आळशी गुरुवार (कथा)

आळशी गुरुवार
कथा व चित्रे: स्वरा चांदोरकर
इयत्ता २री, एमईएस. बालशिक्षण इंग्लिश मिडियम स्कूल, पुणे
टीप: स्वराला आता दुसरीत असल्याने अजून पुरेसे मराठी लेखन/टंकन येत नाही, म्हणून तिने तिच्या आईकडून ही गोष्ट लिहून घेतली आहे. हा अनुभव इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करावासा वाटण्यातून जन्म झालेल्या या गोष्टीचे शब्दांकन करून 'अटकमटक'ला आवर्जून पाठवल्याबद्दल तिच्या आईचेही आभार!

------------------------------------------------------------------

व्हॅनमध्ये बसले तेव्हा अचानक लक्षात आलं, आज गुरुवार! आईची सुट्टी! मज्जा!
अरे हो! पण आज आईच्या सूचनांचाही वार. दारातून आत आल्यावर लगेच, “स्वरा! शूज काढ, कपाटात ठेव”... “एवढा वेळ झाला अजून गणवेश काढला नाहीस"... "हात धुतलेस का?”
बापरे..!
रोज आजी-आजोबांशी गोड बोलून हवं तसं वागता येतं, पण गुरुवार म्हटलं की शिस्तीचा वार. तेवढ्यात व्हॅनकाकांचा आवाज आला, “स्वरा उतरायचं नाही का?घर आलं की!”

‘आता मी मोठी झाले आहे, मला खाली घ्यायला यायचं नाही’ अशी आजीला मी सूचना देऊन ठेवली आहे. त्यामुळे मला खाली कोणी घ्यायला आलं नव्हतं. नेहमीप्रमाणे लिफ्टचं बटन दाबलं, दरवाजा बंद झाल्यावर आरशात स्वत:चा चेहेरा बघितला. शाळेत आज खूप मस्ती केल्यामुळे केस खूप विस्कटले होते, एक बो घट्ट तर दुसरा अगदीच लुळा झाला होता. वर्गात हातावर कोणीतरी स्केचपेनचा ओरखडा काढला होता. एकूण काय तर अवतार झाला होता. आरशात निरीक्षण सुरू असतानाच दरवाजा उघडला आणि आपलं घर आल्याचं लक्षात आलं.

खांद्यावर दप्तराचं ओझं, हातात डब्याची पिशवी, गळ्यात लोंबकळणारं आयकार्ड, पिशवीतून अर्धवट बाहेर आलेली पाण्याची बाटली असं सगळं सांभाळत घरात शिरले. आईची स्वयंपाकघरात काहीतरी गडबड सुरू होती. माझी चाहूल लागताच आईचा आतून आवाज आला, “आली का गं माझी मनीमाऊ?’’

मी दारातूनच खूश होऊन म्हणाले, “ये!! आज तुला सुुट्टी! आपण आज काही तरी वेगळं करूयात.’’
आतून "हम्म..’’ एवढंच उत्तर आलं.
शूज काढले आणि तशीच आईकडे धावले. ती जेवणाची तयारी करीत होती. मी स्वयंपाकघरातच घुटमळत होते. “अगं आई, घर शांत का वाटतंय? आणि आजी-आजोबा कुठं गेलेत?”

“अगं, ते बाहेर गेलेत. चल, तू बोलत बसू नकोस. पटकन पानावरच बस. तुझ्यासाठी मी चीज पराठा केलाय.”

मी एकदमच खूश झाले. पटकन जेवणाच्या टेबलकडे वळले आणि लक्षात आलं, अरेच्च्या! आईने अजून मला नेहमीची एकही सूचना दिली नाहीये. अजून मी ड्रेस काढला नव्हता. गळ्यातलं आयकार्डही तसंच होतं. सॉक्सही पायातच होते. आणि तरी टेबलवर बस म्हणाली. आज आईचं काहीतरी बिनसलंय का, असा विचार मनात आला.

आईने दोघींचं ताट वाढलं आणि म्हणाली, “बस. मला तुला एक गंमत सांगायची आहे. तू मगाशी म्हणालीस ना, की आज आपण काही तरी वेगळं करूयात. त्याचा विचार मी सकाळीच करून ठेवलाय. आज आपण काहीच करणार नाही, हेच आपण करणार आहोत.”

मला काहीच कळलं नाही. चेहऱ्यावर प्रश्नार्थकभाव आणून मी म्हणाले, “अगं, काहीच करायचं नाही हेच करायचं म्हणजे गं काय?”

ती हसली, “अगं, आज मी सगळ्या सूचनांना सुट्टी द्यायचं ठरवलंय. आज आपण ‘लेझी डे’ साजरा करणार आहोत.”

हे ऐकल्यावर मी अजूनच गडबडले, “म्हणजे काय करायचंय आपण, मला अजून नाही कळलं?”

