मी आणि मधू (कथा)
मी आणि मधू
लेखन: राजश्री तिखे
चित्रे: फारूक एस. काझी
टीप: सदर कथेत काही वैज्ञानिक संज्ञांखाली काळी तुटक रेष दिसेल. त्या संज्ञांबद्दल अधिक माहिती त्या शब्दावर पॉइंटर फिरवल्यावर तिथेच दिसेल. मोबाईलवर लेखन वाचत असाल तर त्या शब्दावर बोट टेकवले तर माहिती वाचता येईल.
मी मन्नू. म्हणजे माझं खरं नाव वेगळं आहे पण घरचे मला लाडाने मन्नू म्हणतात. तुमचं पण असेलच ना, असं निक-नेम, घरचं लाडाचं नाव? तर, त्या दिवशी कलत्या उन्हात, मी आमच्या गच्चीत वाळलेले कपडे काढत होते. मी आता चौथीतून पाचवीत जाणार आहे ना, त्यामुळे वाळलेले कपडे काढून घड्या घालण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आई-बाबांना तेवढीच मदत! तेवढ्यात मला गूँ गूँ गूँ गूँ असा आवाज यायला लागला. मला वाटलं माझे कानच वाजताहेत. त्यामुळे मी कानात बोटं घालून चांगलं जोरजोरात हलवलं. मग आवाज गेला. मी हुश्श करून अजून दोन कपडे काढले. तोवर परत आपलं गूँ गूँ गूँ गूँ सुरू. यावेळी जरा जास्तच जवळ येत होता तो आवाज. मग मी नीटच पाहिलं तर काय! एक मधमाशी आमच्या गच्चीत शिरली होती. अरे बापरे! मी तर घाबरलेच.
“ए, शुक, शुक” मी तिला हाकलायला लागले. “ए, अगं जा. जाऽऽ बाहेर.” पण छे, मधमाशी आपली माझ्याभोवतीच घिरट्या घालायला लागली. मग मी कान झाकून खाली वाकले. तेवढ्यात ती गच्चीच्या दारातून आमच्या घरात गेली.
“अरे, अरे, अरे. आत घुसली मधमाशी! ” मोठ्ठ्यांदा ओरडत तिच्यापाठोपाठ मीही धावले. आता हिला कशी हाकलू? तेवढ्यात मला कोपऱ्यातली काठी दिसली. काठी घेऊन मी मधमाशी भिंतीवर बसेल तिथे मारत सुटले. ठक, ठक, ठक, ठक. काठीनी मारतीये, मारतीये पण माशी उडूनच जात होती. माझी काठी तिच्यापर्यंत पोचायच्या आत ती दुसरीकडेच.
“अं..... आता काय करावं बरं?” मी विचारात पडले. “हं, हा पेपर घेते. पेपरची सुरनळी करून मारते. जुना पेपर, जुना पेपर, जुना पेपर....कुठे आहे बरं जुना पेपर? हा मिळाला जुना पेपर. आता बघ कशी पकडते तुला.” मी मधमाशीटलीला म्हणाले. पेपरची सुरनळी करून मी मारत सुटले - सप, सप, सप, सप. पण अरेच्चा! पेपरच्या सुरनळीतसुद्धा सापडली नाही ती.
आता मी जरा वैतागले. मला कळेना कशात सापडेल ही? तेवढयात समोरच्या हुकला टांगलेल्या डास मारायच्या रॅकेटकडे माझे लक्ष गेले. “हां! हिच्याने नक्की पकडता येईल तिला.” मी आनंदाने रॅकेट काढायला उडी मारली. पण , माझा हातच पोचत नव्हता. चौथ्या उडीला लागली हाताला. मग मी तलवार चालतात तशी रॅकेट चालवायला लागले...स्वॅप, स्वॅप, स्वॅप, स्वॅप. पण हाय रे दैवा!
“श्शी बाई! सापडतच नाहीये या रॅकेटमध्ये पण.” मी हताशपणे खालीच बसले.
