खळाळता अवखळ झरा (कथा)

खळाळता अवखळ झरा
लेखन: एकनाथ आव्हाड
चित्र: वेदांत शिंदेइयत्ता ८वी, मिलेनियम नॅशनल स्कूल, पुणे

वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर एकदाचा संपला. बाळू, शमीला खूप आनंद झाला. आधीपासूनच अभ्यासाचं  नियोजन करुन अभ्यास केल्यामुळे दोघांनाही पेपर छान गेलेे होते. पण यावेेळी त्यांच्या आनंदाचं कारण जरा वेगळंच होतं. त्यांचं सारं  लक्ष दोन दिवसांपूर्वीच घरी येऊन धडकलेल्या मामाच्या पत्राकडे लागून होतं. शाळेतून घरी येताच दोघांनीही आईकडे एकच लकडा लावला. "आई, मामाला फोन कर ना गं!"  आई म्हणाली,  "अरे हो, आजच तुमची परीक्षा झाली ना? जरा धीर आहे की नाही. का उचललं बाशिंग लावलं कपाळाला." "अगं आई असं नाही म्हणत. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अस्सं म्हणतात." बाळूूूने तत्परतेने दुरूस्ती केली. आई म्हणाली, "दोन्हीचा अर्थ एकच बरं का, बाळकोबा. आणि तुम्हा दोघांनाही तो समजल्याशी कारण. बरं मला आता सांगा, असं अधीर होऊन, घायकुतीला येऊन  कसं चालेल? जरा तरी सबुरी नको का?" शमी लगेच जागेवर गिरकी घेत म्हणाली, "आई, अगं मागच्या वर्षी आम्ही मामाच्या गावी गेलो तेव्हा कित्ती मज्जा आली होती. उन्हाळ्याची सुट्टी कशी पाखरासारखी भूर्रकन उडून गेली ते कळलंसुद्धा नाही." शमीने हाताचे पंख करुन पाखरासारखं घरभर चक्क उडायलाच सुरुवात केली.
बाळू म्हणाला, "आई, अगं मामाच्या गावी झाडांची दाटी, लपाछपी खेळण्याची तिथे गंमतच मोठी"
शमी लगेच म्हणाली,  "आई, मामाचा गाव नदीच्या काठावर, आनंदाचे गाणे तिथे मुलांच्या ओठावर."
आई हसून म्हणाली,  "अरे अरे,आता थांबवा तुमचं हे मामापुराण. कित्ती सांगाल मला.आणि कितिदा सांगाल मला. अनेकदा सांगून झालंय मला हे. आता तेच तेच ऐकून माझेे तर कान किटलेत बुवा. संध्याकाळी तुमचे बाबा आले ना की, त्यांना सांगा हो तुमचं हे मामापुराण. मग ते करतील चटकन तुमच्या मामाला फोन. चला पळा आत, लब्बाडांनो.  तुमच्या बॅगा भरायला करा सुरुवात. आणि हो, मामाच्या मुलांना जी गोष्टींची पुस्तके तुम्ही विकत घेतलीय ना, तुमच्या साठवलेल्या पैशातून, ती आठवणीने बॅगेत भरा, नाहीतर विसराल."
'बॅगा भरा' - आईच्या या आदेशाने बाळू , शमीच्या गालावरची कळी खुलली. खरंतर, बाळू शमीला सुट्टीत गावी बोलवणारं मामाचं पत्र घरी आल्यापासून दोघेही एकदम खूषमखूष होते. कधी एकदाची परीक्षा संपतेय आणि आपण आजोळी जातोय असं त्यांना झालं होतं. मागच्या वर्षी मामा, मामी, मामाची मुलं - तारा नि दशरथ - आणि गावातले सवंगडी - शिरप्या,बकुळा, जना,म्हादू, गेणू - असे कितीतरी जणं मिळून त्यांनी धमाल केली होती. त्या सगळ्यांनीच  बाळू, शमीला झाडावर सरसर चढायला, कमरेला भोपळा बांधून नदीत पोहायला, सूरपारंब्या खेळायला शिकवले होते. रोजचा दिवस नवं काही शिकण्यात, एकदम मज्जेत जायचा. प्रत्येक जण एक अवखळ खळाळता झराच व्हायचा. संध्याकाळी झोपण्यापूर्वी मामा हटकून भुताची गोष्ट सांगायचा. मुलांना भीती वाटली तरी, पांघरूण अंगावर घेऊन, एकमेकांचा हात हातात धरुन, डोळे विस्फारून, कान टवकारून मामाची अख्खी गोष्ट सारे ऐकायचेच. कारण गोष्टीत शेवटी काय घडलं याची उत्कंठा साऱ्यांनाच लागून असायची. बाळू, शमीसुद्धा गावातल्या मुलांना शहरातल्या, शाळेतल्या अनेक गमतीजमती सांगत. चुटके सांगून हसवत. कोडी घालत. बाळू तर स्वतःच्या कविता साभिनय म्हणून दाखवत. शमी कथाकथन करी. भरतनाट्यम नृत्य सादर करुन घरातल्यांच्या टाळ्या मिळवी. एकूणच काय गावच्या मुलांचं आणि बाळू, शमीचं चांगलंच मेतकूट जमलं होतं.सारे एकत्र असले की हास्य, विनोद व्हायचे. आनंदाच्या बागाच जणू फुलायच्या.

