राक्षू रंग (कथा)

राक्षू रंग
लेखन: दिप्ती देशपांडे
चित्रे: आभा आफळे, अर्चा आफळे


चिनू संध्याकाळी आईसोबत भाजी आणायला भाजी-मंडईत गेली होती. चिनुला मंडईतले भाज्यांचे रंग खूप आवडले. लाल टोमॅटो, जांभळी वांगी, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या शिवाय फळं तर किती रंगांची! बाजारात हे सगळं चिनुला पाहायची भारी हौस. चिनुला अजून हिशोब करता येत नव्हता, पण तिने आईकडून पैसे घेऊन भाजीविक्रेत्यांना दिले.


त्या दिवशी भाजीविक्रेत्यांची बरीच मुलं मंडईत हजर होती. चिनुने त्यांच्याशी ओळख करून घेतली. ती त्या मुलांबरोबर ‘टिपी टिपी टॉप टॉप विच कलर यू वॉन्ट’ हा खेळ खेळली. नवीन कोणी आलं तर, तिने त्यांनाही तो खेळ शिकवला. चिनूने मंडईत भारी धमाल केली! तिला सगळीकडे रंगच दिसत होते.
“आई, आपण रंग तयार करूया का गं? घरी करतात का गं रंग? तू मला मदत करशील? माझ्या मंडईतल्या मित्रांना पण बोलवू का घरी रंग तयार करायला? मग त्या रंगांनी आम्ही छान चित्रे काढून रंगवू.”, चिनू आईला म्हणाली.

“हो चालेल की”, आई म्हणाली, “पण, उद्या मंडईऐवजी दुसरीकडे जाऊया का फिरायला? उद्या तसंही मी मोडाची उसळ करणार आहे. चालेल का?”
“अगं, मग मी कोणाशी खेळणार? आम्ही किती छान खेळतो मंडईत.” चिनू आईला म्हणाली.
“अगं राणी, रंगच पाहायला जाऊ. इथे भाज्या-फळं पाहतो, तिथं फूलं पाहू, फुलांचे रंग पाहू. चालेल?”, आई म्हणाली.
“मग चालेल”, चिनू नाक फुगवत म्हणाली.
पानगळ होऊन गेली होती. जमिनीवर वाळलेल्या पानांचा सडा पडला होता. झाडांना छान पालवी फुटून झाडे फुलांनी बहरलेली होती. चिनू, आई, बाबा आणि चिनूचा मोठा भाऊ, घराशेजारी असलेल्या छोटुश्या जंगलात सूर्योदयाच्या वेळी गेले. चिनू वाळलेल्या पानांवरून चालायला लागली आणि तिला अचानक वाळलेल्या पानातून आवाज आला, 'कर्र.. कर्र... कर्र...'
मग तिने त्या पानांवर उड्या मारायला सुरुवात केली. अजून आवाज येऊ लागले. तेवढ्यात तिला समोर एक झाड दिसलं.
“आई, आई, लाल झाड!”, चिनू म्हणाली.
“हे गुलमोहराचं झाड आहे चिनू”, बाबा म्हणाला.
चिनूला झाड पाहून फारच भारी वाटलं. चिनू इकडेतिकडे उंडारत होती तोपर्यंत चिनुच्या दादानं गुलमोहराच्या फुलांचे देठ नखाला लावले आणि त्याची राक्षसासारखी लांब लांब नखं केली. पिशवीतले चिरमुरे घेऊन ओठांच्या बाजूला लावून, त्याचे राक्षसासारखे सुळे तयार केले. पळसाच्या पानाची शंकूच्या आकाराची टोपी तयार केली. बहाव्याचे झुपके पॅन्टमध्ये अडकवले. लांडोरीचा पिसांच्या मिशा करून अडकवल्या आणि कसाही वाकडातिकडा, जोरजोराने ओरडत तो चिनु समोर आला. जोरजोरात मोठ्याने बोलू लागला, हसू लागला.


“हा... हा... हा... ॐभगभुगे भगनी भागोदरी ॐभट स्वाहा हा...हा...हा!!
मी आहे या जंगलाचा राक्षू राजा
इथे चालतो फक्त हुकूम माझा
आज खाऊन टाकीन तुला
तू आलीस या जंगलात, खूप आनंद झालाय मला
हा... हा.... हा.... हा”
चिनू बेसावध होती. तिने ओळखलंच नाही, की हा नक्की कोण आहे. ती एकदम दचकली, घाबरली. खूप वेगात धावायला लागली. तिच्या मागून राक्षूसुद्धा पळायला लागला आणि राक्षूने तिला पकडले. चिनू जोरजोरात किंचाळू लागली.
“आई.... बाबा...”
राक्षूच्या हातून स्वतःला सोडवण्यासाठी चिनू हातपाय झाडू लागली. ती जाम घाबरली होती. तिचं घाबरणं पाहून दादानेच तिला जवळ घेतलं. मग तिने ती शंकूची टोपी रागाने जमिनीवर फेकून दिली. ती आईच्या कुशीत शिरली आणि खूप खूप रडली. बाबा दादावर खूप चिडला. त्याला ओरडला.

थोड्याच वेळात चिनू नॉर्मल झाली. दादाने सॉरी म्हटलं. चिनुनं त्याला २० उठाबशासुद्धा काढायला लावल्या.
चिनू दादाला म्हणाली, “दादा मलासुद्धा कर की राक्षूराणी. मगाशी मी घाबरले, चिडले, रडले पण ते रंग मला खूप आवडले. मला पण शिकव हं टोपी, नखं करायला आणि ते गजरे कसले मस्त होते.”
आता मात्र चिनूचं बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले. चिरमुऱ्याच्या भेळेचा फडशा पाडून भावनेचे आणि निसर्गातले रंग घेऊन सगळे घरी परतले.