छोट्या दोस्तांनो, तुमच्या 'ग्रेटा'ताईला साथ देताय ना?

हाय दोस्तांनो,

"तुम्ही शाळेत शिकताय इतके लहान आहात हे जरी खरं असलं, तरी अख्ख्याच्या अख्ख्या जगाला तुम्ही एकत्र आणू शकता" असं जर मी म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? स्वीडन मधल्या एका १५ वर्षाच्या मुलीने हे केलं आहे.  इतकंच नाही तर आपल्या पुण्यातील काही विद्यार्थी आणि शाळाही या मुलीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तिने उभारलेल्या या आंदोलनाला आपला पाठिंबा देण्यासाठी २० सप्टेंबरला काही कृती करणार आहेत. आज मी तुम्हाला त्याच मुलीची गोष्ट सांगणार आहे. तिचं नाव आहे 'ग्रेटा थन्बर्ग'. आपली ग्रेटा ताई! ही स्वीडनमध्ये रहाणारी मुलगी. तुमच्यासारखीच शाळेत जाणारी. ती लहान असताना ८ व्या वर्षी तिने "क्लायमेट चेंज" म्हणजे "हवामान बदल" हा शब्द पहिल्यांदा ऐकला. तेव्हापासून या महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल चाललेल्या मोठ्यांच्या नुसत्या पोपटपंचीला कंटाळून, १५व्या वर्षी एक दिवस तिने एक पाउल उचललं आणि जगभरात याचे पडसाद उमटले.

कळलं का? नाही? मग असं नको, जरा नीट उलगडून सांगतो. थोडं धीर धरून वाचा काय?

तुम्ही 'क्लायमेट चेंज' शब्द ऐकला आहे का? हा शब्द वापरला जातो जगात बदलणाऱ्या हवामान आणि पर्यावरणाबद्दल. त्याचं काय आहे, माणसाने आजवर निसर्गाकडून बरंच काही घेतलं. त्याने आधुनिक यंत्रांचा शोध लावेपर्यंत माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातं ठीक म्हणावं लागेल. मात्र गेल्या शंभर एक वर्षांत माणसाकडून निसर्ग ओरबाडायचा वेग वाढत गेला. त्याचा परिणाम प्रदूषण वाढण्यात तर झालाच - ज्यामुळे हवेतील कार्बनचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे जगातलं सरासरी तापमान वाढू लागलं. गेल्या दशक-दोन दशकात हे प्रमाण इतकं वाढलं की आपल्या ध्रुवांवरचं बर्फ तसंच हिमनद्यांमधलं बर्फ वितळू लागलं! या बदलाला क्लायमेट चेंज म्हटलं जातं

तर ग्रेटाने हे ८व्या वर्षी ऐकलं. 'या तापमानवाढीमुळे माणसाचेच नव्हे तर सगळ्या जीवसृष्टीचे जगणे मुश्कील होत जाणार आहे. काही दशकांमध्ये मानव जात सहाव्यांदा संपू शकते, इतकंच नाही तर आजही प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांच्या २०० प्रजाती दररोज नामशेष होत आहेत.' असंही तिने वाचलं. मग हा जगण्याचा प्रश्न आहे तर मोठी माणसं काहीतरी करतील अशा विचाराने ती काही वर्ष थांबली. जगभरात हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल असं तिला वाटलं. पण तिने वर्तमानपत्र, सरकारमधील नेत्यांची भाषणं वगैरे वाचायला सुरुवात केली तर तिला धक्का बसला की इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताहेत सगळे, पण प्रत्यक्षात कुणीच काही मोठी कृती करत नाहीये.

शेवटी एके दिवशी तिने ठरवलं आणि आपली शाळा बुडवून ती थेट स्वीडिश संसदेपुढे जाऊन बसली. देशातच नव्हे तर जगात "पर्यावरणीय आणीबाणी" अर्थात क्लायमेट इमर्जन्सी जाहीर करावी अशी तिची मागणी होती. ती म्हणाली, "जर आताच्या पिढीने पुरेशा प्रमाणात योग्य कृती न केल्याने माणूस संपणारच असेल तर मला तुम्ही शिक्षणच का देता आहात? माणूसच टिकणार नसेल तर शिकून उपयोग काय?" तिच्या मते या प्रश्नावर उपाय शोधायला नकोय, माणसाला उपाय माहित आहेत फक्त गरज आहे अतिशय वेगात सगळ्यांनी मिळून ते उपाय योजण्याची. त्वरीत आणि सर्वात जास्त प्राथमिकतेने! मोठ्यांनी बाकी सगळे मुद्दे, वाद बाजूला ठेवावेत आणि आमच्या भविष्याकडे - या पर्यावरणाकडे लक्ष द्यावे.

