भांडण (कथा)

भांडण

लेखन: ज्योती गंधे
चित्रं: गीतांजली भवाळकर

काहीतरी भांडण झालं असावं, पण  कुठलं साधंसुधं भांडण नसावं आणि किरकोळ कारणावरूनही  नसावं. आईबाबांच्यात नक्कीच काही तरी भांडण झालं असावं.  हे असं भांडण आजतागायत घरात कधीच नव्हतं झालेलं. कारण नाही माहीत, पण किरकोळ कारणावरून नक्कीच नसावं.असा तीन तीन दिवस अबोला,अशी जीवघेणी शांतता कधीच नसते घरात. काय झालं असेल, कोणाला विचारू?’ विचार करकरून पिंकीचं डोकं भणभणून गेलं होतं.

खरंतर त्या दिवशी किती आनंदात होती ती! त्यांच्या शाळेत पद्धत होती, की वर्गात जो कोणी दिवसभर अभ्यास चांगला करेल, व्यवस्थित वागेल, तो दुसऱ्या दिवशीचा मॉनिटर. वर्गाची पटसंख्या केवळ २५ असल्याने टीचर्स सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकायच्या. त्यामुळे ‘best student of the day’ निवडणं अजिबात कठीण नसायचं.शिस्तीचा अगदी सोपा मार्ग होता तो.रोज कोणी न कोणी, काहीतरी छान वागायचं आणि ‘best student’चा किताब मिळवायचं. त्या दिवशी शाळेत एक नवीन मुलगी आली, तीही नेमकी पिंकी शाळेत येत असतानाच. या मुलीला - अनन्याला - सगळी म्हणजे सगळी मदत पिंकीने केली. शाळेचं ऑफिस, टीचर्स रूम, कॉम्प्युटर रूम, लायब्ररी, तिचा वर्ग असं सगळं दाखवलं. गंमत म्हणजे अनन्या पिंकीच्याच वर्गात होती आणि पिंकीला ती खूप आवडली होती.  ह्या तिच्या छानशा वागणुकीबद्दल आणि अर्थातच रोजच्याही सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे छान केल्याबद्दल तिला दुसऱ्या दिवशीची मॉनिटर केलं होतं. अनन्याबद्दल आणि ती स्वतः मॉनिटर झाल्याबद्दल आईबाबांना कधी सांगते असं झालं होतं.

घरी आली, तर घरी काही तरी वेगळंच वातावरण होतं. खरंतर सगळं नेहमीसारखं होतं. आईने पिंकीच्या आवडीचे समोसे केले होते. बाबा तिच्याबरोबर छान मस्ती करत,आरडाओरडा करत टेबल टेनिस खेळला होता. दिसायला सगळं नेहमीसारखं होतं. पण पिंकीला काहीतरी वेगळं वाटत होतं. खूप वेळ लक्षात नव्हतं येत, पण पिंकीला एकदम जाणवलं की बाबा समोसे खाताना काहीच बोलला नव्हता. आई त्याला आग्रहाने वाढत पण नव्हती .खेळताना नेहमी आई पिंकीच्या  बाजूने भांडायची, आणि ती तर खेळ बघायलासुद्धा नव्हती आली. काहीतरी बिघडल्याचं जाणवलं आणि पिंकी एकदम गप्प झाली. रात्री तिने तिचा होमवर्क केला. आई पाहायला पण नव्हती आली. नेहमीसारखं विचारलंही नाही, की अभ्यास झाला का? सगळं व्यवस्थित केलंस न? काही अडलं का?, काही काही सुद्धा नाही. 

 दुसऱ्या दिवशी पिंकी  स्वतःची स्वतः उठली. आपलं आपण आवरलं,शाळेत गेली. शाळेत गेल्यावर मात्र नेहमीसारखी अभ्यास,खेळ, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी बसवत असलेल्या  नाचाची practice,सगळ्यात रमली. घरी आल्यावर मात्र पुन्हा तसंच वातावरण! पिंकीला आता रडू यायला लागलं होतं. पण काय करावं, ते काहीच सुचत नव्हतं. ती आपली शहाण्यासारखी वागत होती,कसला हट्ट नाही, कुठेही लहरीपणाने वागणं नाही, आळशीपणा नाही. एकदम शांत होऊन गेली. आश्चर्य म्हणजे आई,बाबा कोणाच्या लक्षातही येत नव्हतं की पिंकी व्यवस्थित वागतेय म्हणून.

तिसऱ्या दिवशी शाळेत गेली, तर तिची मैत्रीण सायली भेटली. ती म्हणाली,”पिंकी, अगं आपल्या शाळेत ती अनन्या आलीय न, तिचे आईबाबा एकत्र नाही रहात. बाबा कुठेतरी वेगळ्या ठिकाणीच राहतात.”