“किती गं बाई चपळ तू. कसं पकडू मी तुला?” मी खुर्चीच्या पाठीवर बसलेल्या माशीकडे पाहत जोरातच म्हटले. “अगं मन्नू, पण का मारायचंय मला?” माझ्या कानाशी नाजूकशी गुणगुण ऐकू आली.
“ऑं कोण बोललं? कुठून आला आवाज?” मी दचकलेच.
“अगं मी! मी मधू. का तू माझ्या मागे हात धुवून लागली आहेस आणि मला मारते आहेस?” पुन्हा गुणगुण ऐकू आली आणि यावेळी माझ्यासमोर हवेत तरंगणारी मधमाशीही दिसली.
“मग तू माझ्या घरात का शिरलीस? जा, बाहेर, जा बरं तू आधी?” मी मनातून घाबरले होते तरी उसन्या आवेशाने ओरडले.
“अगं, पण का हाकलते आहेस मला?” मधमाशी काकुळतीला येऊन म्हणाली.
“का म्हणजे काय? चावलीस तू मला म्हणजे? किंवा घरातल्या कोणाला चावलीस म्हणजे?” मी डोळे वटारत म्हणाले.
“अगं, पण मी का डंख मारेन तुला उगाचच? मी स्वतःहून कोणाच्याच वाटेला जात नाही. कोणी मला त्रास दिला, माझ्या बहिणींना त्रास दिला किंवा आमच्या पोळ्याला त्रास दिला तरच मी डंख उगारते गं.” मधमाशी कळवळून म्हणाली.
आता बघा. हे म्हणजे ‘चोर तो चोर वर शिरजोर’. मी तावातावाने म्हणाले, “मी आलीये का तुझ्या पोळ्याजवळ? तूच तुझं पोळं सोडून आलीस. का आलीस आमच्या घरी?”
“मन्नू, तू आधी दुसऱ्याच एका घरी राहत होतीस. या नव्या घरी आत्ताच आलीस ना?” मधमाशीने अनपेक्षितच प्रश्न विचारला.
मी बुचकळ्यात पडले आणि नकळतच मी उत्तर दिले, “हो, दोन-तीन वर्षंच झाली ही नवी बिल्डिंग बांधल्याला.”
“मग मला सांग, तुला आठवण येते की नाही जुन्या घराची? वाटतं ना कधीतरी जुन्या घरी जावंसं?” मधमाशी आपली अजूनही त्याच मुद्द्यावर होती.
“अंऽऽ हो. येते मला आठवण आणि जावसं वाटतंही कधीतरी.” लगेच माझ्या डोळ्यासमोर जुनं घर आलं. घरासमोरचं मोठ्ठंच्या मोठ्ठं आणि उन्हाळ्यात लालभडक फुलांनी डवरून जाणारं गुलमोहराचं झाडं, घराभोवतालची बरीचशी मोकळी जागा आणि तिथे मित्रं-मैत्रिणींबरोबर छोटी सायकल फिरवणारी मी दिसायला लागले. आमच्या घरासमोरचं तट्टूमामांचं वाणसामानाचं दुकान आणि कधीतरी आम्ही छोटी मुलं दुकानात गेलो की फुकट चॉकलेट देणारे तट्टूमामा असे सगळे सिनेमासारखे फिरून गेले. त्या घराच्या भिंती रंग उडालेल्या होत्या, पण मला त्या खूप आवडायच्या. कारण, मी लहानपणी काढलेल्या चित्रांनी आणि चिकटकामांनी त्या भरून गेल्या होत्या. मी जुन्या घराच्या आठवणीत थोडा वेळ हरवून गेले पण काही क्षणात अचानक भानावर आले आणि घाईघाईनं म्हणाले, “येतेच मला आठवण, पण त्याचं काय इथे?” आता माझा पेशन्स संपायला आला होता.