         बाळू शमीला बॅगा भरता भरता गावच्या मुलांसोबत  केलेली धमाल, मजा, मस्ती सारी सारी आठवली.गावी प्रचंड उन्हाळा होता पण गावच्या झाडामाडांमुळे, मित्रमंडळींमुळे आणि मामा- मामीच्या प्रेमामुळे तो उन्हाळा त्यांना जाणवलाच नाही. खायची प्यायची तर केवढी चंगळ होती त्यांची. शेवटी एकदाचा बाबांचा मामाला फोन गेला. मामा लागलीच मुंबईला आला आणि बाळू, शमीला घेऊन गावी गेलासुद्धा! गावी गेल्या गेल्या बाळू, शमीला मामाच्या मुलांनी एक आनंदाची बातमी दिली. म्हणाले, 'आपल्या गावात सर्कस आलीय. आपण सगळ्यांनी उद्याच जायचं बरं का सर्कस पाहायला.' मग काय विचारता, एकमेकांना टाळ्या देत जायचा बेत पक्का झाला.         

दुसऱ्या दिवशी दुपारी मामा, मामी, तारा, दशरथ आणि बाळू, शमी सगळेच सर्कस पाहायला गेले. सर्कस पाहून  बाळू, शमी भारावले. सर्कशीतल्या चिमुकल्या विदूषकाने तर विविध करामती आणि कसरती करुन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. का कुणास ठाऊक, त्या विदूषकाला प्रत्यक्ष भेटावं, त्याच्याशी बोलावं असं बाळूला खूप वाटलं. मामाकडे त्याने तसं  बोलूनही दाखवलं. मग काय, सर्कस संपल्यावर मामाने सर्कस मालकाला भेटून बाळूची आणि  विदूषकाची भेट घडवून आणली.

अतिशय कमी उंची लाभलेली असतानाही त्याचं दुःख करीत न बसता इतरांना हसवण्याचं काम करणाऱ्या त्या विदूषकाला प्रत्यक्ष भेटून, त्याच्याशी गप्पा मारुन बाळू, शमीला आनंद तर झालाच. पण घरची गरीबी दूर सारण्यासाठी त्याला लहान वयात हे काम करावं लागतंय हे ऐकून वाईटही वाटलं. त्याच्या वडिलांना दमा आहे. हात पाय त्यांचे चालत नाहीत. त्याची आई दुस-यांच्या शेतावर दिवसभर मजुरीला जाते. शाळांना सुट्ट्या असल्या की तेव्हाच तो सर्कशीत कामाला येतो. वाचनाची तर त्याला फारच आवड, पण गोष्टींची पुस्तकं विकत घ्यायला त्याच्याकडे पैसेच नसत. जे कमवतो ते तो सर्व घरी घरखर्चाला, बाबाच्या अौषधपाण्याला देतो, हे ऐकल्यावर शमीला पटकन काहीतरी आठवलं, ती म्हणाली, "ए विदूषकदादा, तू उद्या आमच्या मामाच्या घरी येशील?" 
विदूषक हसला. म्हणाला, "माझं नाव विदूषक नाही, विरेंद्र आहे. सकाळी आठ ते दहा एवढाच वेळ माझ्यासाठी असतो. नंतर दिवसभर सर्कशीचे खेळ सुरु असतात. पण कशासाठी मी तुमच्या घरी येऊ?"
"तू ये तर खरं.मग सांगते सारं. अरे, आपण आणखी गप्पा मारु.", शमी आर्जवाने म्हणाली.
"बरं बरं! येईन मी उद्या सकाळी आठ वाजता. मला पत्ता देता लिहून? मला आता निघायला हवं आत." दशरथने आपल्या घरचा पत्ता लिहून दिला. विरेंद्र निरोप घेऊन आत निघून गेला. मग मामा मामी मुलांना घेऊन घराकडे आले.        

