अशी झाली फजिती (गोष्ट)

अशी झाली फजिती
लेखन: वैशाली सूर्यवंशी सोनवणे, सटाणा,ता. बागलाण जि. नाशिक
चित्र: अर्णव भिडे, इयत्ता तिसरी, अक्षरनंदन शाळा, पुणे

“या ढिशुम …” असा आवाज करत आवेशने पायाने बॉल उंच टोलावला.
“ए आवेश, हळू ना जरा यार! तो काय क्रिकेटचा बॉल आहे का, इतका उंच मारायला?”
“अरे, मी तर गोल करायला गेलो नि चुकून जरा जास्तच जोरात किक मारली गेली.” आवेश म्हणाला.
“अरे कुठे मारला तू? गेला ना उंच? बघ सापडतही नाही आता. कुठे झाडांमध्ये अडकला, की खाली या झुडपांमध्ये पडला? कुठं शोधायचा आता?”, मनू हिरमुसला होऊन आवेशवर ओरडू लागला.
फुटबॉल खेळणारी गौरी, बनू, सोहम ,वेदांत, आवेश, चित्रा, सुमती हरवलेला बॉल शोधू लागली.
“बसा शोधत आता! मी काय तुम्हाला सापडणारच नाही.” उंच चिंचेच्या झाडावर फांद्यांच्या मागे अडकलेला फुटबॉल गालातल्या गालात हसत म्हणत होता.
“इथं किती छान वाटतंय! उंचच उंच , गार सावलीत बसायला! नाहीतर मैदानावर नुसता मातीत गडबडा लोळत असतो मी! मुलांसोबत खेळताना मजा येते तशी. पण, काही मुलं मात्र खूपच जोरात मारतात. अयाई ग! त्या आवेशने मारलेले तर अजून दुखतंय. नुसता धसमुसळा आहे तो. आता जाऊ दे, मी इथेच थांबतो मस्तपैकी आराम करत! बसा म्हणाव शोधत.” फुटबॉल पुटपुटत होता.


सर्वच मुलं बॉल शोधत होती .दाट झुडपांमध्ये मोठी काठी आणून शोधले . उंच झाडावर नजर पोचेल तिथे मान उंच करत पाहून झाले .पण बॉल काही सापडेना . मुलं बॉल शोधून शोधून दमली .शेवटी अंधार वाढू लागला. घरून आईबाबा हाका मारू लागले आणि ती आपापल्या घराकडे निघाली.

सायंकाळ होऊ लागली, तशी चिंचेच्या त्या दाट झाडांवर राहणारे पक्षी आपल्या घरट्यात परतू लागले होते. फुटबॉल अडकलेल्या फांदीवर अगदी जवळच कावळेदादाचं घरटं होतं. जरा निवांत झाल्यावर अंधुकशा उजेडात अचानक कावळेदादाचं लक्ष बॉलकडे गेलं. ‘दिवसभरात झाडाला हे कोणतं गोल गरगरीत फळ आलंय? काही कळत नाही बुवा.’ कावळे दादा विचारात पडला. बडबड करून हैराण करून सोडणाऱ्या साळुंकीला कदाचित हे माहिती असावं, म्हणून कावळेदादाने लगबगीने झाडाला मोठं पांढरं फळ आल्याची बातमी साळुंकीताईला दिली. तीही उत्साहाने पाहायला आली. पण, तिलाही हे अजब फळ कोणतं, हे काही केल्या समजेना. दोघांच्या बडबडीने नुकतेच झोपी गेलेले पोपटदादाही जागे झाले आणि “काय गडबड चालू आहे”, म्हणून बॉलजवळ येऊन पोचले. पुढ्यातील भले मोठे फळ त्यांच्याही ध्यानी येईना. एक एक करत जवळजवळ झाडावरील सारेच पक्षी बॉलजवळ गोळा झाले.

हे कोणतं फळ आलंय? कधी आलं असावं? सकाळी तर इथे काहीच नव्हतं, की आपलं कुणाचं लक्षच गेलं नाही? पक्ष्यांच्या चिवचिवाटाने दमून झोपी गेलेला फुटबॉल दचकून जागा झाला. पक्ष्यांचा सुरू झालेला कलकलाट त्याच्या कानावर येत होता.
कावळेदादा म्हणत होता, “हॅट, मी तर सकाळी इथेच बसलो होतो. तेव्हा मला काय इतके मोठे फळ दिसले नसते? नक्कीच काही तरी जादू घडलीय.”
यावर साळुंकी म्हणाली, “तुझं लक्षच नसेल नीट.”
कावळेदादा उत्तरले, “बरं का साळुताई, मी इतकाही वेंधळा नाही. बराच वेळ फांद्यांमधून येणारं कोवळं ऊन खात, इथंच तर बसलो होतो.”


