दंश अमावस्या (कथा)

दंश अमावस्या

लेखन: राजीव तांबे 
चित्रं: योगिता धोटे

(वाचकांचा वयोगट शिफारस: १३+ वर्षे)

लहानपणापासूनच गणेश अतिशय हुशार आणि सालस मुलगा. कधीही कुणाशी भांडण नाही आणि कधीही कुणाला उलटून बोलणं नाही. सर्वांना मदत करायला नेहमी तत्‍पर. या अशा स्वभावामुळे गणेश जगमित्र होता, हे काही वेगळं सांगायला नको. गणेश कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. हुशार विद्यार्थी म्हणूनच त्याला सगळे ओळखायचे. घरी गणेश आणि त्याची आई असे दोघेच राहात.
तो शनिवारचा दिवस होता.


गणेश दुपारीच कॉलेजातून घरी आला. आणि पाहतो तर काय.. आई दार बंद करून घराबाहेर उभी होती. भितीने लटपटत होती. गणेशला कळेना, काय झालंय काय?
आई थरथरत म्हणाली, “घरात मोठा विषारी नाग शिरलाय. ताठ होऊन, फणा काढून डोलतोय. डोळे मिचकावत जिभल्या चाटतोय. मी कशीबशी घराबाहेर पळाले आणि दार लावून घेतलं. म.. माझी हिंमत नाही घरात जाण्याची. अं.. आता काय करायचं? कुणाला बोलवायचं? घरात कसं जायचं? मला काहीच कळत नाहीए.”
एव्हढं बोलूनसुद्धा आईला धाप लागली. ती गणेशचा हात धरुन तिथेच पायरीवर बसली.

गणेशला त्या नागाचा प्रचंड संताप आला. नागाला फटकावण्यासाठी तो काठी शोधू लागला. घरात जाऊन नागाला दोन फटके मारायचे आणि कोयत्याने त्याचे चार तुकडे करायचे असं त्याने ठरवलं.
आईला घराबाहेर काढणार्‍या नागाला मारूनच टाकायचं गणेशने ठरवलं. गणेश भलताच भडकला होता. कोयता आणण्यासाठी तो शेजारच्या घरी गेला.
गणेशच्या घरात मोठा विषारी नाग शिरल्याची बातमी तर सगळीकडे पसरलीच, पण गणेशचा पराक्रम बघण्यासाठी आजूबाजूचे शेजारी-पाजारी सगळे जमले. सगळेच मनोमन घाबरलेले.
घरात सहा फूट मोठा विषारी नाग आहे, हे कळल्यावर गणेशसोबत घरात जायला कुणीच तयार नाही.
पण गणेश रागाने पेटला होता. त्या नागाची खांडोळी केल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं. गणेशने दरवाज्याची कडी काढली आणि लाथ मारुन दरवाजा उघडला. माणसं दचकून दोन पावलं मागे सरकली.
एका हातात काठी आणि एका हातात कोयता घेऊन गणेश घरात शिरला. नाग ताठ होऊन समोरच फणा काढून डोलत होता.

असला प्रचंड नाग पाहताच जमलेली माणसं आणखी मागे सरकली.
पण गणेश अजिबात घाबरलेला नव्हता. तो नागाच्या समोर जाऊन उभा राहिला. नागाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला..आणि तेव्हाच तो विचित्र प्रकार घडला.
गणेशच्या हृदयात कालवाकालव झाली. डोक्यात काहीतरी उसळलं, सळसळलं. शरीरातलं रक्त अचानक वाहायचं थांबतंय की काय? असं वाटू लागलं. जीभेतून सणसणून कडकडीत कळ आली. अचानक शरीर थंड पडतंय असं वाटू लागलं आणि गणेश नागासारखाच डोलू लागला.
गणेशच्या हातातील कोयता गळून पडला. त्याचा ‘खण्ण’ आवाज येताच बाहेरची लहान मुले घाबरली.
आता नाग पुढे-पुढे सरकत गणेशच्या डोळ्यात डोळे घालून पाहतच होता.
गणेशने हातातली काठी लांब भिरकावून दिली. गणेशपण दोन पावलं पुढं सरकला आणि नागाला आलिंगन देण्यासाठी त्याने दोन हात फैलावले.

