घर (कथा)

घर (कथा)
लेखन: फारुक एस. काझी
चित्रे: शाम वानरे

“आजोबा, आज इव्हिनिंगला आपण फिक्स क्रिकेट खेळायचं. आज मी शार्प फोर ओ क्लॉकला येईन. डन ना?” प्रांजल शाळेला जाता जाता घाईत बोलला.
“खेळूया रे. तसंच पलीकडे टेकडीकडे फिरायलाही जाऊया. छान दिसते ती टेकडी. तू आता शाळेत जा.” आजोबांनी त्याला हात हलवत निरोप दिला.
प्रांजल शाळेला निघून गेला.
आजोबांनी पेपर उघडून वाचायला सुरवात केली. 

“बुलेट ट्रेनच्या कार शेडसाठी तोडलं जाणार जंगल.” आजोबांनी ही बातमी मोठ्याने वाचली आणि त्यांनी हताश होऊन खिडकीच्या बाहेर पाहिलं.
समोर मोठमोठ्या इमारती दिसत होत्या. आकाशाचा एक लहानसा तुकडा दिसत होता.
“आपण निसर्गाला किती लुटणार आहोत कुणास ठाऊक? 
‘तुका म्हणे उगेची राहा| होईल जें सहज पाहा|’ आपल्या हाती काय आहे दुसरं?”, असं म्हणून त्यांनी पेपर बाजूला ठेऊन दिला.

दुपार झाली. जेवण उरकून आजोबा बाल्कनीत हिंडत होते.
“मंदा, त्या गुलमोहराच्या झाडाखालच्या बाकावर बसतो जरा. मन गमेना हिथं.” 
“बाबा, तिथं झोपू नका. सोसायटीतले लोक नावं ठेवतील. थोडावेळ बसून या. टीव्ही आहे, इथंच आराम करा.” सुनेचं बोलणं ऐकून आजोबा खाली आले.

सोसायटीत सामसूम होती. ते हळूहळू चालत बाकाजवळ गेले. सावकाश बसले. पाठ टेकली.
“रामकृष्ण हरी. देवा पांडुरंगा, तुझ्या जगात काय राम उरला नाय गड्या.” असं म्हणून त्यांनी मान मागे टेकवली. इतक्यात त्यांच्या कानावर चिमण्यांचा गोंधळ पडला.
आजोबांना गावकडचं घर आणि शेजारचं आंब्याचं झाड आठवलं.
पाखरांची मस्ती, गोंधळ आठवला. ते मंद हसले. गोंधळ वाढला तसं आजोबांनी डोळे उघडून वर पाहिलं.
“अगं मावश्यांनो, किती गोंधळ घालताय. म्हातारं माणूस बसलंय. बसू द्या की निवांत. ‘तुका म्हणे शांती धरणे जीवासाठी| दशा उत्तम गोमटी|’ कळलं का काही? कळलं असेल तर शांत राहा. म्हाताऱ्याला शांत बसू द्या.”
असं म्हणून आजोबांनी पुन्हा डोळे मिटले.

“बाबा, तू कुठून आलास? या आधी कधी पाहिलं नाही तुला.”
एक नाजूक आवाजातलं बोलणं ऐकून आजोबांनी ताडकन डोळे उघडले.
बावरून त्यांनी इकडे तिकडे पाहिले. कुणीच दिसेना. त्यांनी पुन्हा डोळे बंद केले.

“बाबा, तू कुठून आलास? या आधी कधी पाहिलं नाही तुला.”
पुन्हा आवाज आला. आजोबा आता दचकले.
“कोण बोलतंय? समोर का येत नाही? असा लपाछपीचा खेळ नका खेळू.”

इतक्यात एक चिमणी कठड्यावर येऊन बसली.
“बाबा, मी आहे. तू कुठून आलास?”
“अबाबा ! चिमणी बोलती? शहरात तर कायबी व्हायला लागलं आता !”
आजोबाना खूप आश्चर्य वाटलं.
“बाबा, तुझ्या गावात माझी भावंडं आहेत. तीपण बोलतात. पण, तुम्ही माणसं आमचं ऐकत नाही.”
“अगं बयो, माणसं माणसांचं ऐकत नाहीत. तुझं कोण ऐकणार?” असं म्हणून आजोबा हसले.

