नोरा आणि समुद्री राक्षस (गोष्ट)

नोरा आणि समुद्री राक्षस

लेखक: समाधान पुजारी 
(sbpujari19@gmail.com)
चित्रेः योगिता धोटे (dhoteyogi@gmail.com)

 

आज नोरा नेहमीपेक्षा जरा लवकरच उठली होती. तिचे बाबा आज समुद्रसफरीवर जाणार होते. गेल्या चार -पाच दिवसांपासून ते होडी बांधत होते. तयार झालेल्या होडीच्या शिडावर नोराने तिचा लाल रुमाल बांधला. होडी अजून सुंदर दिसू लागली. बाबांना समुद्रसफरीसाठी आईने शिदोरी बांधली. त्यांना निरोप देण्यासाठी नोरा आणि तिची आई समुद्रावर आल्या होत्या. होडी समुद्रात पुढे जाऊ लागली, तसा दोघींनी हात हलवून बाबांना निरोप दिला. दूर समुद्रात होडी दिसेनाशी होईपर्यंत दोघी तिथेच किनाऱ्यावर उभ्या होत्या.

 

बाबा आता आठवड्याने परत येणार होते. येताना खूप मासे आणणार होते. नोराचा दहावा वाढदिवस पुढच्याच महिन्यात होता. त्यामुळे मासे बाजारात विकून, मिळालेल्या पैशातून नोरासाठी एक छानसा झगा आणि घरात लागणाऱ्या इतर वस्तू ते आणणार होते. जरी बाबा लवकर येणार नाहीत हे माहीत होतं, तरीही नोरा रोज सायंकाळी समुद्रकिनारी जायची. जाईल तेवढ्या दूरवर नजर टाकून बाबांची होडी शोधायची. बाबा लवकर येऊ देत म्हणून समुद्राकडे प्रार्थना करायची. समुद्र डोळ्यांत साठवून घरी परतायची. हा तिचा नित्यक्रमच झाला होता जणू.

 

आज नोरा नेहमीप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावर आली. पण, तिला दूरवर पसरलेला रोजचा समुद्र कुठेच दिसला नाही! नोरा घाबरली. कारण, समुद्राच्या जागी तिला दिसलं जंगल. सगळीकडे पसरलेली वाळू आणि फक्त झाडं. त्या झाडांची पानं माशांसारखी दिसत होती. नक्की काय झालंय हे नोराला कळेना. तिला बाबांची काळजी वाटू लागली. बाबा कुठे असतील, या जंगलात कुठे अडकले असतील, या विचारांनी तर ती अजूनच घाबरली.

बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती. पण, जंगलात मात्र तिला उजेड दिसत होता. झाडांची पानं चमकत होती. कसलाही विचार न करता, नोरा सरळ जंगलात शिरली. काहीही झालं तरी बाबांना शोधून आणायचं, हे तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं. ती आता चालत चालत बरीच दूर आली होती. तरी आजूबाजूला झाडांशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. त्यात ती झाडंही विचित्र होती. ना ती हालत होती, ना डुलत होती. अगदी स्थिर शांत उभी होती. नोरा आता थकली होती. ती हतबल होऊन ती एका झाडाखाली बसली. या एवढ्या मोठ्या दूरवर पसरलेल्या जंगलात बाबांना शोधायचं तरी कसं या विचाराने तिला रडू कोसळलं. नोरा रडू लागली.


तेवढ्यात कुठूनतरी आवाज आला. “का रडतेयस मुली?”
नोराने घाबरून इकडे तिकडे पाहिलं. तिला कुणीच दिसलं नाही.
“कोण आहे?”, नोरा थोडं दबकतच म्हणाली.
“मी इकडे वर. वर बघ.” असं ऐकताच नोराने वर पाहिलं तर झाड तिच्याशी बोलत होतं. या आधी नोराने बोलणारं झाड कधी पाहिलं नव्हतं. ती घाबरली.

तरी नोरा धीर करून म्हणाली, “मी माझ्या बाबांना शोधतेय. ते मासे पकडायला आले होते पण अजून घरी परतले नाहीत. तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा नक्की काय झालंय इथे. कारण मला कुठे समुद्रच दिसत नाहीये.”