बाहेरची माणसं घाबरली. गणेशच्या मदतीला आपण कोयते घेऊन आत जावं, असं त्यांना वाटू लागलं. आता नाग फणा फुगवून पूर्ण ताठ झाला. सहा फूट ऊंच! आणि गणेश आत्मविश्वासाने नागाच्या दिशेने पुढे सरकू लागला. आई भितीने थरथरू लागली. आता गणेशला कसं रोखावं हे तिला कळेना. कारण आता गणेश एक पाऊल जरी पुढे गेला तरी त्याचा मृत्यू अटळ होता. गणेशला अडविण्यासाठी आई शेजार्‍यांना हात जोडून विनंती करू लागली. पण घरात जाण्याची कुणाचीच हिंमत होईना.
आणि तेव्हाच गणेशने नागाला कवेत घेतलं. नाग सरसरत गणेशच्या अंगावर चढला.

बाहेर अस्फूट किंचाळून आई बेशुद्ध पडली. मुलांनी घाबरून आरडाओरड केली. माणसं आपल्या मुलांना मागे ओढत लांब पळाली.
नागने आपली जीभ गणेशच्या कानात सरसरवली. मग गणेशच्या खांद्यावर उभं राहून त्याने गणेशच्या डोक्यावर छत्रीसारखा फणा धरला.
हा चमत्‍कार पाहऊन बाहेरची माणसं सटपटली! नागाला, गणेशला नमस्कार करू लागली.
काहीवेळातच नाग शांत झाला. गणेशच्या गळ्यात पडला. गणेशने त्याला अलगद बाहेर काढलं. एका कापडी पिशवीत ठेवलं. पिशवी तिथेच ठेवून, आईला आत आणायला गणेश धावला.
गणेश जवळ येताच लोक हात जोडून त्याच्याकडे पाहू लागले. काहीजण तर त्याच्या पाया पडू लागले.
गंमत म्हणजे गणेशला कळेना, हे असं का करत आहेत? गणेशने हाक मारताच आई शुद्धीवर आली. गणेश ठीकठाक आहे हे पाहताच आईला बरं वाटलं.
गणेशने नागाची पिशवी कॉटखाली ठेवली. आईसोबत शेजारी पण घरात आले. गणेशचा पराक्रम आणि झालेला चमत्‍कार शेजार्‍यांनी आईला सांगितला. पण आईला नीटसं काही कळलं नाही.
घरी परत जाताना काहींनी त्याच्याशी हस्तांदोलन केलं. ज्यांनी हस्तांदोलन केलं त्यांना जाणवलं की, गणेशचा हात बर्फासारखा थंडगार होता!


रात्री नाग पिशवीतून बाहेर आला आणि रात्रभर गणेशच्या गळ्यात पडून राहिला. दुसर्‍या दिवशी पहाटे, गणेश पिशवी घेऊन जवळच्याच जंगलात गेला. नागाला जंगलात सोडून घरी परत आला. जंगलात सोडल्यावर नागाने पुन्हा एकदा फणा फुगवून गणेशला आशीर्वाद दिला होता. गणेशच्या पराक्रमाची आणि चमत्‍काराची बातमी लगेचच गावभर पसरली.
गणेश जंगलातून घरी आला, तर त्याला भेटायला लोकांची आणि बातमीदारांची भरपूर गर्दी झाली होती. गर्दी पाहून गणेश वैतागला. हा लोकांचा वेडेपणाच त्याला कळेना. तो कुणाशी काहीही न बोलता सरळ घरात गेला आणि त्याने दार बंद करून घेतलं. कालच्या प्रसंगाला चांगलं तिखटमीठ लावून मोठ्या रसभरीत बातम्या शेजार्‍यांनीच बातमीदारांना दिल्या. आणि नेमकं सोमवारी महाशिवरात्रीच्या दिवशीच ‘नागपुत्र गणेश’ अशी बातमी सर्व वृत्तपत्रात पहिल्या पानावर झळकली. गणेशला पाहायला आता लोकांच्या झुंडी येऊ लागल्या. गणेश आणखीनच वैतागला. तो आईला घेऊन दुसर्‍या गावात राहणार्‍या काकांच्या घरी काही दिवस राहायला गेला.

