हिरवी शिक्षा (गोष्ट)

 

हिरवी शिक्षा
लेखनः गुलाब बिसेन, कोल्हापूर
चित्रेः प्रीता

 

 एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला होता. वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळ सत्रात भरत होत्या. त्या दिवशी गौतम सर परिपाठ संपवून वर्गात गेले. सरांनी वर्गात प्रवेश करताच वर्गाचा वर्गनायक मोहन, सरांकडे तक्रारीचा पाढा वाचत, वही घेऊन आला. वहीमध्ये त्याने वर्गातील काही मुलांची नावे लिहून आणली होती. टेबलावर वही ठेवत तो सरांना म्हणाला, "सर, या मुलांनी वर्गात चिंचा खाल्ल्या बघा. त्यांना चांगला मार द्या." गौतमसर वही हातात घेत मोहनला जागेवर बसायला सांगून म्हणाले, "वर्गात चिंचा खाणार्‍या मुलांना शिक्षा होणारच. त्यांनी शाळेचा नियम मोडलाय."


गौतम सर वहीतील एकएक नाव वाचू लागले. गौतम सर नाव घेतील तशी मुलं उभी राहू लागली. बाहेरचा खाऊ शाळेत खाऊ नये,हा शाळेचा नियम मोडल्याने उभे असणार्‍या मुलांना सर काय शिक्षा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नावे वाचून झाल्यावर बसलेल्या मुलांना उद्देशून सर म्हणाले, "यांनी शाळेचा नियम मोडल्यामुळे हे शिक्षेस पात्र आहेत. त्यांना काय शिक्षा करायला पाहिजे?"
"सर, त्यांना चोपा."
"सर,त्यांना चांगला मार द्या. परत वर्गात चिंचा खाणार नाहीत."

"सर, यांच्या आई बाबांना बोलवून, त्यांच्या समोर चांगलं बडवा." मुले ओरडू लागली.

मुलांच्या या दंग्याने चिंचा खाल्लेली मुले भ्याली. शुभमने तर रडायलाच सुरुवात केली. "सर, मी नाही खाल्ल्या चिंचा. मला प्रकाशने दिल्या बघा." त्याच्या रडक्या आवाजाचा सुर लक्षात घेत गौतम सर म्हणाले, "शांत बसा सगळ्यांनी! तुम्हा कुणालाही मार मिळणार नाही." असे म्हणताच मुलांचा जिवात जीव आला. "आता शिक्षा ऐका." सर्व मुले कान टवकारून ऐकू लागली, "तुम्ही घरात, शेतात आणि शाळेतही चिंचा, बोरे, आंबे, जांभळं खाताय. फळे खाऊन झाल्यावर त्यांच्या बिया इतरत्र फेकून देताय. येत्या उन्हाळी सुट्टीत तुम्ही मुलांनी अशा खाल्लेल्या फळांच्या, प्रत्येकी शंभर बिया गोळा करून जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर शाळेत आणायच्या." सरांनी सुनावलेली शिक्षा ऐकून सर्व मुले खूश झाली. मुलांना शिक्षेचा जणू आनंदच झाला होता.

सरांनी मुलांना दिलेली आगळीवेगळी शिक्षा ऐकून वर्गातील इतर मुले सरांना म्हणू लागली, "सर, आम्ही करतो की हो बिया गोळा. आम्हालापण द्या की शिक्षा." मुलांच्या आग्रहाखातर सरांनी हसत हसत सर्वच मुलांना बिया गोळा करायची शिक्षा दिली. त्या दिवसापासून सर्व मुलांनी खाईल त्या फळाची बी गोळा करून ठेवली. शेतात, रस्त्यात येता जाता, मिळेल त्या झाडाचं बी मुले गोळा करू लागली. संपूर्ण उन्हाळी सुट्टीत, मुलांचा गावभर चाललेला बिया गोळा करायचा कार्यक्रम बघून पालकांनाही नवल वाटले. मग त्यांनीही त्यात हातभार लावला. आंबा, जांभूळ, फणस, पळस, करंजी, बेहडा, चिंच अशा गाव शिवारात मिळणार्‍या फळांच्या बिया गोळा करण्यात मुलांची संपूर्ण उन्हाळी सुट्टी कशी संपून गेली हे कुणालाच कळले नाही.


जून महिना लागताच मोकळ्या आभाळात ढगांचे थोडे थोडे पुंजके दिसायला सुरुवात झाली. त्यासोबतच शेतशिवार जागे होवू लागले. शेतीच्या मशागतीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली. मुलांनाही शाळेचे वेध लागले. सोळा जूनला शाळेच्या घंटेचे ठोके पडताच शाळेत मुलांचा किलबिलाट सुरू झाला. सर्व मुले गौतम सरांची वाट बघत होते. सर शाळेत येताच मुलांनी त्यांच्या सभोवती गलका केला. प्रत्येकाच्या हातात सुट्टीत गोळा केलेल्या बियांनी भरलेल्या पिशव्या लोंबकळत होत्या. सरांनी मोठ्या मुलांना गाडीतील दुकानातून आणलेले रिकामे पुठ्ठ्याचे खोके बाहेर काढायला सांगितले. त्यावर त्यांनी आंबा, जांभूळ, चिंच अशा मुलांनी गोळा केलेल्या बियांच्या झाडांची नावे लिहिली.

मुलांनी आणलेल्या बियांचे वर्गीकरण करून खोक्यात ठेवण्यात आल्या. दुपारी शाळेशेजारच्या शेतात सरांच्या सूचनेनुसार मुलांनी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये माती आणि बिया भरून बीजारोपण केले. बीजारोपण केलेल्या पिशव्या शाळेच्या बागेत ओळीने ठेवण्यात आल्या. आता सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या. सर्व मुले मोठ्या पावसाची आतुरतेने वाट बघू लागले. दोन तीन दिवसातच पावसाला सुरुवात झाली.पावसाच्या पाण्याचा स्पर्श होताच मातीच्या कुशीत झोपी गेलेल्या बिया तरारून जाग्या झाल्या. पंधरा दिवसात एकएक करत सर्व बिया अंकुरीत होवून मातीच्या बाहेर डोकावून बघू लागल्या. बियांपासून जन्मलेले हिरवे मित्र बघून मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी सुट्टीत उन्हातान्हात केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे मुलांना वाटले. शाळेतील प्रत्येक मूल हा सुखद सोहळा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होता. गौतम सरांनी शाळेत चिंचा खाल्लेल्या मुलांना केलेली हि "हिरवी शिक्षा" सर्वांना वेगळा आनंद देऊन गेली.