गोगलगाय (कथा)

गोगलगाय

लेखन व चित्रे: संज्ञा घाटपांडे-पेंडसे


‘गोगलगाय’ नेहमीप्रमाणे वर्गाच्या दारात उभी होती. ती ‘मंद’ आजही उशिरा आली होती! मी आणि माझ्या ‘गँग’नी तिचं नाव ‘गोगलगाय’ ठेवलंय कारण ती गोगलगायीसारखीच ‘स्लो’ आहे. तिची ‘ट्यूबलाईट’ कधी पेटतच नाही! आम्ही काय बोलतो ते कळायला तिला ५ मिनिटं लागतात आणि उत्तर द्यायला ती ५ मिनिटं लावते. त्यामुळे तिच्याशी बोलायचं म्हणजे एक कार्यक्रमच असतो. तिला त्रास द्यायला जाम मजा येते. कारण तिला टपली मारली तरी कुणी मारलीये ते कळायला पण वेळ लागतो. आज मी तिच्यावर नेहमीप्रमाणे जोक मारणार होतो तेवढ्यात तिची आई आत आली.
माझी टरकलीच! ‘ह्या मंदबुद्धीने माझी तक्रार केली की काय आईकडे?’ आता हिची आई सगळ्यांसमोर आपल्याला ओरडणार म्हणून मी पटकन पुस्तकाआड तोंड लपवलं. हळूच एकदा गोगलगायीच्या आईकडे बघितलं. आई शप्पथ ! हिची आई तर एकदम ‘स्मार्ट’ आहे! आणि चेहऱ्यावरून तर प्रेमळ पण वाटत होती. ही खरंच गोगलगाईची आई होती? मी परत पुस्तकात तोंड लपवलं! आता ओरडा खायची वेळ आली होती. पण गोगलगायीच्या आईने सगळ्यांना प्रेमाने ‘हाय’ केलं आणि ताईंशी काहीतरी हळूहळू बोलायला लागली! आम्ही सगळेजण इकडे-तिकडे बघायला लागलो. आमच्या गँगने लगेच ‘कनेक्शन’ बनवलं आणि डोळ्यांनीच एकमेकांना, ‘मॅटर झाला!’ ची खूण केली! ५- १० मिनटं ताईंनी आणि तिच्या आईने काहीतरी खुसफुस केली आणि मग दोघी आमच्या समोर उभ्या राहिल्या.


आता तर दोघी ‘युनिटी’ करून आमची वाट लावणार का काय असं एक मिनट मला वाटलं. पण मग ताईंनी बोलायला सुरुवात केली, “आज मैत्राची आई आपल्याशी गप्पा मारणार आहे!” मध्येच स्वतःला थांबवत ताई म्हणाल्या, “मैत्रा तू बाहेर चक्कर मारून ये बरं जरा वेळ.” “नाही ‘नाही बाई! तिच्यापासून लपवायची काहीच गरज नाही.” तिला आम्ही समजावून सांगितलं आहे सगळं.” गोगलगायीने पण कधी नव्हे समजल्यासारखी मान डोलावली! मला तर काही टोटलच लागेना! काहीतरी सॉलिड ‘सस्पेन्स’ होता आणि तो गोगलगायीला माहीत होता पण आम्हाला नाही! मैत्राच्या आईने आमच्या वर्गाचा ‘चार्ज’ घेतला आणि बोलायला सुरुवात केली!

“तुम्हाला ताई शिकवतात ते सगळं कळतं?”, “हो!” सगळा वर्ग जोरात म्हणाला. मी जरा हळूच ओरडलो कारण बाकी ‘ऑल ओके’ असलं तरी गणिताचा आणि आपला एकदम ३६ चा आकडा आहे! सगळं फुल टू डोक्याच्या वरून जातं! पण तो गणिताच्या ताईंचा प्रोब्लेमे माझा नाही! त्या आगगाडी सारख्या धडधड पोर्शन पळवतात!
“तुम्ही शिकता ते परीक्षेत तुम्हाला आठवतं?” गोगलगायीच्या आईने पुढचा प्रश्न टाकला. अर्थातच हो! कधीकधी होतं म्हणजे एकदमच ब्लँक! पण आठवत तसं बऱ्यापैकी. अभ्यास करतोच की आपण! कधीकधी फालतू चुकांमुळे जातात मार्क्स पण गोगलगायीपेक्षा तरी बरंच! तिला तर नेहेमीच ‘एक आकडी’ मार्क्स मिळतात आणि कधी कधी तर भोपळे सुद्धा! अचानक एक दिवस असा आला आणि तुम्हाला ताई शिकवताएत ते कळेनासंच झालं तर? म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न करताय पण काही डोक्यातच शिरत नाहीये आणि बाकी सगळ्यांना कळतंय पण तुम्हालाच नाही कळते काही, तर काय कराल तुम्ही?” “बापरे! असं कसं होईल? आम्ही ताईंना सांगू की हे काही झेपत नाहीये. परत शिकवा!” कबीर हात झटकत म्हणाला. “बरोबर! पण तरीही नाही कळलं तर? आणि समजा, कळलं पण आयत्या वेळी परीक्षेत मेंदूत एकदम ‘कोरा कागज’ झालं तर?” सगळा वर्ग चिडीचूप!