या दुसर्‍या गावातसुध्दा लोकांना गणेश आल्याची कुणकुण लागू शकते आणि मग ‘गणेश दर्शनाचा’ कार्यक्रम सुरू होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन काकांनी गणेशची व्यवस्था एका वेगळ्या खोलीतच केली. गणेश दिवसभर खोलीतच असे. रात्री किंवा भल्या पहाटे तो बाहेर पडे. गावाबाहेर नदीवर जाऊन येई. आता गणेशला येऊन आठ दिवस झाले होते. आता दोन दिवसात घरी जायला निघायचं असं त्याच्या मनात होतं. पण त्या दिवशी गावात पाटलाच्या घरात मोठा विषारी नाग निघाला. पाटलाची आई आजारी होती. घरी झोपूनच होती. आईच्या डोक्याशीच नागोबा वेटोळं करून बसला होता आणि फणा काढून डोलत होता. सतत जिभल्या चाटत तोंडाचा ‘आऽऽ’ करुन त्याचे सुळे दाखवत होता.
त्यामुळे त्या नागाला मारता येईना आणि त्या म्हातार्‍या आजीला उठता येईना. डोक्‍यावरच मृत्यूची सावली डोलतेय हे पाहिल्यावर आजी धसकली. एकदम विचित्र परिस्थिती निर्माण झाली.
आणि जमलेल्या गावकर्‍यात कुजबुज सुरू झाली की..
‘शेजारच्या गावातल्या ‘नागपुत्राला’ बोलवा.’
‘सध्या त्याची आईच आपल्या गावात आली आहे, तिलाच सांगा.’ वगैरे.

रात्रीची वेळ होती. गणेश घराबाहेर पडतच होता इतक्यात पाटील धावत आले. समोर साक्षात नागपुत्र पाहताच पाटील हात जोडत त्याच्या पायावरच कोसळले.
रडत रडत म्हणाले, ‘नागपुत्र माझ्या आईला वाचवा. वाचवा माझ्या आईला. तिच्या डोक्याशी नागोबा वेटोळं घालून बसला आहे. खरंच देवानेच पाठवलं तुम्हाला इथे. वाचवा हो. माझ्या आईला तुमची आई समजा होऽऽ”
पाटलांचा आवाज ऐकून काका आणि आई बाहेर आले. आईच्या विनंतीवरून गणेश पाटलांच्या घरी गेला.

गणेशला पाहताच लोकं हात जोडून उभे राहिले.
गणेश तरातरा आत गेला. नागाच्या बाजूला मांडी घालून बसला. नागाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. नाग ताठ झाला. गणेशच्या खांद्यावर चढला. त्याने गणेशच्या कानात जीभ सरसरवली. गणेशने त्याला जवळ घेऊन थोपटलं. गणेशने आपली जीभ नागाच्या त्या मधोमध चिरलेल्या जीभेला लावली. नाग क्षणात शांत झाला. गणेशच्या गळ्यात वेटोळं होऊन पडला.
सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आजीबाईंनी लांबूनच गणेशला नमस्कार केला. गणेश झटक्यात उठला आणि जसा आला होता तसा निघून गेला.
दुसर्‍या दिवशी पहाटेच आई आणि गणेश आपल्या घरी निघून गेले.

आता गणेशला घरी येऊन आठ दिवस झाले होते.
गणेश नेहमीप्रमाणे कॉलेजला जाऊ लागला. मोठा विषारी नाग गळ्यात घालणारा नागपुत्र गणेश अशी त्याची ओळख झाली होती. त्यामुळे त्याचे मित्र त्याला थोडेसे बिचकूनच असत. त्याच्यासोबत पटकन मिसळत नसत. पण गणेश मात्र अभ्यासात चांगलाच रमला होता.
संध्याकाळची वेळ होती. आई देवळात गेली होती. गणेश घरी एकटाच होता. दरवाजा वाजला.
एका माणूस दारात उभा होता. तो गणेशकडे पाहात हसून म्हणाला, “हे घ्या.” आणि त्याने आपल्या हातातील वस्तू गणेशच्या हातात दिली.
तिच्या थंडगार लिबलिबीत स्पर्शाने गणेश चरकला.