झाड म्हणालं, “काल इथे हवेचा राजा वारा आणि समुद्रराजा यांच्यात दोघांमध्ये कोण जास्त श्रेष्ठ यावरून वाद चालला होता. समुद्राला त्याच्या दूरवर पसरलेल्या पाण्याचा गर्व झाला होता, तर समुद्राला हवा तसा इकडे तिकडे लाटांनी वाहून नेतो म्हणून वाऱ्याला! त्यांचं भांडण एवढं वाढलं की, दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. त्यामुळे समुद्रात वादळ निर्माण झालं. कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. समुद्रातील सगळे प्राणी घाबरून गेले, त्यांनी निसर्गदेवीकडे याचना केली. शेवटी निसर्गदेवीने चिडून दोघांनाही शिक्षा दिली. समुद्राचं सगळं पाणी वर ढगांमध्ये पाठवलं, तर वाऱ्याला एका शिंपल्यात बंद करून एका राक्षसासोबत मोठ्या शंखामध्ये बंद केलंय. समुद्रातील सगळे प्राणी झाडं झाली आहेत. तुझे बाबाही. तू वाऱ्याला सोडवू शकलीस तर सगळं काही पहिल्यासारखं होईल.”

“मला तो शंख कुठे मिळेल?”, नोरा म्हणाली.
“इथून पुढे थोड्या दूर अंतरावर.”, झाड उत्तरलं.
त्या झाडाचे आभार मानून नोरा शंख शोधत पुढे चालू लागली. सगळ्या जंगलभर एक भयाण शांतता पसरली होती. त्या जंगलात झाडांच्या पानांचा उजेड तिला रस्ता दाखवत होता.

थोडं दूर चालल्यावर नोराला काहीतरी चमकताना दिसलं. समोर एक प्रचंड मोठा शंख होता. सोनेरी रंगाचा चमकणारा शंख. एवढा मोठा शंख नोराने कधीच पाहिला नव्हता. इथेच तो राक्षस असणार हे नोराने ओळखले. ती शंखाच्या प्रवेशद्वाराजवळ आली, पण शंखाच्या आत जाण्याचा दरवाजा बंद होता. नोराने दोन्ही हातांनी दार ढकलण्याचा प्रयत्न केला.


तोच आतून मोठ्याने आवाज आला, “कोण आहे बाहेर?”
“मी नोरा.”
“काय हवंय तुला?”
“मला वारा हवाय. जो तुमच्याकडे कैद आहे.” आतून राक्षस जोर जोरात हसू लागला.
“लहान मुली, ते आता शक्य नाही. तू परत जा. सूर्य उगवण्याआधी जर तू नाही गेलीस, तर तुझंही झाड होईल.”
नोरा घाबरली होती. तरीही आता मागे हटायचं नाही हे ठरवलं होतं. नोरा राक्षसाला म्हणाली, “मी काहीही झालं, तरीही वाऱ्याला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही.” एक लहान मुलगी एवढा हट्ट करतेय, बघून राक्षसालाही थोडी मजा वाटली.
तो म्हणाला, “ठीक आहे. मी तुला तीन प्रश्न विचारेन. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस की हा दरवाजा उघडेल आणि तू आत येऊ शकशील. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस की मी वाऱ्याला तुझ्याकडे सोपवेन. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस की तू या शंखातून बाहेर पडू शकशील. यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुझं झाड होईल.”
राक्षसाला वाटलं ही मुलगी आता घाबरून माघार घेईल, पण नोराला आता फक्त डोळ्यांसमोर तिचे बाबा दिसत होते.
नोरा म्हणाली, “मी तयार आहे. विचार पहिला प्रश्न.”

राक्षस म्हणाला, ऐक.
“मोत्यांहूनही किमया भारी
सारी धरती हिरवी करी
पाहिले मोती सुगंध पसरी
दुःख सारे क्षणात विसरी”

“पाऊस! पाऊस याचं उत्तर!”, नोरा पटकन म्हणाली.
तसा शंखाचा दरवाजा उघडताना तिला दिसला. नोरा दरवाज्यातून आत आली. समोर पाहते तर एक मोठा उंच धिप्पाड राक्षस उभा होता. त्याच्याकडे पाहूनच नोराला धडकीच भरली. त्याच्या गळ्यात एक बंद शिंपला होता.

भीत भीतच नोरा म्हणाली, “विचार दुसरा प्रश्न.”