बहुतेक सगळ्यांनाच डोळ्यासमोर आपापल्या पेपरवर लाल पेनाने गिरवलेले शून्य दिसायला लागले! “असंच काहीसं झालंय आपल्या मैत्रिणीबरोबर! काही काही मुलांबरोबर होतं असं. त्याला वेगवेगळी कारण असतात! ते कळायला तुम्ही अजून लहान आहात, पण महत्त्वाचा मुद्दा हा की तो मुलगा किंवा मुलगी ‘वेडी’ किंवा ‘मंद’ नसते. इतर मुलांपेक्षा त्यांना शिकायला, अभ्यास समजून घ्यायला जास्त वेळ लागतो. आणि आजूबाजूच्या गोष्टी कळायला पण!” ‘आईशप्पथ! म्हणजे केमिकल लोचा!’ माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. पुढे तिच्या आईने बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या! सगळ्याच्या सगळ्या काही समजल्या नाहीत, पण थोड्या फार कळल्या! बोलताना तिच्या आईला बहुतेक थोडं रडू पण येत होत. पण मी कधी कधी दाबून ठेवतो रडू! तसंच तिची आई पण करत होती! पहिल्यांदा मला गोगलगायीसाठी सॉलिड वाईट वाटलं आणि स्वतःचा राग पण आला! ‘केमिकल लोचा’ होता त्याला ती तरी काय करणार. श्या! आपण उगाचच तिची मजा उडवली! माझ्या डोक्यावरून गोष्टी जायला लागल्या की माझी सटकते आणि मी हातातली वही किंवा पुस्तक जोरात आपटतो आणि आईवर चिडचिड करतो! म्हणजे अशी ‘फिलिंग’ गोगलगायीला दररोज येत असेल! ‘बिचारी!’ मी आणि अलोकदादा जेवायला बसतो तेव्हा आवडीचा पदार्थ असला की तो मला ‘इधर-उधर’ बघायला भाग पडतो आणि माझ्या ताटातलं त्याला आवडेल ते हडप करतो! आणि वरून ‘बावळट कुठला! इतक्या वेळा तीच तीच ट्रिक वापरतो तरी पेटत नाही याची!’ असं पण म्हणतो. इतका सणकून राग येतो ना! तसंच गोगलगायीला पण वाटत असेल जेव्हा आम्ही तिची पेन्सिल, पेन खोडरबर पळवतो आणि मग ती वेंधळ्यासारखी दप्तराच शोधत बसते! आम्ही लांबून टाळ्या देत हसतो!

मला गोगलगायीच्या जागेवर मीच दिसायला लागलो! मी हळूच मागे गोगलगायीकडे नजर टाकला. ती आपल्या केसांशी खेळत आपल्याच तंद्रीत होती. मी धांदरटपणा केला की आई धपाटे घालायला माझ्या मागे धावते पण आजी अचानक कुठून तरी टपकते आणि मला आईपासून वाचवत तिला म्हणते,’ प्रेमाने सांगाव्या गं गोष्टी. उठसूठ हात चालवू नये मुलांवर!’ बहुतेक गोगलगायीला पण अश्याच काहीतरी प्रेमाची वगैरे गरज असावी! बास! मी ठरवूनच टाकलं की यापुढे बिलकुल तिला त्रास द्यायचा नाही!

“तर मग हा वर्ग माझ्या मैत्राला मदत करणार ना?” सगळ्या वर्गावर नजर फिरवत मित्राच्या आईने विचारलं. “हो!” पुन्हा सगळे एका सुरात ओरडले. मला काय वाटलं माहीत नाही पण मी उठून मैत्राकडे गेलो आणि कान पकडून म्हणलं, “सॉरी गं! पुन्हा नाही असं करणार!” ( आई म्हणते चुकीसाठी माफी नाही मागितली तर ती जास्त मोठी चूक ‘काउंट’ होते.) गोगलगायीला झेपलंच नाही काय होतंय! माझं बघून मग निषाद पण उठला, मग अमर पण, श्वेता पण. सगळेच तिला सॉरी म्हणायला उठले. आता मात्र तिच्या आईला रडू आवरेना. ताईंनी तिच्या आईला म्हणाल्या, “काही काळजी करू नका हो! गुणी आहेत माझी सगळी मुलं. आम्ही मिळून तिची काळजी घेऊ.” आता गोगलगायीकडे बघण्याचा सगळ्यांचा ‘अँगल’च बदलला!

सगळे जागा सोडून तिच्या दिशेने धावले आणि तिच्या भोवती कलकलाट सुरू केला. ”मी तुला गणित शिकवणारे आता! त्यामुळे भोपळा मिळायचा काही स्कोपच नाही. बघशीलच तू!” निषाद छाती बडवत म्हणाला. “मी तुला वात्रट मुलांना कशी अद्दल घडवायची ते शिकवते.” माझ्याकडे रागीट, खडूस कटाक्ष टाकत श्वेता म्हणाली. ताई आणि तिची आई कौतुकाने वर्गाकडे बघत होत्या. गोगलगाय आता माझ्यापेक्षा श्रीमंत झाली होती कारण अख्खा वर्गच तिचा मित्र बनला होता. मला टोटलमध्ये फक्त साडे ९ च मित्र आहेत. ( नेहा कधी मित्र आहे म्हणते कधी नाही म्हणते म्हणून ती अर्धीच) मी पहिल्या बाकापाशी विचार करत उभा होतो, ‘मी काय बरं शिकवू शकतो गोगलगायीला?’ अचानक कुणीतरी डोक्यावर टपली मारली. बघतो तर मैत्राची आईच होती. “घ्याल ना माझ्या ‘गोगलगायीला’ तुमच्या गटात? आहे थोडी स्लो पण शिकेल हळू हळू” मित्राची आई हसून म्हणाली. मी मंदासारखा तिच्या आईकडे बघतच बसलो!