मी वाट पाहीन......(कथा)

मी वाट पाहीन......

लेखन: फारूक एस. काझी
चित्रे: गीतांजली भवाळकर

 

“हॅलो, जनरल सिद्धार्थ. हेड ऑफिसमधून बोलतोय. तुमची सुट्टी संपायला अजून अवकाश आहे. परंतु तुम्हाला तत्काळ एका कामगिरीवर निघायचं आहे. हिमाचल प्रदेश आणि काश्मीरच्या सीमेवर नव्याने काही चौक्या उभारायच्या आहेत. १९७१ च्या युद्धानंतर तिथं सुरक्षा कडक करण्याचे आदेश आहेत.”

“मला काय करावं लागेल?” सिद्धार्थ यांनी तात्काळ सैनिकी शिस्तीत आपल्यासाठी काय ऑर्डर आहे हे विचारलं.

“परवा तुम्हाला एक पत्र मिळेल. त्यात सर्व नोंद केलेली आहे. तसेच तुमच्यासाठी विशेष नियुक्ती पत्रही आहे.”

“ओके सर !” सावधान स्थितीत त्यांनी ऑर्डर स्वीकारली.

रिसिव्हर खाली ठेऊन त्यांनी एक सुस्कारा सोडला.

“आणखी युद्ध !”

          १९६५ आणि १९७१ च्या युद्धातील हानी डोळ्यांनी पाहिली होती. त्या बंदुका, रणगाडे, सैनिकांचं रक्त या सगळ्या गोष्टी खूप जवळून अनुभवल्या होत्या. त्यामुळे मन आता युद्धाला तयार नव्हतं. परंतु देशाची सुरक्षा गरजेची असते. त्यासाठी तरी आपणाला लढावंच लागतं. निराश आणि उदासभरल्या डोळ्यांनी त्यांनी खिडकीतून पश्चिमेला पाहिलं. दिवस मावळायला आला होता आणि पश्चिमा लालसर-सोनेरी रंगात न्हाली होती. त्यांना क्षणभर रक्तच भासलं ते. त्यांनी डोळे मिटून घेतले. 

..........

पत्र हाती पडताच सिद्धार्थ यांनी सगळ्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या. लगेच निघणं गरजेचं होतं.

       हिमाचल प्रदेश आणि काश्मीर. निसर्गाने मुक्तहस्ताने जिथं सौंदर्य विखरून ठेवलं होतं. पाहणाऱ्याने पाहतच रहावं. डोळ्यात काय आणि किती साठवावं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. ७१ चं युद्ध संपूनही चार वर्षं होत आली. युद्धाचा धोका जरी टळला तरीही संपला नव्हता. 

     सिद्धार्थ आपल्या कामगिरीवर निघाले. हिमालयाच्या रांगा डोळे दिपवत होत्या. शुभ्र चांदीचा चुरा जणू कुणी शिंपडलाय असं मनोहारी दृश्य. त्या चंदेरी बर्फावर सूर्यकिरणे सांडली आणि सगळं कसं लख्खं चकाकून गेलं. स्वर्ग कसा असतो याविषयी त्यांनी जे ऐकलं होतं, वाचलं होतं...अगदी तसंच होतं हे सर्व. स्वर्गच !!

       काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या सीमाभागात काही ठिकाणी नव्याने चौक्या उभारायच्या होत्या. स्थानिक जाणकार सोबत होते. संरक्षक दलातील अनुभवी लोक सोबत होते. नकाशावर काही चौक्या निश्चित झाल्या तरी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय हे काम तडीस जाणार नव्हतं. कारण हा भागच मुळात डोंगरी, दाट जंगलाचा होता. सिद्धार्थ यांनी काही लोक सोबत घेऊन पहिल्या टप्प्यातील चौक्यांच्या जागा फायनल करायला सुरवात केली.

  दोन तीन दिवस भटकंती करत अखेर ते एका उंच टेकडीवर आले. आसपास जंगलही भरपूर. संपूर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात येत होता. सिद्धार्थ यांनी ही जागा फायनल केली. सोबतचे बरेच सदस्य थकून गेले होते. त्यांनी तिथंच एका चिनार वृक्षाखाली बुंध्याला टेकून बैठक मारली. सिद्धार्थ यांनी आसपासचा परिसर पाहावा असं ठरवून ते खाली उतरले.

