फळांच्या गावाला जाऊया (कविता)

फळांच्या गावाला जाऊया
लेखनः दिप्ती देशपांडे
चित्र: वैभवी शिधये

 

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांचा कारंजा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया
फळांच्या गावाला जाऊया, जाऊया
फळांच्या गावाला जाऊया।। धृ।।

मी तर फळांचा राजा, येई उन्हाळी गावा.
माझी चव चाखा या(2)
ओळखा पाहू मी कोण?


मी तर राहतो शिमल्याला, लाल लाल रंग माझा.
दूर ठेवतो औषधा,
माझी चव तुम्ही चाखा
ओळखा पाहू मी कोण?

माझा असतो मोठा घड, मी तर राहतो वेलीवर
रंग माझा हिरवा
थोडे थोडे तुम्ही खावा
ओळखा पाहू मी कोण?असती काटे वरती मला, आत असतो मऊ गरा
कोकणमेवा म्हणती मला
आतील गरे तुम्ही खावा
ओळखा पाहू मी कोण?

बिया असती आत फार, उभट असतो माझा आकार
रंग माझा केशरी
चव माझी आहे न्यारी
ओळखा पाहू मी कोण?

आकार माझा गोल गोल, कधी कधी दिसतो लंबगोल
चाॅकलेटसारखा रंग माझा
माझी चव तुम्ही चाखा
ओळखा पाहू मी कोण?

मी तर राहतो नागपूरला,  आंबट गोड चवीला
रंग माझा नारिंगी
खावा तुम्ही सगळ्यांनी
ओळखा पाहू मी कोण?

माझ्यामध्ये नाही खोड, चवीला मी असतो गोड
माझी असते मोठी फणी
बसून खावा सगळयांनी
ओळखा पाहू मी कोण?