“हे तुझं नवं घर आहे ना, ते माझं घर होतं आधी.” हा तर मला धक्काच होता. मला आता मधमाशीचा आवाज दुःखी वाटायला लागला होता. ती पुढे सांगायला लागली, “तुला माहितीये तुमच्या बिल्डिंगच्या जागी आधी जंगल होतं, खूप झाडं होती. जांभळाची, हिरड्याची, निलगिरीची, खैराची… कितीतरी प्रकारची कितीतरी झाडं. तुझं घर आहे ना, तिथं एक जांभळाचं मोठं झाड होतं. त्यावर माझं घर होतं, म्हणजे आमचं मोठ्ठं पोळं होतं. तुमची ही बिल्डिंग बांधली ना, तेव्हा सगळी झाडं तोडली, त्यात ते जांभळाचं झाडही तोडलं. आमचं पोळं तुटलं, माझ्या कितीतरी बहिणींचा जीव गेला. त्यावेळी आमच्या पोळ्यातल्या राणीला बाळं होणार होती. त्यामुळे आम्ही काही बहिणींनी मिळून तुमच्या बिल्डिंगपासून थोड्या अंतरावरच्या दुसऱ्या झाडावर नवीन पोळं बांधलं. पण, अजूनही जुन्या घराची आठवण येते, म्हणून इथे येतो आम्ही अधून-मधून. पण इथं आल्यावर खूप वेळा माझ्या बहिणींना जीवाला मुकावं लागतं.”
एवढं सगळं बोलल्यावर तो इवलासा जीव मला दमल्यासारखा वाटायला लागला. तिचं बोलणं ऐकून मला वाईटही वाटायला लागलं. तेवढ्यात ती पुन्हा म्हणाली, “मन्नू, तुला माहिती आहे का आम्ही या जगातून नाहीसे झालो तर तुम्ही माणसंपण नाहीशी व्हाल.”
हा आता दुसरा धक्का होता. आवंढा गिळत मी विचारलं, “ते कसं काय गं, मधू?” मी चक्क आता मधमाशीशी मधू म्हणत गप्पा मारायला लागले. मला आता तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली होती.
“अगं तुम्ही कशी मावस, चुलत, आते अशी वेगवेगळ्या आडनावांची भावंड असता, तसं आम्ही सातेरी, आग्यामाशा अशी मावस, चुलत, आते भावंड आहोत. आमच्यातल्या कित्येक घराण्यांच्या माशा कोणत्यातरी विशिष्ट झाडाचाच मध गोळा करतात. आम्ही जेव्हा मध गोळा करतो, तेव्हा त्या झाडाचं
ती पुढे म्हणाली, “म्हणजे बघ हं, आमच्यापैकी मोहरीचा मध गोळा करणाऱ्या मधमाश्यांची संख्या कमी झाली किंवा त्या नष्ट झाल्या, तर मोहरीच्या फुलाचे परागकण या फुलातून त्या फुलात जाणार नाहीत, म्हणजे मोहरीच्या फुलांची फळं म्हणजे शेंगा होणार नाहीत. फळं नाहीत म्हणजे बिया नाहीत.”
आत्ता माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. मी म्हणाले “आणि बिया नाहीत म्हणजे मोहरीची नवी रोपं आणि नवी झाडं नाहीत.”
“हो ना, अशा तऱ्हेने हळूहळू मोहरीची सगळी झाडं संपून जातील.” मधूने माझं वाक्यं पूर्ण केलं.
“अशा तऱ्हेने वेगवेगळी झाडं, पिकं नष्टं झाली तर तुम्हा माणसांना अन्न कसं मिळेल? म्हणजे हळूहळू मानवजातही नष्टं होईल.” मधूने तिचं आणि माझं नातंच उलगडून सांगितलं होतं जणू काही. ते आता मला नीटच कळलं. मी म्हटलं, ”मधू आता तुला किंवा तुझ्या बहिणींना मी परत कधीच त्रास देणार नाही, मारणार नाही आणि माझ्या मित्रं-मैत्रिणींनाही सांगेन.”
