फॅन फिक्शन: मॅड आय आपटे

मॅड आय आपटे 

लेखन: नील अर्चिस मनीष, ९वी, अक्षर नंदन पुणे
अर्कचित्रे: श्रीनिवास बाळकृष्ण

रेखाटने: अन्वय परळीकर, ९वी, अक्षर नंदन पुणे

--oo--

प्रसंग १- 

दरवाज्यात एक माणूस उभा होता, तो आपल्या कापऱ्या हातांनी पकडलेल्या काटकुळ्या काठीवर रेलून कसाबसा उभा होता आणि त्यानं आपल्या शरीरयष्टीच्या तिप्पट मोठं असं काहीतरी अंगावर पांघरलं होतं. छतावर वीज चमकल्यामुळे स्पष्ट दिसत असलेल्या त्या अनोळखी पाहुण्याकडे, मोठ्या हॉलमधले सगळे जण मान वळवून बघत होते. त्याने आपली खलाश्याची मोठी, त्रिकोणी, काळी टोपी खाली ओढली आणि आपल्या डोक्यावर घातलेला लाल केसांचा टोप काढून गुंता झालेले केस झटकले. त्यानंतर टोप आणि टोपी परत डोक्यावर ठेवत तो शिक्षकांच्या टेबलाकडे जायला लागला. 

त्याच्या एक आड एक पावलाबरोबरठक ठकाक ठकअसा आवाज येत होता. तो टेबलच्या टोकाशी जाऊन उजवीकडे वळला आणि डम्बलडोरांकडे लंगडत जायला लागला. छतावर पुन्हा एकदा वीज चमकली आणि हर्माईनीच्या चेहऱ्यावर असे भाव उमटले, की तिला खूप काही बोलायचं होतं, पण जणू शब्द आणि आवाजच तिला सापडत नव्हता. 

विजेच्या प्रकाशात त्या माणसाचा चेहरा व्यवस्थित दिसला होता. हॅरीने असा चेहरा आजपर्यंत कधी पहिला नव्हता. असं वाटत होतं, की उरलेल्या सामानापासून कसाबसा घाईघाईत तो चेहरा बनवला होता. ज्याने कोणी तो चेहरा बनवला होता, त्याने आपल्या सबंध आयुष्यात कधी मनुष्यप्राण्याला पाहिलं नसावं. तो इतका गमतीशीर होता, की बनवणाऱ्याला छिन्नी आणि आकारांचा परिचय नसावा असं वाटत होतं. संपूर्ण चेहऱ्यावर रापल्याच्या विचित्र खुणा होत्या. ज्यामुळे वर्तमानपत्राचे तुकडे वापरून केलेलं चिकटकाम वाटत होतं ते. चेहरा वळला असावा आणि त्यासोबत कातडी आणि नाकही वळलं असावं, पण परत नेहमीच्या जागी मात्र आलं नसावं असं वाटत होतं. नाक चक्क वाकडं होतं आणि चरबी सुटी झाली होती. एवढंच नाही, तर त्या माणसाचे डोळे फारच भयानक होते. 

त्यातला एक डोळा छोटा, काळा, मण्यासारखा होता. दुसऱ्या डोळ्याचा पहिल्या डोळ्याशी काहीच संबंध नसावा. त्या डोळ्याची खोबणी एवढी फाकली होती की कुठल्याही क्षणी तो गोल गरगरीत डोळा खाली पडेल असं वाटत होतं. हा डोळा मोठा आणि निळा होता. डोळ्यावरची पापणी कधीच लवत नव्हती. डोळा सतत इकडेतिकडे फिरत होता. कधीकधी तर डोळा डोक्याच्या मागच्या बाजूला जात असे आणि समोरच्यांना फक्त पांढरा भाग दिसत असे. 

अनोळखी पाहुणा डम्बलडोरांकडे गेला आणि त्याने आपला काठी न पकडलेला हात पुढे केला. त्या हातावर देखील खूप सुरकुत्या, रापल्याच्या खुणा, जखमा दिसत होत्या. डम्बलडोर त्या माणसाशी हस्तांदोलन करताना हळू आवाजात काय बोलले, हे मात्र हॅरीला ऐकू गेलं नाही. त्यावर पाहुण्याने चेहरा विद्यार्थ्यांकडे वळवला आणि आपल्या ओठांच्या डाव्या कोपऱ्यातून काही शब्द उच्चारले. डम्बलडोरनी मान हलवून काहीसं हसत आपल्या शेजारच्या मोकळ्या खुर्चीवर बसण्याची पाहुण्याला खूण केली. 

अनोळखी माणूस तिथे गेला आणि त्याने तिथल्या टेबलाचा आणि खुर्चीचा वाकून वास घेतला. या परीक्षेत ती जागा पास झाल्याचं सगळ्यांना लगेचच कळलं. पाहुणा तिथे बसला आणि त्याने आपली खलाश्याची टोपी खाली काढून ठेवली. त्यानंतर त्याने आपला लाल केसांचा टोप सरळ केला. आपल्या समोरची कबाबाची ताटली त्याने पुढ्यात ओढून घेतली आणि साधा डोळा त्याच्या अगदी जवळ नेऊन त्याची सर्व बाजूंनी तपासणी केली. मग आपल्या अंगावर पांघरलेली शाल त्याने मागच्या खुर्चीवर टाकली. अनोळखी पाहुण्याने सैनिक लोक जंगलात कॅमोफ्लॅज होणारे कपडे घालतात तसे कपडे घातले होते. हे पाहून मोठ्या हॉलमधल्या अनेकांची हसण्याची इच्छा झाली पण धाडस मात्र कोणी केलं नाही. पाहुण्याने आपल्या पँटच्या खिशातून एक चाकू काढला आणि त्याने तो कबाब खाऊ लागला. त्याचा साधा डोळा कबाबावर केंद्रित असला, तरी त्याचा निळा डोळा संपूर्ण हॉलमध्ये काहीतरी शोधत असल्यासारखा फिरत होता. 

आता मी तुमची ओळखकाळ्या जादुपासून बचावच्या आपल्या नव्या शिक्षकांशी करून देणार आहे.सगळ्या हॉलचे डोळे पाहुण्याच्या कबाबावरून काढून घेत आणि शांततेचा भंग करत डम्बलडोर म्हणाले, “प्रोफेसर बाबूराव आपटे.

प्रसंग २- 

धाड्! 

कितीतरी लोकांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू आले. हॅरीला एखादी गुलाबी मऊ वस्तू त्याच्या चेहऱ्याला चाटून गेल्यासारखी वाटली. पण छडी बाहेर काढण्यापूर्वीच त्याला आणखी एक जोरदार ‘धाड’ असा आवाज ऐकू आला. प्रवेश हॉलमध्ये आणखी एक आवाज घुमला. 

पुन्हा करशील जर तर असं काही, खबरदार!

हॅरीने वळून पाहिलं. प्रोफेसर आपटे संगमरवरी पायऱ्यांवरून लंगडत उतरत होते. त्यांनी निळ्या लांबसडक केसांचा टोप घातला होता. अंगामध्ये मोठा पांढरा सदरा होता. कंबरेला हिरवा पट्टा बांधला होता. तो सापासारखा दिसत होता. त्यांनी छडी बाहेर काढलेली होती आणि फरशीवर कापत असलेल्या एका गुलाबी टेडी बेअरवरती रोखलेली होती. जिथे मॅल्फॉय उभा होता, बरोब्बर तिथेच आता ते अस्वल होतं. 

प्रवेश हॉलमध्ये भयाण शांतता पसरली होती. आपटे सोडले, तर प्रत्येकाचा श्वास रोखलेला होता. आपटे हॅरीला बघण्यासाठी वळले- म्हणजे त्यांचा साधा डोळा हॅरीकडे बघत होता आणि त्यांचा तो दुसरा डोळा त्यांच्या डोक्यामागे पाहत होता.  

लागलं तुला नाही ना?” आपटेंनी गुरगुरत विचारलं. त्यात त्यांचा आवाज खर्जातला आणि खरबरीत वाटत होता. 

नाही,” हॅरी आपटेंचं विचित्र बोलणं समजून म्हणाला.थोडक्यात वाचलो.” 

नकोस हात त्याला लावू.आपटे ओरडले. 

हात लावू नकोस? कोणाला?” हॅरी चक्रावलाच. 

सांगतोय तुला नाही मी त्याला.आपटे आपल्या मागे उभ्या असलेल्या क्रॅबला खूण करून म्हणाले. तो गुलाबी अस्वलाला उचलणारच होता; पण तेवढ्यात थांबला. असं वाटत होतं, की आपटेंचा नकली डोळा जादूचा असून, त्याला डोक्यामागचंही दिसू शकत होतं. 

आपटे लंगडत क्रॅब, गॉयल आणि अस्वलाकडे यायला लागले. आपटेंना येताना बघून, त्या अस्वलाने घाबरून एक किंकाळी मारली आणि ते तळघराच्या दिशेने पळायला लागलं. 

लगेच इतक्या नाही, नाहीआपटे ओरडले आणि त्यांनी पुन्हा आपली छडी अस्वलावर रोखली. अस्वल हवेत दहा फूट उंच उडलं आणि धाडदिशी खाली जमिनीवर पडलं. मग ते पुन्हा एकदा वर उडलं. 

शत्रूवर करणारे हल्ला आपल्या पाठीमागून, अजिबात नाहीत लोक आवडत मला.आपटे कडाडले आणि अस्वल वेदनांनी किंचाळत उंच, आणखी उंच उडत राहिलं.आहे नीच, तिरस्करणीय आणि कृत्य भेकडपणाचं हे.” 

अस्वल हवेत उडत राहिलं. त्याचे पाय आणि शेपूट हवेत फडफडत होते. 

पुन्हा-कधीही-असं-करू-नकोसआपटे दातओठ खात एकेक शब्द उच्चारत होते आणि अस्वल दगडी फरशीवर आपटत पुन्हा पुन्हा वर उडत होतं.  

प्रोफेसर आपटे!एक घाबराघुबरा आवाजा आला. प्रोफेसर मॅक्गॉनॅगल हातात पुस्तक घेऊन संगमरवरी पायर्यांवरून खाली उतरत होत्या. 

प्रोफेसर हॅलो, मॅक्गॉनॅगल.आपटे शांतपणे म्हणाले आणि त्यांनी अस्वलाला हवेत आणखी थोडं वर उडवलं. 

तुम्ही-तुम्ही काय करताय?” प्रोफेसर मॅक्गॉनॅगलनी विचारलं. त्यांची नजर हवेत उसळणाऱ्या, पडणाऱ्या अस्वलावर खिळलेली होती. 

शिकवतोय धडा.आपटे म्हणाले. 

धडा शिकवताय- आपटे, हा एखादा विद्यार्थी तर नाही ना?” प्रोफेसर मॅक्गॉनॅगल ओरडल्या आणि त्यांच्या हातातून पुस्तकं खाली पडली.  

होय.आपटेंनी उत्तर दिलं. 

नाही!प्रोफेसर मॅक्गॉनॅगल ओरडल्या. त्या पळतच पायऱ्या उतरून खाली आल्या आणि त्यांनी आपली छडी बाहेर काढली.  एका क्षणानंतर एक जोरदार आवाज झाला आणि ड्रेको मॅल्फॉय पुन्हा दिसायला लागला. तो फरशीवर पडलेला होता.  त्याचे सोनेरी केस त्याच्या गुलाबी पडलेल्या चेहऱ्यावर विखुरलेले होते. तो घाबरून उठून उभा राहिला.  

आपटे, आपण शिक्षा देण्यासाठी रूपांतरणाचा उपयोग कधीच करत नाही.प्रोफेसर मॅक्गॉनॅगल कापऱ्या आवाजात म्हणाल्या, “प्रोफेसर डम्बलडोरनी तुम्हाला हे नक्कीच सांगितलं असेल.” 

सांगितलंही शक्य असेल, कदाचित आहे.आपटे बेफिकीरपणे आपली हनुवटी खाजवत बोलले.वाटलं मला असं पण, की चांगली घडवण्याच्या दृष्टीने अद्दल उपाय योग्य ठरेल हा...

आपटे, विद्यार्थ्यांच्या चुकांबद्दल आपण त्यांना शिक्षा देतो किंवा चूक करणाऱ्याच्या हाऊस प्रमुखाकडे तक्रार करतो.” 

असं? ते ही मग करीन मी.आपटे मॅल्फॉयकडे अत्यंत नाराजीने बघत म्हणाले. वेदना आणि अपमानामुळे मॅल्फॉयच्या पिवळट डोळ्यात अश्रू तरारले होते. तो आपटेंकडे रागाने बघत पुटपुटायला लागला, त्यातमाझे डॅडीहे शब्द स्पष्टपणे ऐकायला येत होते. 

अरे हा,” असं म्हणत आपटे सावकाशपणे आणखी काही पावलं पुढे टाकायला लागल्यामुळे त्यांच्या लाकडी काठीचा ठकठक असा आवाज घुमायला लागला.खूप ओळखतो डॅडींना फार पोरा पूर्वीपासून तुझ्या मी. सांगितलंस बरं होईल तर तू, की नजर आहेत आपटे मुलावर बारीक म्हणून ठेवून. वतीने एवढंच सांगच माझ्या तू त्यांना. प्रोफेसर सिव्हिरस स्नेपच आणि तुझ्या प्रमुख असतील नाही हाऊसचे?” 