राक्षस म्हणाला, ऐक.
“हे महाशय दिवसा झोपतात
दुसऱ्याच्या प्रकाशात रात्रभर फिरतात
एका रूपात कधीच नसतात
एक रात्र तर झोपूनच राहतात”

“चंद्र!” हुशार नोराने लगेच उत्तर दिलं. तसा राक्षस गायब गायब झाला आणि त्याजागी एक यक्ष प्रकटला. तो समुद्राचा राजा होता.

नोराची भीती एकदम कुठल्या कुठे नाहीशी झाली. तो नोराला म्हणाला, “निसर्गदेवीने शिक्षा म्हणून मला वाऱ्यासोबत इथे तीन प्रश्नांनी कैद करून ठेवलंय. तू दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊन मला माझं मूळ रूप परत दिलंस.”
एवढं बोलून समुद्रराजाने गळ्यातला बंद शिंपला नोराच्या हातात दिला. त्याच्या आत वारा कोंडलेला होता. आता नोराला फक्त शंखाच्या बाहेर जाऊन, तो शिंपला उघडायचा होता. पण, त्याआधी अजून एक शेवटचा प्रश्न बाकी होता. त्याचं उत्तर बरोबर दिलं, तरच ती बाहेर पडू शकणार होती. नाहीतर तिचंही झाड होणार होतं.

नोरा समुद्रराजाला म्हणाली, “तिसरा प्रश्न?”
राजा म्हणाला, ऐक
“जे आईच्या रागात आहे
ते बाबाच्या कुशीत आहे
जगही जिंकता येते याने
सांग जे तुझ्या हृदयात आहे”

प्रश्न ऐकताच नोराला घरी काळजीने वाट बघत असणारी आई आठवली. गोष्टी सांगणारी बाबांची कुशी आठवली. तिचे डोळे पाण्याने भरून आले.
“प्रेम!”,नोरा अलगद डोळे मिटून म्हणाली.

तिच्या डोळ्यांतून पाण्याचे थेंब गालावर ओघळले. उत्तर बरोबर होतं. उत्तर दिलं तशी शंखाची एक सुंदर होडी तयार झाली. होडीत नोरा आणि समुद्रराजा उभे होते. नोराने एकवार समुद्राच्या राजाकडे बघितलं. दोघांच्याही डोळ्यांत आनंद होता. नोराने हळूच हातातील बंद शिंपला उघडला, तसा आत कोंडलेला वारा भराभर बाहेर पडू लागला. जंगलातील झाडे हलू लागली. वाऱ्यावर डोलू लागली. झाडांनी ढगांना गार वारा दिला, तसा धो धो पाऊस कोसळू लागला. बघता बघता समुद्र पुन्हा पाण्याने भरू लागला. झाडे पाण्यात बुडाली तशी त्यांचे परत प्राणी झाले. मासे आनंदाने उड्या मारत परत पोहू लागले. देवमाशाने तर पाण्याचा अगदी उंच फवारा मारून नोराचे आभार मानले.

या सगळ्यात नोराची नजर तिच्या बाबांना शोधत होती. दूरवर तिला लाल रुमाल बांधलेली होडी दिसली. नोराचे डोळे आनंदाने भरून आले. बाबा जवळ आले. वादळाने त्यांची होडी बरीच खराब झाली होती. समुद्रराजाने त्या होडीचा लाल रुमाल सोडून नवीन होडीला बांधला. त्याने नोरासाठी होडीत भरपूर मासे भरले. नोरा बाबांना रडतच बिलगली. तिचा हरवलेला बाबा तिला परत सापडला होता.

समुद्रराजाने नोराला एक सुंदर शंख भेट दिला. वाराही तिथे पोहचला होता. आता दोघांनाही आपली चूक समजली होती. त्यांनी नोराचे आभार मानले. वाऱ्याने पाण्यावर हलकेच फुंकर मारली आणि एका हळुवार लाटेसोबत नोरा आणि बाबांची नाव किनाऱ्यावर पोहचली. नोरा आता खूप खूश होती. तिने समुद्राकडे पाहिलं. वारा आता समुद्राला गुदगुल्या करत होता. नोराला खूप मजा वाटली. ती हसू लागली. गुदगुल्यांनी समुद्रात लाटा तयार होत होत्या आणि समुद्रही आता खळखळून हसत होता.


अगदी नोरासारखा!

 

------- ० --------

कथा व चित्रे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल फारुक एस. काझी यांचे आभार