गणेशच्या हातात एक सोनेरी नागीण होती.
तो माणूस म्हणाला, “सांभाळा हिला.” पुन्हा एकदा तो हसला. पण यावेळी मात्र त्याने ओठावरुन सर्रकन जीभ फिरवली. त्याची जीभ सापासारखी मध्ये चिरलेली होती. तशीच वळवळत होती.
गणेश दचकला! दोन पावलं मागे सरकला. पण तोपर्यंत तो माणूस अदृश्य झाला होता. आणि गणेश हातात सोनेरी नागीण घेऊन दारातच उभा होता.

गणेश घरात गेला. त्याने ती नागीण एका उशीखाली ठेवून दिली.
थोड्याचवेळात आई आली. गणेश घरात रमला. अभ्यासात गुंगला. ‘घरातल्या एका उशीखाली आपण एक सोनेरी नागीण ठेवली आहे’ हे तो विसरुनच गेला.
असेच तीन दिवस गेले.
आणि अचानक उशीखालून सोनेरी नागाचं एक छोटं पिल्‍लू सरपटत बाहेर आलं.
गणेश पाहातच राहिला.
पिल्‍लाने गणेशकडे पाहात डोळे मिचकावले. जिभल्या चाटल्या आणि एका क्षणात ते गणेशकडे झेपावलं.
गणेशने अलगद त्याला उचललं, जवळ घेतलं.
गणेशला खूप आनंद झाला. पिल्‍लू सुखावलं.
गणेशने उत्सुकतेने उशी उचलून पाहिलं. पिल्‍लू ठेवून ती सोनेरी नागीण कधीच निघून गेली होती. आता घरी असताना गणेश त्या पिल्‍लासोबत खेळत असे. ते पिल्‍लू सतत गणेशच्या अंगाखांद्यावर असे.
खरं म्हणजे हे आईला अजिबात आवडत नसे. पण गणेशचे मन दुखावेल म्हणून ती बोलत नसे.

एका सोमवारी अमावस्या होती. रात्रीची वेळ. झोप येत नाही म्हणून गणेश पिल्‍लाशी मस्ती करत होता. आणि अचानक ते सोनेरी पिल्‍लू एकदम लहान झालं.
गणेश चमकला! त्या इवल्याशा पिल्‍लाला हातात घेऊन पाहू लागला. त्याचक्षणी त्या पिल्‍लाने उडी मारली गणेशच्या तोंडात आणि नकळतच गणेशने ते पिल्‍लू गिळलं!


गणेश भयंकर घाबरला. बाथरुममध्ये पळाला. त्याने ओकण्याचा प्रयत्न केला पण त्याला उलटी होईना. ‘डॉक्टरांकडे जावं का?’ असा ही एक विचार त्याच्या मनात येऊन गेला.
पण तो शांत बसला. त्याला कुठलाच त्रास होत नव्हता.


दुसर्‍या दिवशी सकाळी आईने गणेशकडे पाहिलं आणि ती चरकली. गणेशच्या तोंडातले सुळे जरा जास्तीच मोठे झाले होते. नागाचे विषारी दात असावेत असेच ते वाटत होते. पण ती त्याक्षणी काही बोलली नाही.
नंतर गणेश आंघोळ करुन आला. तिने सहज पाहिलं, तर सगळं ठीक होतं. ‘म्हणजे मगाशी आपल्याला भास झाला असावा’ असा तिने समज करून घेतला.
पण तो गैरसमज होता. खरी गोष्ट वेगळीच होती.


गणेशच्या कॉलेजची मुंबईला शैक्षणिक सहल जाणार होती. गणेशने अजून मुंबई पाहिली नव्हती, समुद्र ही पाहिला नव्हता. त्याने जायचं ठरवलं. मुंबई मधील विविध शैक्षणिक संस्था, संग्रहालये, क्रिडा संकुल, हायकोर्ट आणि काही प्रेक्षणिय स्थळे असा आठ दिवसांचा भरगच्‍च कार्यक्रम होता. गणेशचं वागणं अतिशय नॉर्मल आणि अगदी पहिल्या सारखंच विनम्र असल्याने त्याच्या मित्रांना वाटणारी भिती कमी झाली होती. आणि ट्रिपचा विषय असल्याने सगळेच खेळीमेळीने वागू लागले.
सगळे मुंबईला पोहोचले. ठरल्याप्रमाणे दिवसभर मुलांचे कार्यक्रम असत. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी गणेश एकटाच फिरायला बाहेर पडला. फिरत फिरत समुद्रावर गेला. अमावस्या सुरू होत असल्याने समुद्राला हळूहळू भरती येत होती. गणेशचं रक्‍त पण तसंच सळसळत होतं. समुद्र किनार्‍यावर वाळूत काही मुले खेळत होती. वाळूचे किल्‍ले करत होती. त्यांचे पालक त्यांच्यापासून थोड्या अंतरावर गप्पा मारत बसले होते.
अचानक गणेशला शरीरात थरथर जाणवू लागली. जबडा घट्ट झाला. हात पाय आक्रसल्यासारखे वाटले. डोळे बारीक झाले. शरीरातून थंड रक्ताच्या लाटा उसळत आहेत असं वाटू लागलं. तोंडातून फुत्कार सुटू लागले आणि त्याला काही कळायच्या आधीच तो धावत सुटला.
आता त्याचे सुळे मोठे झाले होते.. नागासारखे.
आता त्याची जीभ मध्ये चिरली गेली होती.. नागासारखी.
त्याचं तोंड ही तांबूस सोनेरी झालं होतं.. नागासारखं.
त्याची चाल ही नागमोडी झाली होती.. नागासारखी