हो.मॅल्फॉय वैतागून म्हणाला.  

जुना आणखी मित्र एक,” आपटे गुरगुरत म्हणाले.अगदी मी गप्पा मारायला झालोय प्रोफेसर सिव्हिरस स्नेपशी अधीर. त्यांच्याकडे घेऊन चल मला, चल.ते मॅल्फॉयच्या दंडाला धरून त्याला तळघराकडे न्यायला लागले. 

 

प्रसंग ३- 

लवकरच त्यांना पॅसेजमध्ये आपटेंच्या लाकडी काठीची ठकठक ऐकू यायला लागली आणि ते खोलीत आले. ते नेहमीप्रमाणे चमत्कारिक आणि भयंकर दिसत होते. आज आपटेंनी एखाद्या किशोरवयीन मुलाचा वेश केला होता. अत्यंत ढगळ जीन्स त्यांनी घातली होती, जी घसरू नये म्हणून त्यावर काळ्या रंगाचा एक जाडजूड पट्टा करकचून बांधण्यात आला होता. त्यावर जो केशरी रंगाचा टीशर्ट घातला होता, त्यावर लिहिलं होतं, ‘चिल घे ब्रो!आपटेंनी पांढऱ्या कुरळ्या केसांचा टोप घातला होता. 

आपटे वर्गात आल्यावर सगळे विद्यार्थी तातडीने उठून उभे राहिले आणि नमस्ते म्हणाले. ते ऐकल्यावर वर्गाकडे पाठ करून डेस्कवर काहीतरी ठेवणारे आपटे झटकन वळले आणि, ‘खाऊ की गिळूहसता हसता पुरेवाटयांच्या मधल्याच कुठल्यातरी भावना तोंडावर आणून ते वर्गाशी बोलायला लागले. 

फालतूपणा! हा नमस्तेचा वगैरे अजिबात मला नकोय वर्गात या. रोज मी आलो की वर्गात, सगळ्यांनी म्हणायचं एकत्रपणे, ‘ये बाबूराव का स्टाइल हैसमजलं?”

शिक्षकांनी दिलेली आज्ञा पाळणं आवश्यक होतं, ती किती का विचित्र असे ना. तेव्हा सगळ्या वर्गानी एकत्रच मान डोलवून हे समजल्याचं सांगितलं. आपटेंनी विद्यार्थ्यांकडे बघून कसलीतरी अपेक्षा केली. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की आत्तापासून या नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. सगळे एकसुरात म्हणाले, “ये बाबूराव का स्टाइल है.

हरकत नाही आत्तासाठी तरी, अजून नीट तुम्ही हळूहळू शिकाल म्हणायला.आपटे म्हणाले आणि सगळे खाली बसले. 

पुस्तकं तुमची तुम्ही ठेऊन आत द्या.ते आपल्या डेस्कशी बसत, गुरकावत म्हणाले.नाही त्यांची पडणार तुम्हाला गरज.

सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापली पुस्तके बॅगेत ठेवून दिली. रॉन खूपच रोमांचित दिसत होता. 

आपटेंनी रजिस्टर बाहेर काढलं, आपल्या टोपावरचे पांढरे झुळझुळीत केस आपल्या विकृत आणि भाजलेल्या चेहऱ्यावरून बाजूला सारले आणि ते विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायला लागले. त्यांचा साध्या डोळा नावांच्या यादीकडे बघत होतात तर त्यांचा जादूचा डोळा सभोवार फिरत होता. नाव पुकारल्यानंतर जो विद्यार्थीहजर सरम्हणेल, त्याच्यावर स्थिर होत होता. 

आहे ठीक.हजेरी संपल्यानंतर ते म्हणाले.पत्र लिहून आहे कळवलं या प्रगतीबद्दल वर्गाच्या मला प्रोफेसर रीमस ल्युपिननं. वाटतं मला, झालेलं आहे तुम्हाला मुकाबला करायचं गुप्त प्राण्यांशी तंत्र अवगत- आहे वाचलेलं सगळ्यांनी तुम्ही बहुरूपी, लाल टोपी, हिंकीपक्स, जलराक्षस, काप्पास आणि नरलांडग्याबद्दल बरोबर ना आहे?” 

सगळ्यांनी होकारार्थी माना डोलवल्या. 

शापांशी अजून देण्यात लढा परंतु मागे आहात खूपच तुम्ही.आपटे म्हणाले.त्यामुळे वाटोळं करू शकतात जादूगार किती एकमेकांचं, सांगणार तुम्हाला मी त्याबद्दल आहे. सामना करायचा काळ्या जादुशी कसा, शिकवायला ते तुम्हाला, हातात माझ्या वर्ष आहे एक-

रॉनच्या तोंडून निघून गेलं, “काय? तुम्ही त्यानंतर थांबणार नाही?”

आपटेंचा जादूचा डोळा फिरला आणि रॉनकडे रोखून बघायला लागला. रॉन सटपटलाच; पण दुसऱ्याच क्षणी आपटे हसायला लागले- हॅरीने त्यांना हसताना पहिल्यांदाच पाहिलं होतं; पण त्यामुळे झालं असं, की त्यांच्या आधीच छिन्नविछिन्न झालेला चेहरा आणखीनच विदीर्ण दिसायला लागला; पण निदान मुलांना एवढा तरी दिलासा मिळाला की त्यांना हसतापण येतं! रॉनला जरा सुटल्यासारखं वाटलं. 

तू मुलगा आहेस आर्थर वीज्लीचा ना?” आपटे म्हणाले.तुझ्या वडिलांनी फार मोठ्या वाचवलं होतं मला, संकटातून दिवसांपूर्वी काही. पण हो, एकच वर्षभर थांबणार आहे मी फक्त. आग्रहास्तव प्रोफेसर अल्बस डम्बलडोरच्या खास. परत जाईन शांत निवृत्त जीवनात एका वर्षानंतर मी आपल्या.” 

ते कोरडेपणाने हसले आणि मग त्यांनी आपल्या ओबडधोबड हातांनी टाळी वाजवली. त्यानंतर अचानक काहीतरी लक्षात आल्यासारखं केलं आणि आपली छडी बाहेर काढली. ती छडी आपल्या गळ्यावर टेकवत आपटेसरळ बडबडोअसं काहीतरी पुटपुटल्याचं वर्गाला ऐकू गेलं. तो मंत्र काय होता, हे आपटे पुन्हा बोलायला लागल्यावर कळलं. 

प्रोफेसर आपटे बोलताना जी शब्दांची सरमिसळ करून बोलायचे त्यावर काम करणारा तो मंत्र होता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी किंवा बाधा येऊ नये आणि त्यांना बोलणं नीट समजावं म्हणून कोणीतरी आपटेंना तो मंत्र सांगितला असल्याची माहिती मागे बसलेल्या सीमस फिनिगनने हॅरी, रॉन आणि हर्माईनीला पोहोचवली. पण तो मंत्र पूर्णपणे काम करत नसल्याचंही सगळ्यांच्या लगेचच लक्षात आलं. वाक्य तर आपटे व्यवस्थित बोलत होते मात्र अनेक शब्द दोन वेळा बोलले जात होते. हा मंत्राचा एक परिणाम होता. 

तर मग, आता थेट विषयालाच हात हात घालूया. शाप- शाप कितीतरी प्रकारचे असतात आणि त्यांच्या त्यांच्या शक्तीही वेगवेगळ्या असतात. आता असं आहे, की जादू मंत्रालयानुसार मी मी तुम्हाला शापांचं फक्त प्रत्युत्तर शिकवून तिथेच थांबणं अपेक्षित आहे. तुम्ही सहाव्या सहाव्या वर्षाला जाईपर्यंत बेकायदेशीर शाप कसे द्यायचे, ते तुम्हाला शिकवायची मला परवानगी परवानगी नाही. तोपर्यंत तुम्ही अशा शापांशी शापांशी मुकाबला करण्याइतके मोठे झालेले नसाल, असं मानलं जातं; पण प्रोफेसर प्रोफेसर डम्बलडोरांचं तुमच्याबद्दलचं मत फारच चांगलं आहे. त्यांच्या मते तुम्ही या या सगळ्याशी आरामात लढा देऊ शकाल आणि मलाही मलाही असं वाटतं, की अशा शापांची तुम्हाला जितक्या जितक्या लवकर माहिती मिळेल, तितकं चांगलं. तुम्हाला जी गोष्ट गोष्ट माहीतच नाही, त्या गोष्टीपासून स्वतःचा बचाव बचाव तुम्ही कसा काय करू शकाल? जो जादूगार तुम्हाला बेकायदेशीर शाप देणार असेल असेल, तो तुम्हाला सांगून थोडाच शाप देणार आहे! ही गोष्ट तो तो सभ्यपणे आणि नम्रपणे अजिबात करणार नाही, त्यामुळे तुम्हाला सज्ज असावं लागेल लागेल. सावध राहावं लागेल. विद्यार्थिनी लव्हेंडर ब्राऊन, मी शिकवत असताना ते बाजूला ठेवा.” 

लव्हेंडर दचकलीच आणि ओशाळली. ती टेबलखालून पार्वतीला आपली भविष्य पत्रिका दाखवत होती. आपटेंचा जादूचा डोळा ज्याप्रमाणे त्यांच्या डोक्याच्या मागचं पाहू शकत होता, त्याचप्रमाणे अपारदर्शक लाकडाच्या पलीकडचंसुद्धा पाहू शकत होता, हे सर्वांना कळून चुकलं. 

तर.... तुमच्यापैकी कुणाला माहीत माहिती आहे का, की जादूगारांच्या कायद्यानुसार कोणत्या शापांना सगळ्यात जास्त जास्त शिक्षा मिळते?” 

कितीतरी हात चाचरत वर झाले, त्यात रॉन आणि हर्माईनीचे हातही होते. आपटेंनी रॉनला खूण केलेली असली, तरी त्यांचा जादूचा डोळा अजूनही लव्हेंडरवरच खिळून होता. 

अंss” रॉन चाचरत म्हणाला.माझ्या डॅडींनी मला एका शापाबद्दल सांगितलं होतं. बहुधा संमोहन शाप?”

, हां,” आपटे कौतुकानं म्हणाले.तुझ्या डॅडींना त्याची त्याची चांगलीच माहिती असेल. कोणे एके काळी संमोहन संमोहन शापामुळे मंत्रालय फारच जेरीला आलं होतं.” 

आपटे आपल्या लाकडी काठीवर जोर देऊन उभे राहिले. मग त्यांनी आपल्या डेस्कचा खण उघडला आणि त्यातून एक मोठी काचेची पेटी बाहेर काढली. त्यात तीन कोंबडे बसले होते. त्यांची वाढ पूर्ण झालेली असली तरी सर्वसाधारण कोंबड्यांपेक्षा यांचा आकार बराच लहान होता. रॉन थोडा पुढे सरकला... त्याला कोंबडे खूप मनोरंजक वाटायचे. 

आपण कोंबड्यांवर का प्रयोग करतो आहे प्रोफेसर?” पार्वती पाटीलने अत्यंत दबक्या आवाजात भीत भीत विचारलं. 

एवढं एवढं हळू बोलणाऱ्यांना बाबूराव गणपतराव आपटे उत्तर देत नसतात.आपटेंनी समोर न बघता उत्तर दिलं. 

पार्वती कशी बशी उभी राहिली आणि तिने जरा मोठ्या आवाजात विचारलं, “कोंबडे का?” बाकीचे शब्द तिने गिळंकृतच करून टाकले, तिला वाटणाऱ्या प्रचंड भीतीमुळे. 

बाबूराव को चिकन बडा पसंद है!गमतीत आपटे म्हणाले आणि हसले. 

आपटेंनी पेटीत हात घालून एका कोंबड्याला पकडलं आणि सर्वांना दिसावं म्हणून त्याला आपल्या तळहातावर ठेवलं. मग आपली छडी त्याच्याकडे रोखून ते पुटपुटले, “संमोहितो!” 

कोंबडा आपटेंच्या तळहातावर एखाद्या मोराचं नाटक केल्यासारखे त्याचे हात डोक्यावर धरून गोलगोल फिरायला लागला.  त्यानंतर त्याने आपले पाय ताठ केले आणि तो पाठीवर पडला. मग किल्ली मारल्यावर चालणाऱ्या खेळण्यासारख्या त्याने तिथल्या तिथे कोलांटी उड्या मारायला सुरुवात केली. आपटेंनी आपली छडी हलवली. बाजूच्या रेडियोमधूनकोंबडी पळालीहे गाणं वाजायला लागलं आणि कोंबडा लगेचच आपली मान सुरेख हलवत पाय उडवत तालीत नाच करायला लागला. आपटे सोडून सगळे खिदळत होते. 

तुम्हाला खूप मजा मजा वाटतेय, नाही का?” ते ओरडून म्हणाले.कुणी हा हा प्रकार तुमच्या बाबतीत केला, तर तेव्हाही तुम्हाला एवढीच मजा वाटेल का?”

सगळ्यांचं हसू तत्काळ मावळलं. 

