लाखमोलाची भेट (कथा)

लाखमोलाची भेट
लेखन: एकनाथ आव्हाड
चित्र: रमा राहुल वायसे, इयत्ता ८वी
 

गुरुपौर्णिमा उत्सवाला अवघा आठवडाच उरला होता. यावेळी आपण वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करावी आणि ही गुरुपौर्णिमा साजरी करताना आपल्यासोबत आपला अख्खा वर्ग असावा, असे शीतलला सारखे वाटत होते. शीतल ही 'आठवी ब'च्या वर्गाची माॅनिटर. अंगी नेतृत्वगुण असणारी. हुशार. मनमिळाऊ. दरवर्षी गुरुपौर्णिमेला, मुलं शाळेजवळच्याच नाक्यावरच्या फुलवाल्याकडून, फुलांचे गुच्छ किंवा सुटी फुलं घेऊन येत. गुरुपौर्णिमेला हा फुलवाला हमखास चढ्या दराने फुलं विकत असे. साध्या एका गुलाबाचेही तो दहा रूपये आणि छोट्या गुच्छाचे तर चक्क पन्नास रूपये घेई. बरं, गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सर्व कोमेजलेल्या फुलांचा खच पाहायला मिळायचा कचऱ्याच्या डब्यात. शीतलला हेच नको होतं. तिने बाबांना तिच्या मनातलं सारं काही सांगितलं. मग बाबांनी तिला एक मस्त कल्पना सुचवली. ती कल्पना ऐकून तिला खूपच आनंद झाला. आता हीच कल्पना तिला वर्गाला सांगायची होती. तिला वाटले, एकदा का वर्गाला ही कल्पना पटली की आपले काम फत्ते झाले.

दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीची घंटा झाल्यावर मुळेबाई वर्गातून बाहेर पडल्या. वर्गात आता मुलेच होती. शीतलने हीच संधी साधून हलक्या आवाजात ती मुलांना म्हणाली, "मला दोन मिनिटं तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे." शीतल काय गुपित सांगणार आहे, हे ऐकण्यासाठी मुलांनी उत्सुकतेने आपले कान टवकारले. शीतलने मग यावेळची गुरुपौर्णिमा आपण वेगळ्या पद्धतीने का आणि कशी साजरी करूया ते समजावून सांगितले. मुलांनाही ते पटले. सर्वांनी शीतलच्या या योजनेला होकार भरला. मग काय लगेच कामाला सुरुवात झाली. शीतलने सर्वांना त्यांच्या आवडीची कामं वाटून दिली. म्हणजे कसं... सुशांत उत्स्फूर्त आणि नेमकं बोलतो म्हणून त्याच्याकडे कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी दिली. राधिका छान कविता करते म्हणून तिला वर्गशिक्षिका मुळेबाईंवर एक कविता लिहायला सांगितली. भावेशची चित्रकला मस्तच, म्हणून त्याला मुळेबाईंसाठी छानसं ग्रिटींग कार्ड तयार करायला सांगितलं. शेवटी शीतल म्हणाली, "आपले फुलांसाठी बरेच पैसे जातात, म्हणून यावेळी आपण प्रत्येकाने फुलं, गुच्छ आणायचे नाहीत. फक्त आई-वडिलांच्या परवानगीने आणि स्वेच्छेने केवळ दोन रूपये आणायचे. चालेल?"मुलांनी मोठ्याने हो म्हणताच, शीतल खालच्या आवाजात म्हणाली, "हळू, कुणी ऐकेल ना! आपली ही कल्पना सध्या गुलदस्त्यातच ठेवूया. काय?" एकमेकांना टाळ्या देत सर्वांनीच यावर संमती दर्शवली.

एकदाचा गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला. शाळा भरल्याबरोबर वर्गशिक्षिका मुळेबाई कॅटलाॅग घेऊन 'आठवी ब'च्या वर्गात आल्या. मुळेबाई संपूर्ण वर्गाच्या प्रिय बाई होत्या. मायेच्या ममतेने त्या शिकवायच्या. मुलांना त्या खूप आवडायच्या. बाईंची हजेरी घेऊन झाल्याबरोबर शीतल जागेवर उभी राहीली. बाईंना म्हणाली, "बाई, आज गुरुपौर्णिमा म्हणून वर्गातील आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एक छोटेखानी कार्यक्रम ठरवलाय. अवघा पंधरा मिनिटांचा. तुमची परवानगी असेल तर लगेच सुरु करतो आम्ही" बाई हसून म्हणाल्या, "ठीक आहे. करा पटकन सुरु."सुशांत पटकन बाईंच्या टेबलाजवळ आला. वर्गाला उद्देशून म्हणाला, "मित्रांनो, आज गरुपौर्णिमा. म्हणतात ना, गुरूने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा..." सुशांत खूप सुंदर, अभ्यासपूर्ण निवेदन करत होता.  मुळेबाई त्याची निवेदनकला ऐकून खूष झाल्या. शीतलने कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. मग सुशांतने राधिकाला कविता म्हणण्यासाठी पाचारण केले. राधिकाने कवितेला सुरूवात केली. कवितेचं शीर्षक आहे, 'आमच्या मुळेबाई'

