चराठीम चषाभा चनाच्यादि चभेच्छाशु

आज मराठी राजभाषा दिन. यामिनित्ताने मराठीच्या इतिहासाबद्दल किंवा कुसुमाग्रजांबद्दल माहिती तुम्ही मिळवालच, किंवा तुमच्या शाळेतही त्याबद्दल सांगितले जाईल.
इथे मात्र आपण भाषेसोबत खेळणार आहोत.
तर आज आपण एक गंमत करणार आहोत. तुम्ही आई बाबा, शिक्षक यांना समजू नये किंवा तुमचा मित्रमैत्रिणींच्या कंपूबाहेर गुपितं कळू नयेत म्हणून एखादी लिपी किंवा भाषा तयार केली असेल ना?
अरफसे आरफामी शारफाळेत अरफसताना बोरफोलत आरफासु.

रत, चम्हालातु चत्या चषेबद्दलभा चंगायचंसा चहेआ. चय्यारत?

'च' ची ही भाषा सोपी आणि सगळ्यांना माहीत असणारी आहे. वर दिली आहे ती 'रफ' किंवा 'टरफ' ची भाषाही सगळीकडे प्रचलित आहे.
पण तुम्ही मुलांनी याहून वेगळे आणखी काही प्रयोग नक्की केले असतील याची आम्हाला खात्री आहे. या तुमच्या 'गुप्तभाषेत' तुम्ही एक परिच्छेद लिहून पाठवायचा आहे आणि त्यासोबत त्याचं नेहमीच्या मराठीत रूपांतरही. जर तुम्हाला लिहायचा कंटाळा असेल तर ऑडीओ किंवा व्हिडीयो सुद्धा आम्हाला पाठवू शकता

ही कोडी तुमच्या नावासह अटकमटक वरून कोडं या रूपात प्रकाशित केली जातील आणि मग बघुयात इतर मुलांना ती भाषा समजतेय का?

आपले गुप्तभाषेत लिहिलेले परिच्छेद (त्याच्या मराठीतील रुपांतरासह) किंवा रेकॉर्ड केलेले ऑडियो/व्हिडीयो आम्हाला monitor.atakmatak@gmail.com वर नक्की पाठवा. ती भाषा टाईप करायला कठीण जात असेल किंवा तुमची वेगळी लिपिही असेल, तर एका कागदावर लिहून त्याचा फोटो पाठवला तरी चालेल. तुमचे परिच्छेद १७ मार्च पर्यंत पाठवायचे आहेत.

चला तर. वाट पाहतोय.

 
मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा! :)