पूर्ण नियंत्रण,” तो कोंबडा पुन्हा आडवा पडून लोळायला लागल्यावर आपटे सावकाश म्हणाले.मी मी जर याला आदेश दिला, तर तो खिडकीबाहेर उडी मारेल, बुडेल किंवा तुमच्यापैकी एखाद्याच्या पायाचा चावा घेईल.

आपटे पुढे म्हणाले, “कित्येक वर्षांपूर्वी जादूगार जादूगर आणि जादूगारिणींना संमोहन शापाद्वारे नियंत्रित केलं जायचं.ते वॉल्डेमॉर्ट शक्तिशाली होता तेव्हाची गोष्ट सांगताहेत, हे हॅरीच्या ताबडतोब लक्षात आलं.त्यामुळे कोण कोण नाइलाजानं काम करतंय आणि कोण स्वेच्छेनं करतंय हे माहीत करून घेणे घेणे म्हणजे मंत्रालयाच्या दृष्टीनं डोकेदुखीच होती. संमोहन शापाशी लढा देता येतो आणि तो कसा ते मी मी तुम्हाला शिकवेन; पण त्यासाठी विलक्षण चारित्र्यशुद्ध शक्तीची गरज असते, जी प्रत्येकात असतेच असतेच असं नाही, त्यामुळे तो शाप चुकवता आला आला तर फारच उत्तम. अखंड दक्षता!ते एकदम ओरडल्यावर विद्यार्थी दचकलेच. 

आपटेंनी लोळण घेणाऱ्या कोंबड्याला पकडून आपल्या डेस्कवर सरळ ठेवलं.कुणाला आणखी काही काही शाप माहीत आहेत का? आणखी एखादा एखादा बेकायदेशीर शाप?” 

हर्माइनीचा हात वर झाला आणि त्याबरोबरच नेव्हिलचाही हात वर झालेला पाहून हॅरीला आश्चर्यच वाटलं. एरवी नेव्हिल साधारणपणे एकाच तासाला उत्तरं द्यायचा आणि तो म्हणजे वनस्पतीशास्त्र, जो त्याचा आवडता विषय होता. नेव्हिलला स्वत:लादेखील आपल्याच साहसाचं आचर्य वाटत होतं. 

हां, बोल?” आपटेंचा जादूचा डोळा फिरून नेव्हिलवर स्थिरावला. 

एक शाप आहे - पीडिकृत शाप.नेव्हिल हळू, पण स्पष्ट आवाजात म्हणाला. 

आपटे आता आपल्या दोन्ही डोळ्यांनी नेव्हिलकडे निरखून बघत होते.तू विद्यार्थी विद्यार्थी नेव्हिल लाँगबॉटम आहेस ना?” त्यांनी विचारलं आणि त्यांचा जादूचा डोळा विद्यार्थ्यांची नावं असलेल्या रजिस्टरमध्ये बघायला लागला. 

नेव्हिलनं घाबरून मान हलवली; पण आपटेंनी त्याला आणखी प्रश्न विचारले नाहीत. वर्गाकडे बघत त्यांनी पेटीतून दुसऱ्या कोंबड्याला बाहेर काढलं. त्यांनी त्याला डेस्कवर ठेवल्यावर तो अचल बसून राहिला, कारण त्याची हलायचीसुद्धा हिंमत होत नव्हती. 

पीडिकृत शाप.आपटे म्हणाले.आपण आपण कोंबड्याचा आकार थोडा वाढवू या म्हणजे मग तुम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच नीट कळेल.आपली छडी कोंबड्याकडे रोखत ते म्हणाले, “विस्तारण.” 

मग आपटेंनी आपली छडी कोंबड्याच्या दिशेनं रोखली आणि पुटपुटत म्हणाले म्हणाले, “पीडितो.”

कोंबड्याचे पाय एकाएकी त्याच्या शरीराकडे वळले. तो उलटा झाला आणि भयानक प्रकारे तडफडायला लागला, इकडेतिकडे तोल जाऊन पडायला लागला. त्याच्या तोंडून जरी काहीही आवाज येत नसला, तरी हॅरीला खात्री होती, की बोलता येत असतं, तर तो नक्कीच जीव खाऊन केकाटला असता. आपटेंनी अजूनही आपली छडी बाजूला केली नव्हती. कोंबडा आणखीनच दयनीयपणे कापायला आणि तडफडायला लागला.

थांबवा ते, बंद करा.हर्माईनी जोरात ओरडली. 

हॅरीनं वळून हर्माईनीकडे पाहिलं. हर्माईनी कोंबड्याकडे बघत नसून, नेव्हिलकडे पाहत होती. हॅरीपण बघायला लागल्यावर त्याला दिसलं, की नेव्हिलने समोरचं डेस्क घट्ट धरून ठेवलेलं होतं. त्याचे हात पांढरे पडलेले होते आणि त्याचे डोळे भीतीनं विस्फारलेले होते. 

आपटेंनी आपली छडी बाजूला केली. कोंबड्याची तडफड थांबली; पण तो अजूनही थरथरत होता. 

आकुंचन.आपटे पुटपुटले आणि कोंबडा पुन्हा पहिल्यासारखा लहान आकाराचा झाला. आपटेंनी त्याला पहिल्या कोंबड्याशेजारी नीट ठेवलं. 

वेदना,”  आपटे सावकाश म्हणाले.जर तुम्हाला पीडिकृत शाप शाप देता येत असेल, तर कुणाचा छळ करण्यासाठी चाबूक किंवा किंवा चाकूची गरज नाही. कोणे एके काळी हा हा शापही खूपच लोकप्रिय होता.

ठीक आहे. कुणाला तिसरा तिसरा शाप माहीत आहे का?” 

हॅरीनं चहूकडे पाहिलं. सगळे जण एकच विचार करत होतेकी त्या शेवटच्या कोंबड्याची काय हालत होईल कुणास ठाऊक! हर्माईनीचा हात तिसऱ्यांदा हळूच हलला आणि वर झाला. 

हां, बोल बोल,” आपटे तिच्याकडे बघत म्हणाले. 

मृत्युदंशम.हर्माईनी हळूच म्हणाली. 

रॉनसकट कितीतरी जणांनी तिच्याकडे घाबरून पाहिलं. 

आह्,” आपटे म्हणाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित झळकलं.हां, सगळ्यात सगळ्यात शेवटचा आणि वाईटात वाईट... मृत्युदंशम... मारून मारून टाकणारा शाप.” 

त्यांनी आपला हात काचेच्या पेटीत घातला. असं वाटत होतं, की जणू काही आपलं काय होणार आहे, ते तिसरा कोंबडा समजून चुकला होता. तो आपटेंच्या बोटांना चुकवण्यासाठी पेटीतल्या पेटीत इकडेतिकडे पळायला लागला; पण आपटेंनी त्याला पकडून डेस्कवर ठेवून दिलं. कोंबडा त्या लाकडी पृष्ठभागावर दहशत घेऊन वेगानं पळायला लागला. तो रॉनच्या दिशेने यायला लागल्यावर रॉन घाबरून मागे सरकत असताना बाकावरून पडता पडता वाचला. 

आपटेंनी छडी उचलल्याबरोबर हॅरीच्या अंगावर सरसरून काटा आला. 

आपटे कडाडले, “मृत्युदंशम!” 

डोळे दिपवणारा हिरवा प्रकाश पसरला. एखादी विशाल अदृश्य वस्तू हवेत उडत असल्यासारखं वाटलं आणि दुसऱ्याच क्षणी कोंबडा उलटा झाला. त्याच्या अंगावर कसलीही नामोनिशाणी नसली, तरी तो मेलेला होता. कितीतरी मुली जोरात किंचाळल्या.

आपटेंनी मेलेल्या कोंबड्याला डेस्कवर बाकी दोन कोंबड्यांच्या शेजारी व्यवस्थित ठेऊन दिलं. 

ते हळूच म्हणाले,  “हे चांगलं नाहीये. सुखदही नाहीये नाहीये आणि याची काही तोडही नाहीये. यातून वाचण्याचा वाचण्याचा काही उपायच नाहीये.  आजतागायत फक्त एकच एकच व्यक्ती यातून जिवानिशी वाचलेली आहे आणि ती आत्ता या क्षणी माझ्यासमोर बसलेली आहे आहे.” 

आपटेंचे दोन्ही डोळे हॅरीकडे वळताच त्याचा चेहरा लाल झाला. बाकीचे सगळे जणही आपल्याकडेच बघताहेत, याची त्याला जाणीव झाली. हॅरी कोऱ्या फळ्याकडे एकटक बघत राहिला; पण खरं तर त्याचं तिकडे अजिबात लक्ष नव्हतं. 

थोडक्यात त्याच्या मम्मी - डॅडींना अशा प्रकारे मरण आलं होतं तर. अगदी त्या कोंबड्यासारखंच. त्यांच्या शरीरावरही काहीच खुणा नसतील का? त्यांनीपण फक्त हिरवा प्रकाश पाहिला असेल आणि वेगानं येणाऱ्या मृत्यूचा आवाज ऐकला असेल आणि काही कळायच्या आत त्यांच्या शरीरातून प्राण निघून गेले असतील का

आपटेंनी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली. त्यांचा आवाज हॅरीला खूप दुरून येत असल्यासारखा वाटत होता. मोठ्या प्रयत्नानं तो वर्गात परत आला आणि आपटेंचं बोलणं ऐकायला लागला. 

मृत्युदंशम शाप शाप देण्यासाठी खूप मोठ्या शक्तीची आवश्यकता असते. तुम्हाला पाहिजे तर तुमच्या तुमच्या सर्वांच्या छड्या माझ्याकडे रोखून हे शब्द उच्चारून बघा; पण त्यानं माझ्या नाकातूनही नाकातूनही रक्त निघेल असं मला वाटत नाही. अर्थात, ते तितकंसं महत्त्वाचं महत्त्वाचं नाहीये, कारण मी हा हा शाप कसा द्यायचा, ते तुम्हाला शिकवायला इथे आलेलो नाही. आता जर का याला काहीही तोडच तोडच नाहीये, तर मी तुमच्यापुढे त्याचं प्रदर्शन का करतोय? तर तुम्हाला माहीत असावं म्हणून म्हणून. वाईटात वाईट काय असू शकतं, त्याची त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे म्हणून. अशा शापाशी मुकाबला करण्याची वेळ तुमच्यावर यावी यावी असं तुम्हाला नक्कीच वाटत नसेल. अखंड दक्षता!ते ओरडले आणि पुन्हा एकदा सगळा वर्ग हादरला. 

आता... हे जे तीन तीन शाप आहेत- मृत्युदंशम, संमोहन आणि पीडिकृत शाप- त्यांना अक्षम्य शाप म्हटलं जातं. यापैकी कशाचाही कशाचाही प्रयोग माणसांवर करण्याबद्दल अझ्कबानमध्ये जन्मठेपेची शिक्षा मिळते. तुम्हाला या या शापांशी लढा द्यायला शिकायचं आहे. त्यांच्याशी लढा कसा द्यायचा, ते मी तुम्हाला शिकवेन. सुसज्ज असावं लागेल तुम्हाला. असावं लागेल सशस्त्र आणि त्याहीपेक्षा सतत राहून दक्ष तुम्हाला करत राहिलं पाहिजे सराव. लेखण्या आपापल्या आता काढा बाहेर काढा. लागा लिहायला.यापुढे आपटे म्हणाले, “अरेच्चा, मंत्र उतरलेला दिसतोय!असं म्हणून प्रोफेसर आपटेंनी आपली छडी त्या तिन्ही कोंबड्यांकडे वळवली आणि काहीतरी मंत्र पुटपुटला. त्याबरोबर त्यांच्याजागी चिकन कबाब अवतीर्ण झाले. वर्गाला अक्षम्य शापावरच्या नोट्स काढायला सांगून उरलेला वेळ आपटे कबाब खात राहिले. 

 

प्रसंग ४-

तेवढ्यात हॅरीला पाठीमागून ठकठक असा ओळखीचा आवाज ऐकू आला. वळून पाहिल्यावर त्याला दिसलं, की बाबूराव आपटे शेजारच्याच एका वर्गातून बाहेर पडत होते. आज त्यांनी जो जगावेगळा अवतार केला होता, तो बघून मनातल्या मनात हॅरी आणि सेडरीकला खूपच हसू आलं. आपटेंनी आज एखाद्या जेलमधल्या व्यक्तीचा वेश घातला होता. काळ्या- पांढऱ्या पट्ट्या असलेले फूल शर्ट आणि पॅंट त्यांनी घातली होती, पण त्यावर त्यांनी जी गुलाबी रंगाची मोठी हॅट घातली होती, त्यामुळे ते आणखीनच गमतीशीर दिसत होते. 

चल विद्यार्थी पॉटर हॅरी, माझ्याबरोबर." ते दरडावून बोलले. वर्गात तू तुझ्या विद्यार्थी डिगोरी सेडरीक जा.

हॅरी आपटेंच्याकडे घाबरून बघायला लागला. त्यांनी त्या दोघांचं बोलणं ऐकलं तर नसेल ना? अं - प्रोफेसर, मला वनस्पतिशास्त्राच्या तासाला जायचं आहे. 

काळजी नकोस पॉटर करू त्याची, माझ्या चल ऑफिसात. 

