दंगा (गोष्ट)

दंगा
लेखन: अमृता गोटखिंडीकर
चित्र: अमृता पुजार


“देवासमोर दिवा लावा ग पोरींनो जरा…”

“बंड्या, आता बास झालं तुझा टीव्ही,जरा रिमोट दे.”

“भावजी, अहो आमची सिरीयल आहे आता..”

“अगं इथे गावात कुठे तुमच्या सिरिअली…”

“दादा, शेख्या भेटला का रे?”

“अरे, आता आलोय मी त्याच्याकडून . सगळे जमले होते कट्ट्यावर.. राणी, चहा देतेस का?”

“दादा, सगळे भेटल्यावर कुठे कामाचं बोलतोय तू त्याच्याशी! पण एकदा सोक्षमोक्ष लाव काय तो.”

“बघू उद्या-परवा..रिमोट दे रे”

“भावजी...च्यक”

“बाबा, मग मला तुमचा फोन द्या..”

“फोन वगैरे काही नाही ... अभ्यास केला का? राणी, बघ गं याच्याकडे. इथे आला की उंडारतो नुसता”

“मला आता वेळ नाही, माऊकडे बघू द्या जरा . माऊ!”

“मला भूक नाही आई..”

“वहिनी, दादाबरोबर माझापण चहा टाका…”

“देवासमोर दिवा लावा ग पोरींनो जरा..”

“राणी, आई काय म्हणते आहे, बघ जरा”

“अहो, किती जणांकडे लक्ष देऊ? माऊ, ताटातलं संपवायचं सगळं.”

“धाकाली सुनबाई, तेल वात आहे का…”

“बघते”

“काका, तुझा तरी फोन दे”

“मला पाहिजे फोन”

“मला पाहिजे”

“मला..”

“मला..”

धाप ..

“आSSSS   काकू याने मला मारलं…”

“हिने माझे केस ओढले…”

“बस हा आता... रडारड”

“अरे  शांत बसा.. जरा बातम्या ऐकू द्या”

“तुम्ही आणि तुमचा काका..  घाला गोंधळ!”

“माऊ, दोन मिनिटांत आली नाहीस जेवायला, तर सटका देईन हा..”

“दिवा लागला वाटतं हा?”

“अगं, चहा टाकतेस ना?”

“अहो, वहिनींनी टाकलाय.. होतोय”

“माऊ…”

“मी खेळायला जाऊ का?”

“बंड्या, इथे बस.. काही गरज नाही”

“अहो, सांगा ना माऊला.. जरा तुमचं लक्ष नाही”

“हम्म्म”

“माऊ, तू ठोंब्या आहेस असं आई म्हणते.. ठोंब्या म्हणजे काय गं?”

“तू गप्प बस....”

“ठोंब्या ठोंब्या..”

“आई....”

“तूच ठोंब्या…”

“आई! आ…”

“आता जर तुमचा दंगा थांबला नाही तर बघा.. परत काकाने सांगितलं नाही म्हणू नका”

“अरे, जरा बातम्या ऐकू द्या…”

“श श श ... आता कशी लाईट गेली..”

“खळ्ळ.. खळ्..”

“काय फुटलं?”

“चहा ओतत होते, नेमकी लाईट गेली..”

“आई उकडतंय”

“सुनबाई, नेहमी लाईट जाते इथे.. येईल २ तासात”

“आजी .. २ तासात! किती उकडतंय!”

“अरे जरा थांब , सुटेल आता वारा”

“चहा होतोय ना?”

“आता कुठे... आधी मेणबत्ती शोधू द्या”

“अगं, दोन कंदील काचा पुसून, वाती घालून देव्हाऱ्याच्या मागे ठेवले आहेत. तुम्ही येणार म्हणून... घ्या ते..”

“काकू उकडतंय…”

“वहिनी, सापडले हो कंदील.. दिवा पण लावलाय देवासमोर…”

“त्यातला एक कंदील दे ग इथे स्वयंपाकघरात, भाऊजींना आणि  ह्यांना चहा टाकते परत…”

“आज्जी, उकडतंय…”

“अगं चहा नको, पन्हं करते मी  सगळ्यांना. फ्रिजमध्ये आहे बघ कैरीचं पन्हं! माऊ, माठातलं पाणी आण तांब्याभरून. बंड्या, जा बर्फ आण”

“बरं. देते..”

“आई, कर कर . किती दिवसांनी …”

“मी पण येते बंड्या”

“धाकल्या सुनबाई, मोगऱ्याची फुले आहेत बघ आता काढलेली.. जरा इथे ठेव आणून ती.. माऊ, आता वारा सुटेल मग तुला मोगरीने अजून बरं वाटेल.” 

“राणी, एक मोठे पातेले आण गं! आणि, ग्लास आहेत का बघ ..”

“मी आणतो”

“मी पण येते”

“अगं हळू…”

“धाड टन टन…”

“हा हा…”

“आई”

“याने मला पाडलं…”

“बंड्या... माकडा.. बघते तुला...धाड धाड”

“आयआयई....”

“अहो आई, मीठ, पन्हं इथे ठेवलंय हं”

“हाहा .. अगं तू कशी पडली ? मला उचलायला आलीस… हाहा…”

“माऊ हसू नकोस... थांबा बघते…”

(पळापळीचे आवाज , हसण्याचे आवाज)

“पकड त्याला…”

“अरे काय चाललं आहे, राणी, आलो हा मी आत…”

“माऊ, तू तिकडून धर, आपण हे पातेले आजीला देऊ…”

“सावकाश या रे पोरांनो…”

“भावजी हे बर्फाचं निघत नाही फ्रिजमधून! जाम झालंय..”

“आलो आलो…”

“हळू ठेव इथे पातेलं..”

“आजी मी मदत करू…”

“बरं.. जा, एक ओगराळे घेऊन ये हलवायला..”

“म्हणजे?”

“आजी मी आणतो…”

“माऊ, तू तोपर्यंत पन्हं टाक पाण्यात.. चांगले १० चमचे भरून.”

“१..”

“२..”

“दादा, निघत नाही हे बर्फाचं…”

“बघू …”

“ओढ..”

“अरे.. हा हा.. विऱ्या माझ्याशी मस्ती…”

“दादा, तू लहानपणी माझ्या शर्टात टाकलेला बर्फ.. घे आता..”

“३..”

“४”

“५”

“हाहा”

“हाहा”

“दाद्या, हा घे तुला…”

“अहो लहान आहात का? विरुभावजी तुम्ही तरी…”

“हाहा... अय्या…”

“काका.. हा घे. टाक हा बर्फ अजून बाबाच्या शर्टात..”

“थांब बघतो तुला.. फार काकाच्या लाडाचा आहेस … विऱ्या, थांब पळू नकोस”

“हाहा”

“पोरांनो.. पडताल.. उंबरे सांभाळून..”

“आई, दादाला सांग…”

“विऱ्याने सुरुवात केली.”

“दादोबा, विरोबा काय हा दंगा…”

“इश्श, बंड्या आपला  बाबा आणि काका छान भांडतात नाही?..”

“काका शूर आहे पण..”

“हट् बाबा शूर आहे…”

“हट्..”

“हट्..”

“झालंय रे पन्हं पोरांनो”

“आजी, काय काय गं घातलंय पन्ह्यात?”

“थोडं भांडण, थोडं हसू आणि मीठ..”