गणेश एका मुलाजवळ पोहोचला.
त्या मुलाला काही कळण्याआधीच गणेशने त्या मुलाच्या मानेवर झटक्यात दंश केला.. एकदा.. दोनदा.. तीनदा!
मुलगा जीवाच्या आकांताने ओरडला. तडफडत खाली पडला.
बाकीची मुले घाबरुन किंचाळली आणि सैरावैरा धावत सुटली.
गडबड ऐकून जवळची माणसं मुलाजवळ धावत आली. खाली पडलेल्या मुलाभोवती गर्दी जमली. त्या मुलाचे पालक पण धावत आले.
मुलगा काळा-निळा पडला होता.
त्याचवेळी गणेश शांतपणे पुढे निघून गेला.


समोरच्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलाचे पालक त्याला ताबडतोब घेऊन गेले. पण काही उपयोग झाला नाही.
डॉक्टर म्हणाले, “अत्यंत जहरी नागाचं विष भिनल्यामुळे याचा मृत्यू झाला आहे.”
पोलिसांनी सीसी-टिव्हीचं फुटेज तपासलं आणि त्यांना दिसलं की, ‘त्या मुलाला एका सहा फूट ऊंच अशा सोनेरी नागाने दंश केला आहे.’
पोलिसांनी ते सीसी टिव्ही फुटेज अनेक तज्ज्ञांना दाखवलं. पण तो ‘सोनेरी नाग’ पाहून ते सारेच अचंबित झाले.
पोलिसांनी त्या सोनेरी नागाचा शोध घेण्यासाठी सगळा किनारा विंचरून काढला. पण काही फायदा झाला नाही.
गेल्या १०० वर्षात अशी विचित्र घटना मुंबईच्या समुद्रकिनारी कधी घडलेली नव्हती. त्यामुळे साहजिकच, या बातमीला प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जोरदार प्रसिद्धी मिळाली.
आणि दुसर्‍याच दिवशी, अशी घटना एका गजबजलेल्या मॉलमध्ये सकाळी घडली. तिथे ही सीसी टिव्ही फुटेजमध्ये तोच सहा फुटी सोनेरी नाग दिसत होता.
आता मात्र लोकांमध्ये घबराट पसरली.
हा सोनेरी नाग अचानक येतो कुठून आणि क्षणात जातो कुठे? हा कुठे लपतो की अदृश्य होतो? हे कुणालाच कळेना.

सहलीच्या तिसर्‍या दिवशी दुपारी मुंबई विद्यापिठात जायचे असल्याने कॉलेजची मुले उशीरा उठली.
कॅंटीनला सगळी एकत्र नाश्ता करायला बसली, तेव्हा पहिल्या पानावरची सोनेरी नागाची बातमी वाचून सगळेच हादरले!
इतक्यात सकाळीच बाहेर पडलेला गणेश धावतच कॅंटीनमध्ये आला. त्याचं किंचित तांबूस सोनेरी तोंड पाहून सगळेच चपापले. ‘त्या’ बातमीविषयी कुणीच काही बोलेना. सगळेजण चोरट्या नजरेने गणेशकडेच पाहात होते.
गरम गरम नाश्ता टेबलावर आला.
वडा-सांबारचा घमघमीत वास येताच गणेशने नकळत ओठावरुन जीभ फिरवली. आणि.. गणेशची सापासारखी चिरलेली वळवळणारी जीभ पाहून, त्याच्या समोर बसलेली दोन मुले किंचाळून खाली पडली. गरम सांबार त्यांच्या अंगावर सांडलं. ती दोघं धडपडत उठली आणि जीव घेऊन पळत सुटली. कुणालाच काही कळेना.