हॅरी त्यांच्या मागोमाग जायला लागला. आता आपल्या बाबतीत काय होणार आहे कुणास ठाऊक, असा विचार करत तो चाललेला होता. त्यालाड्रॅगन्सबद्दल कसं कळलं, हे तर विचारणार नसतील ना आपटे? जर आपटेंनी डम्बलडोरना हॅग्रिडबद्दल जाऊन सांगितलं तर किंवा हॅरीलाही गुलाबी जीवंत टेडी बेअर बनवून टाकलं तर? हॅरीच्या मनात आलं, की जर तो टेडी बेअर झाला, तर ड्रॅगनला ओलांडणं त्याला खूप सोपं जाईल. मग तो खूप छोटा होईल आणि पन्नास फुटांवरून ड्रॅगन त्याला बघूच शकणार नाही.

तो आपटेंच्या मागोमाग चालत त्यांच्या ऑफिसात जाऊन पोहोचला. आपटेंनी दरवाजा बंद केला आणि ते हॅरीकडे वळले. त्यांचा जादूचा आणि साधा असे दोन्ही डोळे हॅरीवर खिळलेले होते. 

आपटे सावकाशपणे म्हणाले, “फारच चांगलं तू केलं आहेस आत्ता विद्यार्थी हॅरी पॉटर काम.” 

ते असं काही बोलतील, अशी अपेक्षाच नसल्यामुळे काय बोलावं तेच हॅरीला कळेना. 

आपटे म्हणाले, “बस.हॅरी बसला आणि आजूबाजूला बघू लागला. 

मागील दोन शिक्षकांच्या काळात तो या ऑफिसात आलेला होता. प्रोफेसर लॉकहार्टच्या कालावधीत भिंतीवर त्यांचे स्वत:चेच हसत असलेले आणि डोळे मिचकावत असलेले फोटो टांगलेले असायचे. ल्युपिन इथे असताना इथे कुठला ना कुठलातरी नवीन आकर्षक प्राणी असायचा आणि त्याच्याबद्दल ते वर्गात शिकवणार असायचे; पण सध्या तरी या ऑफिसचे दोन वेगळे भाग दिसत होते. 

एका भागात प्रत्येक गोष्ट अगदी टापटीप होती. खिडकीवर धुळीचा कणही नव्हता, डेस्कवरची प्रत्येक पेन्सिल व्यवस्थित कोरून ठेवली होती, टांगलेल्या सैनिकाच्या कपड्यांवर एक साधी चुणीही नव्हती. दुसऱ्या भागात परिस्थिती अगदी विरुद्ध होती. सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसत होत्या. मध्येच एखादा कचऱ्याचा ढिगारा बनला होता, तर कित्येक ठिकाणी कागद जाळल्यामुळे होणारी राख पसरलेली होती. 

या सगळ्या पसाऱ्यातून काही अत्यंत विचित्र वस्तू व्यवस्थित उठून दिसत होत्या. हॅरीला वाटलं, की आपटे जेव्हा ऑरर होते, तेव्हा ते या वस्तूंचा वापर करत असतील. त्यांच्याकडे एक डॉमिनोज पिझ्झाचा मोकळा जीवंत बॉक्स होता, जो उघडझाप करत मोठ्यामोठ्याने अनेक माणसांची नावं ओरडत होता. प्रत्येक नावाबरोबरधोका! धोका!असे शब्दही स्पष्ट ऐकू येत होते. एकीकडे भक्कम काचेच्या डब्यात एक मगलू लोक वापरतात तशी बंदूक होती जी आपपलीच प्रत्येक सेकंदाला गोळ्या इथेतिथे मारत होती. लवकरच हे लक्षात आलं की ती काचेची पेटी बुलेटप्रूफ होती.

हॅरीला खोलीच्या कोपऱ्यात काही अधांतरी तरंगणारं पाणीही दिसलं. त्या पाण्याने पाच ते सहा चेहऱ्यांचा आकार घेतला होता, पण ते ओळखू येत नव्हते. एका कोपऱ्यात एक छोटंसं टेबल ठेवलेलं होतं आणि त्यावर आपटेंनी मॅल्फॉयला ज्या गुलाबी टेडी बेअरमध्ये रूपांतरित केलं होतं, तसंच एक अस्वल ठेवलेलं होतं. त्यातून बारीक बारीक आवाज येत होता. 

माझी यंत्रणा आवडली का शोधणारी काळ्या जादूला?” हॅरीकडे लक्षपूर्वक बघत आपटे म्हणाले. 

ते काय आहे?” हॅरीनं गुलाबी टेडी बेअरकडे बोट दाखवत विचारलं. 

मागच्या तासाला आपटेंनी जो मंत्र स्वतःवर टाकला होता, ज्यामुळे ते शब्दांची सरमिसळ न करता बोलू शकत होते, तो त्यांनी परत स्वतःवर टाकला आणि मग बोलायला लागले.

गौप्य संवेदक आहे. जर जर कुणी खोटं बोलत असेल, तर लगेच तेये बाबुभाई का स्टाइल नही हैअसं कोकलायला लागतं; पण पण इथे त्याचा काही उपयोग नाहीच आहे म्हणा. सगळे विद्यार्थी त्यांनी आपला गृहपाठ गृहपाठ का केला नाही याबद्दल खोटंनाटं सांगतच असतात, त्यामुळे मी इथे आल्यापासून ते ते कोकलतंच आहे. मला ही बंदूक पेटीत बंद करावी करावी लागली, कारण ती सतत गोळ्या मारत होती होती. मैलांवर काही चुकीची गोष्ट घडत घडत असेल तर ती लगेच सावध होते. इथे तर विद्यार्थी विद्यार्थी करतात त्या चुकीच्या गोष्टींना मर्यादाच नाही नाही!ते दरडावणीच्या सुरातच पुढे म्हणाले, “पण विद्यार्थ्यांच्या चुकीच्या कामाव्यातीरिक्त कामाव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी ते हेरतं हे उघडच आहे.” 

आणि हे पाणी कशासाठी आहे? 

ओह, ते माझं माझं शत्रूदर्पण आहे. यात माझ्या शत्रूंचे चेहरे तयार तयार होतात. पण मला त्यांचे डोळे जोपर्यंत दिसत नाहीत, तोपर्यंत तोपर्यंत माझ्यावर कसलंही संकट नाही आणि तसं झालं, तर मात्र मात्र मी माझा पेटारा उघडतो.” 

ते किंचितसं कोरडं हसत म्हणाले आणि त्यांनी खिडकीच्या खाली ठेवलेल्या एका मोठ्या पेटीकडे खूण केली. पेटीवर एका ओळीत सात किल्ल्यांसाठी सात भोकं होती. हॅरीच्या मनात आलं, की याच्या आत काय असेल कोण जाणे; पण आपटेंच्या पुढच्या प्रश्नानं त्याला सरळ जमिनीवर आणून आदळलं. 

तर मग... ड्रॅगन्सना कशा कशा प्रकारे टक्कर द्यायचं ठरवलं आहेस तू?” 

हॅरी अडखळला. ज्याची भीती वाटत होती, तेच घडलं; पण काय वाट्टेल ते झालं तरी हॅग्रिडनं नियम तोडल्याची गोष्ट त्यानं ना सेडरिकला सांगितली होती ना तो आपटेंना सांगणार होता. 

असू दे रे, आपटे उसासा टाकत आपली लाकडी काठी, पाठ खाजवायला वापरत म्हणाले. जादूगार स्पर्धेत लबाडी करण्याची करण्याची पारंपरिक प्रथा आहे. असं नेहमीच होत आलंय.” 

मी लबाडी केलेली नाही.हॅरी झटकन म्हणाला.मला ते कळलं हा एक योगायोग होता फक्त!” 

आपटे हसत म्हणाले, पोरा, मी तुला दोष दोष देत नाहीये. मी डम्बलडोरना पहिल्यापासून सांगत आलोय, की ते स्वतः कितीही कितीही आदर्शाचा पुतळा असले, तरी कारकारोफ आणि मॅक्झिम तसेच असतील असं मुळीच नाही नाही. त्यांना सांगता येत असलेली प्रत्येक गोष्ट गोष्ट त्यांनी आत्तापर्यंत आपापल्या चॅम्पियन्सना सांगितली सुद्धा असेल. त्यांना त्यांना जिंकायचं आहे. डम्बलडोरना हरवायचं आहे. डम्बलडोरही शेवटी एक एक माणूसच आहेत, हेच त्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे.” 

आपटेंचं भयंकर हसणं आणि त्यांच्या त्या जादूच्या डोळ्याचं गरागरा फिरणं बघून हॅरीला त्यांच्याकडे पाहायचीसुद्धा हिंमत होईना. 

आपटेंनी विचारलं, “तर मग... ड्रॅगन्सना कसं ओलांडायचं ओलांडायचं याबद्दल काही विचार विचार केला आहेस का तू?”

हॅरी म्हणाला, नाही.” 

हे हे बघ, ते कसं करायचं, ते मी तुला सांगणार नाही नाही. आपटे रुक्षपणे म्हणाले.मला मला भेदभाव करायला आवडत नाही. मी फक्त तुला शहाणपणाचा सल्ला सल्ला देऊ शकतो आणि माझा पहिला सल्ला सल्ला हा आहे- आपल्यातल्या शक्तीचा फायदा घे.” 

पण इच्छा नसूनही हॅरीच्या तोंडून निघून गेलं, “पण माझ्याकडे कोणतीही शक्ती नाहीये.” 

काहीतरी काहीतरी मूर्खासारखं बरळू नकोस.आपटे खेकसले.मी मी म्हणतोय ना तुझ्याकडे शक्ती आहे म्हणून, मग आहे. यावर नीट विचार कर. तुला सगळ्यांत जास्त जास्त चांगली कोणती गोष्ट करता येते?” 

हॅरीनं मेंदूवर खूप ताण दिला. त्याला कोणती गोष्ट सर्वात जास्त चांगली करता येते बरं? पण या प्रश्नाचं उत्तर तर फारच सोपं होतं. "क्विडीच." तो फिकटपणे म्हणाला, "पण त्याचा इथे काय संबंध-

बरोबर बरोबर आहे." आपटे त्याच्याकडे एकटक बघत म्हणाले आणि त्यांचा जादूचा डोळा स्थिर झाला. "मी असं ऐकलं आहे, की की तू खूप चांगलं उडतोस.

हो, पण...'' हॅरी त्यांच्याकडे बघतच बसला. "मला झाडू नेण्याची परवानगी नाहीये. माझ्याकडे फक्त माझी जादूची छडी असेल.

माझा दुसरा दुसरा शहाणपणाचा सल्ला हा आहे," आपटे त्याचं बोलणं तोडत जोरात म्हणाले, "की ज्या वस्तूची तुला गरज गरज आहे, तिला मिळवण्यासाठी एखाद्या सोप्याशा मंत्राचा वापर कर. 

हॅरी वेड्यासारखा त्यांच्याकडे बघतच बसला. त्याला कशाची गरज होती? "हे हे बघ पोरा," आपटे कुजबुजत्या स्वरात म्हणाले, "दोन गोष्टींना जोड. हे करणं फारसं अवघड नाहीये.

 

प्रसंग ५-

ठक ठक ठक. 

स्नेपनी अचानक बोलणं थांबवलं. त्यांनी आणि फिल्चनी जिन्याखाली पाहिलं. त्यांच्या डोक्यांच्या लहानश्या फटीतून हॅरीला प्रोफेसर आपटे तिथे लंगडत येताना दिसले. आपटेंनी आपल्या सात नंबरच्या गुलाबी फुटबॉल जर्सीच्या खाली राखाडी रंगाची ट्रॅकपॅंट घातली होती. त्यांच्या डोक्यावर बारीक काळ्या केसांचा टोप होता, आणि चेहऱ्यावर टक्क जागे असल्याचे भाव होते. ते नेहमीप्रमाणेच आपल्या काठीवर रेललेले होते. 

त्यांनी फिल्चला दरडावून विचारलं, “काय पायजमा पार्टी इथे आहे का चालू? का बरं मला नाही बोलावलं? हे नाही चालण्यासारखं हा!

प्रोफेसर स्नेपनी आणि मी आवाज ऐकले, प्रोफेसर.फिल्चने तातडीने उत्तर दिलं.पिव्ह्ज नावाचं भूत नेहमीप्रमाणेच वस्तूंची फेकाफेकी करत होतं आणि तेवढ्यात प्रोफेसर स्नेपच्या लक्षात आलं की त्यांच्या ऑफिसात कोणीतरी घुसलं-

माझ्याशी संदर्भात गोष्टी मी माझ्या मित्राला सांगव्यात असं तुला नाही वाटत फिल्च?” स्नेप खेकसले. 

आपटे जिन्यावर हॅरी, स्नेप आणि फिल्चच्या आणखी जवळ येऊन थांबले. हॅरीला आपटेंचा जादूचा डोळा छत, खालच्या आणि वरच्या पायऱ्या, स्नेप आणि फिल्च वरून फिरून त्याच्यावर स्थिरावलेला दिसला. 

