हावरट बगळा (बडबडगीत)

कवी - धनंजय वैद्य

इंदूरपासून थोडेच दूर
गेल्यास लागते सारंगपूर
तिकडून पुढे बडागाव
गावकुशीत आहे तलाव

अध्येमध्ये कमळे लाल
पसरट पाने खालोखाल
पाण्यात होते मासे खूप
किनाऱ्याशी बगळा चूप

बगळा दुबळा रडवेला
बघून खेकडा वर आला
"बग्गळोबा का रडता?
मासे का नै पक्कडता?"

बगळा म्हणे "उपयोग काय?
पोटावरती पडतोय पाय
गावामधले मच्छीमार
जाळे विणतायत मोठे फार

मासा एकही उरणार नाय
सांगा मग मी करणार काय?
मासे होते ऐकत सगळे
न राहावून म्हणाले "बगळे--

"-शेट, खरेच सांगताय काय?
तुमचे ठीकाय, काढाल पाय!
होईल थोडा वांधा तुमचा
वंश मात्र संपेल आमचा!"

बगळा म्हणे "एक जमेल
बघा न पटेल किंवा पटेल"
मासे समोर धरून रांगा
म्हणू लागले "सांगा, सांगा!"

बगळा म्हणे "ऐका राव
पल्याड याहून मोठा तलाव
माझ्यासोबत तिकडे याल
मच्छीमारांना तुरी द्याल!

मासे म्हणाले "कस्से येऊ?
कुठले पंख चिकटून लावू?"
बगळा म्हणे "सांगतो, सांगतो
चोचीत एकेक धरून नेतो"

एकेक मासा चोचीत चढे
घाईघाईने पुढे-पुढे
सांजसकाळी एकेक करून
बगळा नेई चोचीत धरून

खाली यायचा थोडेच उडून
माशाला टाकायचा खाऊन
साफ करायचा आरामात
काटे काढून मांस पोटात

मऊमऊ मासे खाऊन
बगळा गेला कंटाळून
वेगळी काही चव हवी
कडक मस्त आणि नवी

तेवढ्यात दिसला वाकडातिकडा
पोहोणारा आपला खेकडा
खेकड्याला तो म्हणता झाला
"यायचे का आज तुम्म्हाला?"

खेकड्याने मग विचार केला
का ना जावे सहलीला?
पण म्हटले "बगळेशेट
टोचऱ्या चोचीत मी नै येत!"

"ठीकाय माझी पाठेय मऊ
तिच्यावर बसवून तुम्हाला नेऊ"
बगळोबाच्या मानेवर चढून
बसला खेकडा सरसावून

उडता उडता चहूकडे
त्याची तिखट नजर पडे
काट्यांचा ढीग, नाही तळे
काय झाले ते त्याला कळे

बगळ्याचा हा उमजून कावा
कचकन् मानेचा घेतला चावा
बगळा मरून खाली पडला
चतुर खेकडा थोडक्यात वाचला

तुरूतुरू येऊन परत
माशांना दिली हकीकत
मेला हावरट बगळा दुष्ट
आणि संपली आपली गोष्ट

 

चित्र:  वरील चित्र घडवण्यासाठी 'क्रिएटीव्ह कॉमन्स' प्रताधिकार असणारी लहान चित्रे वापरली आहेत.