अंगावर सांबार सांडल्यामुळे ती खाली पडली आणि आता शर्ट धुवायला बाथरुमला गेली असावी, असं क्षणभर वाटलं खरं. पण ती इतकी घाबरली का होती? हे कुणालाच समजलं नाही.
हळूहळू गणेशचा चेहरा निवळला आणि जीभ ही नीट झाली. गणेश नेहमीप्रमाणे नॉर्मल झाला.
सगळी मुले गपगुमान नाश्ता करुन रुमवर गेली. त्यांनी मगाशी पळालेल्या त्या दोन मुलांना गाठलं.
ती दोन मुलं पांघरूण घेऊन झोपली होती. त्यांना दरदरून ताप भरला होता. मुलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले, पण ती काही बोलायलाच तयार नव्हती.
मुलांनी वैतागून टिव्ही लावला. टिव्हीवर मॉलमधली ब्रेकिंग न्युज सुरू होती. ‘मुलाला दंश करून सोनेरी नाग सळसळत गेला आणि माणसांच्या गर्दीत मिसळला’ असे सीसी टिव्ही वरचे फुटेज टिव्हीवर वारंवार दाखवले जात होते.
‘शहरात सोनेरी नागाची दहशत. नागरिकांत घबराट. पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन’ अशी बातमी झळकत होती.
हे पाहून ती दोन मुले आणखीनच धसकली. गणेशविषयी कसं सांगावं? याचा ती विचार करत होती. आणि आता ती बोलणार इतक्यात गणेशच खोलीत आला आणि त्या दोन मुलांच्या बाजूला बसला.
आता ती दोन मुले भितीने गादीवर वळवळू लागली.
गणेशने त्यांना अतिशय प्रमाने विचारलं, “काय झालं मगाशी? असे अचानक घाबरल्यासारखे पळून का गेलात? तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येऊ का?’’
आणि त्याचवेळी गणेशने ओठावरुन जीभ फिरवली. त्याची जीभ नॉर्मल होती.
हे पाहून ते दोघे किंचित सावरले. बहुधा ‘ती बातमी’ वाचल्याने आपल्याला भास झाला असावा असं त्यांना वाटलं.
ते अडखळत म्हणाले, “अं.. तू नको नाश्ता आणूस. आम्हीच कॅंटीनला जाऊन येतो.” आणि पळालेच ते कॅंटीनला.

सहलीचा चौथा दिवस. गणेश नेहमीप्रमाणे पहाटे उठला. जवळच्याच बागेत फिरायला गेला.
बागेत खूप माणसं चालण्याचा व्यायाम करायला, योगासनं करायला आलेली होती.
गणेश बागेतल्या एका कोपर्‍यात झाडापाठी बसला. सर्वांपासून लांब. बागेत झपाझप चालणारी, व्यायाम करणारी माणसं गणेश शांतपणे बसून पाहात होता.
आणि अचानक त्याचं रक्त सळसळू लागलं. दात शिवशिवू लागले. सुळे मोठे झाले, कारण त्याने जवळूनच येणारा बेडकाचा आवाज ऐकला होता.