हॅरी खूपच घाबरलेला होता. आपटेंना अदृश्य झग्याच्या पलिकडचं दिसू शकत होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी सगळं खूपच विचित्र दिसत असणार होतं. स्नेप आणि फिल्च आपल्या नाइट शर्टात उभे होते, फिल्चच्या हातात सोनेरी अंड होतं, आणि त्यांच्या समोर हॅरी पायरीत अडकून पडलेला होता. आपटेंना आश्चर्याचा धक्का बसल्याचं हॅरी त्यांच्या आ वासलेल्या तोंडाकडे बघून समजू शकत होता. हॅरी आणि आपटेंची काही क्षण नजरानजर झाली आणि मग आपटेंनी स्वतःला सांभाळून आपलं तोंड बंद केलं आणि आपला साधा डोळा स्नेपकडे वळवत बोलायला सुरुवात केली. 

खरं आहे का, मी ऐकलं ते रे स्नेप? कोणी ऑफिसात घुसलं होतं तुझ्या का?” आपटेंनी हळूच विचारलं. 

पायऱ्यांमध्ये अडकला असल्याने हॅरीचा पाय चांगलाच दुखत होता. त्यात अदृश्य झग्याखाली असल्यामुळे एक कणंही हलणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं. पण त्यातही हॅरीला आपटेंच्या बोलण्यातला त्याने कधीही न ऐकलेला मनापासून आलेल्या चिंतेचा सूर जाणवल्याने हॅरी पुरता गोंधळून गेला. आपटे स्नेपची खरीखुरी चिंता का करत असतील?

स्नेप आपटेंची नजर टाळत म्हणाले, “ते फारसं महत्त्वाचं नाहीये रे बाबूराव.

आता मात्र हॅरीचं डोकं खरंच कामातून गेलं. हॅरीने प्रोफेसर आपटेंना, डम्बलडोरांखेरीज कोणालाच बाबूराव म्हणताना ऐकलेलं नव्हतं. मग अशा रात्रीच्या वेळी स्नेप आपटेंना पहिल्या नावाने का संबोधत होते?

आपटे स्नेपच्या आणखी जवळ जात म्हणाले, “कसं नाही महत्त्वाचं? महत्त्वाचं आहे ते खूप. कोणाला सिव्हिरस वाटेल ऑफिसात तुझ्या घुसावंसं?” आपटेंच्या सुरात हॅरीला पुन्हा एकदा काळजी जाणवली. त्यात आपटेंनी सुद्धा स्नेपना त्यांच्या पहिल्या नावानी हाक मारली होती. हॅरीला जाम धक्का बसला होता. आपटे आणि स्नेप मित्र तर नसावे?

मला वाटतं, एखादा विद्यार्थी गंमत म्हणून घुसला असावा.स्नेप पुन्हा आपटेंची नजर टाळत विषय गुंडाळण्याच्या सुरात म्हणाले. स्नेपच्या त्या तेलकट चेहऱ्यावरच्या भावांमुळे कोणालाही कळलं असतं की ते खोटं बोलताहेत.यापूर्वीही असं झालेलं आहे. माझ्या खाजगी कपाटातून काही अगदी फालतू आणि असंबंधीत गोष्टी चोरीला गेल्या होत्या. विद्यार्थी डेअर वगैरे म्हणून असा मूर्खपणा करत असावेत.आपल्या थापेला पुढे करत स्नेप म्हणाले. 

गोष्टी या सगळ्या असंबंधीत दिसत असल्या, तरी काहीतरी भयानक यंत्र किंवा बेकायदेशीर काढा तर विद्यार्थी नसावेत ना बनवत नाकाखाली सिव्हिरस टिचुन तुझ्या? माझी यंत्र धोकासूचक, परवा सांगत असंच काहीसं होती. पण उलटी थेट परिस्थिती तर नाही ना? म्हणजे तू असं लपवून ठेवलं काही नाहीयेस ना आपल्या ऑफिसात?” आपटेंनी आपला जादूचा डोळा थेट स्नेपच्या चेहऱ्याकडे रोखत आपलं बोलणं पूर्ण केलं. 

आपटेंचं बोलणं समजून घ्यायला हॅरी, स्नेप आणि फिल्च या तिघांनाही काही क्षण लागले, पण त्यानंतर मात्र हॅरी पूर्ण लक्ष देऊन स्नेपकडे बघायला लागला. काहीतरी लपवायचा स्नेप प्रचंड प्रयत्न करत होते हे हॅरीच काय, फिल्चनेही ताडलं. स्नेपचा पिवळट चेहरा एकदम सरळ झाला आणि डोळे काहीसे आकुंचले गेले. 

मग लगेचच ते पुन्हा नेहमीसारखा चेहरा करून शक्य तितक्या सावकाशपणे बोलायला लागले, “बाबूराव, मी माझ्या ऑफिसात कोणतीही वस्तू लपवलेली नाहीये यावर तुझा तरी विश्वास बसायलाच हवा. मागच्या आठवड्यात नाही की तुलाच माझ्या ऑफिसची कसून झडती घ्यावी लागली होती. तुझ्या नजरेतून काही सुटू शकत नाही.स्नेपनी एकाच वाक्यात विनंती, आठवण आणि कौतुक केलं होतं.

आपटेंच्या चेहऱ्यावर एक विचित्र लाज पसरलेली दिसली. आपटेंचा चेहरा हा आधीच इतका विद्रूप होता, की त्यावर कुठलीही भावना पाहिल्यावर मनात कसंसंच व्हायचं. शरमलेल्या सुरतच ते पुढे म्हणाले, “सिव्हिरस, माहीतच ना असेल तुला की डम्बलडोरने तपासणी विशेष करायला या वर्षी इथे सांगितली होती मला. मला वाटलं तेव्हा होतं किती वाईट, तुला मी ते सांगितलंच होतं बाटलीसोबत बटरबियरच्या परवाच.

आता मात्र हॅरीच्या डोक्यातला गोंधळ एकदम शंभर हजार-लाख-कोटी-अब्ज पटीने वाढला. आपटे आणि स्नेप एकत्र बटरबियर पीत होते?! हे अगदीच अशक्य कोटीतलं वाटत होतं. स्नेप कोणाहीसोबत बटरबियर पिणं शक्यच नव्हतं. 

तुझं मनापासून सॉरी मला चांगलंच आठवतंय बाबूराव. आपलं बोलणं झाल्यावर तू उरलेली बाटली परत घेऊन गेलास तेसुद्धा मी विसरू शकणार नाही. मी समजू शकतो, की तुझ्यासारख्या नामांकित ऑररला अशी कामगिरी का दिली गेली असेल ते. पण या सगळ्या गोष्टी शाळेच्या इतर स्टाफसमोर मांडण्याची किती गरज आहे हे मला लक्षात येत नाहीये.तिथे पूर्ण वेळ संभाषण ऐकत उभ्या असलेल्या फिल्चकडे बघून स्नेप हे शेवटचं वाक्य म्हणाले होते. 

आपटेंनी एकदम फिल्चकडे पहिलं. जणू काही ते विसरूनच गेले होते की फिल्च तिथे आहे ते. मग ते म्हणाले, “बोलणं सिव्हिरस पटलं तुझं. सगळ्यांनी झोपायला आता जायला हवं असं वाटतं मला; अर्थातच बेडवर आपापल्या. नाहीये खोलीत माझ्या येणं कोणीच चालणार. खाजगी माझ्या वेळेत लुडबूड करून दाखवाच!” 

का हो बाबू? आज बटरबियर नाही पिणार प्रोफेसर स्नेप सोबत?” गप्पांच्या ओघात आपणंही मिसळावं अशी वेडी इच्छा मनात घेऊन इतका वेळ गप्प असलेला फिल्च अचानक भीत भीत, पण स्पष्ट बोलला. 

बाबूभैय्या से डायरेक्ट बाबू?! ए नालायका, असं बोलण्याचा अधिकार कोणी दिला तुला? बेशरम?” हे असंच वाक्य हॅरीच्या मनातही आलं होतं, पण स्नेपच्या तोंडी ते आणखीनच योग्य वाटलं या क्षणी. एवढ्या मोठ्या व्यक्तीचा अनादर करावा म्हणजे काय? आपटे सुद्धा चांगलेच रागावले होते. 

ए थेरड्या फुसकुं-अशी शिवी त्यांनी जवळजवळ घातली. पण मग स्वतःला आवर घालून म्हणाले, “फिल्च, झोपायला ताबडतोब तू जा.हॅरी जरा दचकलाच, आपटेंचा असा रुद्रावतार पाहून; पण त्याला त्यामागचं कारण लक्षात आलं. 

फिल्च मात्र अजिबात मागे झुकला नाही. आपल्या एवढ्याश्या शरीरात होता- नव्हता तेवढा दम एकवटून तो बोलला, “मी कधी झोपायला जावं, ते तुम्ही ठरवू नका. तुम्ही आपापल्या झोपायच्या वेळेचं बघा.फिल्चच्या तोंडी असली भाषा पाहून हॅरी उडालाच! हॅरीचा आपल्या कानांवर विश्वासच बसे ना! स्नेपने आपली छडी उगारलेली पाहून मात्र फिल्च गप्प झाला. 

स्नेपने आणखी काही हलचाल केली नाही, कारण त्यांना चांगलंच माहीत होतं, की त्यांनी आत्ता एक छोटासा जरी मंत्र फिल्चवर मारला असता, तर घडणारं महाभारत कधी संपलच नसतं. अशाच स्मशान शांततेत पुढचे काही क्षण गेल्यावर आपटे म्हणाले, “उठा ले रे देवा! मुझे नही, इस फिल्च के बच्चे को उठा ले!

यानंतर पुन्हा काही वेळ शांततेत गेला. मग आपटे म्हणाले, “झोपायला जा, फिल्च. तुझा जो तुकडा कागदाचा पडला आहे तो तिथे घेऊन जा.आपटे ज्या कागदाकडे बोट दाखवत होते, तो हॅरीकडून पडलेला भटकणाऱ्यांचा नकाशा होता. हॅरीला स्नेपच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदललेले दिसले, ते कागद पडला होता त्या सहा पायऱ्या खाली असलेल्या जागी जायला लागले. आता मात्र हॅरीची घाण फाटली. त्याने खुणा करून आपटेंना सांगितलं की तो कागद आपला आहे. 

आपटेंना अगदी वेळेत ते कळलं म्हणून चांगलं झालं. स्नेप तो चर्मपत्राचा तुकडा उचलायला वाकणारच होते, तेवढ्यात आपटेंनी मंत्राने तो कागद आपल्याकडे बोलवून घेतला.माझाच असावा मगाशी पडलेला कागद हा. मीही आहे वेडाच.असं म्हणत आपटेंनी ते चर्मपत्र आपल्या हातात घेतलं. 

स्नेपनी चमकून फिल्चच्या हातातल्या सोनेरी अंड्याकडे आणि मग आपटेंच्या हातातल्या चर्मपत्राकडे पाहिलं.पॉटर!ते स्वतःशीच कुजबुजले. पण ते शब्द तिथल्या सगळ्यांना ऐकू आले आणि हॅरीच्या अंगावर सरसरून काटा आला. 

ते अंड पॉटरचंच आहे आणि तो कागद सुद्धा त्याचाच आहे. मी मागच्या वर्षी तो त्याच्याकडे पाहिला होता. पॉटर इथे हजर असणार. तो त्याचा अदृश्य झगा घालून लपलेला असणार आहे.स्नेपनी आपली शंका एका श्वासात बोलून दाखवली आणि मग ते परत आधी उभे होते तिथे येऊन हात पसरून हवेत चाचपडायला लागले. 

ही आपण थिअरी अर्ध्या उरलेल्या बाटलीसोबत बटरबियरच्या बसून बोलूया सिव्हिरस. डम्बलडोरना ऐकायला आवडेल नक्कीच काहीतरी थिअरी अशी. ताळ्यावर डोकं आहे ना सिव्हिरस पण तुझं? पॉटरचं नाव एवढ्या लवकर डोक्यात तुझ्या आलं विचारतोय म्हणून. वाटते काळजी मला रे तुझी.

हम्म..एखाद्या चॅटिंगमध्ये विषय बंद करावा तसा हम्म म्हणून स्नेपनी विषय बंद केला. स्नेपनी आपले हात सावकाश खाली केले आणि काही क्षण विचार केल्यानंतर ते नरम आवाजात, मोजून- मापून म्हणाले, “माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर पॉटर असे काही चाळे एवढ्या रात्रीच्या वेळी करत असेल, तर त्याला थांबवायला हवं.. त्याच्या भल्याकरता.

सिव्हिरस तोंडी तुझ्या पॉटरची चिंता करण्याची भाषा वाटते फारच विचित्र.आपटेंच्या या वाक्यावर कोणीच काहीच बोललं नाही. तेवढ्यात अंधारातून मिसेस नॉरीस ही मांजर प्रकट झाली आणि फिल्चच्या पायाला घासून हॅरी जिथे उभा होता, तिथे बघून तिने जोरात म्याऊं केलं. ती फिल्चच्या पायाशीच फिरत, सुगंधी फेसाचा वास कुठून येतो आहे ते हुंगण्याचा प्रयत्न करत होती. हॅरीला पुन्हा एकदा भीती वाटली, की आपण शोधले जातोय की काय. 

तेवढ्यात स्नेप म्हणाले, “आत्ता आपण सगळ्यांनीच झोपायला जाणं उत्तम ठरेल; आपापल्या खोलीत.