“माझा नातू राहतो इथं. प्रांजल. नवीन राहायला आलेत इथं. तुझं घर कुठं हाय?” आजोबांनी प्रश्न केला.
“ही समोरची इमारत दिसतेय का?” चिमणीने एक पंख दाखवत विचारलं.
“हम्म, त्यात आहे का तुझं घरटं ?” 
“नाही. या इमारतीच्या जागी एक मोठा पिंपळ होता. त्यावर होतं आमचं घरटं. आम्ही सगळे खूप आनंदाने राहत होतो. पण माणसांना घर पाहिजे होतं. त्यांनी आमचं घर मोडलं आणि स्वत:चं घर बांधलं.”
चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं.

“अगं असं रडतेस काय ? इथं नाही तर दुसरीकडं बांधायचं घरटं.”
“बाबा, बोलणं सोप्पं आहे. करणं अवघड. इतक्या वर्षं आम्ही एकत्र राहिलो. ज्याने आधार दिला, त्या झाडाला मरताना पाहिलं. किती रडत होता तो... जीव कालवला आमचा. पण आमचा लहान जीव काय करणार?”
“खरंय तुझं. ‘तुका म्हणे मज वाटते उदास| काय करू यास पांडुरंगा|’ आपलं घर कुणीतरी मोडतं. आपला जीव अडकलेला असतो त्यात. तू नको रडूस. त्या पलीकडच्या टेकडीवर बांध तुझं घरटं. छान जागा आहे.”
“हा हा हा हा...”
“काय झालं हसायला ?”
“बाबा, तिथं नवीन इमारत होणार आहे. पलीकडं कारखाना. कुठं बांधणार घर?” 
“मग, तुमचं घर?”
“बाबा, आम्ही सोय करायला लागलोय.”
“कसली सोय?”
“ये दाखवते तुला.”

आजोबा चिमणीच्या मागोमाग चालू लागले. चिमणीने त्याला टेकडीच्या उतारावर आणलं. 
“हे बघ, झाडंच झाडं...”
आजोबांनी खाली पाहिलं आणि नवलानं पाहू लागले.
आजि बरवे झाले| माझे माहेर भेटले|’ आहाहाहा किती झाडं ही ! व्वाह...कुणी लावली?”
“आम्हीच. सकाळी आम्ही अन्न शोधायला बाहेर पडतो तेव्हा झाडांच्या बिया शोधतो. आणतो. इथं टाकतो. आपली मदत आपणच करायला हवी. निसर्गच शिकवतो आम्हाला हे.”
आजोबा, खूप खुश झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

“अरे बाबा, आता तू का रडायला लागलास?”
“बयो, मोठ्या रस्त्यात माझं घर आणि माझी झाडं आडवी येत होती. सरकारने माझं घर आणि झाडं तोडली. मला त्याचे पैसे मिळाले. पण माझ्या घरात गुंतलेला जीव मला चैन पडू देईना. म्हणून मी इकडे आलो. एकटा जीव. तुला घर नव्हतं. पण तुम्ही रडत नाही बसला. शेकडो पाखरांसाठी घर बांधत राहिला. मानलं पाहिजे. ‘झाड कल्पतरू| न करी याचकी आव्हेरू||’”
“बाबा, आता तू कुठं राहणार?”
“आता, मी गावाकडे जाणार. छोटं घर माझ्यासाठी आणि मोठं घर तुझ्या भावंडांसाठी बांधणार. म्हणजे भरपूर झाडं लावणार. बयो, इवलासा जीव तुझा. तू आज माझी गुरु झालीस.” आजोबाच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं.
“आता मला शांत झोप लागेल. उद्या गावी परत जायचंय. तूही ये तिकडेच. मजेत राहा. आपण आपापल्या घरात आनंदाने राहू.” आजोबा खुशीत येऊन चिमणीला बोलले.
“इथली झाडं संपली की तिकडं यावंच लागेल. तू मात्र झाडं संपू देऊ नको.” चिमणी जड आवाजात बोलली.
चिमणीने हसत हसत पंख हलवून निरोप दिला. आजोबांच्या पावलांचा वेग वाढला होता. चालण्यातून आनंद ओसंडून वाहत होता.
आजोबा गुणगुणत होते... “आम्ही जातो आपुल्या गावा| आमुचा रामराम घ्यावा|