ओळख (कथा)

ओळख
लेखन: राजश्री तिखे
चित्र: पारूल समीर 


मोठी सुट्टी संपल्यानंतर मी वर्गाकडे चाललेच होते, तेवढ्यात मला स्वातीचा चिडलेला आवाज ऐकू आला. “लीना, तू ठेव आज सगळं उचलून. मागच्या वेळी मी आवरलं होतं, आज तुझी पाळी आहे.” लगेच लीनाचा तिच्या वरताण आवाज आला, “तुला ठेवायला काय झालं गं? काय हात झिजतात का तुझे लगेच? मागे दोन वेळा मी आवरलं होतं. त्या दिवशी नैका...” पुढचं ऐकायला मी थांबलेच नाही तिथे. स्वाती आणि लीना मधल्या सुट्टीत कॅरम खेळत होत्या. कॅरमचं सामान कोणी आवरून ठेवायचं यावरून वादावादी चालू होती. लीना आता तोंडाचा पट्टा सोडणार, स्वाती माघार घेऊन शेवटी सगळं आवरून टाकणार हे मी पैजेवर सांगू शकले असते. चूक लीनाचीच असणार याची मला खात्रीच होती.

लीना मला कधीच आवडली नाही. तिच्यात आवडण्यासारखं होतंच काय? कध्धी अभ्यास वेळेवर झालेला नसायचा. प्रत्येक तासाला बोलणी खाणं ठरलेलंच. निबंधाच्या वह्या, प्रयोग-वह्या कायम अपूर्ण असायच्या. शिवाय ती बेफिकीरही होती. रिकाम्या रिफिल्स आणि कागदाचे चुरगळलेले बोळे ती वर्गात कुठेही फेकायची. तिच्या ह्या सवयी मला अजिबात आवडायच्या नाहीत. सगळ्यात हाईट म्हणजे, कोणी डब्यात काही खास आणलं असेल, तर त्या मुलीच्या परवानगीची वाटही न पाहता खुशाल तिच्या डब्यात हात घालून खायला सुरुवात हिची! आणि आवडला पदार्थ तर खातच सुटायची....श्शी! तिच्यासोबत कधीही डबा न खाण्याचा मी तर निश्चयच केला होता. आणखी एक तिडीक आणणारी गोष्ट म्हणजे, ती कायम तारस्वरात बोलायची. एखादी गोष्ट नाही पटली, की भांडायला तयार एका पायावर. शांतपणे बोलणं, आपला मुद्दा समजावून सांगणं ह्या गोष्टी जणू काही तिला माहीतच नव्हत्या. नुकतंच आमच्या शाळेच्या कबड्डी टीममधूनही तिला काढून टाकलं होतं. खरं तर ती चांगलं खेळायची, पण नक्कीच तिथेपण तिने काहीतरी लोच्या केला असणार. तिच्यापासून चार हात लांब राहणं, हीच बेस्ट पॉलिसी होती. मी तेच करायचे.

तर, त्या दिवशी मी लीना आणि स्वातीच्या भांडणाकडे दुर्लक्ष करून वर्गात शिरले. पुढचा तास इतिहासाचा होता. चंदा जोशी बाईंचा. आठवीच्या वर्गावर कायम त्याच असायच्या आणि ८वीचे प्रत्येक वर्षीचे वर्ग त्यांची वाट पहायचे, कारण त्या इतक्या वेगळ्याच आणि मस्त पद्धतीने इतिहास शिकवायच्या की मज्जा यायची. मागच्या तासाला त्यांनी इतिहासाच्या प्रकल्पाबद्दल चर्चा केली होती. ‘इतिहास काही फक्त राजे आणि लढायांचा नसतो, तर सामान्य माणसाचा इतिहास देखिल अभ्यासता येतो. आयुष्यातल्या विविध गोष्टींचा इतिहास - जसं संगीताचा इतिहास, खाद्यपदार्थांचा इतिहास, पेहरावांचा इतिहास - असाही अभ्यास इतिहास अध्यापनाची साधनं वापरून कसा करता येईल’ याबाबत त्या बोलल्या होत्या. दोन-दोनच्या गटाने एक विषय घेऊन प्रकल्प करायचा होता. आज वर्गात आल्यावर, आपला प्रकल्पातला जोडीदार निवडण्यासाठी, त्यांनी चिठ्ठ्या उचलायला सांगितल्या. मी चिठ्ठी उचलणाऱ्या गटात होते. पुढे जाऊन मी चिठ्ठी उचलली. जोडीदार कोण असेल, यापेक्षा बाई आपल्याला विषय कुठला सांगतील याचीच उत्सुकता मला जास्त होती.