        झाडांच्या फांद्यांनी आकाशाच्या देहावर जणू नक्षी काढली होती. गारवा आणि उन यांचा अद्भुत मिलाप ते अनुभवत होते. एक प्रसन्न भाव होता चेहऱ्यावर. शांतता हेच विश्वाच्या आनंदाचं खरं रहस्य आहे. प्रेम आणि शांतता ह्या दोनच गोष्टी विश्वाला सुख आणि समाधान देऊ शकतात. हा विचार करता करता त्यांची नजर समोर गेली. टेकडीपासून काही अंतरावर काही भग्न घरं त्यांना दिसली. ‘इथं घरी कशी?” त्यांच्या मनात प्रश्न चमकून गेला. कारण एवढ्या दुर्गम जागी घरं कुठून आली? ती ही अशी उद्ध्वस्त? काय घडलं होतं?

     छोट्या छोट्या घरांच्या त्या इवल्याशा गावात फिरत फिरत ते गावाबाहेर आले. गाव छोटा पण, पूर्ण बेचिराख झालेला होता. “बॉंब हल्ल्यात तर हे गाव नष्ट झालं नसेल?” “की दरोडेखोर टोळ्यांनी यांना हुसकावून गाव नष्ट केला? अनेक प्रश्न होते डोक्यात.

       ते चालत चालत गावाबाहेर आले. उद्ध्वस्त गाव पाहून मन उदास झालेलं होतं. पाय जड झालेले. असं सर्व संपून जाणं वाईटच. वेदना देणारं.

चालता चालता ते गावाबाहेर आले. समोर झाडांच्या दाटीत एक छोटी कौलारू इमारत दिसत होती. कचेरी असावी. सिद्धार्थ समोर गेले. दरवाजा बंद होता. काहीशी पडझड झालेली. त्यांनी दरवाजा हळूच ढकलला. करकरत दरवाजा जागचा थोडा हलला. आणखी थोडं बळ लावताच दरवाजा उघडला. माती पडली. 

      आत डोकावून पाहिलं. काहीसं मोडलेलं फर्निचर , खूप जुनी भिजून लगदा झालेली कागदं. आत जाऊन पाहिलं तर ते एक खूप जुनं पोस्ट ऑफिस होतं. वरच्या छताची काही कौलं निघाली होती. त्यामुळे बरंच साहित्य खराब झालं होतं. तिथंच एका खिडकीत एक लोखंडी पेटी ठेवलेली होती. काय असेल त्यात ? असा विचार करून सिद्धार्थ यांनी ती उघडली. बाहेरची कडी गंजून गेलेली. ती मोडून पडली. पेटी बरीच चांगल्या स्थितीत होती. पेटी उघडताच त्यांचं लक्ष आत असलेल्या एका पत्राकडे गेलं. लिफाफा होता.

      त्यांनी तो लिफाफा उचलून घेतला. गंज चढून तो लिफाफा खराब झाला होता. पत्ता लिहिलेली अक्षरंही पुसट झाली होती. लिफाफा एका कोपऱ्यात गंज लागून फाटला होता. तारीख दिसत नव्हती. हे पत्र इथून जाण्याआधीच हे गाव आणि हे पोस्ट संपलं होतं तर ! त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि उद्विग्न होऊन मान हलवली. ते पत्र पाहत असतानाच त्यांना एका सहकाऱ्याची हाक ऐकू आली. त्यांनी पत्र आपल्या कोटाच्या खिशात ठेवून दिले. आणि तडक बाहेर पडले.

सहकाऱ्याकडून समजलं की १९६१ च्या युद्धात हे गाव उद्ध्वस्त झालं. गावातील लोकांना हलवलं गेलं होतं. जीवित हानी झाली होती. पण नेमकी किती हे सांगता येत नव्हते. पोस्ट सुरु होतं. पण तेही नंतर बंद केलं गेलं.