त्यावर आपटे म्हणाले, “विचार सिव्हिरस उत्तम आहे. अंड ते माझ्याकडे दे फिल्च. यापुढे आणि माझ्याशी आत्ता शब्दानेही एका घालू नकोस वाद. की कोणा भुताच्या चोरटेपणाचा पुरावा हा वगैरे आहे म्हणून. अंड ते आपल्या चॅम्पियनकडे लगेच हवं पोहोचायला. इकडे आण, दे ते ताबडतोब.

फिल्चने अनिच्छेनीच ते अंड आपटेंच्या हातात दिलं आणि तो मिसेस नॉरीसशी काहीतरी बोलत तडक झोपायला निघून गेला. त्याच्या मागोमाग स्नेप सुद्धा आपटेंना शुभरात्री म्हणून आपल्या खोलीत निघून गेले. काही वेळाने धाडकन दार लावल्याचा आवाज झाला. मग आपटेंनी वळून अगदी बारीक आवाजात हॅरीशी बोलायला सुरुवात केली. 

वाचलास पॉटर थोडक्यात. मान पटकन माझे आभार. आहेस ना रे? की झोपलास?”

धन्यवाद प्रोफेसर.आपला अडकलेला पाय प्रचंड दुखत असताना देखील हॅरी म्हणाला. 

हे आहे काय?” आपटेंनी नकाशाकडे बोट दाखवत विचारलं. 

तो हॉगवर्ट्सचा नकाशा आहे, प्रोफेसर. मगलूंच्या लाईव्ह लोकेशन सारखं काम करतो तो. फारच उपयोगी..

ओहो..आपटे आपले दोन्ही डोळे प्रचंड विस्फारत नकाशाकडे पाहत म्हणाले. एव्हाना हॅरीने कसाबसा आपल्या अंगावरचा अदृश्य झगा काढला होता, पण आपटेंचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं.नकाशा तर फारच हा आहे विलक्षण!

हॅरीचा पाय आता इतका दुखायला लागला की त्याच्या डोळ्यात पाणी आलं.अं- प्रोफेसर आपटे, मला जरा मदत करता का हो? या फसव्या पायरीत केव्हापासून माझा पाय अडकला आहे.हॅरी कसाबसा म्हणाला. 

अरेच्चा! हो, जरूर, हो.आपटेंनी आपला साधा डोळा हॅरीकडे वळवला आणि त्याच्या दंडाला पकडून त्याला ओढून घेतलं. हॅरीचा पाय त्या फसव्या पायरीतून मोकळा झाला. त्याला चांगल्याच मुंग्या आल्या होत्या. हॅरीने रेलिंगचा आधार घेत पायाला जरा आराम दिला. हे सगळं चालू असताना आपटेंचा जादूचा डोळा मात्र नकाशावर फिरत होता. 

काही वेळाने आपटेंनी हॅरीला हळूच विचारलं, “ऑफिसात स्नेपच्या घुसलं होतं कोण ते पॉटर पाहिलंस का तू?”

हो, नकाशात मला दिसली ती व्यक्ती,” हॅरी म्हणाला. यापुढे काही बोलावं का नाही ते त्याला कळेना. शेवटी तो विचार करून म्हणाला, “मला दिसलेली व्यक्ती बार्टी क्राउच होती, प्रोफेसर. माझी पक्की खात्री आहे.

क्राउच? हे फारच कुतुहलजनक आहे!त्यांचे दोन्ही डोळे आता नकाशावरून झरझर फिरत होते. आपटे आणि हॅरी दोघेही इतके गहन विचारात गढून गेले होते, की आपटे चक्क वाक्य सरळ म्हणत होते, कोणताही मंत्र न मारता, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. हॅरीने मग खूप धीर करून आपटेंना प्रश्न विचारला, “प्रोफेसर, तुम्हाला काय वाटतं? मिस्टर क्राउच स्नेपच्या ऑफिसमध्ये काय करत असावेत? यामागे काही लपलं असावं का?”

असा विचार कर पॉटर, आपटे ही एक महान व्यक्ती आहे. पण क्राउचच्या समोर ते काहीच नाहीत. क्राउचच्या समोर बाबूराव गणपतराव आपटे अगदी बदलून जातो. त्यांचा संबंध लावणं कठीण आहे, पण अशक्य नाही. मला मात्र त्या प्राणभक्ष्याचा तिटकारा वाटतो, जो मोकाट फिरतो आहे. ज्याने त्यांची दखलही घेतलेली नाही.

हॅरीला या उत्तरातून काहीच लक्षात आलं नाही आणि आपटे अजूनही सरळ वाक्य म्हणत होते हे सुद्धा त्याला उमगलं नव्हतं. यानंतर काही वेळाने आपटे म्हणाले, “पॉटर, मी काही काळ हा नकाशा माझ्याकडे ठेऊन घेतला तर चालेल का?”

हॅरीला खरं म्हणजे तो नकाशा फारच प्रिय होता. तो फार उपयोगीही होता. मात्र आत्ताच आपटेंनी हॅरीचा जीव चांगलाच वाचवला असल्याने हॅरीला कृतज्ञता म्हणून काहीतरी करणं गरजेचं वाटलं. शिवाय, आपटे त्या नकाशाबद्दल असेही काही प्रश्न करत नव्हते, ज्यामुळे फ्रेड-जॉर्ज, प्रोफेसर ल्युपिन, सीरियस वगैरे अडचणीत आले असते. 

हो, चालेल ना.हॅरी म्हणाला खरा, पण त्याची पूर्ण तयारी नव्हती.                                                     

हा, मुलगा कसा शाहणा!आपटे पुन्हा भानावर आल्यासारखे शब्द मिसळून बोलायला लागले.

 

प्रसंग ६- 

प्रोफेसर आपटे?” विद्यार्थ्यांच्या गर्दीतून वाट काढत हॅरीने हाक मारली. त्याच्या मागे रॉन आणि हर्माईनी होतेच. 

विद्यार्थी पॉटर हॅरी, बोल.आपटे गुरगुरले. एरवी ते हॅरीशी बोलताना तसे मोकळेपणाने बोलल्यासारखे बोलायचे, पण आज मात्र दिवसंच काहीतरी बिघडला होता. जणू उठतानाच आपटेंनी आळस देण्याऐवजी कोंबडीसारखंपक पक पकाककेलं होतं!

आपटे नेहमीच जे अजब पेहराव करायचे, तसाच आजही त्यांनी केला होता. त्या माणसाने, ढेरी बटणं तोडून बाहेर पडेल की काय असा टाईट काळा झब्बा घातला होता. मात्र आपटे एवढे मळले होते, की तो झब्बा मूळचा काळा असावा, हे कोणालाच पटलं नसतं. त्यावर कुठे माती लागली होती, कुठे चिखल चिकटला होता, तर बराच भाग खडूच्या पांढऱ्या धुळीने माखला होता. त्याखाली आपटेंनी सप्तरंगी घागरा घातला होता. डोक्यावर आज अर्धा चंदेरी आणि अर्धा सोनेरी असा छोट्या कुरळ्या केसांचा टोप स्थानापन्न होता. 

ते एकदा घातलेले कपडे पुन्हा कधीच वापरत नाहीत! एवढ्या उत्तम फॅशन मेंदू साठी टाळ्या झाल्या पाहिजेत!हॅरी, रॉन आणि हर्माईनी गर्दीतून वाट काढत असताना रॉन दोघांच्या कानात कुजबुजला. 

या आत या,” आपटे घाईघाईत आपल्या खोलीत घुसत, तिघांना खूण करत म्हणाले. ती खोली आज जरा वेगळीच दिसत होती. हॅरीला पुसटसं आठवत होतं, की मागे तो या खोलीत आला होता, तेव्हा खोलीच्या एका भागात प्रचंड पसारा आणि दुसऱ्या भागात अगदी टापटीप आवरावरी करून ठेवली होती. आज मात्र तो प्रचंड पसारा खोलीभर पसरला होता. त्यामध्ये नित्योपयोगी वस्तू तर होत्याच, शिवाय विविध रंगाची रोपटी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा (यामध्ये हॅरी आणि हर्माईनीला इस्त्री, फोन्स, रिमोट, माऊस, हेअर ड्रायर, खेळणातल्या गाड्या अशा अनेक गोष्टी ओळखता आल्या, पण रॉनला त्या सगळ्या गोष्टीमगलूंच्या वस्तूया नावानेच माहीत होत्या) आणि विविध एकमेकांसोबत न जाणारे कपडेही होते. 

आपटेंनी मात्र या सगळ्याकडे पाठ करून, हवेतून एक ड्रॅगनचं तोंड असलेली लाकडी खुर्ची उत्पन्न केली, त्यावर बसले आणि ते हॅरी, रॉन, हर्माईनीला उद्देशून म्हणाले, “बोला.

तुम्हाला मिस्टर क्राउच दिसले का?” हॅरीने थेट विषयालाच हात घातला. 

नाही.आपटेंनी उत्तर दिलं. त्यांचा पाय सतत अस्वस्थ असल्यासारखा हलत होता. 

आपटे पुढे काहीच बोलत नाहीयेत हे पाहिल्यावर हॅरीने पुन्हा प्रश्न विचारला, “तुम्ही नकाशाचा वापर केलात?”

अर्थातच!आपटे अचानक खुर्चीतून उठत म्हणाले. ते मग आपला घागरा उचलून टेबलपाशी गेले आणि त्यांनी तिथे असलेला थर्मास उचलून त्यातून चार- पाच घोट घेतले. मग पुन्हा खुर्चीवर येऊन बसल्यावर ते पुढे म्हणाले, “वेडा मी असीन दिसत, पण असू शकतो हुशार, पॉटर. केला मी वापर नकाशाचा. दिसले क्राउच नाहीत, तरीही.

म्हणजे ते अदृश्य झाले असावेत.रॉन म्हणाला. 

हॉगवर्टसमध्ये कोणीही अदृश्य होऊ शकत नाही रॉन, मी चार वर्ष सांगतिये तुला!हर्माईनी म्हणाली. 

तू विचार आहेस का केला ऑरर होण्याचा, विद्यार्थिनी ग्रेंजर हर्माईनी?” आपटेंनी एकदम विचारलं. हर्माईनीचा चेहरा एकदम फुलून गेला. पण त्यापुढे ती काही बोलणार, एवढ्यात रॉन म्हणाला, “मग ते जंगलात पळून गेले असतील का? की हॉग्जमीड मध्ये जाऊन लपले असतील?” 

रॉनने आशेने आपटेंकडे पाहिलं. त्यालाही ऑरर बनण्याचा सल्ला हवा होता. 

दोन्हीही पर्याय असू शकतात शक्य. काहीच आपण नाही सांगू शकत. ते नाहीत गढीत मात्र.असं म्हणून आपटेंनी इतक्या जोरात जांभई दिली, की त्यांच्या चेहऱ्यावरचे काही वर्ण ताणले गेले, आणि तोंडामधले काही दातही गायब असल्याचं हॅरी आणि हर्माईनीच्या लक्षात आलं. रॉन अजूनही आपल्याला ऑरर बनण्याचा सल्ला मिळाला नाही, म्हणून जरा रागावला आणि हिरमुसला होता. 

तुम्ही गुप्तहेरगिरी तुमची आता बंद करा ही. मी काही किस्से आहेत ऐकले. या बाबतीत काहीही करू नाही तुम्ही शकत. विचार सोडून तो अगदी द्या. विद्यार्थी पॉटर हॅरी, तू तिसऱ्या कामगिरीवर आता केंद्रित लक्ष कर. हवी मदत असेल, तर माग.आपटे हे म्हणल्यावर हॅरीला त्याची आठवण झाली. काल रात्री झालेल्या घटनांनंतर त्याच्या डोक्यातून स्पर्धेचं विचारच गेला होता. 

आम्ही कायमच त्याच्या मदतीला हजर असतो.रॉन आपटेंना उद्देशून म्हणाला.पहिल्याच वर्षी हॅरीने परीसचा दगड वाचवला ते तुम्ही ऐकलंच असेल. त्यामध्ये मी सुद्धा मदत केली होती.” 

रॉनला अजूनही ऑरर बनण्याचा सल्ला मिळण्याची आशा होती हे हॅरी, हर्माईनी आणि आपटेंना लगेच लक्षात आलं. आपटे किंचित हसले आणि त्यांनी एक सुस्कारा टाकला. 

दोघे तुम्ही ठेवा लक्ष त्याच्यावर.आपटे रॉन आणि हर्माईनीला म्हणाले.बारीक माझं लक्ष आहेच, तरीही सगळे रहा सतर्क. अखंड दक्षता पॉटर, अखंड दक्षता! जिंकायचं असू दे लक्षात तेवढं, स्पर्धेत!

 

प्रसंग ७-

आपटेंनी आपली छडी उचलली आणि आपलं तोंड उघडलं. हॅरीनं आपला हात शालीत घातला.  

स्तब्धो! डोळे दिपवून टाकणारा लाल प्रकाशाचा लोळ आला आणि आपटेंच्या ऑफिसचा दरवाजा धमाक्यासह मोडून पडला. आपटे ऑफिसातल्या फरशीवर मागच्या मागे कोसळले. हॅरी अजूनही आपटेंचा चेहरा जिथे होता, तिथेच पाहत होता.