“अग, त्यात काय झालं? बदली झाली असेल दुसरीकडे!”, पिंकीला त्यात काहीच वाटलं नाही.

“अग पिंकी, तसं नाहीये,असं असत तर आता मध्येच  आपल्या शाळेत कशाला आली असती ती? तिचे आजी आजोबा रहातात तिथे आता ती आणि तिची आई रहातात.तिथून आपली शाळा जवळ पडते म्हणून आपल्या शाळेत घातलंय तिला.” सायलीने आणखी माहिती पुरवली.

खरंच,पिंकीच्या लक्षातच नव्हतं आलं, की आता मध्येच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दुसरी सहामाही सुरू होऊन जवळ जवळ महिना होत आला होता तेव्हा अनन्या आली होती,आणि पिंकीची आणि तिची दोस्ती सगळ्यांच्या आधी जमली होती आणि पिंकीने तिला सगळं मागचा अभ्यास लिहायला, समजून घ्यायला मदत केली होती. पण तिला काहीच नव्हतं कळलेलं, मग सायलीला कसं कळलं ? 

“तिनं  सांगितलं तुला? की तू विचारलंस तिला?” 

“छे ग बाई! मी कशाला विचारू तिला? ती आठवीतली शिवानी माहितेय न तुला? ती अनन्याच्या आजी आजोबांच्या शेजारी राहते, तिनं सांगितलं.” सायलीने तिची बाजू स्पष्ट केली.

पिंकी विचारात पडली,”आपले आईबाबा दोन दिवस भांडले ,एकमेकांशी बोलले नाहीत,  तर आपल्याला किती वाईट वाटतंय! अनन्याला काय वाटत असेल? तरी किती मस्त हसत,खेळत असते. आपल्याला तर काही शंका सुद्धा नाही आली.’ तिने घाईघाईने सायलीला बोलावलं आणि तिच्याकडून वचन घेतलं की तिने दुसऱ्या कोणाला ह्यातलं काही सांगायचं नाही आणि शिवानीला पण सांगायचं की कोणाशी हे बोलायचं नाही म्हणून. तिला एकदम भडभडून यायला लागलं.’असं का होतंय आपल्याला? आपल्याला अनन्याच्या जागी आपण दिसतोय का? नाही, नाही!असं नाही होणार.असं नाही होणार असं वाटत होतं पण मनातून ते जातच नव्हतं.आपल्याला आता खूप रडू येणार असं वाटायला लागलं. ती मनात ते विचार येऊ नयेत म्हणून प्रयत्न करत होती. कोण काय बोलतंय, ते कळतच नव्हतं तिला. एकदोनदा टीचरने  तिचं लक्ष वेधण्याचा, तिला बोलतं करायचाही प्रयत्न केला. मैत्रिणींनी किती हाक मारल्या, पण ती त्यांच्याबरोबर खेळायला तर गेली नाहीच, पण डबाही खाल्ला नाही. काही सुचतच नव्हतं तिला.

शाळा सुटल्यावर घरी आली. आईला पाहताच तिला  मिठी मारून रडायला लागली. आईला काही कळेचना,”काय झालं पिंकी ,कोणी बोललं का तुला? टीचर  रागावल्या का? अभ्यासातलं काही चुकलं का? मैत्रिणींशी भांडण झालं का?”

भांडण म्हटल्यावर पिंकी रडत रडत बोलायला लागली. काही नीटसं आईला कळत नव्हतं. तेवढ्यात बाबापण ऑफिसमधून घरी आला.हळू हळू पिंकीला शांत करत, ती काय म्हणतेय ते समजून घ्यायला लागले दोघेजण. त्यांच्या लक्षात आलं, ती म्हणतेय, “माझं नाही, तुमचं भांडण! नका न भांडू आई,बाबा. मला भीती वाटते. बाबा आपल्याला सोडून जाणार आहे? आपण दोघींनीच   राहायचंय आजी आजोबांकडे?”

