ढगांचा कारखाना (गोष्ट)

ढगांचा कारखाना
लेखन: योगिता शिंदे
चित्रे: गीतांजली भवाळकर

“रियान, चल आता ब्रश कर. मग मी तुला आंघोळ घालतो." बाबांनी रियानला हाक मारली.
नेहमीप्रमाणे आजही रियान बेडरूमच्या खिडकीतून पाय सोडून, बाहेर काहीतरी बघत बसला होता.
“हो. आलो!" असं रियान म्हटला खरं, पण तसाच बसून राहिला.
“रियान, काय रे तू! भरभर आवरत नाही. मग शाळेत जायला उशीर होतो." आई वैतागून म्हणाली.
“आज शाळेत जाता येणार नाही." रियान म्हणाला.
“का? आज काय आहे?" आईने स्वयंपाकघरातून डोकावत विचारले.
“आई बाबा, आज खूप पाऊस येणार आहे. तो बघा ढग बनवायचा कारखाना." रियानने खिडकीच्या बाहेर बोट दाखवत म्हटले.


बाबा हसत म्हणाले, “हो का? मग त्या ढगांपासून पाऊस पडेल?"
“हो! आता खूप पाऊस येणार आहे." रियान मोठ्ठे डोळे करत म्हणाला.
“बरं पाऊस आला, तर मी तुला शाळेत घ्यायला येईन. आणि संध्याकाळी मी तुला पावसाची गोष्ट सांगेन, चालेल?" बाबांनी विचारलं.
“चालेल!", रियान मान डोलावून म्हणाला. भरभर आटपून आणि थोडंसं खाऊन, रियान बाबांबरोबर शाळेत गेला.

शाळेतही रियान खिडकीतून बाहेरच बघत होता.
“रियान,काय आहे बाहेर?", ताईंनी रियानला विचारले.
“ताई, आज खूप पाऊस येणार आहे." रियान ताईंना म्हणाला.
“अरेच्च्या, पण बाहेर तर ऊन पडलं आहे." ताई रियानच्या जवळ येत म्हणाल्या, “आपण पावसाचं गाणं म्हणायचं का? चल आपण सगळ्यांना विचारू." असं म्हणून ताईंनी सगळ्या मुलांना विचारलं. मुलं आनंदाने ओरडली, “वा ताई! गाणं."
“चला मग. छान गोलात बसा." ताईंनी मुलांना सांगितलं.
'एवढं मोठं पाणी, पाण्याची वाफ, वर जाते आपोआप.' हे गाणं ताईंनी मुलांना म्हणून दाखवलं आणि नंतर त्यांच्यासोबत म्हणायला सांगितलं.

“ताई, पाण्याची वाफ आकाशात गेली, की तिच्यापासून पाऊस बनतो?" सार्थकने ताईंना विचारलं.
“हो. म्हणजे पावसाचे ढग बनतात." ताईंनी सांगितलं.
“पण ताई, आमच्या घराच्या खिडकीतून तर, ढग बनवायचा कारखाना दिसतो. खरंच!" रियान डोळे मोठे करत म्हणाला.
तसं बाकी मुलं एकमेकांकडे बघून कुजबुजायला लागली. ताईंनी सगळ्या मुलांना शांत केलं आणि म्हणाल्या,“रियान , तू काय बघितलं ते व्यवस्थित सांगशील का?"
रियान सांगू लागला, “ताई, आमच्या बेडरूमच्या खिडकीतून एक कारखाना दिसतो आणि त्याला मोठ्ठा पाइप आहे. त्या पाइपमधून तो रोज सकाळी काळे ढग आकाशात सोडतो आणि मग पाऊस येतो."
उर्वी त्यावर म्हणाली, “ताई, माझा दादा म्हणतो, ढग आकाशात तयार होतात. खरंच असं होतं का? सांगा नं, ताई."


ताई म्हणाल्या, “बघा हं! मी तुम्हाला एक चित्र काढून दाखवते." ताईंनी फळ्यावर समुद्र, सूर्य, डोंगर, झाडं असं चित्र काढलं आणि चित्र दाखवत मुलांना म्हणाल्या, “मुलांनो! हा कोण आहे?"
“सूर्य!", मुलं ओरडली.
“बरोबर, सूर्याच्या उष्णतेमुळे म्हणजे जेव्हा खूप ऊन लागतं ना, तेव्हा समुद्र, विहीर, नदी, असं जमिनीवरचं पाणी गरम होतं. इतकं गरम होतं की त्या पाण्याची वाफ होते.” ताईंनी चित्रात पाण्याची वाफ दाखवली.
“हो. सकाळी बाबांनी आंघोळीच्या पाण्याची वाफ दाखवली होती." रियान म्हणाला.
ताई हसल्या आणि पुढे सांगू लागल्या, “ती वाफ हळूहळू आकाशात जमा होते आणि तिचे ढग बनतात. त्या ढगांना थंड हवा लागली, की मग पाऊस पडतो. आहे की नाही गंमत!आणि रियान, कारखान्यातून जो बाहेर पडतो ना तो असतो त्या कारखान्यातला धूर!" ताईंनी रियानला सांगितलं. सगळी मुलं आज पावसाची गंमत कळल्यामुळं खूप खूश झाली आणि परत ‘एवढं मोठं पाणी’ हे गाणं म्हणू लागली.


आज पाऊस काही आला नाही, पण शाळेतून रियानला न्यायला मात्र बाबाच आले. घरी पोहोचेपर्यंत रियानने बाबांना पाऊस पडण्याची गंमत सांगितली.अरे वा! रियान, मी तुला पाऊस पडण्याची गोष्ट सांगणार होतो, तर तूच मला गोष्ट सांगितलीस." बाबा हसत म्हणाले.
“बाबा, मी घरी गेल्यावर तुम्हाला आणि आईला ‘पाऊस कसा पडतो’याचं चित्र काढून दाखवेन हं"

रियानला आज एकदम मोठ्ठं झाल्यासारखं वाटत होतं.

-----------------

ताईदादांसाठी पुरवणी माहिती

आपल्या भारत देशात जो पाऊस पडतो तो नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे.हे वारे हिंदी महासागर व अरबी समुद्र यांवरून येते त्यामुळे सगळ्यात अगोदर समुद्रकिनाऱ्यांवर पाऊस सुरू होतो. आपण बऱ्याचदा ऐकतो की झाडं तोडली तर पाऊस कमी पडेल! आता तुम्ही म्हणाल की जलचक्रात तर झाडं कुठेच दिसत नाहीए.पण , झाडं जमिनीतील पाणी शोषून घेऊन ते बाष्परूपात हवेत सोडतात आणि त्या बाष्पाचे ढग बनून पाऊस येतो.

-----------------

एवढं मोठं पाणी (गीत)
गायन: रावी आणि मृणाल आपटे