ती म्हणाली, “आज तुला हवं तसं वागायला मी परवानगी दिली आहे. कोणत्याही सूचना नाहीत. तुला जर वाटलं शाळेचे कपडे काढून त्यांची घडी करायची तर कर, जेवण झाल्यावर तोंड आणि हात धुवावेसे वाटले तरच कर. तुला जे वाटते ते कर!”

मी स्वप्नात तर नाही ना असं वाटलं आणि एकदम खूश झाले. त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही जेवणं झाल्यावर ताट टेबलवर तसंच ठेवलं होतं. आईनं स्वतःचं ताटही उचललं नाही, हे जरा मला विचित्र वाटलं पण मजाही वाटली.

हात चिकट झाला होता म्हणून धुण्याचे कष्ट घेतले, पण तोंड धुवायचा आळशीपणा केलाच. सॉक्स अजून हॉलमध्येच पडले होते. दप्तर बेडरूममधील बेडवर पडलं होतं. आईला शाळेतून आलेली नोटीस दाखविण्यासाठी वही काढताना, बाहेर आलेली कम्पॉस, खडूची पेटी आणि दोन-तीन पुस्तकं बेडवर कशीही पडली होती. आयकार्डही त्या पुस्तकांवरच मी भिरकावलं होतं. आज अभ्यासाला सुट्टी असल्यानं मी लगेच खेळायला बसले. पहिल्यांदा बाहुल्यांशी खेळले, मग थोडावेळ पझल खेळले. आज सगळ्या वस्तू जागेवर ठेवायची सूचना नसल्याने खोलीत सगळा पसाराच झाला होता. भरपूर खेळून झाल्यावर थोड्यावेळ आईच्या कुशीत झोपूया असं वाटलं.

आईचं लॅपटॉपमधलं काम उरकलं होतं, त्यामुळे आम्ही बेडच्या दिशेला वळल्यावर लक्षात आलं. बेडवर एवढा पसारा आहे की झोपायलाच जागा नाही. नकळत मी आईला म्हणाले, “अगं, इथं झोपायचं कसं? मला बेडवर रुमाल असेल तरी झोपताना अडथळा होतो. इथं किती सामान आहे.’’
आई हसली आणि म्हणाली, “अग आज 'आळशी दिवस' आहे ना! चालतं एक दिवस. एका कोपऱ्यात दे सगळं सारून. करू थोडी जागा आणि झोपूयात.”
आम्ही तोच उद्योग केला. अवघडलेल्या अवस्थेत झोपावं लागलं. अजून अंगावर गणवेश तसाच होता, त्यामुळे जर गैरसोयीचं (अन्ईझी) वाटत होतं पण दुर्लक्ष केलं. साधारण पाचच्या सुमारास स्वयंपाकखोलीतून आईचा आवाज ऐकू आला, “मनी माऊ! उठा आता दूध प्यायचंय ना! ग्राउंडला जायची वेळ आत्ता येईल.”

मी आळस देत “आले” म्हणाले. आळस द्यायला हात वर केला, तर हातात आयकार्डचा पट्टा अडकला. थोडा पाय ताठ केला तर उशीच्या शेजारी ठेवलेली खडू पेटी सरकन घसरली आणि जमिनीवर खडू पसरले. माझी जाम चिडचिड झाली, तशीच उठले आणि “आईग्ग!!”

खोलीकडे बघितले आणि ईईईईईई वाटलं. “अगं आई किती पसारा झालाय खोलीत. मला बघवत नाही. सगळंच कसं पसरलंय. मला बेडवरच्या पसाऱ्यामुळे नीट झोपता पण नाही आलं आणि या गणवेशाची सगळी बटण माझ्या हातावर रुतली आहेत.”

मी तक्रारीचा जणू पाढाच सुरू केला. वाफाळणाऱ्या कॉफीचा मग हातात घेऊन आई आत आली आणि हसली, म्हणाली, “अगं आज आळशी दिवस ना, मग पसारा तर होणारच. उलट तू आज खूश असलं पाहिजेस मी तुला काहीच सूचना नाही दिल्या. वस्तू जागेवर ठेव सांगितलं नाही की अजूनही तोंडाला लागलेल्या सॉसबद्दलही मी बोलले नाहीये! किती मस्त. तुला हवं ते करता आलं ना आज?”

आईची सगळी वाक्य ऐकून मी भानावर आले आणि म्हणाले, “नको गं बाई हा आळशी दिवस! मला तुझ्या सूचनाच जास्त आवडतात. चल ना गं आई, आपण पटकन सगळं आवरूयात. मला ना हा पसारा पाहून कसंतरी होतंय. एरवी आपली खोली किती टापटीप असते! आवरल्याशिवाय मी आज दूध नाही घेणार!"