चिठ्ठी उघडून पाहिल्यावर मला ‘जोरका झटका जोरसे लगे’ असं झालं. लीना? वर्गातल्या इतर २८ मुली सोडून लीनाच यावी माझ्या नशीबी! माझा चेहरा धाडकन् पडला असणार. मी अगदी पडेल आवाजात तिचं नाव वाचून दाखवलं. ‘बाई, मी चिठ्ठी बदलून घेऊ का?’ असं विचारायचं माझ्या अगदी ओठावर आलं होतं, पण बाईंनी ‘का गं?’ असं विचारलं असतं, तर सर्वांच्या देखत मी काय सांगणार होते? मुकाट जागेवर येऊन बसले.

मला विषय मात्र मस्त दिला होता बाईंनी, ‘मधुबनी चित्रकारीचा इतिहास!’ मी स्वतःचीच समजूत काढली, की नाहीतरी लीनासारखी उडाणटप्पू मुलगी काय काम करणार प्रकल्पाचं? सगळं मलाच करायला लागणार. आणि खरं तर तिनं न केलेलंच चांगलं. मी एकटीनंच काम केलेलं परवडेल मला. हवं तर न केलेल्या कामाचं क्रेडीटही तिला द्यायला मी तयार झाले असते.

मी प्रकल्पासाठी लागणाऱ्या संदर्भ पुस्तकांची यादी केली आणि सौजन्य म्हणून त्याची कॉपी लीनाला दिली. दुसऱ्या दिवशी, मला ताप आल्याने मी शाळेत जाऊ शकले नाही. दुर्दैवाने तो टायफॉईडचा ताप निघाला, त्यामुळे आठवडाभर माझी शाळा बुडाली. त्यापुढच्या आठवड्यात मी शाळेत गेले, पण तरी अशक्तपणा खूप होता. शिवाय बुडलेला अभ्यास, घरचा अभ्यास सगळंच भरून काढायचं होतं.

त्या गडबडीत मी प्रकल्पाचं विसरूनच गेले. शुक्रवारचा शेवटचा तास इतिहासाचा होता. त्या दिवशी बाईंनी प्रकल्पाची आठवण केली. सोमवारी प्रकल्प जमा करायचा होता. माझ्या पोटात गोळाच आला. आता तर पुस्तकं पण घेता येणार नाहीत, ग्रंथालयाची वेळ संपली होती आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. मी हताश, हतबल होऊन बसलेली असताना, लीना मात्र कोणाशी तरी गुद्दा-गुद्दी करत होती. अगदी नाइलाजाने आणि अनिच्छेने मी तिला हाक मारली आणि एकूण परिस्थितीची कल्पना दिली.