खोलीतली धोकासूचक यंत्र आता चांगलीच जोरात काम करत होती. डॉमिनोज पिझ्झाचा बॉक्स, ‘अल्बस डम्बलडोर- धोका, मिनर्व्हा मॅक्गॉनॅगल- धोका, सिव्हिरस स्नेप- धोका!असं परत परत ओरडत होता. मॅक्गॉनॅगलनी त्यावर झटकन मंत्र घालून साऊंडप्रूफ आवरण घातले. बुलेटप्रूफ काचेच्या डब्यातली बंदूक आता थेट तिघांच्या दिशेने गोळ्या झाडत होती. स्नेपनी तिच्यावर मूकमंत्राचा प्रयोग केल्याक्षणी ती तळाशी शांतपणे पडून राहिली. 

खोलीच्या कोपऱ्यातल्या तरंगणाऱ्या पाण्याने घेतलेले डम्बलडोर, मॅक्गॉनॅगल आणि स्नेपचे आकार आता स्पष्ट दिसत होते. प्रोफेसर मॅक्गॉनॅगलने त्यावर छडी टेकवली आणि ते आपपलंच उडत खिडकीबाहेर पडलं. कोपऱ्यातलं स्टूल आणि त्यावर ठेवलेलं खेळण्यातलं अस्वल हे चांगलेच थरथरत होते आणित्यांना बोलव, त्यांना बोलव!असं ओरडत होते. स्नेपनी त्यावर एक लाथ मारल्यावर ते स्तब्ध झाले. आत्ता हॅरीची नजर डम्बलडोर, मॅक्गॉनॅगल आणि स्नेपवर गेली. 

ते तिघंही दरवाज्यातून आत आले होते. डम्बलडोर सर्वात पुढे होते आणि त्यांची छडी आपटेंच्या छातीकडे रोखलेली होती. त्याच क्षणी हॅरीला कळून चुकलं, की वॉल्डेमॉर्ट डम्बलडोरना घाबरतो असं सगळे का म्हणतात! आपटेंच्या बेशुद्ध शरीराकडे पाहताना डम्बलडोरच्या चेहऱ्यावर भयंकर भाव होते. त्यांच्या वृद्ध चेहऱ्यावर मायाळू हास्य नव्हतं, तर प्रत्येक सुरकुतीतून द्वेष उफाळत होता. त्यांच्या अर्धगोल चष्म्यामागे दिसणाऱ्या निळ्या डोळ्यातली चमक आता ज्वालांनी घेतली होती. 

डम्बलडोर बेशुद्ध आपटेंच्या जवळ आले. त्यांनी आपटेंचा चेहरा उलट- सुलट करून बघितला. दरम्यान हॅरीने मॅक्गॉनॅगल आणि स्नेपच्या चेहऱ्यांकडेही बघून घेतलं. त्यांचे चेहरेही संताप आणि तिरस्काराने फुलून गेले होते. 

प्रोफेसर मॅक्गॉनॅगल हॅरीजवळ येऊन म्हणाल्या, “माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चल पॉटर. 

नाही.डम्बलडोर करड्या आवाजात म्हणाले.मिनर्व्हा, तो इथेच थांबेल, कारण हे सगळं समजून घेण्याची त्याला गरज आहे. समजून घेणं, म्हणजे स्वीकार करण्याच्या दिशेनं उचललेलं पहिलं पाऊल आहे आणि स्वीकार केल्यानंतरच फक्त गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात. आज रात्री त्यानं काय काय सहन केलं आहे, ते कुणामुळे आणि का ते त्यानं समजून घेण्याची आवश्यकता आहे.डम्बलडोरचं बोलणं संपल्यावर काही क्षण शांतता पसरली. 

आपटे,” हॅरी त्या शांततेचा भंग करत हळूच म्हणाला, “हे बाबूराव आपटे कसे असू शकतील?”

हे बाबूराव गणपतराव आपटे नाहीयेत. डम्बलडोर शांतपणे म्हणाले.तू खऱ्या बाबूभैय्यांना ओळखत नाहीस. खऱ्या बाबूभैय्यांनी आज रात्रीच्या घटनेनंतर तुला माझ्यासमोरून हलवलंच नसतं. घुसखोराची ही घोडचूक मी पकडली आणि तुमच्या मागे इथे आलो.असं म्हणत डम्बलडोरनी बेशुद्ध पडलेल्या आपटेंच्या शरीरावर वाकून त्याच्या शालीत हात घातला. त्यांनी आपटेंचा थर्मास बाहेर काढला ज्यातून ते कायम प्यायचे. मग तो थर्मास उघडून त्यांनी तो गालिच्यावर उलटा केला. त्यातून एक घाण वासाचा, चिकट द्रवपदार्थ बाहेर पडला. 

वेशांतर काढा, आपटे दर तासानी न चुकता आपल्या नाकासमोर पीत रहायचे.असं म्हणत त्यांनी पुन्हा समोरच्या व्यक्तीच्या कोटात हात घातला आणि किल्ल्यांचा एक जाडजूड जुडगा बाहेर काढला. मग ते उभे राहिले आणि स्नेपना म्हणाले, “सिव्हिरस, तुझ्याकडचं सगळ्यात शक्तिशाली सत्यद्रव घेऊन ये. आणि मिनर्व्हा, तू किचनमध्ये जाऊन विंकी नावाच्या बुटक्या गुलामीला घेऊन इथे ये. धावत जा आणि पळत या दोघे.” 

स्नेप आणि मॅक्गॉनॅगलना या सूचना जरी चमत्कारिक वाटल्या असतील, तरी त्यांनी कसलीही शंका दाखवली नाही. दोघंही ताबडतोब वळले आणि ती कामं करायला निघून गेले. डम्बलडोरनी आधी हॅरीला हात देऊन उठवलं आणि हवेतून एक खुर्ची उत्पन्न करून त्यात सावकाश बसवलं. 

मग डम्बलडोर सात कुलपं असलेल्या खोलीतल्या पेटाऱ्याकडे वळले. अर्थातच, तो पेटारा जादूचा होता. प्रत्येक वेळी डम्बलडोर वेगळी किल्ली फिरवत आणि पेटाऱ्यात वेगवेगळ्या गोष्टी दिसत. असं सहा वेळा झालं, तेव्हा हॅरीला पेटऱ्यात अनुक्रमे मंत्रांची पुस्तकं, काढ्यांचे सामान, तुटलेली जादूची धोकासूचक यंत्र, मगलूंच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मगलूंची काही हत्यारं आणि प्रचंड रंगीबेरंगी कपडे दिसले. 

डम्बलडोरनी मग कुलपात सातवी किल्ली घालून जेव्हा झाकण उघडलं, तेव्हा आश्चर्याचा धक्का बसून हॅरी किंचाळलाच. तिथे एक प्रकारचा खड्डा होता. तो एखाद्या भूमिगत खोलीसारखा होता. आणि त्यात दहा फूट खाली फरशीवर कुणीतरी आडवं पडलेलं होतं. ती व्यक्ती गाढ झोपेत असल्यासारखी आणि खूपच अशक्त वाटत होती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून खरेखुरे बाबूराव गणपतराव आपटे होते. त्यांच्या जादुई डोळ्याच्या जागी खोक दिसत होती आणि त्यांच्या केसांचे अनेक पुंजके गायब होऊन टक्कल वाढायला लागलं होतं. 

हॅरीनं पेटाऱ्यात झोपलेल्या आपटेंकडे एकदा पाहिलं आणि एकदा ऑफिसातल्या फरशीवर बेशुद्ध पडलेल्या आपटेंकडे हादरून पाहिलं. डम्बलडोर पेटाऱ्यात उतरले आणि त्यांनी काही उबदार शाली निर्माण करून खऱ्या आपटेंवर पांघरल्या. 

मला वाटतं, आज रात्रीच्या अतिउत्साहाच्या भरात नकली बाबूभैय्या वेषांतर काढा जितक्यांदा प्यायला हवा, तितक्यांदा प्यायचं विसरलेला आहे. आपण पाहू या आता.डम्बलडोर हॅरीकडे वळून म्हणाले.साधारण पाच मिनिटात आता, माझा अंदाज बरोबर असेल तर, अर्थात.डम्बलडोरचे डोळे फरशीवर बेशुद्ध होऊन पडलेल्या नकली बाबूभैय्यांवर खिळलेले होते. हॅरीपण तिथेच बघायला लागला. 

खोलीतल्या पसाऱ्यातून डम्बलडोरनी एक खुर्ची ओढली आणि ते त्यावर बसले. काही मिनिटं शांतता पसरली आणि मग हॅरीच्या डोळ्यांदेखत फरशीवर पडलेल्या माणसाचा चेहरा बदलायला लागला. व्रण गायब व्हायला लागले. शरीरावरची कातडी पुन्हा एकदा तुकतुकीत व्हायला लागली. तुटकं नाक अखंड होऊन आक्रसायला लागलं. डोक्यावरचा टोप बाजूला पडला आणि टकलावर फिकट मातकट रंगाचे केस उगवायला लागले. पुढच्याच क्षणी त्या माणसाच्या चेहऱ्यावरून जादूई डोळा निसटून बाहेर पडला आणि त्याही जागी एक खराखुरा डोळा आला. जादूई डोळा फरशीवर पडून सगळीकडे गरगर फिरत पाहायला लागला. 

हॅरीला त्याच्या समोर एक भांग पाडलेला, नाकाखाली छोटी मिशी असलेला गोरा माणूस दिसत होता. तो  कोण आहे, ते हॅरीला माहीत होतं. हॅरीने त्याला डम्बलडोरांच्या स्मृतिपात्रातही पाहिलेलं होतं. आत्ताही तो अगदी तसाच दिसत होता, फक्त जरा थकलेला आणि जास्त वयाचा वाटत होता. 

बाहेरच्या बोळात पावलं वाजली आणि लगेचच दारातून स्नेप सत्यद्रवाची बाटली घेऊन आणि प्रोफेसर मॅक्गॉनॅगल विंकीला घेऊन आले.क्राउच!स्नेप म्हणाले आणि ते दारातच थबकले. बार्टी क्राउच, अरे देवा!प्रोफेसर मॅक्गॉनॅगल म्हणाल्या. त्याही फरशीवर पडलेल्या माणसाकडे डोळे फाडून बघत राहिल्या. मळकट कळकट अवतारातली विंकी स्नेपच्या पायांच्या जवळून पाहायला लागली. तिचं तोंड वासलं आणि ती जोरात ओरडली, “मास्टर बार्टी, मास्टर बार्टी..” 

आम्ही त्याला स्तब्ध केलंय.डम्बलडोर म्हणाले.सिव्हिरस, तू काढा घेऊन आलास?” 

स्नेपनी डम्बलडोरना एक पारदर्शक द्रवपदार्थ असलेली छोटीशी बाटली दिली. याच सत्यद्रवाचा प्रयोग करण्याची स्नेपनी हॅरीला वर्गात धमकी दिलेली होती. डम्बलडोर उठून उभे राहिले, फरशीवर पसरलेल्या माणसावर झुकले आणि त्यांनी त्या माणसाचं तोंड उघडून त्यात सत्यद्रवाचे तीन थेंब टाकले. मग त्यांनी आपली छडी त्याच्या छातीकडे रोखून फर्मावलं, “सजीवो.” 

मिस्टर क्राउचच्या मुलानं आपले डोळे उघडले. त्याचा चेहरा सुस्तावल्यासारखा होता आणि नजर शून्यात लागलेली होती. त्याच्या चेहऱ्याच्या समपातळीवर राहण्यासाठी डम्बलडोर त्याच्या समोर गुडघ्यांवर बसले. डम्बलडोरनी त्याला शांतपणे विचारलं, “तुला माझा आवाज ऐकायला येतोय का?” 

त्या माणसानं पापण्यांची उघडझाप करून पुटपुटत सांगितलं, “हो.

डम्बलडोरनी पुढे त्याला जो प्रश्न विचारला, त्याचा अर्थ हॅरी, मॅक्गॉनॅगल किंवा स्नेप यापैकी कोणालाच कळला नाही. डम्बलडोरनी त्याला हळूच विचारलं, आता तू आम्हाला हे सांग की तू जादुई जगात कसा आलास?”

क्राउच किंचित हसला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो निर्विकारपणे बोलायला लागला, “माझं नाव अॅडॉल्फ हिटलर, मी एक मगलू आहे. दुसऱ्या मगलू महायुद्धामध्ये मी एक महत्त्वाची भूमिका बजावली. मगलू इतिहास हा तुम्हा जादूगारांच्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नसल्याने मला फार लोक ओळखत नाहीत, किमान या काळात तरी नाही. 

या सगळ्याला सुरुवात झाली ३० एप्रिल १९४५ ला, जेव्हा मला एक बाई भेटायला आली. ती माझ्याजवळ कशी आली ते मला प्रथम कळलंच नाही कारण माझ्या आजूबाजूला सतत सुरक्षा व्यवस्थ तैनात होती. मी त्या वेळी एकटाच खोलीत बसलो होतो आणि माझी पापणी लवल्याक्षणी ती खोलीच्या कोपऱ्यात अवतरली. तिच्याकडे एक झगा होता जो तिला अदृश्य करत होता. त्या वेळी मला काहीच सुधरत नव्हतं कारण मी काळी जादू वगैरे फक्त ऐकून होतो. 