रात्री जेवण केल्यावर सिद्धार्थ आपल्या खोलीत आले. थंडी वाढली होती. पत्र हातात घेऊन त्यांनी एकदा त्याचा वास घेतला. लोखंडी गंजाचा वास.

पत्र अलगद उघडून त्यांनी वाचायला सुरवात केली.

.....................................................................

जनाब पंतप्रधान.

आदाब. 

     मी नूर. चौदा वर्षांची आहे. सातवी शाळा झालीय माझी. मामुंकडे शिकले. आमच्या गावात शाळा नाही म्हणून. .माझ्या घरात आम्ही सहाजण होतो. हो, होतो. कारण आता त्यातलं कुणीच जिवंत नाही. माझे अब्बू मेंढ्या राखत. ते आपल्या मेंढ्या घेऊन दूरदूर जायचे. मगरीबला परत यायचे. माझी अम्मी घरातलं काम करायची. माझी दादी घरात बसून कोंबड्या राखायची. तिला अंधुक दिसायचं. मी आणि माझे दोन लहान भाऊ दिवसभर खेळायचो. घरातली कामं करायचो. काय करणार? शिकायचं तर शाळा तर पाहिजे? तीच नाही. मग घर, मेंढ्या, ही चिनार आणि देवदारची झाडं. हेच सोबती आणि खेळ.

       आम्हाला अब्बांनी खेळण्यातल्या बंदुका आणून दिल्या होत्या. लाकडी. आम्ही त्याने युद्ध युद्ध खेळायचो. आम्हाला जर माहीत असतं की युद्ध म्हणजे काय असतं तर  आम्ही कधीच खेळलो नसतो. कारण युद्ध खूप वाईट असतं, ते तुमचं सगळंच संपवून टाकतं. जसं माझं संपून गेलं. सगळंच्या सगळं.

       आम्ही सकाळी कोवळ्या उन्हात देवदार आणि चिनारच्या झाडांखाली खेळत रहायचो. मज्जा यायची. त्यादिवशीही तसंच झालं.  अब्बू मेंढ्या रानात घेऊन गेले. आम्ही मैदानात खेळत होतो. दादी आणि अम्मी घरात होत्या. आमचं गाव खूप लहान आहे. आम्ही खूप प्रेमाने रहायचो. पण त्यादिवशी सर्व नष्ट झालं. गाव राहिलंच नाही. एक उद्धवस्त खंडहर बनून गेलं. 

        त्यादिवशी आकाश स्वच्छ होतं. त्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होतं. अब्बू मेंढ्या घेऊन गेले. आम्ही खेळत बसलो. अम्मी आणि दादी घरात. आमचा खेळ रंगात आला आणि एकदम आकाशात घरघर ऐकू आली. आणि काय होतंय हे कळण्याआधीच एक बॉंब आमच्या घरावर पडला. अम्मीची आरोळी ऐकू आली फक्त. घर जमीनदोस्त झालं होतं. दादी आणि अम्मी संपून गेल्या होत्या. घरच कबर झालं होतं.

       गावात जिथे तिथे हा:हा:कार मजला होता. लोक धावत होते. ओरडत होते. माझे दोन्ही लहान भाऊ असेच धावत होते. माहित नाही कसा पण अचानक एक बॉंब मैदानात येऊन पडला. मी दूरवर फेकले गेले. माझे दोन्ही भाऊ मात्र मला कुठेच दिसले नाहीत. त्यांच्या कपड्यांच्या चिंध्या तेवढ्या दिसल्या. रक्तानं माखलेल्या.

      गावातील काही लोक गायब झाले. संपून गेले. कुणीही बाकी राहिलं नाही. सगळीकडे काळा धूर पसरला होता. जळालेल्या गोश्तच्या वासाने मळमळून येत होतं. मलाही भडभडून आलं. माझ्या ओकाऱ्या झाल्या. काही सुचत नव्हतं. माझ्या घरातले सगळे लोक मारले गेले होते. माझं घर उध्वस्त झालं होतं. 

