नानी (कविता)

 नानी
कवी: फारुक एस. काझी "समीर"
चित्र: शाम वानरे

 

मोहल्ल्यातल्या कोपऱ्यावर
राहते एकटी नानी
गोधडी शिवता शिवता
सांगते रोज कहाणी

राजा राणी प्रधान सेवक
राक्षस कधी फकीर.
जादुटोण्याच्या गोष्टी
ऐकायला सगळे अधीर

हळू आवाजात बोलायची
टाका घालता घालता
ऐकायला दारी थांबायचे
राहगीर चालता चालता

कुठलं पुस्तक वाचायची?
कुठून आणायची गोष्ट?
कळले नाही कशी कुणाला
सुचायची तिला गोष्ट?

पोटासाठी टाका घाली
आधाराला होती गोष्ट
टाका घालतानाच गेली
सोडून अर्धी गोष्ट

मोहल्ल्यातल्या कोपऱ्यावर
राहायची एकटी नानी
गोधडी शिवता शिवता
सांगायची रोज कहाणी