निनुच्या नानीची साडी (गोष्ट)

निनुच्या नानीची साडी

लेखन: दीप्ती देशपांडे, कोल्हापूर.
चित्र: ज्योती महाले

मी माझ्या आजीला नानी म्हणते. नानी माझ्या आजोली रहाते. मला ना माझं आजोल खूप खूप आवडतं. 

माझी नानी फुलाफुलांची अंगाला चिकटणारी साडी नेसते. आई म्हणते, “अगं निनु, तिला सुती साडी म्हणतात.” नानीची साडी खूप मऊमऊ लागते. इथं आजोली आलं की, मी आणि माझी मनु रातली अश्शी ती अंगावर घेतो. माझा मामू आंब्याच्या झाडाला नानीच्या साडीचा झोपाला बांधून देतो. मी आणि मनू छान, छान छोटे, छोटे झोके घेतो. मला उंच झोका घेता येत नाही ना!

नाना आबोजा साडीची झोपडी बांधून देतात. मग मी आई होते आणि मनू माझी मुलगी. आम्ही घल-घल खेळतो.

माझ्या माऊला बाल  झालंय. मी माझ्या मावशीला माऊ म्हणते. आम्ही पाहायला गेलो होतो बालाला . माझी माऊ बालाला घेऊन माझ्याच आजोली राहते ना.

उन्हाल्याची सुट्टी होती नं,  तेव्हा मी आणि आई आजोली गेलो होतो.
“नानी, नानी मी आले.”
“पिल्लू तुझी गोडगोड तायू आली बघ”, नानी म्हणाली.
“आई, आई बघ की, माऊच्या बालाला नानीच्या साडीचं छोटं बेडशीट केलंय नानीनं”, मी म्हणाले.
आई म्हणाली, “त्याला नं दुपटं म्हणतात.”
पुर्र्पु र्रपुर्र.....
“आई, बालानं पादू केलं. आई! बाल  शी करतयं.”
“निनु, तू करत नाहीस का गं शी कधी?” माऊ म्हणाली. मी तिथून पलाले.

आता ख्रिसमसच्या सुट्टीत मी नानीकडे आले आहे. बाल आणि माऊ पण इथेच आहे. माऊचं बाल आता माझ्यासारखं बसतंय पण चालत नाही, बोलत नाही.

 नानीनं बालाच्या दुपट्याची मज्जाच केलीय सगळी. 

दुपटी अशी जवल जवल ठेवली आणि खूप दुपट्यांची दोन-दोन मोठी दुपटी केली आहेत.  
कोणाला माहितीये का. एक मला आणि एक माऊच्या पिल्लूला. आता मी दुपटं घेते आणि झोपते.

गुड नाईट!