आरसा (गोष्ट)

आरसा
लेखन: अश्विनी बर्वे
चित्र: पारुल समीर


“पुरे झालं आरशात पाहणं”, आजी तिकडून ओरडली.
“पण मी मुळी त्यात बघतच नव्हते”, असं म्हणत सारिया तिथून पळाली.
“काय असतं गं तुझं सारखं आरशाजवळ? जेव्हा पहावं तेव्हा तिथंच उभी असतेस.”
“एवढा उंचावर आरसा लावून ठेवलाय. माझं तोंड तरी दिसतं का त्यात? म्हणे, तिथंच उभी असते.”

सारियाला आरशात पाहायला फार फार आवडत होतं. त्यामुळे तिने आपल्या मनात खदखदत असणारा प्रश्न विचारून टाकला.
“आरशात फक्त मोठ्यांनीच पाह्यचं असा काही नियम आहे का?”
“असा काही नियम नाही, पण तू अजून थोडी उंच झालीस की दिसेल तुलाही आरशात” आजी म्हणाली.
“पण मला रोज बघायचं आहे आरशात. माझं मला आवरून ठरवता आलं पाहिजे, काय करायचं ते?” सारिया आपलं म्हणणं पटवून देवू लागली. त्यांच्या घरात कोणतीही गोष्ट नीट समजून द्यावी लागायची. आरडाओरडा केला तर काहीच मिळायचं नाही.
“ ठीक आहे. बघु तुला दुसरा आरसा देता येतो का ते. पण, नीट सांभाळशील ना?” आजीनं विचारलं.
“हो गं माझी आजुडे! नीट तुझ्यासारखा सांभाळेन”, सारिया आजीच्या मऊमऊ गालावर गाल घासत म्हणाली. तिला स्वतंत्र आरसा मिळणार याचा फारच आनंद झाला होता. त्यामुळे ती आजीच्या गळ्यात पडत होती. आजीला अजिबात ते आवडत नसे, म्हणून आजी म्हणाली, “फार लळालोंबा करू नकोस, हो बाजूला”
“पण, तू कधी देणार मला आरसा?” सारिया आरशाची आणि आजीची पाठ सोडत नव्हती.
आजीने आपल्या लाकडी कपाटाचं दार उघडलं,आणि त्यातून एक छोटासा आरसा बाहेर काढला. त्याला धरायला छान गोलाकार जागा होती. आरशाच्या बाजूने महिरप केलेली होती. यापेक्षा सुंदर आणि उपयोगी जगात काहीच असू शकत नाही, याची सारियाला खात्रीच पटली.


“आजी, माझ्या बाकीच्या खेळण्यांपेक्षा ही वस्तू सगळ्यात मौल्यवान आहे, माझ्यासाठी.” सारिया म्हणाली.
“हो, पण नीट जपून ठेवशील ना?” आजी म्हणाली.
“हो गं आज्जे, पण तू पाहिलंस का आरशाच्या महिरपीला लावलेले लोलक उन्हात चमकत आहेत!” सारिया आरशाला कवटाळत म्हणाली.
“हो ना! त्या लोलकातून पिवळा,हिरवा,निळा,लाल रंग आपल्या चेहऱ्यावर पडतो. मस्त आहे ना?” आजीही लहान होत आरशाचं कौतुक करू लागली.
“आजी, सगळ्यांकडे एवढा भारी आरसा नसतो ना?” सारिया आपल्या मैत्रिणीच्या घरचे आरसे आठवून म्हणाली.
“हो, पण म्हणून कोणाला त्यावरून चिडवायचं कारण नाही.” आजी पुढे काय होईल याचा अंदाज घेत म्हणाली. पण, तोपर्यंत सारिया आरसा घेऊन बाहेर गेलीसुद्धा होती.
“सारिया, किती मस्त आहे ना तुझा आरसा” असं कोणी मैत्रिणीने म्हटलं की सारीयाला फार छान वाटायचं. जणू आरशाचा शोध तिनेच लावला आणि एवढा सुंदर आरसा तयार केला. सारिया जिथं जिथं जाईल, तिथं तिथं ती पिशवीत आरसा घेवून फिरायची. अगदी शाळेत, मंदिरात, मैदानावर.


