मॅजिक वर्ड्स (कथा)

मॅजिक वर्ड्स
लेखनः ज्योती गंधे
चित्रः ज्योती महाले

त्या दिवशी घरी येताना, शाळेच्या बसमध्ये बसण्याआधी मी खूप आनंदात होते. शाळेच्या गाण्याच्या स्पर्धेत मी म्हटलेल्या ‘मन सुद्ध तुजं …’ गाण्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं. कधी एकदा आईला सांगते असं झालं होतं. अचानक माझी खास मैत्रीण ईशा, कोणालातरी सांगत असताना मला ऐकू आलं, “आई म्हणते, बक्षीस कोणाला द्यायचं ते ठरलेलंच असतं, आपण कशाला भाग घ्यायचा? म्हणून मी कधीच भाग घेत नाही स्पर्धेत!”

मी ते ऐकलं आणि मला रडू यायला लागलं. आईनी आणि मी खूप मेहनत घेतली होती. आई दरवेळेला काहीतरी सुधारणा सांगत होती आणि मी तसं म्हणायचा प्रयत्न करत होते. माझ्या योगाच्या ताई नेहमी म्हणतात, “सावनी सांगितलेल्या सगळ्या सूचना नीट ऐकते आणि त्याप्रमाणे प्रत्येक प्रयत्नात सुधारणा करते, म्हणून स्पर्धेच्या वेळेला तिचं सादरीकरण अचूक आणि उत्तम असतं.” मग ईशा असं का म्हणते? मला खूपच रडू यायला लागलं.

घरी आले तर आई म्हणाली, “अमोघदादा येणार आहे.”

मी म्हटलं, “आत्ता कसा काय मध्येच?”

“अग,त्याच्या काकाच लग्न नाही का? म्हणून येणार आहे तो.”

अमेरिकेहून माझा  मावसभाऊ अमोघदादा येणार होता. मला खूप आनंद झाला. एरवीसुद्धा जूनमध्ये तो येतो. तेव्हा माझी शाळा सुरू झालेली असते, त्यामुळे खूप वेळ नाही मिळत, पण जो काही वेळ आम्हाला एकत्र मिळतो त्यात मला खूप काही शिकण्यासारखं असतं. त्याला सगळ्या देशांची माहिती आहे. त्याने भूगोलाच्या झोनल स्पर्धेमध्ये बक्षिसंही मिळवली आहेत. तो आला, की त्याच्याकडून नकाशातून माहिती घेताना मला खूप छान वाटतं. आई म्हणते, “अमोघ अगदी ‘वेल बिहेव्हड' (छान वागणारा) आहे.खरंच तो सगळ्यांशी खूप छान वागतो . मुख्य म्हणजे मराठीत बोलतो. तेही अगदी ‘आपल्यासारखं’!” आता आपल्यासारखं म्हणजे काय, ते नाही मला माहीत, पण आई म्हणते, “तो ‘अमेरिकन’ मुलासारखं मराठी नाही बोलत. त्यामुळे इथल्या मुलांशी पण त्याची छान मैत्री होते.” मला अमोघ दादा फार आवडतो. माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठा आहे. पण आई म्हणते तसा तो माझा ‘रोल मॉडेल’आहे.

अमोघदादा, मावशी, काका आले आणि आमच्या घरात धमाल सुरू झाली. मावशी माझ्यासाठी मस्त फुलाफुलाची सॅक आणि खूप कपडे घेऊन आली. ती माझ्यासाठी तिकडचे कपडे आणते, त्यामुळे माझे ड्रेसेस इथल्या मुलींपेक्षा वेगळे असतात. मला फार आवडतात.

आईने दादाच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी केली होती. दादा म्हणाला, “मावशी, खूप छान झालीय खिचडी! मला खूप आवडली.” खाऊन झाल्यावर आम्ही खेळायला गेलो.

आम्ही खूप गप्पा मारल्या. त्याने त्याच्या मित्रांच्या, शाळेतल्या खूप गमती सांगितल्या. मी पण माझी कथा कथन स्पर्धेतील बक्षीस मिळालेली गोष्ट त्याला सांगितली. ती त्याला खूप आवडली. त्याने “मस्त,मस्त” म्हणत टाळ्याही वाजवल्या. माझ्या अभ्यासाच्या टेबलवरची वही बोलता बोलता त्याने हातात घेतली, तिची अशीच तो पानं उलटायला लागला. मला एकदम म्हणाला, “सावनी, तुझं अक्षर किती छान आहे!” मला इतकं प्राउड फील झालं. खूप छान वाटलं. 

आईने जेवायला बोलावलं. इतर पदार्थांसोबत मावशीला आवडते म्हणून शेपूची भाजी पण केली होती. मी पहात होते, दादाने ती लगेच संपवली. आईने विचारलं, “अमोघ, आवडते का तुला पण शेपूची भाजी? अजून वाढू का?”