काही दिवसातच तिची ही मागणी जगभरात पोचली. देशोदेशींच्या मुलांनी, मोठ्यांनी, शिक्षकांनी नि शास्त्रज्ञांनीही तिला पाठिंबा दिला. ब्रिटनसारख्या देशाने अशी इमर्जन्सी घोषितही केली. गेले वर्षभर दर शुक्रवारी जगभरातील लोक या मागणीसाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. या गोष्टीला एक वर्ष नुकतंच झालं. त्या निमित्ताने २० सप्टेंबर या तारखेला एकाच वेळी हे आंदोलन जगात व्हावं असं जगभरातील लोकांना ग्रेटाने आवाहन केले आहे. त्याचबरोबर २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर हा हवामान आठवडा म्हणून जगभर पाळला जाणार आहे. तुम्ही त्याला प्रतिसाद देणार ना? येत्या २० सप्टेंबरला जगभरातून ५० लाख मुलं रस्त्यावर येतील असा अंदाज आहे

पुण्यातल्या 'अक्षरनंदन' या शाळेने या चळवळीला पाठिंबा दिला आहे. या निमित्ताने, या आठवड्यात ग्रेटाचा "टेड टॉक" शाळेतील मुलं एकत्र येऊन ऐकणार आहेत, त्यावर वर्गावर्गात चर्चा होईल. २० सप्टेंबर रोजी, शाळेतील काही विद्यार्थी शाळेच्याच वेळात आजूबाजूच्या परिसरात एक जागृती फेरीही काढणार आहेत. पहिली ते दहावीची मुलं पर्यावरणासंबंधी चित्र काढून या चळवळीला आपला पाठिंबा दर्शवणार आहेत.

भारतही याच ग्रहावर असल्याने, इतर सर्व देशांप्रमाणे या प्रश्नाचा मोठा परिणाम आपल्यावरही आहे. मग तुम्ही मुलं काय करू शकता? खरंतर आता तुम्ही मुलंच हे करू शकता असं मला वाटतं:

१. तुमच्या कुटुंबात, कॉलनीत, शाळेत तुमच्या पालकांना, शिक्षकांना, शेजाऱ्यांना, नातेवाइकांना भेटून तुम्ही विचारू शकता की "आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला सुदृढ आणि आनंदी जीवन जगता यावं यासाठी तुम्ही ताबडतोब प्रयत्न करणं गरजेचे आहे. तुम्ही काही करताना दिसत नाही. वेळ निसटत चालली आहे तर तुम्ही आमच्यासाठी काय करणार?" त्यांना ग्रेटाची गोष्टही सांगा.

अक्षरनंदन शाळेतील तुमच्या मित्र मैत्रीणींप्रमाणे, तुम्हालाही काही  वाटत असेल तर तुमच्या शाळेतील शिक्षकांशी जरूर बोलून बघा. या नेक कामात तुमचे शिक्षक, तुमच्या शाळा आनंदाने सहभागी होऊ देतील असा आम्हाला विश्वास वाटतो. अक्षरनंदन शाळेव्यतिरिक्त इतर शाळांतही काही उपक्रम होणार असतील तर आम्हाला जरूर कळवा.

२. २० तारखेला शक्य असेल त्यांनी तेलावर चालणारं वाहन (कार, स्कूटर वगैरे) न वापरता सायकल वापरा किंवा पायी शाळेत जा. आपल्या पालकांना, शिक्षकांनाही शक्य असेल तर आपल्या ऑफिसात चालत किंवा सायकलवरून जाण्याचे आवाहन करा.

३. सर्वात मुख्य म्हणजे स्थानिक पर्यावरणाच्या प्रश्नांकडे आपल्या पालकांचे, शिक्षकांचे, शेजाऱ्यांचे लक्ष वेधा. तुमच्या परिसरात एखादं झाड तोडलं जात असेल, नद्यांमध्ये प्रदूषण केलं जात असेल तर आपल्या पालकांना त्यावर कृती करण्याचा आग्रह धरा.

आजवर माणसाने जे केलं ते आता पुन्हा ठीक करणं लगेच शक्य नाही. मात्र अजून वेळ गेली नसली तरी फार वेळ हातात नाही हे मोठ्यांना समजवा.

लहान दोस्तांनो, मला खात्री आहे की तुम्ही हे करू शकाल. ग्रेटाने सुरुवात केली आहेच. तुम्ही मुलंमुली मोठ्यांना खऱ्या अर्थाने शहाणपण शिकवाल अशी मला खात्री आहे. एवढं कराल ना तुमच्या, माझ्या - आपल्या भविष्यासाठी?

२० तारखेला (आणि तेव्हापासून सतत) मोठ्यांना या प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी ऑल द बेस्ट!

तुमचा, 
ऋषिकेश दादा, मॉनिटर, अटकमटक.कॉम

-------------------

अधिक माहितीसाठी:

१. ग्रेटाला काय म्हणायचं आहे ते सांगणारा हा तिचा टेड टॉक. तुम्हीही ऐका आणि पालकांनाही ऐकवा:

२. या विषयावर श्री.र्मराज पाटील यांची एक सुंदर मुलाखत 'ऑल इंडिया रेडिओ'वर 'परिक्रमा' या कार्यक्रमात 'गौरी लागू' यांनी घेतली. ती सोबत देत आहोत, ही मुलाखत तुमच्या पालकांना नक्की ऐकवा:

 

श्रेय अव्हेर:
सदर ऑल इंडिया रेडीयोवर प्रसारीत झालेल्या मुलाखतीचे रेकॉर्डिंग अटकमटकवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री.र्मराज पाटील यांचे मनापासून आभार. मुलाखतीचे सर्व प्रताधिकार (कॉपीराईट) धर्मराज पाटील यांच्याकडे सुरक्षित आहेत.
सदर मुलाखतीचं रेकॉर्डिंग मिळवून दिल्याबद्दल तसेच अक्षरनंदन शाळेत हा दिवस कसा असेल याची कल्पना आपल्याला दिल्याबद्दल आभा भागवत यांचेही मन:पुर्वक आभार!

इतर सर्व चित्रं आंतरजालावरून साभार. केवळ त्या चित्रांना क्रिएटिव्ह कॉमन्स हा प्रताधिकार लागू