सारीयाला कोणतीही जागा खेळण्यासाठी चालत असे. ती आणि तिच्या मैत्रिणी सतत जमिनीवर उघड्या पायाने खेळत असत. एकदा तिने असाच तो सुंदर आरसा पिशवीत घालून नेला. एकदा तिची मैत्रीण रिया तिला म्हणाली, “व्वा! काय मस्त आरसा आहे. मला बघू दे ना त्यात.”
तर सारिया म्हणाली, “नाही हा माझा आरसा आहे,असा आरसा कोणाचकडे नाही. मी कोणालाच हात लावू देणार नाही.”
तर सगळे मित्रमैत्रिणी तिला स्वार्थी स्वार्थी म्हणून चिडवायला लागले, पण सारियावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ती मुद्दाम जिथं खूप मुलं-मुली असतील तिथं जायची आणि स्वतःच्या आरशात पहायची. तिला सगळ्यांना जळवायचं असायचं. दोन चार दिवस ती अशीच खेळली.
एकदिवस रिया म्हणाली, “सारिया आरसा घरात एका ठिकाणी ठेव, म्हणजे तो फुटणार नाही.”
सारीयाला याचा खूप राग आला. ती म्हणाली, “माझा आरसा कधीच फुटणार नाही. तो मौल्यवान आहे.”
आपला आरसा कधीच फुटणार नाही असंच तिला वाटे. घरात आजीनं, आईनं सगळ्यांनी तिला समजावलं पण तिला ते पटलं नाही. सारीयाच्या मैत्रिणी तिला चिडवण्यासाठी म्हणाल्या, “तू तो आरसा वरून खाली फेक, बघूया फुटतो का?”
सारिया म्हणाली, “नाहीच फुटणार तो, मुळीच नाही फुटणार.”
“मग फेक ना खाली, फेकायला कशाला घाबरतेस?” मैत्रिणीही आता हट्टाला पेटल्या होत्या.
आपण कोणत्याच गोष्टीला कधीच घाबरत नाही, हे दाखवण्यासाठी सारियाने तो आरसा जिन्यावरून खाली फेकला.
धडाम!! खाली फेकलेला आरसा पालथा पडला होता. त्यामुळे तो फुटला की नाही हे तिला कळलं नाही. ती म्हणाली, “बघा बघा तो फुटला नाही.” सारिया धावत खाली गेली आणि पालथा पडलेला आरसा तिने उलथा केला, तर त्या काचेचे दोन तुकडे झालेले होते.

ते बघून सारियाला खूप दुःख झालं. ती तिथेच बसून राहिली, तिला रडू यायला लागले. ते बघून तिच्या मैत्रिणी आणि मित्र घाबरून पळून गेले. एक मैत्रिण म्हणाली, “बघ तुला म्हटले होते ना की, तो फुटेल म्हणून! तो फुटला. चांगली अद्दल घडली तुला.”
जेव्हा सारिया तिच्या आजीकडे काय झालं ते सांगायला गेली, तेव्हा आजीनं तिच्याकडे फक्त पाहिलं. सारियाचे बाबा म्हणाले, “आरसा फुटला म्हणून मी काही तुला रागवणार नाही, पण तू आरसा कसा काय फेकला याचं मात्र मला आश्चर्य वाटतं. आरसा कोणताही असो तो फुटणारच ना?”
त्यानंतर कितीतरी दिवस सारियाला तिच्या मैत्रिणी चिडवत होत्या, की "कोणी आरसा फेकू शकतो?" असं म्हणून त्या हसायच्या. काहीजणी तर मुद्दाम सारियाला विचारायच्या, “ए! तुझा आरसा कुठे आहे?”
सारियानं तिच्या आजोबांना तिचं दुःख सांगितलं. त्यांनी शांतपणे तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. ते म्हणाले, “तू तुझ्या रियाबरोबर आरशात पाहिलं असतंस, तर तुला खूप मजा आली असती.”
“हं, पण आता मी काय करू? काहीतरी आयडिया सांगा ना? प्लिज प्लिज!” सारिया मैत्रिणीशिवाय रडकुंडीला आली होती.
“तूच विचार कर. मला नाही आवडत, असं कोणाच्या मध्येमध्ये करायला.” आजोबा म्हणाले. सारियाला तिच्या खेळात कोणी आलेलं आवडत नसे त्यावेळी ती असे बोले, म्हणून आजोबांनी तिला हसवण्यासाठी तिची नक्कल केली.
“आजोबा, माझ्याजवळ एक आयडिया आहे. नाही म्हणू नका.”
“मी काही आणायला पैसे देणार नाही.”
“पैसे नकोच. तुमच्या सायकलचा आरसा तुटला आहे ना? तो द्या.”
“अगं पण...”
आजोबा काही म्हणेपर्यंत सारियाने तो आरसा घेतला.

तो सजवण्यासाठी एक पुठ्ठा घेतला. बारीक काचा, रंग काय काय गोळा केलं. आणि मग, रिया आणि इतर सगळ्या मैत्रिणी मिळून ‘जगात भारी’ असा आरसा सजवू लागल्या. सगळ्या मिळून त्या आरशात बघू लागल्या. एकमेकांना ढकलत हसू लागल्या, खिदळू लागल्या. पण एवढं सगळं करतांना आरशाला मात्र जपत होत्या. हो! पुन्हा फुटायला नको ना.