विशेष माहिती: घुमट

 घुमट
लेखन, छायाचित्रे: धनश्री मणेरीकर

 

गणेशोत्सव चालू आहेच. त्यात नुकतंच म्हणजे ३१ ऑगस्टला अशा एका वाद्याला गोव्याच्या राज्यवाद्याचा दर्जा देण्यात आला, जे वाद्य गणेशोत्सवात गोव्यात सर्वत्र वापरले जाते. माहिती आहे का कोणतं वाद्य ते? त्या वाद्याचं नाव आहे 'घुमट'.

'घुमट' हे गोव्याचे प्रमुख लोकवाद्य. या वाद्याला नुकताच राज्यवाद्याचा दर्जा देण्यात आला, म्हणूनच आता हे 'राजमान्य लोकवाद्य' झाले आहे.

गणेश चतुर्थी म्हणजेच कोकणीत 'चवथ'! या चवथीच्या आरत्या आणि घुमट यांचे नाते बरेच जुने आणि दृढ आहे.बाकी माहिती वाचायच्या आधी आपण या वाद्यासोबत रंगलेली एक आरती बघुया का?

तर, एरवी केवळ 'जागोर', नवरात्र आणि मंदीरांमध्ये वाजणारा घुमट आता घरोघरी वाजताना दिसतो. अगदी ख्रिस्ती बांधवांच्या 'मांडो'मध्येही याचा वापर होतो. म्हणूनच घुुुमट हिंदू ख्रिश्चन ऐक्याचे प्रतिक झाले आहे. सुवारीवादन, नाटक इतकेच मर्यादित न रहता आता 'घुमट आरती' स्पर्धा घेतल्या जातात. गोव्यात सध्या घुमट वाजवणारी २५० पेक्षा जास्त पथके आहेत. पूर्वी घुमटवादन हे पुरुषप्रधान होते. आता मात्र गैरसमज दूर होऊन घुमट वादनाची महिला पथकंही तयार होत आहेत. शिवाय हे फक्त गोव्यातच नाही बरं का! गोव्याव्यतिरिक्त कर्नाटकात लोकगीत सादर करतानाही घुमट वाजवतात. तर आंध्र प्रदेशात कथा सादरीकरणादरम्यान या वाद्याचा वापर होतो.

आता आपण घुमट कशाचा बनला आहे ते बघुया. घुमट असतो तो भोपळ्याच्या आकाराचा, ज्याला दोन तोंडं असतात. "घुमणारा माठ" म्हणून याला 'घुमट' म्हणतात. याचा मुख्य भाग - घट - मातीपासून बनवलेला असतो, अगदी मडक्यासारखा! याचे एक तोंड मोठे असते तर दुसरे लहान. यापैकी लहान तोंड झाकले जात नाही. दुसरे मोठे तोंड घोरपडीच्या कातड्याने बंद केलेले असते. ते बंद करायला सुतळ आणि सुंभ वापरतात.


हे वाद्य गळ्यात अडकवून किंवा आडवे धरून वाजवतात. तुम्ही व्हिडीयोत बघितले असेल तसे, मोकळ्या असलेल्या तोंडाकडे डाव्या हाताचा पंजा धरून, उजव्या हाताने कातडीवर थाप देऊन किंवा बोटे वापरून हे वाजवले जाते. याची कातडी थोडी ओली करून आवाज कमी करता येतो तर मडके तापवून आवाज वाढवताही येतो.

कमी होत असलेली घोरपडींची संख्या आणि कायद्याने घोरपडींना मारण्यावर असलेली बंदी हा या वाद्यासाठी मोठा प्रश्न आहे. हे प्रश्न लक्षात घेता, घोरपडीच्या कातड्याला अन्य प्राण्यांच्या कातड्याचे पर्याय वापरात दिसतात. अर्थात मूळ घुमटातून उमटणारा मन भारावणारा नाद दुसऱ्या पर्यायी कातड्यामध्ये येत नाही, हे खरं असलं तरी पर्यावरणाला आणि जैवविविधतेला प्राधान्य असलेच पाहिजे. त्यामुळे हौसेला आणि मनाला मुरड घालून पर्यायी चामडे वापरून तयार केलेल्या घुमटांचे संवर्धन करणे महत्त्वाचे ठरेल.

तुम्हाला हे पटलं का? तुम्ही घुमटाचा आवाज प्रत्यक्ष ऐकला आहे का? तुमचा अनुभव काय याबद्दल आम्हाला नक्की कळवा.