जंगल आजी ३: करकोच्याचा पाहुणचार

लेखन: डी.व्ही.कुलकर्णी 
चित्र: प्राची केळकर भिडे

याआधीच्या गोष्टी: ससोबा का आयतोबा | आजीच्या जवळी घड्याळ कसले.

--------------------------------------

गोष्ट तिसरी: करकोच्याचा पाहुणचार

 लेकीच्या घरी जाण्याच्या निमित्ताने आजी जंगलात आली याचा आनंद प्राण्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. हरीण हसू लागलं, तसं जंगलातलं वातावरण बदललं. वेली खूश झाल्या. पक्षी आनंदात बोलू लागले. त्यांच्या किलबिलाटाने बातमी जंगलभर पसरली. सिंहाच्या हुकूमशाहीला सगळे वैतागले होतेच.आजीने आपल्या हुशारीने सिंहाच्या जुलमी राजवटीत जसे हरिणाचे प्राण वाचवले तसेच आजी आपले संरक्षण करील असा प्राण्यांना विश्वास होता. परंतु कोणास ठाऊक उद्या काय घडेल? जंगलचा एक नियम आहे,ज्याने त्याने मेहनत करावी, आणि आपले पोट भरावे. सिंह राजा असला म्हणून काय झाले.नियम सर्वांना सारखा हं! फळ, कंदमूळ वगैरे देऊ, परंतु शिकार तुझ्या पुढ्यात येणार नाही.

आजी आली ही बातमी समजल्यावर जो तो आजीला येऊन भेटू लागला. आजीचे आभारदेखील मानू लागला. करकोचा दांपत्य तर भलतेच खूश होते. “वा छानच! खरं म्हणजे आजी, तुम्ही आमच्याकडे पाहुणचाराला आलं पाहिजे.” सौ. करकोच्याने आमंत्रण दिलं.आजीलादेखील तिचा आग्रह मोडवला नाही.

कोल्ह्याला मात्र या आमंत्रणाने फारसा आनंद झाला नाही. त्याने आजीला बाजूला घेतले आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, “आजी, हे करकोचा जोडपं महालबाड आहे. त्याचं आमंत्रण स्वीकारू नकोस. ती करकोचीण तर महावस्ताद आहे. काही वर्षापूर्वी मलादेखील या दोघांनी जेवायला बोलावलं. चांगली काजू-बदाम घालून खीर केली आणि सुरईत ठेवली. आता सुरईतील खीर मी कशी पिणार? उभयतांनी ती खीर संपवली आणि मी मात्र जिभल्या चाटीत बसलो.”

आजी हसली; म्हणाली, “कोल्होबा, तुम्हाला प्यायची आहे का खीर?”
खिरीचं नाव काढताच कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. “खरं म्हणजे मी आज उपवास करणार होतो. परंतु आजी, तुझा आग्रह आहे तर येतो.”

आजी आणि कोल्हा दोघे करकोच्याकडे गेले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सौ.करकोच्याने सुरईत खीर आणून ठेवली. “घ्या ना.ताज्या दुधाची आहे. चांगले काजू बदाम घातले आहेत.”
“अरे वा!”, असं म्हणत आजीने पिशवीत दोन ‘स्ट्रॉ’ काढले. एक कोल्ह्याला दिला आणि मजेत खिरीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. कोल्ह्याने आजीकडे पाहिलं. अरेच्च्या, अशी गंमत आहे तर! त्यानेदेखील पोकळ नळीच्या साहाय्याने खीर प्यायला सुरुवात केली.



“काय कोल्होबा, मजा आली ना?”, आजीने विचारले.

“हो खूप मजा आली. या छोट्याशा कागदाच्या पोकळ नळीने काम केले. पण या नळीत खीर कशी गं शिरली असेल?” आजी हसली.

“कोल्होबा, छान प्रश्न विचारलास. ही खीर कशी प्यायलो हे खरंतर सोपं आहे, पण तुम्हा प्राण्यांनाही माहिती असावी म्हणून ते सांगण्याआधी मी हवेबद्दल थोडी माहिती सांगते, ती ऐका. आपण ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीच्या सर्व बाजूने हवेचे आवरण आहे. त्यालाच वातावरण असेही म्हणतात. ही हवा म्हणजे अनेक वायूंचे मिश्रण असून ती सजीवांच्या जगण्याला आवश्यक आहे. या हवेत सुमारे ७८% नायट्रोजन, २१% ऑक्सिजन, ०.०४% कार्बन डायऑक्साईड आणि उर्वरित इतर वायू असतात. साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे १००० कि.मी. इतक्या उंची पर्यंत वातावरण असते. जसजसं वर जावं, तसं तशी हवा विरळ होत जाते. म्हणूनच उंच पर्वतावर आपल्याला प्राणवायूची गरज भासते. वातावरणाचे काही थर आहेत. पहिल्या थराला ट्रोपोस्पिअर असे म्हणतात. या थरात जीवसृष्टी आहे. जीवनास आवश्यक असलेला प्राणवायू या थरात आहे. नंतरच्या थराला स्ट्रॅटोस्फिअर असे म्हणतात. या थरात ओझोन हा वायू आहे. ओझोन वायूदेखील जीवसृष्टी च्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. हा वायू सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपले रक्षण करतो. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यास या आवरणाला धोका पोहचू शकतो.”

“तर कोल्होबा, आपल्याभोवती जी हवा आहे तिला वजन आहे. हवेला असलेल्या या वजनामुळेच वातावरण प्रत्येक वस्तूवर आपला भार टाकतं. हा भार समुद्रसपाटीपाशी दर चौरस सेंटिमीटरला १.०३३ किलोग्रॅम इतका असतो. तो भार आपल्याला जाणवत नाही कारण शरीराच्या आतून आणि बाहेरून सारखाच असतो. आपण जेव्हा हा स्ट्रॉ वापरून पेय पितो, तेव्हा आपण पोकळ नलिकेतील (स्ट्रॉमधील) हवा ओढून घेतो. त्यामुळे नालिकेच्या आतला भाग निर्वात होतो म्हणजे तिथे हवाच उरत नाही - तिथला भार नाहीसा होतो. पण बाटलीतील, म्हणजे नळीबाहेरील द्रव पदार्थावर मात्र वातावरणातील हवेचा भर तसाच असतो. हवेच्या या दाबामुळे बाटलीतील द्रव पदार्थ नलिकेत शिरतो. कोल्होबा आपण सुरईतील खीर अशीच प्यायलो बरं!”

कोल्ह्याने छानशी ढेकर दिली. करकोच्याचा निरोप घेऊन आजी तिथून निघाली.

(क्रमश:)

----------------------

लेखक शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असून, आजवर अनेक बालकथांचे लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या या आधुनिक जंगल आजीच्या कथांना कोसामप आणि बालकुमारसाहित्य परिषदेने पुरस्कार दिले होते. या कथासंग्रहाबद्दल पु.ल. देशपांडे यांनीही लेखकाचे कौतुक केले होते. अटक मटक.कॉम'ची घोषणा होताच मोठ्या मनाने आपणहून त्यांच्या कथा साईटवर प्रकाशित करण्याची परवानगी त्यांनी दिली - त्याबद्दल त्यांचे आभार