शाळेस पत्र

शाळेस पत्र

लेखनः सुमुखी शेजवलकर, इयत्ता ७वी, अक्षरनंदन | अर्कचित्र: तुषार देसाई


आदरणीय अक्षरनंदन शाळेचे श्रीमंत, राणीसाहेब व सरदार यांसी,
(श्रीमंत दादासाहेब, रश्मीराणीसाहेब व सर्व - अक्षरनंदन माध्यमिक शाळेची सलतनत सांभाळणारे व तख्ताचे रक्षणकर्ते-यांसी-)

स.न.वि.वि. आपला निरोप आम्हांस काल पोहोचला. त्या मजकुरात आमची प्रकृति पूसलीत व बिऱ्हाडी काय (उद्योग) चालू आहेत याबाबत हालहवाल पूसली होती. आमची प्रकृति ठणठणीत. दर ग्रीष्मात होते तशी घशाची व्याधि होती. घसा सुजला होता, परंतु वैद्यबाईंच्या साहाय्याने आता तसे नाही. बरे वाटते आहे. दर पंधरवड्यात दोनदा बाहेर दौरे चालू. तेचवेळी आम्ही आणि मातोश्री जाऊन येतो वैद्यबाईंकडे, बरोबर इतर कामकाज संपवून येतो. क्वचित तीर्थरूप असतात. सोबत आम्ही प्रकाशनाचे कामास बाहेर पडून येतो. कधी सरदारांकडून कामात ढिलाई जाहल्यास तीर्थरूपांना राग अनावर होतो. बिऱ्हाडी बसून एकच खंत वाटते की, अटकेपार झेंडे लावण्यासारखे कामकाज हातून होत नाही.

       आम्ही आपल्या राज्यात काही वृक्ष लावण्याचे प्रयोजन केले होते व सातवी सैन्याच्या तुकडीने काही वृक्ष लावले होते. परत जेव्हा तेथे जाण्याचा योग येईल तेव्हा त्यांची हालहवाल कळवावी. अहो, झाडांना पूसावे. ते जरूर तबियत सांगतील!

       या दिवसांत कामाचे महत्त्व कळते आहे. किती गोष्टींवर अवलंबून रहावे लागते! स्वावलंबनाचे धडे गिरवणे आहे. नवीन गोष्टी शिकतो आहोत. आम्हांस भाषा व इतिहासात विशेष रस असल्यामुळे त्यातील अनेक गोष्टी चालू. नवीन भाषा शिकतो आहोत. सातवीच्या सैन्यातील पेंडसे नामक शिपायाच्या आऊंनी आम्हांस जपानीचे धडे दिले. जपानी भाषा उत्तम, परंतु मन फ्रेंचमध्ये रमले. मागील वैशाखात दहा दिवस फ्रेंचचे धडे घेतले होते. ते थोडे विस्मृतीत गेले होते. त्यावर मातोश्रींना उपाय सुचला, त्यांनी आमचे नाव फ्रेंचच्या शिकवणीला भरून टाकले. शिकवणीच्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षण सुरू आहे. वाक्ये बनवता येतात व लिहिता बोलता येते. या पत्रातील लहेजावरून आपणास इतिहासाचे कळले असेलच. आम्हांस मराठ्यांच्या कारकीर्दीबद्दल व शौर्याबद्दल अत्यंत रुची आहे. त्यात आम्ही पानिपतावर अभ्यास करत आहोत. विश्वास पाटलांचे 'पानिपत' आधी पैदा केले, त्यानंतर त्र्यं. शं. शेजवलकरांचे 'पानिपत १७६१' वाचतो आहोत. शेजवलकरांच्याच रक्ताचे वारस आम्ही आहोत, अशा चित्रविचित्र कल्पना मनात येतात, परंतु सर्व झूठ आहे. हे रक्ताचे वारस वगैरे. या दोन पुस्तकांशिवाय 'स्वामी', 'पावनखिंड' ही ऐतिहासिक पुस्तके वाचलीच; व 'द दा विंची कोड', 'वनवास', 'लिटल विमेन', 'पॅपिलॉन', 'मधुबाला (चरित्र)' इत्यादी पुस्तकेसुद्धा वाचली आणि नोंदी केल्या. पुस्तके वगळल्यास चित्रपट पाहणे, अभिनय, पाक(प्रयोग)कृती आणि व्यायाम करणे चालू आहे. लेखनकौशल्य वाढीस लागत आहे. नाट्यछटा लिहून जाहली. ती एका अकादमीस (नाट्यसंस्कार कला अकादमी) पाठवली अन् त्यात आमचा पहिला क्रमांक आला! शिवाय नाटके लिहितो. 'युक्रेनी लोककथा' नावाचे एक पुस्तक आहे, त्यातील सहा कथांवर आम्ही संहिता लिहितो आहोत. सातवीच्या सैन्याच्या तुकडीतील इतर पाच शिपाईगड्यांना बरोबर घेऊन त्याचे प्रयोग आपल्या शाळेच्या सभागृहात बालवाडी ते तिसरीच्या शिपायांसमोर आम्ही करायचे म्हणतो. संमती असल्यास कळवणे. सरावाची तालीम दर पंधरवड्यास दोनदा होते. उत्तम होत आहे.

       अभ्यास ठीक. आपण दिलेले काम काही अंशी का होईना, फत्ते आहे. कर्मधर्मसंयोगाने मातोश्रींच्या ओळखीतून आमची व धाकट्या बंधुराजांची पुढील वर्षाची पुस्तके व शिष्यवृत्तीची पुस्तकेसुद्धा मिळाली. धन्य झालो. इतिहासाचे अर्धे पुस्तक वाचून पूर्ण झाले. बाकी पुढचे कधीतरी नक्कीच वाचू. चांगले आहे.

       आपणा सर्वांची आठवण येते. पुढील वर्ष सुरू होण्याची वाट पाहतो आहोत. वर्गसजावट बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु सर्व बरे होईल. मजकूर मिळाल्यास किमान पोच तात्काळ पाठवणे. गरज भासते आहे. 

       कळावे, लोभ असावे, ही  विनंती..

 - शिपाई क्रमांक ३४ 

 

टिपः सदर पत्र प्रथमेश नामजोशी यांनी डिजिटल टंकीत करून दिले. त्याबद्दल त्यांचेही आभार