मुळेबाई आम्हाला, आवडतात खूप
असतात सदा , त्या हसतमुख

स्वभाव त्यांचा, मधासारखा गोड
मायेला त्यांच्या, नाही कसली तोड

मराठी शिकवण्यात, त्यांचा हातखंडा
नसतो कधी हातात, छडीचा दांडा

पुस्तकातली कविता, गातात किती छान
कथाकथन त्यांचे ऐकून, हरपून जाते भान

अडचणी सोडविण्यात, नेहमी असतात तत्पर 
प्रत्येक प्रश्नाला असते, त्यांच्याकडे उत्तर

नाही कधी बडबडत, नाही बोलत रागावून
चुकले तर आईसारखे, सांगतात त्या समजावून

म्हणूनच आम्हांला प्रिय, आमच्या मुळेबाई
त्यांच्यामुळेच शाळेची, आठवण सदा येई

कविता झाली. मग सुशांतने वर्गातल्या चार गटप्रमुखांना पुढे बोलावले. त्यांनी एका कागदात गुंडाळून भेटवस्तू आणली होती. ती भेटवस्तू, एक गुलाबाचं फूल, राधिकाची फ्रेम केलेली कविता आणि भावेशने तयार केलेलं गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारं सुंदर भेटकार्ड. या सर्व गोष्टी चौघांनी मिळून बाईंच्या हाती दिल्या. खाली वाकून बाईंना नमस्कार केला. वर्गातला गणेश म्हणाला, "बाई, आठवी ब च्या वर्गाकडून गुरुपौर्णिमेच्या तुम्हांला खूप खूप शुभेच्छा."

तेवढ्यात वर्गातली दिप्ती उत्साहाने पटकन बाईंना म्हणाली, "बाई, ती कागदात गुंडाळून ठेवलेली भेटवस्तू उघडून बघा ना." मग दिप्तीच्या आग्रहाखातर बाईंनी भेटवस्तूवरचा कागद काढला. तर आत एक सुंदर पुस्तक होते. लेखिका इंदूमती जोंधळे यांचे 'बीनपटाची चौकट'. त्यांचा जीवनपटच त्यांनी या पुस्तकात  उलगडला आहे. पुस्तक पाहून बाईंना खूप आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, अरे तुम्हांला कसं माहीत मला हे पुस्तक वाचायचं आहे ते. आपल्या शाळेच्या ग्रंथालयात हेच तर पुस्तक शोधत होते मी." शीतल पटकन पुढे येऊन म्हणाली, "हो बाई. माहीत आहे मला. आठवड्यापूर्वी आपल्या शाळेच्या ग्रंथालयातले ग्रंथपाल दामलेकाकांशी याच पुस्तकाबाबत तुम्ही विचारणा करत होता ना, तेव्हा मी तिथेच होते. बालकवितेच्या कपाटात कवी संजय वाघ यांचं 'गाव मामाचं हरवलं' हे पुस्तक शोधत होते मी वाचण्यासाठी. तुम्ही विचारलेल्या पुस्तकाचं नाव मी नेमकं लक्षात ठेवलं. मग मनाशी ठरवलं, या गुरुपौर्णिमेला हेच पुस्तक तुम्हांला भेट म्हणून द्यायचं. मग वर्गात मुलांशी बोलले आणि आज गुरुपौर्णिमेला तो योग घडून आला. बाई, माझे बाबा म्हणतात, बुके देण्यापेक्षा बुक द्यावं माणसानं. कारण पुस्तकं माणसांना जोडतात. हे पुस्तक शोधून देण्याच्या कामी माझ्या बाबांनी थोडी मदत केली. मात्र बाकी आमचं आम्हीच.बाई,आवडली ना तुम्हांला आमची ही भेट  ?" यावर मुळेबाईंना काय बोलावं काहीच कळेना. त्यांचे डोळे भरुन आले.त्यांच्या मनात आलं, मुलं आपल्यावर किती भरभरुन, निस्सिम प्रेम करीत असतात. आपणच कधीकधी कमी पडतो त्यांना समजून घ्यायला. क्षणभर वर्गात शांतता पसरली. मग त्यांनी ते पुस्तक हृदयाशी घट्ट धरले आणि त्या म्हणाल्या, "खूप खूप मोठ्ठे व्हा बाळांनो. तुमची ही भेट माझ्यासाठी लाखमोलाची आहे. कारण...कारण, यात तुमचं प्रेम सामावलं आहे." का कुणास ठाऊक, बाईंचे पाणावलेले डोळे पाहून आता मुलांचे डोळे पाणावले होते.