीच हालचाल दिसली नाही. त्यामुळे तो आवाज डबक्यातून तर आला नसेल ना? अशी शंका त्याच्या मनात आली. तो वाकून पाण्यात बघू लागला. त्याला डबक्यात छोटे छोटे मासे पाण्यावर तरंगताना दिसले.
त्यांना बघून तो म्हणाला, "माशांनो, तुम्ही मला आवाज दिला काय?"
"होय, आम्हाला वाचवा."
"पण मी तर तुम्हाला काहीच केलेले नाही. मी इथे फक्त पाणी प्यायला आलोय. मी तुम्हाला कुठलीही इजा पोहचवायला आलेलो नाही."
"कावळे दादा, आम्हाला वाचवा. आमच्या डबक्यातलं पाणी तुम्ही सर्व प्राणी पक्षी पिऊन संपवल्यावर आम्ही कसं जगायचं. मगाशी पाणी पिऊन गेलेल्या गव्याने तर आमचं पुढच्या महिनाभराचं पाणी एका झटक्यात संपवून टाकलं. आता तुम्हीच सांगा आम्ही कसं जगायचं?"

माशाची ही व्यथा ऐकून कावळा अधिकच हळवा झाला. त्याला काय करावे काही सुचेनाच. तहान तर खूप लागलेली आहे. अशात माशांचा जीव वाचवणेही गरजेचे आहे. तो द्विधा मन:स्थितीत पडला. पाणी प्यावे तर माशांना त्रास होणार आणि पाणी नाही प्यायलं तर जीवाला मुकावे लागणार. कावळा विचारात पडला. या समस्येवर काही उपाय सापडतो का ? याचा तो विचार करू लागला.

क्षणभर विचार करून तो माशांना म्हणाला, "माझ्याकडे या समस्येवर उपाय आहे."
"कुठला, कुठला" म्हणत मासे एका सुरात ओरडले.
"उपाय सांगतो पण ते एका अटीवर."
"अट? आम्हाला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. पण उपाय सांग." एक मासा ओरडला.
"मी तहानेने व्याकुळ झालोय. या परिसरात कुठेच पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे तुम्ही मला आधी पोटभर पाणी पिऊ द्या. मग मी तुम्हाला उपाय सांगतो."
"ठीक, ठीक." सर्व मासे एका सुरात म्हणाले.

तहानलेला कावळा सर्व भान हरपून पाणी पिऊ लागला. पाणी पिऊन झाल्यावर तो माशांना म्हणाला, "मी माझ्या सर्व कावळे मित्रांना हाक मारतो. ते सगळे आले की आम्ही सर्व मित्र मिळून रोज सायंकाळी एक तास जंगलाशेजारच्या नदीतील पाणी संपूर्ण उन्हाळा संपून, पाऊस येईपर्यंत तुमच्या डबक्यात भरून ठेवण्यासाठी श्रमदान करतो."
कावळ्याच्या या श्रमदानाच्या कल्पनेने सारेच मासे भारावले. त्यांनी कावळ्याचे मनोमन आभार मानले.

ठरल्याप्रमाणे कावळ्याने काव काव करत आपल्या सर्व मित्रांना बोलावून आणले. त्यांना आपली श्रमदानाची कल्पना सांगितली. सर्व कावळ्यांना त्याची कल्पना खूप आवडली. त्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी पळसाच्या झाडाचे एकएक पान तोडून चोचीत घेतला. सर्वांनी त्याचा द्रोण तयार करून ते नदीचे पाणी आणून माशांच्या डबक्यात ओतू लागले.