“नको मावशी. मला नाही आवडत ही भाजी, पण आई म्हणते,पानात वाढलेलं सगळं खायचं आणि शेपूची भाजी आपल्या पोटासाठी चांगली असते, म्हणून मी खाल्ली पटकन. पण मला बटाट्याची भाजी वाढ नं, मला आवडते, आणि खूप मस्त झालीय.” 

मला ह्या वेळेला एक जाणवलं की, दादा प्रत्येकाला ‘हे आवडलं,’ ‘हे छान आहे,’असं खूप वेळेला म्हणतो. आणि मला जेव्हा, जेव्हा त्याने तुझं ‘हे’ छान आहे,’ते’ छान आहे असं म्हटलं तेव्हा तेव्हा खूप बरं वाटत होतं.

मला एकदम ईशाची आठवण आली. आम्ही केजीपासून बरोबर होतो. किती खेळायचो,गप्पा मारायचो.पण एकमेकांना कधी तुझं ‘हे’ छान आहे, तुझं ‘ते’ मला आवडतं असं कधीच नाही म्हणालो.

दुसऱ्या दिवशी शाळेत गणिताच्या तासाला टीचरनी दहा गणितं दिली होती. मीपण मनापासून सोडवत होते. माझी दोन गणितं राहिली होती. तेवढ्यात टाळ्यांचा आवाज आला. मी वर पाहिलं. टीचर म्हणत होत्या, “Well done, ईशा, All sums correct, Excellent!”

ईशाच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. तेवढ्यात डबा खायची सुट्टी झाली. मी स्वतःहून ईशाकडे गेले, आणि म्हणाले,  “ईशा, तुझं गणित किती छान आहे, मला शिकवशील?”

ईशा माझ्याकडे पाहत राहिली पण म्हणाली, “सावनी, शिकवेन मी तुला पण तुझंही गणित चांगलंच आहे, फक्त तू जरा हळूहळू करतेस.”

“ईशा, आज आईने केक दिलाय डब्यात, तुला आवडतो म्हणून जास्त आणलाय. चल न डबा खाऊ या.”

केक म्हटल्यावर ईशा खूश झाली.म्हणाली, “चल, चल, खाऊया डबा.’

दादाच्या “आवडलं,छान आहे “ च्या 'मॅजिक'मुळे माझी मैत्रीण परत मिळाली.

या जादूचा वापर मी आता सगळ्यांवर करते. आपल्याला कोणाचं काही छान वाटलं, मनापासून आवडलं तर त्याला ते सांगायचंच असं मी ठरवलं. आणि प्रत्येकातलं काही न काही मला चांगलं दिसायला लागलं आणि मी तसं त्यांना सांगायलाही लागले. मिहीर खूप मस्ती करतो पण खो-खो खूप मस्त खेळतो. त्याला तसं सांगितलं तर काय मजाच झाली. माझ्या खोड्या काढणं तर त्यांनी बंद केलंच, पण मला कुणी त्रास दिला तर त्याच्याशी भांडायलाच लागला. नंतर नंतर तर माझ्या असं लक्षात आलं की, पहिल्यांदा असं काय चांगलं आहे ते सांगितल्यावर, एखादी गोष्ट चुकली, नाही पटली असं सांगितल्यावरही माझं कोणाशी भांडण झालं नाही. सगळ्यांशी असलेल्या माझ्या मैत्रीचा मला आता जास्त आनंद होतो. आणि खरं सांगू का? सगळे माझ्या अक्षराचं, माझ्या योगासनांचं, माझ्या मार्कांचं  खूप कौतुक करतात तेव्हा मलाही खूप बरं वाटतं आणि या कौतुकासाठी तरी आपल्याला सगळं आणखी छान करावसं वाटतं आणि त्यासाठी मी खूप प्रयत्नही करत असते. 

ईशाची आणि माझी आता आणखीनच घट्ट मैत्री झालीय. आता ती स्पर्धेत भाग तर घेतेच आणि आम्ही दोघी एकमेकींचं सादरीकरण कसं चांगलं होईल हेसुद्धा बघतो पण कोणीही जिंकलं तरी दोघींनाही खूप आनंद होतो. कारण, स्पर्धेत भाग घेण्यातला, स्पर्धेतल्या आपल्या सादरीकरणासाठी कष्ट करण्यातला आनंद तिलाही आवडायला लागलाय.

किती छान आणि सोप्या पद्धतीने आपली सगळ्यांशी मस्त मैत्री होऊ शकते हे  दादाच्या मॅजिक वर्डस अर्थात जादुई शब्दांनी मला शिकवलं. ”थँक्यू दादा. You are really my role model!”