गणेश प्रचंड बेचैन झाला. तो जागेवरुन उठला. कोपर्‍यात चिखलात लपलेला बेडूक त्याने गचकन पकडला. कुणाला काही समजायच्या आतच त्याने तो बेडुक कचाकचा चावून गपकन गिळला.
त्याचवेळी तिथे झाडासमोर उभं राहून, हमीद वेगवेगळ्या पोझ घेऊन सेल्फी काढत होता. कालच त्याने जुना फोन देऊन नवीन कोरा आयफोन घेतला होता. थोड्याचवेळात हमीदचं सेल्फी काढणं संपलं.
गणेश चालत चालत पुढे गेला तेव्हा त्याला एका माणसाची किंकाळी ऐकू आली.
सर्वजण धावतच तिथे गोळा झाले. गणेश पण गेला.
हमीदचा चेहरा भितीने पांढराफटक पडला होता. त्याला बोलताच येत नव्हतं. त्याचे पाय लटपटत होते.
काही माणसांनी त्याला पाणी पाजलं. एका माणसाने त्याला थोपटलं. हमीदने त्या माणसाचा हात घट्ट धरुन ठेवला. हमीद थोडासा सावरला.
हमीदने भीत भीत बागेत आत्ताच काढलेला सेल्फी लोकांना दाखवला.
सेल्फी पाहताच माणसं सैरावैरा धावत सुटली. हमीदचा हात झटकून तो माणूसपण पळाला. काही मिनिटांतच ती बाग रिकामी झाली.
बागेत फक्त दोघेजणंच उरले.
भितीने थरथरणारा हमीद आणि गणेश. गणेशने हमीदच्या हातातला मोबाइल पाहिला. त्या सेल्फीत ‘हमीदच्या मागे एक झाड होतं. आणि त्या झाडाच्या मागे.. तोच तो सहा फुटी सोनेरी नाग ताठ उभा होता. त्याच्या तोंडातून बेडकाचे पाय बाहेर आलेले होते.’

हमीद काही बोलण्याआधीच गणेश म्हणाला, “ऑंss? मी तर इथेच होतो. पण..”
हमीदने दचकून गणेशकडे पाहिलं. गणेशचं लालसर तांबूस तोंड पाहून तो भितीने गारठला.
इतक्यात गणेशने नकळत ओठावरून जीभ फिरवली. आणि.. ती वळवळणारी चिरलेली जीभ पाहून हमीद बेशुध्द पडला.

आणि तिसर्‍या दिवशी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर हमीदचा आणि सोनेरी नागाचा फोटो झळकला.
शहरातील समुद्र किनारे, मॉल आणि आता बागा ओस पडू लागल्या. सोनेरी नागाच्या भितीने लोकांचं उगाचच बाहेर पडणं, भटकणं बंद झालं. सोनेरी नागाविषयी भलत्या-सलत्या अफवा पसरू लागल्या.
मुलांना शाळेत पाठवायलासुद्धा पालक घाबरू लागले. शहरात पोलिसांची गस्त वाढली. बिघडलेले सीसी-टिव्ही तातडीने दुरुस्त केले गेले. नंतर दोन दिवस शहरात काहीच घडलं नाही.
नागरिक सावध झाले. लोक भीत भीत मॉलमध्ये जाऊ लागले. मुले शाळेत जाऊ लागली. लोक गटागटाने बागेत व्यायामाला, चालायला जाऊ लागली. थोडसं वातावरण निवळलं.

दुपारपासूनच गणेशला जरा अस्वथच वाटत होतं.
आज त्यांना संध्याकाळी मुंबईच्या क्रिडा-संकुलाला भेट द्यायची होती. त्यासाठी सर्वांना निळी जीन पॅंट आणि पिवळा टी शर्ट असा गणवेश सक्तीचा होता. सगळे जण गणवेशातच गेले. त्या सर्वांना हॉस्टेलवर यायला उशीर झाला.
रुमवर आल्यावर गणेशला पुन्हा एकदा अस्वस्थं वाटू लागलं. पोट गुबारलं आणि घशात मळमळू लागलं. अचानक उलटी होईल असंही वाटू लागलं. मुंबईची दमट हवा आपल्याला मानवत नाही असं वाटून, गणेश खिडकीतून वाकून समोरच्या बागेकडे पाहू लागला. बाहेरची मोकळी हवा मिळताच गणेशला थोडं फ्रेश वाटलं.
आता रात्रीचे साडेनऊ वाजले होते. बाग दहा वाजता बंद होते. रात्री जेवण झाल्यावर काही माणसं शतपावली करायला बागेत येतात. तर काही माणसं बागेत बसून आईस्क्रीम, कुल्फी खायला, ज्यूस प्यायला येतात. मग गप्पा मारत बसतात.
‘आपणही आत्ता बागेत जावं का?’ असा विचार गणेशच्या मनात आला.