मी बाहेर पाहिलं तर अंधार झाला होता. आता मला मधूची काळजी वाटायला लागली होती. मी म्हटलं, “आजची रात्रं तू आमच्या घरी रहा आणि उद्या घरी जा.”
आता मधूची रहायची सोय करायला हवी होती.
मला आता खूप मोठं माणूस असल्यासारखं वाटायलं लागलं. मधूला सुरक्षित तिच्या घरी पाठवायची जबाबदारी माझ्यावर आली होती ना! मी विचार करायला लागले. मग अचानक मला एक आयडिया सुचली. मी मधूला म्हणाले, “तू ताईच्या खोलीत ये. आज ताई तिच्या मित्रं-मैत्रिणींबरोबर ट्रेकला गेलीये.”
मग मी मधूला ताईच्या खोलीत घेऊन गेले. तिथं एका डबीत मी माझ्या आवडीचं लाल रंगाचं मऊ कापड ठेवलं.
“तुला लाल रंग आवडतो ना?” मी मधूला विचारलं.
“मला बाई असे रंगबिंग कळत नाहीत. मला फक्त भडक, आकर्षक रंग कळतात. तो बघ तसा” असं म्हणत ती ट्यूबलाईटच्या दिशेने निघाली, तशी मी ओरडले. “अगं मधू-मधू.... नको जाऊ तिकडे. भाजशील तू. तू कशाला जातेस ट्यूबजवळ?”
“अगं, मला वाटलं ते फूलच आहे. झगझगीत दिसतंय् ना?”
मी चकितच झाले. मधूच्या डोळ्यांना असं वेगळं दिसत असेल असं वाटलंच नव्हतं मला. अगं मधू, तुझ्यासारख्याच तुझ्या बहिणी ट्यूबकडे धावतात.”
“अगं, हो ना. कधी ते आम्हाला फूल वाटतं तर कधी गार वातावरणात उब हवीशी असते म्हणून आम्ही ओढले जातो तिकडे.” मधू पडेल आवाजात म्हणाली.
“हो का? अरे बापरे. बरं मग मी आता ही ट्यूब बंद करते पण आत्ता गार आहे ना जरासं मग तुला उबही मिळेल असं काहीतरी करायला हवं.” अचानक मला एक आयडिया सुचली. ताईच्या टेबलवरचा टेबललँप मी लावला. त्या टेबललँपच्या तोंडाला एक प्लॅस्टिकची पिशवी बांधली. त्याच्याखाली एका छोट्या डबीत उबदार कपडा ठेवला आणि मधूला म्हटलं, “तू आजची रात्रं या डबीत रहा हं. उद्या सकाळ झाली की तुझ्या घरी जा. आणि दिव्याला लावलेली पिशवी फाडू नको हं. ”
मधू डबीत शिरल्यावर मी ताईच्या रूमचं दार लावून घेतलं. उगाच घरात कोणाचे नसते प्रश्न नकोत.
सूर्याचे किरण आमच्या घरात शिरत होते, तोवरच भल्या सकाळी मला मधूच्या आठवणीने जाग आली. मी घाईघाईने ताईच्या खोलीत गेले तेव्हा मधू दिव्याला बांधलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीभोवती घोंगावत होती. मला पाहिल्यावर ती डबीत बसली. मी ताईच्या खोलीची खिडकी उघडली आणि हळूच डबी खिडकीपाशी नेली. मला अजिबात भीती वाटली नाही.
मधूने खिडकीबाहेर भरारी घेतली. थोडं पुढं जाऊन ती थांबली.. मीही तिला टाटा केला. तेवढ्यात आईचा आवाज आला, “काय मन्नू, आज एवढ्या लवकर उठलीस? काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय?”
मी नुसतीच हसले. आईला कुठे माहितीये माझी आणि मधूची मज्जा!