ट्रॅक्टरवरची शेळी (कथा)

ट्रॅक्टरवरची शेळी
लेखनः अश्विनी बर्वे
चित्रः सोमनाथ अलकुंटे

हरी एका छोट्या गावात राहत होता. त्यांच्या गोठ्यात पाच गायी, चार म्हशी आणि दोन बैल होते. शिवाय त्याच्याकडे चार-पाच मांजरं आणि कुत्रीही होती. हरीला प्राण्याबद्दल जरा जास्तच प्रेम होतं. त्यांच्या विहिरीत दोन कासवं होती. शिवाय त्याने बेडकंही पकडलेली होती. त्यांच्या घरी असलेल्या कमळाच्या छोट्या हौदात, त्याने छोटे छोटे मासे पाळले होते. अंगणात कोंबड्या होत्या, दोन टर्की होत्या. एवढ्या सगळ्या प्राण्यांची काळजी घेणं आणि त्यांच्या बरोबर सतत वेळ घालवणं हरीला फार फार आवडायचं. त्याच्या खांद्यावर एक खारूताई सतत बसलेली असे. हरी त्याच्या ताटातलं जेवण तिला द्यायचा. शिवाय, भुईमुगाच्या शेंगा ती सतत चरत असे. शेंगा खाताना ती सगळीकडे कचरा करे . तेव्हा हरीची आई म्हणायची, “हरी, आता तुझं हे प्राणीसंग्रहालय बंद कर, दिवसभर त्यांचं काही ना काही चालूच असतं!”
“हो गं आई, यापुढं मी एकसुद्धा अधिकचा प्राणी पाळणार नाही.” हरी हसून म्हणायचा. हरीचं आणि त्याच्या आईचं असं नेहमी चालायचं.


“वहिनी, अहो वहिनी!”, हरीच्या आईला बाहेरून कोणी तरी आवाज दिला, म्हणून हरी बाहेर आला. हरीच्या घरी दूध घ्यायला नेहमीच कोणी ना कोणी येत असे. तसं त्या दिवशी रशीदकाका दूध घ्यायला आले होते. त्यांच्या गाडीच्या कॅरेटमध्ये शेळीची चार-पाच करडं होती. छोटी छोटी,काळी-पांढरी पिल्लं फार गोड दिसत होती. कॅरेटमधून उडी मारून एक करडू खाली उतरलं आणि तिथंच खेळू लागलं. करडू सरळ हरीच्या जवळ आलं आणि त्याच्या पायाशी अंग घासू लागलं. हरीनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला जवळ घेतलं.
“हरी, हे करडू रखतो का तू?”, रशीदकाका म्हणाले.
हरीनं आईकडे पाहिलं, आईचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. हरी काहीच बोलला नाही. त्यानं किटलीमध्ये त्या काकांना दूध नेऊन दिलं. काकांनी सगळी पिल्लं परत त्यांच्या मोटर-सायकलला बांधलेल्या कॅरेट मध्ये ठेवली आणि ते निघून गेले. पण, ते हरीच्या मागे लागणारं करडू मात्र, ट्रॅक्टरखाली बसलेलं होतं. त्यानं हरीला आवाज दिला, “म्यांऽ म्यांऽऽ”
हरीनं पिल्लाकडे पाहिलं आणि तो काकांना आवाज द्यायला लागला. पण, ते लांब निघून गेले होते.

मग हरीनं त्या शेळीच्या पिल्लाला जवळ घेतलं आणि म्हटलं, “अरे घाबरू नकोस, तुला भूक लागली का?” हरी असं म्हणताच ते पिल्लूही त्याला चिकटलं. हरीनं त्याला गोठ्याच्या बाजूला जिथं ते घास ठेवतात, तिथं आईपासून लपवून ठेवलं. त्याच्या कानात सांगितलं, “थांब तुला खायला घेऊन येतो, तोपर्यंत अजिबात ओरडायचं नाही,आईला आवडत नाही बरं.” मग पिल्लानं समजल्यासारखं अंगाचं मुटकुळं केलं आणि बसून राहिलं.
हरी घरात गेला आणि आईच्या अवतीभवती करू लागला. ती पाणी आणायला गेली की तिच्या पुढे जाऊन तिला पाणी देऊ लागला, तिला काही ना काही मदत करू लागला. “हरी काय पाहिजे तुला?”, आईनं विचारलं.
“काही नाही, मी तुला मदत करतोय.” हरी म्हणाला.
“तेच विचारतेय मी, तुला काय पाहिजे?” आई म्हणाली.
“खरं तर काहीच नको, पण एक विचारायचं होतं.” हरी म्हणाला.
“काय ते?”
“आई शेळीचं करडू काय खातं?”
“अगदी लहान असेल तेव्हा आईचं दूध पितं, पण कोवळा कोवळा पाला सुद्धा खातं”, आई म्हणाली.
“अजून?”
“तुला काय चौकश्या? तू करडू ठेवून तर घेतलं नाहीस ना?”
“नाही गं, मी नाही ठेवून घेतलं.” हरी म्हणाला. “थांब आलोच हं मी” असं म्हणत हरीनं तिथून धूम ठोकली. तो करडू बघायला आला तर ते हिरवं कोवळं गवत खात होतं. हरीनं थोडा पाला आपल्या हातात घेतला आणि म्हणाला. “खा ,खा पोटभर खा,आणि चावून खा.” हरीच्या हाताला पिल्लाची ओली जीभ लागत होती. त्याला गुदगुल्या होत होत्या. त्यामुळे त्याला खूप हसू येऊ लागलं. त्याच्या हसण्याचा आवाज बाहेरून येणाऱ्या त्याच्या बाबांच्या कानावर पडला.