घरी आल्यावर बाळूने लगेच शमीला विचारले, कशाला बोलवलंस गं शमू तू विरेंद्रला घरी? आपला विचार गुलदस्त्यात ठेवतच शमी म्हणाली, "कळेल, कळेल! उद्याच सारं कळेल. तुला आणि घरातल्यांनाही" बाळू  हसला. बाळूच्या डोक्यात तर दिवसभर सर्कस, विदूषक आणि त्या विदूषकाचं बोलणंच होतं. संध्याकाळी  बाळूने त्याची कवितेची वही काढली. आणि मनातले विचार भरभर कागदावर तो उतरवत गेला. त्याचीच विदूषक ही कविता झाली.

 

सर्कशीतला विदूषक, गंमतजंमत करी
तालावरी त्याच्या, दुनिया हसे सारी

विचित्र पोषाखात , तो दिसे मजेदार
लाल नाक लावून, होई सायकलस्वार

मस्करी करुन कधी, गमतीचे बोले
हसवूनी आमचे ,डोळे करी ओले

सर्कशीचा खरा प्राण,तोच आहे खरा
त्याच्याशिवाय खेळ, होत नाही पुरा.

संध्याकाळची जेवणं झाल्यावर बाळूने ही कविता सर्वांना वाचून दाखवली. सर्वांनाच ती खूप आवडली.मग बाळूलाही काहीतरी सुचले. त्याने ती कविता सुंदर हस्ताक्षरात एका कागदावर लिहून काढली.        

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोब्बर आठच्या ठोक्याला विरेंद्र दारात हजर. सर्वांनीच त्याचे उत्साहाने स्वागत केले. विदूषकाचा पोषाख अंगावर नसल्याने तो आज जरा वेगळाच दिसत होता. चहा, नाष्टा, गप्पा झाल्यावर शमीने कागदात बांधलेला खाऊ दिला त्याला. घरातल्यांनी आणि विरेंद्रनेही कुतूहलाने त्या कागदात गुंडाळलेल्या चौकोनी खाऊकडं पाहिलं.मग शमीच म्हणाली,  "उघड ना मी दिलेला खाऊ. बघ आवडतो का तुला?"  विरेंद्रने कागदातून खाऊ बाहेर काढला. तर काय आश्चर्य! त्यात चक्क बाबा भांड यांची 'धर्मा', ना. धो ताम्हणकरांची 'गोट्या' आणि साने गुरुजींचे 'श्यामची आई' ही तीन पुस्तके होती. पुस्तकांचा हा आगळावेगळा खाऊ विरेंद्रला खूप आवडला ."पुस्तकं वाचून कळव हा मला ,कशी वाटलीत ही पुस्तकं तुला ते?  कळवशील ना? मी तुला जाताना आमचा मुंबईतला घरचा पत्ता देईल." शमी म्हणाली. आणि मग बाळूने काल स्वतःच्या  हस्ताक्षरात लिहिलेली विदूषक ही कविता त्याला भेट केली. दशरथ आणि ताराने तर आमराईतले आंबे एका कापडी पिशवीत भरून त्याला दिले आणि मामीने लाडवांचा डबा.

मामा मामीने तोंड भरुन त्याच्या कामाचं कौतुक केलं. हे सारं पाहून विरेंद्रचे डोळे भरुन आले. आवंढा गिळून तो म्हणाला, "आता या सुट्टीत सर्कससोबतच असेन मी. घरची आठवण आली तरी घरी जायला मिळत नाही. दौरे असतात सर्कशीचे. शाळा सुरु झाल्यावरच आता घरी जाईन मी. पण आज तुम्हा सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. माझ्या घरचीच जीवाभावाची माणसं भेटल्यासारखी वाटली मला. खरंच,काल सर्कशीतली तुम्ही माझी कला पाहिली आणि आज चक्क तुम्ही मला तुमच्यातलाच समजून घरी बोलवलंत. एवढं प्रेम दिलंत. कलाकाराला आणखी काय हवं असतं. आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील माझ्या." सर्वांचा निरोप घेऊन विरेंद्र गेला खरा पण सर्वांच्याच मनात राहिला. खळाळता अवखळ झराच जणू तो वाटला. बाळू, शमीला या सुट्टीत विरेंद्रच्या रुपाने आज नवीन मित्र भेटला. उंचीने लहान पण कलेने महान असा!