मग पोपटदादाही बोलले, “तसे तर मलाही सकाळी इथे काही दिसले नाही. पण, हे इतकं मोठं फळ, असं अचानक कसं आलं असावं, काही समजत नाही.”
धापा टाकत आलेली मैना बोलली, “बापरे हे इतकं मोठं फळ कसलं आहे? इतके दिवस तर कधी दिसलं नाही या झाडाला!”
त्यावर कोकीळ उत्तराला, “कुठल्याच झाडावर नाही पाहिलं हे अस फळ. मला तर बाई भीतीच वाटतेय या फळाची.” पक्ष्यांच्या या गप्पा ऐकून फुटबॉलला आता मोठी मौज वाटू लागली होती .
शेवटी साळुंकी ने सुचवलं, “या फळाची आपण सारे मिळून चव घेऊ या. इतकं मोठं फळ आलंय, बोलण्यापेक्षा खाऊन बघू या” साळुंकीताईचा सल्ला सर्वांना पटला. फळ चाखून पाहण्यासाठी सर्वच पक्षी फुटबॉलला चोचीने मारू लागली “आआई गगगग …! ही काय आफत आली बाबा? एखादी चोच जोरात बसली तर सारी हवा फुस्सदीशी बाहेर येईल नि आपण अगदी बिनकामाचे होऊन जाऊ. अरे बापरे ! कुठं अडकून बसलो आपण”, फुटबॉलला दरदरून घाम फुटला.
“इथून आता लागलीच निसटावं लागेल. या पक्ष्यांच्या चोचींचा मार खाऊन फुस्स होण्यापेक्षा, आपल्या मित्रांमध्ये खेळलेलं किती चांगलं!" असं म्हणत फुटबॉलने फांदीवरनं टुणकन उडी मारली. तो घरंगळत आपल्या मनूच्या दाराशी येऊन बसला .
तिकडे झाडाच्या ढोलीत झोपी गेलेल्या खारुताईलाही पक्ष्यांच्या चिवचिवाटाने जाग आली.

“आज इतक्या लवकर पहाट कशी झाली?” म्हणत ती बाहेर आली. रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात घरंगळत जाणारा बॉल खारुताईने पाहिला. पक्ष्यांचा गलका अंधारात चालूच होता. काय गोंधळ आहे म्हणून खारुताई पक्ष्यांपाशी आली. “का ग साळुंके, इतकी जोरात चोच मारली, की फळच खाली पाडून टाकले.” मैना साळुंकीवर ओरडत होती.
“मी एकटीच नाही. तुम्ही सर्वचजण चोची मारत होतात” साळुंकी तावातावाने सांगत होती. सारी हकीकत समजल्यावर खारुताई खो खो हसु लागली व भांडणाऱ्या पक्षांना म्हणाली, “अरे बाबांनो, ते काही फळ नव्हते. तो फुटबॉल होता! त्या पलीकडच्या मैदानावर रोज मुलं खेळत असतात, तोच फूटबॉल होता हा!”
“बॉल म्हणजे गं खारूताई? ते तर केवढं मोठं फळ होत ना.” साळूताईवर चिडलेल्या मैनेने खारुताईला विचारले
“अगं वेडाबाई, ते फळ नव्हतं काही. तो फूटबॉलच होता. बॉलचे खूप प्रकार व खेळ आहेत. मुलं एकमेकांमध्ये मैदानावर हे वेगवेगळे खेळ खेळत असतात.असंच खेळताना हा फुटबॉल इथं येऊन अडकला असणार. असं करुया उद्या मुलं मैदानावर खेळायला येतील, तेव्हा तुम्ही सारेजण त्यांचा खेळ बघायला या, म्हणजे तुम्हाला समजेल.”
खारुताईचं बोलणं ऐकल्यावर खारुताईसोबत सारेच पक्षी हसू लागले. आपापल्या घरट्यात परतल्यावर उद्या न चाखलेल्या फळाचा, अहो म्हणजे फुटबॉलचा, खेळ पहायला कधी जातो या उत्सुकतेने झोपी गेले. तर, केव्हा एकदाची सकाळ होते आणि मनूला भेटून त्याच्यासोबत मैदानावर मनसोक्त खेळतो असा विचार करत फुटबॉलही झोपी गेला .