मी माझ्या माणसांना बोलवणारच होतो, पण तेवढ्यात तिने माझ्या तोंडासमोर काहीतरी धरलं. तो एक नेकलेस होता, पण जरा विचित्र. त्याला एकात एक असे तीन वर्तुळ लावलेले होते ज्याच्या मध्यभागी एक अगदी छोटंसं वाळूचं घडयाळ होतं. 

तिने एकदम घडाघडा बोलायलाच सुरुवात केली. तिने मला सांगितलं की ती एक जादूगरिण आहे आणि तो नेकलेस म्हणजे एक काळयंत्र (टाईम टर्नर) होता. तिने मग मलासैतानी शहेनशहानावाच्या कोणाची तरी माहिती सांगितली आणि शेवटी एक कागदाचा तुकडा माझ्या हातात खुपसला ज्यावर एका बाईचे नाव आणि पत्ता दिला होता. त्याखाली एक दिनांकही खरडला होता. त्या तारखेला मला ते काळयंत्र घेऊन जाईल. तेव्हा मी दिलेल्या पत्यावर जाऊन त्या बाईला भेटावं असं ती म्हणाली. तिला छडी दाखव म्हणजे ती तुला ओळखेल असं म्हणाली. 

एवढं बोलून तिने आपल्या जवळच्या थैलीतून एक लाकडाची छडी काढून माझ्या दुसऱ्या हातात ठेवली आणि मग एक थर्मास काढून त्याच्यामध्ये माझे काही केस तोडून घातले. तिने मग तो थर्मास तोंडाला लावला आणि अगदी काही सेकंदातच तिच्या जागी माझी हुबेहूब आकृती उभी असलेली मला दिसली. तिने आपल्या जवळच्या थैलीत तो थर्मास ठेऊन दिला आणि थैली माझ्याकडे दिली. 

पुढच्याच क्षणी त्या बाईने तिच्या हातातला नेकलेस माझ्या गळ्यात घातला आणि त्याच्यातलं मधलं वर्तुळ बरोबर मोजून १८ वेळा फिरवलं. मला माझ्या शरीराला एक हिसका बसल्याचा जाणवला आणि दुसऱ्याच क्षणी ती खोली नाहीशी व्हायला लागली. शेवटच्या सेकंदाला मला दिसलं की माझी एक आकृती माझ्यासमोर मरून पडली होती आणि त्याच्या पुढच्याच क्षणाला मी एका अत्यंत चांगल्या अवस्थेतल्या लंडनच्या रस्त्यावर उभा होतो, सुमारे ३० दशक काळ पुढे.

त्याचं हे बोलणं थांबल्यावर काही क्षण आपटेंच्या ऑफिसात शांतता पसरली. हॅरीने हळूच डम्बलडोर, मॅक्गॉनॅगल आणि स्नेपच्या चेहऱ्यांकडे बघून घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावर संताप आणि आश्चर्याची मिश्र भावना उमटली होती. स्नेपच्या तेलकट चेहऱ्यावरची कपाळाची शीर ताडताड उडत असलेली हॅरीला सहज लक्षात आली. डम्बलडोर आवाजात ओढून ताणून शांतता आणत पुढे म्हणाले, “मग काय झालं?” 

समोरची व्यक्ती पुन्हा त्याच निर्विकार स्वरात बोलायला लागली, “जादूच्या या जगात मी हळूहळू रुळायला लागलो. त्या वाटेतले खाचखळगे सांगायची गरज नाही कारण त्याचा मुख्य गोष्टीशी संबंध नाही. पहिले काही महिने मी रस्त्यावर राहिलो, मिळेल ते खाऊन जगलो. एक दिवस एका घरात मी घुसलो. मला फक्त खाण्याच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या. तेवढ्यात त्या घराचे मालक आणि मालकीण आत आले. मला पाहून दोघांनीही आपल्या जाकीटातून माझ्याकडे होती त्याचसारख्या छड्या काढल्या. मी आवाक झालो. त्यांनी कुठला मंत्र माझ्यावर मारण्याआधी मीही माझी छडी काढून त्यांना दाखवली. दोघेही जरा शांत झाले. 

मी अत्यंत घाणेरडा दिसत होतो, माझे केस वाढलेले आणि गुंतलेले होते, मी कित्येक आठवड्यात व्यवस्थित आंघोळही केली नव्हती आणि माझ्या अंगावरचे कपडे म्हणजे अगदी लक्तरंच. त्या दोघांपैकी बाईला माझी खूपच दया आली. मग एका गोष्टीनंतर दुसरी गोष्ट घडली, आणि त्या दोघांनी मला दत्तक घेऊन टाकलं. त्या दोघांची नावं होती, मिस्टर बार्टिमस क्राउच आणि मिस मेगन क्राउच. मी माझं नाव लक्षात नसल्याचं नाटक केलं. त्यामुळे क्राउच पती-पत्नींनी मला दत्तक घेतल्यावर माझं नाव बदलून बार्टी क्राउच जुनियर ठेवलं गेलं.

मेगन माझा खूप मनापासून सांभाळ करत होती जणू काही मी खरंच तिचा मुलगा होतो असं ती वागायची. माझा तेवढाच तिरस्कार बार्टीमस करायचा हे माझ्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही. मी कोण आहे याबद्दल मला काहीच आठवण नसल्याचं नाटकही मी करत राहिलो. काही दिवस असेच शांतपणे गेल्यावर एके दिवशी मला अचानक त्या एका कागदाच्या चिटोऱ्याची आठवण झाली जो पहिल्या जादूगरणीने मला दिला होता. तो मी त्या जादूच्या थैलीतून शोधून काढला आणि वाचला. त्यावर लिहिलं होतं, बेलाट्रिक्स ब्लॅक- १२, ग्रिमॉल्ड प्लेस, लंडन येथे भेटू शकेल. दुसऱ्या दिवशी मी कोणाला न सांगता सकाळी लवकर घरातून बाहेर पडलो. मिस्टर क्राउचनी घरावर काही मंत्र लावून ठेवले होते, पण मागच्या काही महिन्यात मी जादूवर चांगलंच प्रभुत्व मिळवलं होतं. मी लिहिलेल्या पत्यावर पोहोचलो.

मगाशी त्या व्यक्तीने घेतलेली नावं ऐकताच तिथे उपस्थित सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. क्राउच पती-पत्नी आणि बेलाट्रिक्स ब्लॅक (तेव्हा तिचं लग्न झालं नसल्याने ब्लॅक हे नाव होतं) यांचा संबंध हॅरीसाठी खूपच अनपेक्षित होता. मध्ये काही सेकंद शांतता गेली, जणू काही कोणीतरी प्रश्न विचारण्यासाठी थांबलेलं होतं. मग पुन्हा सुरू झालं. 

बेलाट्रिक्स आणि माझी ओळख झाली, त्याचीही कहाणी काही महत्त्वाची नाही. तिने मला काळ्या जादुबद्दल सर्व गोष्टी शिकवल्या. त्यांच्या मगलूंपासून गुप्त असलेल्या घरच्या गुप्त खोलीत आम्ही दोघे पडीक असू. तिच्या कोणत्याच कुटुंबियांशी माझी कधी भेट झाली नाही. काही महिन्यांनी एके दिवशी बेला मला एका महालात घेऊन गेली. तिथे माझी सैतानी शहेनशहा अर्थात वॉल्डेमोर्टशी ओळख झाली. मी सांगत असलेलं सगळं अगदी साधं वाटत असेल तरी तसा भाग अजिबात नव्हता. मला प्राणभक्षी होण्याचा मान मिळाला. लोकांना मारणं म्हणजे रोज आंघोळ करण्यासारखं नियमित झालं. याच दरम्यान मी रुडॉल्फस लेस्ट्रेंज नावाच्या माणसाशी बेलाची ओळख करून दिली. पुढे त्यांचं लग्न झालं आणि त्याबद्दल दोघांनीही माझे आभार मानले. 

मग वॉल्डेमोर्ट जवळजवळ मेले, तेव्हा मी अझ्कबान मध्ये होतो. माझ्या क्रूर दत्तक वडिलांनीच मला तिथे पाठवलं होतं. पण मेगनचं माझ्यावरचं प्रेम अजिबात कमी झालं नव्हतं. तिने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या महिन्यात मला तिथून बाहेर काढण्याचा बेत आखला. बार्टीमस फक्त तिच्यासाठी तयार झाला. ते मला भेटायला आले आणि मी आणि मेगननी एकमेकांचे वेश घेऊन जागा बदलल्या. मेगनचा तिथेच मृत्यू झाला, तरीही कोणालाही काहीही शंका येणं शक्यच नव्हतं कारण डिमेंटॉर्स आंधळे असतात. त्यांना फक्त भावना जाणवतात. मग काही दिवसांनी बार्टीमसने-

गप्प बसा मास्टर बार्टी... तुम्ही सबंध क्राउच कुटुंबाला धोक्यात आणता आहात.इतका वेळ मूकपणे अश्रू ढाळत बसलेली बुटकी गुलाम विंकी अचानक ओरडली. हॅरी जरासा दचकला पण बार्टी काहीच झालं नसल्यासारखं बोलायला लागला. 

तर मग काही दिवसांनी बार्टीमसने मेगन मेली असं जाहीर केलं आणि एक खोटी कबर वगैरे खणली. मला बार्टीमसने संमोहन शापाच्या कैदीत ठेवलं होतं कारण त्याला भीती होती की मी पुन्हा प्राणभक्षी गटाकडे खेचला जाईन. जी त्याची चिंता अगदीच योग्य होती. काही महिने असेच गेले. विंकी माझी काळजी घ्यायची. हळूहळू मी बार्टीमसच्या संमोहन शापावर मात करायला लागलो. त्याला ते लक्षात आलं नाही, पण त्याचा उपयोग झाला जेव्हा एका रात्री पीटर पेट्टिग्रू वॉल्डेमोर्टना घेऊन आमच्या घरी आला. 

त्यानंतर मी बार्टीमसला संमोहन शापाखाली नियंत्रित करायला लागलो. दरम्यान वॉल्डेमोर्टना आपलं शरीर मिळवण्याची आवश्यकता होती ज्यासाठी त्यांनी एक बेत रचला होता. त्यामध्ये एका खास माणसाची हॉगवर्टसमध्ये गुप्तहेर म्हणून असण्याची गरज होती जी जबाबदारी त्यांनी मला दिली. मला बाबूराव गणपतराव आपटे या माणसाचा वेश घेऊन यायचं होतं. मी मग पीटरच्या मदतीने काही आठवडे आपटेचं निरीक्षण केलं. त्याच्या चालीरीती शिकून घेतल्या. त्याचं ते शब्द इकडे तिकडे करून बोलणं सगळ्यात कठीण होतं शिकायला, पण वॉल्डेमोर्टसाठी मी सगळं करायला तयार होतो. 

एके रात्री मी बाबूरावला चीत केलं आणि इथे, हॉगवर्टसमध्ये त्याचा वेश घेऊन आलो. एकीकडे मी या शाळेचा, तुम्हा सगळ्या लोकांचा फालतूपणा कसाबसा सहन करत होतो आणि दुसरीकडे माझ्यासारखंच बार्टीमसलासुद्धा संमोहन शापाशी झगडता यायला लागलं. पीटरने त्याच्यावर लक्ष द्यायच्या कामात दिरंगाई केली ज्यामुळे तो सुटला. तो इथे येऊन डम्बलडोरना माझ्याबद्दल सगळं सांगणार होता असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्याला शाळेच्या मैदानातच गाठून मारून टाकलं.

“नाही!! मास्टर बार्टी तुम्ही खोटं बोलत आहात. तुम्ही असं कसं करू शकता..विंकीने  आपला आवाज पुन्हा एकदा अचानक काढला. स्नेपनी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याच क्षणी ती गप्प झाली पण आता तिच्या गटाण्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंची संख्या चांगलीच वाढली. 

शांतता पसरली, मग परत समोरची व्यक्ती बोलायला लागली, “हॅरीचं नाव मीच अग्निचषकात टाकलं, त्याला ड्रॅगन्स बद्दल सांगायला मी हॅग्रीडला प्रवृत्त केलं, सोनेरी अंड्याचं रहस्य सेडरिककडून मीच हॅरीपर्यंत पोहोचवलं. शिवाय आज चक्रव्यूहात सुद्धा क्रमला संमोहित करणारा, डेलाकोरला बेशुद्ध करणारा मीच होतो. मी डिगोरीला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, पण हॅरीचा अति शहाणपणा त्याच्यातही घुसला. मेला ना डिगोरी! पण हॅरी मात्र अजूनही जीवंत आहे आणि सैतानी शहेनशहा परतले आहेत. वॉल्डेमोर्ट परतले आहेत.

--oo--

 

 

~~~ooo~~~

 

सदर लेखन हे फॅन फिक्शन आहे. यातील पात्रं परिचित असली तरी ही लेखकाची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. या लेखन प्रकाराबद्दल अधिक माहिती या विकीपीडिया पानावर मिळेल