त्यांनी हरीला विचारलं, “हरी, तू माझ्याबरोबर तालुक्याच्या गावी येतोस का? शेताचं काही सामान आणायचं आहे. मला मदत होईल, तू आला तर.” तेवढ्यात, शेळीच्या पिल्लाचा म्यांऽ म्यांऽऽ आवाज आला.आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं. “हा कसला आवाज? शेळीचा तर आवाज नाही ना हा?”, आईनं विचारलं.
“छे छे, आपल्याकडं कुठं आहे शेळी?”, हरी घाईनं बाबांपर्यंत येत म्हणाला. पण परत तो आवाज आला. शेळीचं करडू स्वयंपाकघराच्या दाराशी आलं. आई-बाबांनी ते पाहिलं. मग हरीला खरं काय ते सांगावंच लागलं. “अग आई, रशीदकाकाचं ते करडू आहे, इथंच राहून गेलं, म्हणून मी त्याला घरात आणलं. मी ते आले की त्यांना देऊन टाकेन.”
“ बरं, बरं, ठीक आहे. दोन दिवसांनी ते आले नाही, तर आपण त्यांच्या मळ्यात जाऊन देऊन येऊ” बाबा म्हणाले.
“बाबा आपण शेळीच्या पिल्लाला बरोबर घेवून जाऊया. म्हणजे ते एकटं कंटाळणार नाही.” हरी म्हणाला.
“पण तू कामात लक्ष द्यायला हवं, नाहीतर तू त्याच्यामागं राहशील आणि मला मदत होणार नाही.” हरीचा बाबा म्हणाला.
“हो हो, मी नक्की मदत करेन.”हरी म्हणाला.


हरी, ते शेळीचं करडू आणि बाबा ट्रॅक्टरमध्ये बसून निघाले. अर्ध्या रस्त्यापर्यंत आले. तेव्हा नेमका त्यांच्या ट्रॅक्टरचा हॉर्न वाजेना. बाबानं जोरजोरात ती पिपाणी दाबून पाहिली. पण काहीच उपयोग झाला नाही.
“हरी, अरे हॉर्न वाजत नाही, आता काय करायचं?” बाबांनी विचारलं.
“आपण हळू हळू जाऊ या ना,” हरी म्हणाला.
“अरे, पण लोक दोन्ही बाजूला न बघताच रस्ता ओलांडतात, त्यांना आवाज आला नाही तर!” बाबा म्हणाले.
“मग काय करूया बाबा? आता आपण परत जाऊया का?”, हरी म्हणाला.
“नको नको, आज आपलं काम व्हायलाच पाहिजे.” बाबा असं म्हणाले आणि ते ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घ्यायला लागले.
तेवढ्यात शेळीचं करडू ओरडलं, “म्यांऽम्यांऽऽ” लोकांना शेळीचा आवाज ऐकू आला आणि ते रस्त्यातून बाजूला झाले. हरीचे बाबा खूप खूश झाले. त्यांनी करडू पुढे त्यांच्याजवळ बसवलं. 

पिल्लू मोठ्या आनंदाने तिथं बसलं, जणू तेच ट्रॅक्टर चालवत आहे असं त्याला वाटत होतं. समोर लोक दिसले, की ते ओरडे, त्यामुळे लोकांचं त्याच्याकडं लक्ष जाई. आपल्या छोट्या मित्राने केलेली मोठी मदत पाहून हरीला खूप आनंद झाला.


हरीच्या बाबांनी कृषिकेंद्राजवळ ट्रॅक्टर थांबवला. तेव्हा करडू बाहेर बघून मोठमोठ्यानं ओरडू लागलं. हरीला कळलं नाही, त्याला काय झालं ते! हरीनं त्याला गोंजारलं, पण ते ओरडतच राहिलं. करडू कोणाकडे तरी पाहून ओरडतंय, हे हरीच्या लक्षात आलं. तेव्हा त्याला रशीदकाका दिसले. हरीनं त्यांना जोरात हाक मारली. काकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ते धावतच आले. हरी त्यांना म्हणाला, “काका, तुमचं करडू माझ्याकडेच राहून गेलं होतं, आता तुम्ही ते परत घेवून जा.”
“अरे, पण तुला आवडतं ना ते? काका म्हणाले.
“हो, पण त्याला त्याच्या भावंडांची आठवण येत असेल ना?”, हरी म्हणाला.


तेवढ्यात हरीचे बाबाही आले. हरीनं त्या दोघांची ओळख करून दिली.
बाबानं शेळीच्या पिल्लाचं खूप कौतुक केलंआणि म्हटलं की, “तुमची शेळी तुम्ही घेवून जा”. असं म्हणून त्यांनी ते पिल्लू रशीद काकांकडे दिलं, पण ते जायला तयार होईना. त्यानं हरीकडं उडी घेतली आणि ते हरीला चिटकून राहिलं. पिल्लाला हरी आवडला होता आणि हरीला पिल्लू!