आई,बाबा दोघेही अवाक् झाले. आपल्यातलं भांडण पिंकीला कळलं  तरी कसं? काय काय विचार केलेत तिने ? किती त्रास झाला आपल्या बाळाला? आपलं चुकलंच.दोघांनी तिला जवळ घेतलं,”नाही हं राजा, नाही भांडणार आम्ही.आपण सगळ्यांनी एकत्रच रहायचंय . कोणी,कुठेही  जायचं नाहीये.” “आणि दोघेही एकमेकांना ‘माझं चुकलं,माझं चुकलं ‘ म्हणायला लागले.”म्हणजे,तुम्ही दोघं चुकला होतात?”पिंकीला गंमत वाटली.”नाही ग,आईचंच बरोबर होतं.”, बाबा म्हणाला, “नाही ग, बाबाच बरोबर होता .”, आई म्हणाली. पिंकीला काही कळेचना कोण चूक, कोण बरोबर? आई म्हणाली, “खरं सांगायचं तर दोघांचंही बरोबर होतं,आणि दोघांचंही चुकलं होतं. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी अनेक पर्यायांचा विचार करायचा असतो आणि कधीतरी एकाहून जास्त पर्याय असू शकतात. हे आम्ही लक्षात घ्यायला हवं होतं, पण आम्ही दोघं एकमेकांचं नीट ऐकूनच घेत नव्हतो.” पिंकीला माहीत होतं आपले आई बाबा नेहमी बरोबरच असतात. आपले आई बाबा किती छान आहेत! , “I love you आईबाबा !” असं म्हणून पिंकी दोघांच्या कुशीत शिरली. “We too love you, bachha!”म्हणत आईबाबांनी तिला जवळ घेतलं आणि असं पुन्हा कधीच आपण भांडायचं नाही असं मनोमन ठरवून टाकलं. मग सगळं कसं छान, नेहमीसारखं झालं. सगळं घर आनंदाने  डोलायला लागलं. त्या रात्री पिंकीला आईबाबांच्या कुशीत अगदी गाढ झोप लागली.

दुसऱ्या दिवशी, सकाळी उठल्यावर पिंकीला अनन्याची आठवण आली. तिच्या मनात आलं, ’ह्या रविवारी तिला आपल्याकडे खेळायला बोलावलं तर?’ तिनं आईला विचारलं, तर आई लगेच ‘हो’ म्हणाली. शाळेत गेल्यावर लगेच तिने अनन्याला सगळा planसांगितला .ती पण खूश झाली. “आईला विचारते” म्हणाली.

रविवारी अनन्या खरंच आली. मस्त खेळल्या दोघी. खेळता खेळता अनन्याने  विचारलं,”पिंकी,तुझं खरं नाव पण ‘पिंकीच’ आहे?”
“अग नाही ग,माझं खरं नाव ‘अनाहिता’ आहे. अनाहिता अश्विनी अमोल राजहंस.लहानपणी मला सगळं  पिंक रंगाचं लागायचं न, म्हणून पिंकी.”
“अय्या,वेगळंच आहे तुझं नाव, अनाहिता आणि अश्विनी, दोन्ही नावं तुझी आहेत?”
“नाही ग!अश्विनी माझ्या आईचं नाव आहे. मी दोघांची असताना फक्त बाबांचच नाव का सांगायचं? म्हणून मी दोघांचं नाव सांगते. सही करताना पण, मी ‘AAAR’ अशी करते.”
“ए,खूपच मस्त कल्पना आहे,मी पण असंच करणार.”

अनन्या असं म्हणाली पण एकदम रडायलाच लागली. पिंकीला काय करावं ते समजेना. ती उठली आणि अनन्याला तिनं जवळ घेतलं. ती रडायला लागल्यावर आई घेते तसं.

रडणं कमी झाल्यावर अनन्याने विचारलं ,”पिंकी,तू मला काहीच कसं नाही विचारलंस? किती जणी विचारतात,कोणी माझ्याबद्दल बोलत असतात आणि मी तिकडे गेले की गप्प बसतात. कोणी माझ्याकडे असं बघतात, की मला रडूच येतं . फक्त तुझ्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात मला एक मैत्रीण दिसते, खरी मैत्रीण.”

“अनन्या, तुला खरं सांगू? आईबाबांना नाही आवडत असं काही विचारलेलं. कोणाला सांगावंसं  वाटलं, तर ते आपण होऊन सांगतील. त्यांना आपण विचारून आणखी दु:ख नसतं द्यायचं. असं ते म्हणतात. आपले आईबाबा मोठे असतात. ते आपल्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्या त्यांच्यात काही भांडण झालं तरी ते योग्यच निर्णय घेतात आणि आपल्याला आनंदी बघण्यासाठी ते काहीही करतात.”

“खरंय  ग पिंकी.माझ्यावर आईबाबांचं खूप प्रेम आहे, ते दोघे मला एकत्र यायला हवेत ग!”

दरवाजाच्या मागे आई आली होती, दोघींसाठी मस्तपैकी भेळ घेऊन. त्यांचं बोलणं ऐकता ऐकता तिच्या डोळ्यांना अक्षरशः धार लागली. हे अश्रू होते, अनन्यासाठी आणि पिंकीसाठी , तिच्या समजूतदारपणासाठी पण!