        मी बेशुद्ध झाले. जेव्हा जाग आली तेव्हा मी एका कापडी झोपडीत होते. डॉक्टर येऊन मला पाहून गेले. एक बाई माझ्याजवळ बसून माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होत्या. मला बोलताही येत नव्हते. मला माझ्या अब्बुंची काळजी वाटत होती. पण त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी होती. मला काहीच समजत नव्हतं. मी डॉक्टरांना विचारले. पण त्यानाही काही माहित नव्हते. माझी काळजी आणखी वाढतच गेली.

         प्रधानमंत्रीजी,तुम्ही देशाचा कारभार चालवता. मला माझे अब्बू शोधून द्याल का? त्यांच्याशिवाय माझं या जगात दुसरं कुणीच नाही हो ! माझे अब्बूच आता माझी दुनिया आहेत. पण ते कुठं आहेत माहित नाही. हे पत्र मी माझ्या टेंटमध्ये बसून लिहितेय. तुमचा पत्ता मला नर्सने दिला. 

       हे युद्ध संपेल.पण माझे घरचे लोक? ते कधीच परत येणार नाहीत. ही युद्धं का होतात मला खरंच माहित नाही. पण या युद्धाचे काय परिणाम होतात हे मी अनुभवलंय. या युद्धाने माझं घर गिळून टाकलं. माझे घरचे, माझे गावकरी, माझे भाऊ, माझे मित्र सगळ्यांना गिळून टाकलंय. अशी युद्धं का करतात लोक? का आमचं सुकूनवालं जगणं एका क्षणात भस्म केलंत? तुम्ही द्याल का या प्रश्नांची उत्तरं? थांबवाल का अशी युद्धं? युद्धाने कुणाचंच भलं होत नाही. थांबवाल? 

       माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल का? माझ्या अब्बूना जरूर शोधा. मी वाट पाहतेय त्यांची. मी वाट पाहीन तुमच्या पत्राची. उत्तर जरूर पाठवा.

खुदा हाफिज.

तुमची लाडकी,
नूर 

       पत्र मिटून सिद्धार्थ यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. डोळ्यांच्या कडातून पाणी वाहत होतं. वेदनेने ओठ थरथरत होते. त्यांना धाय मोकलून रडायचं होतं. नुरची माफी मागायची होती. युद्धं का होतात ? याचं उत्तर तर त्यांच्याजवळही नव्हतं. खरंतर  त्यांच्या हातात काहीच नव्हतं. 

      कितीतरी वेळ ते असेच खिडकीजवळ उभारून रडत होते. दूरवर अंधारात पाहत होते. पुढे काय झालं असेल तिचं? तिचे अब्बू सापडले असतील का? की तीही अनाथ म्हणून कुठल्या तरी एखाद्या आश्रमात जगत असेल. तिच्या या पत्राच्या उत्तराची वाट पाहत. 

      “आपल्याकडे युद्धविरोधी म्हणून एखादं स्मारक बांधलं गेलं तर हे पत्र तिथं पहिल्यांदा ठेवेन. युद्ध फक्त विद्धवंस करू शकतं. याची खात्री तरी लोकांना पटेल. आपल्याला शांततेसाठी युद्ध करावं लागतं. माणूस म्हणून आपल्या सर्वांसाठी हे लाजिरवाणं आहे.” आवंढा अनावर झाला आणि ते कितीतरी वेळ तसेच रडत उभे राहिले. अंधार अजून गडद झाला. डोळ्यातलं पाणी पांढऱ्या रेषांत बदलून गेलं.

सकाळ झाली. इतर सहकारी आत आले. सिद्धार्थ अजून खिडकीजवळच उभे होते. 
“सर, निघायचं ना ?” एका सहकाऱ्याने प्रश्न केला.

“हम्म्म्म....” सिद्धार्थ यांची तंद्री तुटली. 

“मला एक लिफाफा आणून द्याल का? एक पत्र तात्काळ पंतप्रधानांना पाठवायचं आहे.” असं म्हणत त्यांनी हातातील पत्राची घडी घातली.

सोबत स्वत:चं एक पत्र जोडून तो लिफाफा दिल्लीला रवाना केला.

नूरचं पत्र पोचवण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली होती. पण, त्यांना हे ठाऊक होतं की ते तिच्या अब्बूना कधीच शोधू  शकणार नव्हते. कधीही नाही. आणि नूरलाही.

................................................................................................