---------------------

दुसर्‍या दिवशी सकाळी सर्व मुले तयार झाली. पण गणेशचा पत्ताच नाही. ‘बहुधा सकाळी लवकर उठून समुद्रावर फिरायला गेला असेल’ असं वाटलं त्यांना.
आता शॉपिंगला जाऊन संध्याकाळच्या गाडीने ती गावाला परत जाणार होती. मुलांना शॉपिंगची घाई असल्याने ती भराभर आवरुन मॉलकडे रवाना झाली.
नेहमीप्रमाणे पहाटे बाग उघडली. लोकं व्यायामाला, चालायला येऊ लागली. आज खूप दिवसांनी हमीद पण बागेत आला होता.
हमीदला पाहताच काही लोकं त्याच्या पासून लांब पळू लागली. तर काही त्याची चौकशी करून ‘तो सेल्फी’ पाहायला मागू लागली. चालणारी माणसं उगाचच हमीदकडे पाहात रेंगाळू लागली.
हमीद वैतागला. तो बागेच्या दुसर्‍या कोपर्‍यात गेला. इथे लोकांची फारशी वर्दळ नसते. इथे गच्‍चं झुडुपं आहेत आणि मातीत बिळं आहेत. लोकांपासून लांब आल्यावर त्याला बरं वाटलं.
त्याने बाकावर बसल्यावर सहज समोर पाहिलं तर.. समोरच्या बाकाखालून एका माणसाचे पाय बाहेर आले होते.
हमीद टुणकन उठला. समोर गेला. आणि पाहतो तर काय..


बाकाखाली निळी जीन पॅंट आणि पिवळा टी शर्ट घातलेला मुलगा हिरवा-निळा होऊन निपचित पडला होता. त्याच्या बाजूलाच तो सहा फुटी सोनेरी नाग होता. त्या नागाची शेपटी त्या मुलाच्या घशात खोलवर अडकलेली होती. जणूकाही तो सोनेरी नाग त्याच्या तोंडातूनच बाहेर आला असावा.
आणि त्या नागाचं तोंड मुंगुसाने कुरतडलेलं होतं. नागाच्या शरीराचे अनेक ठिकाणी लचके तोडलेले होते.
सोनेरी नाग शेवटच्या घटका मोजत तडफडत होता.
हमीद किंचाळला. हातवारे करत ओरडला. घाबरून थयथया नाचला.
सगळे जणं धावत आले. ते भयानक दृश्य पाहून सगळे जागीच गोठल्यासारखे झाले.
हमीद म्हणाला, “मी या..या मुलाला ओळखतो. त्यादिवशी पण हाच होता तिथे..’’
लोकांची पळापळ सुरू झाली.
पोलीस आले. डॉक्टर आले. अग्‍नीशामन दल आले. बाग बंद केली गेली.
सोनेरी नागाचा मृत्यू झाल्याची बातमी दुसर्‍या दिवशी सगळीकडे झळकली. पण इतर कुठलाही तपशील बातमीत नव्हता.
लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

यानंतर काही दिवसातच अमावस्या आली.
त्यादिवशी हमीद गंमत म्हणून ते बागेतले सेल्फी आपल्या आयफोनवर पाहात होता.
स्क्रीनवर दोन बोटं जुळवून सेल्फीतला सोनेरी नाग लहान मोठा करत होता. त्याने सोनेरी नाग खूप झूम केला आणि पटकन एकदम लहान केला.. आणि हमीद चमकला!
तो सेल्फीतला सोनेरी नाग एकदम खूपच लहान झाला आणि त्याच्या बोटांनाच चिकटला.
हमीदने झुपकन बोटं मागे खेचली.. त्याबरोबर ते सोनेरी नागाचं छोटंसं पिल्‍लू त्याच्या बोटांना धरुनच बाहेर आलं.
हमीदला गंमत वाटली.


हमीद त्या हिरवट सोनेरी पिल्‍लाशी खेळू लागला. त्याला तळहातावर घेऊन खेळवू लागला. त्याच्याशी मस्ती करू लागला.
आणि एकाक्षणी त्या पिल्‍लाने झुपकन उडी मारली हमीदच्या तोंडात. हमीदने नकळत ते पिल्‍लू गिळलं.
------------------------
अमावस्येला बाहेर फिरायला जाणार असाल तर जरा सावध राहा. हमीद कुठेही असू शकतो.
अचानक तुमच्या पाठीमागूनही येऊ शकतो.
..........................

- राजीव तांबे
- (rajcopper@gmail.com)