“काही काळजी करू नको. आपण करू की उद्या-परवामधे प्रकल्प.” लीना बेफिकीरीने म्हणाली.
आता खरं तर माझी सटकायला लागली. प्रकल्पासाठी संदर्भ पुस्तकं लागतील. ती आपल्याजवळ नाहीयेत याची जाणीव तरी आहे का या मुलीला? माझ्या मनातले हे विचार मी बोलण्याआधीच ती म्हणाली, “तू दिलेल्या यादीतली पुस्तकं मी परवाच घेतली लायब्ररीतून.” हुश्शश्श! माझा जीव भांड्यात पडला.
“कुठे आहेत पुस्तकं?” मी अधीरतेने विचारलं. एकदा पुस्तकं हातात पडली की मला काही घेणं-देणं नव्हतं तिच्याशी.
“घरी आहेत माझ्या. रोज कोण ते ओझं आणणार?” लीना म्हणजे हद्द होती, कॅज्युअल ऐप्रोचची.
“ठीक आहे. मग तू ये माझ्या घरी उद्या दुपारी जेवण झाल्यावर पुस्तकं घेऊन.” मी जवळपास निर्णयच देऊन टाकला.
“ओके. पण जर मला नाही जमलं यायला, तर तू ये माझ्या घरी.” पलटवार केल्यासारखं ती म्हणाली.
काय हे? मी आजारातून उठलीये वगैरे काही विचारच नाही हिला.
“मला नाही जमणार.” मी तीक्ष्ण स्वरात म्हणाले. माझा ताबाच राहिला नाही स्वतःवर. मग जरा खुलासा केल्यासारखं मी पुढे म्हटलं, “तुला माहितीये ना मला बरं नव्हतं. त्यामुळे माझे आई-बाबा नाही पाठवणार मला. त्यांना काळजी वाटतीये माझी. आणि शिवाय माझं पथ्य आणि औषधांच्या वेळा.... ते सगळं पण सांभाळायला लागतंय ना!“

दुसऱ्या दिवशी मी जेवून उठतच होते, की फोनची रिंग वाजली. लीनाचा फोन होता. “सॉरी मुक्ता. मला नाही जमते यायला. पप्पांना वेळ नाही मला तुझ्याकडे सोडायला.” एवढं बोलून फोन ठेवलासुद्धा. मी काय म्हणते आहे ते ऐकायलाही थांबली नाही बाई. कठीणच होतं. पण, मी काही तिच्यासारखी कॅज्युअल स्टुडंट नव्हते. कायम पहिल्या पाचात येणारी सिन्सिअर स्टुटंड होते मी. माझ्या अभ्यासाच्या बाबातीत मी कधीच तडजोड केली नव्हती. शेवटी मीच लीनाकडे जायचं ठरवलं. पुस्तकं तिच्याकडे होती ना!

बाबांनी मला तिच्या घरासमोर सोडलं. घराच्या पुढच्या भागात त्यांचं मोठं किराणा दुकान होतं. त्या किराणा दुकानाकडे पाहून मी तिच्या अस्ताव्यस्त घराची कल्पना करू लागले. दुकानाच्या बाजूलाच घरात जायला एक छोटा मार्ग होता. मी आत गेले. घरात शिरताच मला आश्चर्याचा धक्का बसला. लीनाचं घर चक्क नीटनेटकं आणि स्वच्छं होतं. मला पाहताच लीना धावत आली. मला पाहून तिला चक्क आनंद झाला होता. तिने प्रेमाने माझं स्वागत केलं. “चल आतच बसूया आपण”, ती म्हणाली.

मी आतल्या खोलीत स्थिरस्थावर झाले. लीनाने संदर्भ पुस्तकं आणली. “मी ही पुस्तकं पहायचा प्रयत्न केला, पण माझी वाचूनच नाही झाली.” ती जरा खजील सुरात म्हणाली. मी त्यावर काही म्हणण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात लीनाच्या आईचा आवाज आला, “लीनाऽऽऽ, सोफा कव्हर्स बदललीस का? आणि बाजूच्या फर्निचरवर पण जरा फडका मारून घे. मग तुझ्या मैत्रिणीबरोबर बस.”
“अगं पण मम्मी, आम्हाला आमचा प्रकल्प पूर्ण करायचाय. अर्जंट आहे. उद्या जमा करायचाय.” तिने पडेल आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला.
पण त्यावर लीनाच्या आईचा दुप्पट चढलेला आवाज आला, “जास्त बोलू नकोस. सांगितलेलं मुकाट ऐकावं. उगा शब्दानं शब्द वाढवून नये. आज घरात किती महत्वाचा कार्यक्रम आहे, गडबड आहे समजत नाही तुला? ”
लीनाचा चेहरा उतरला. ती कशीबशी सावरत म्हणाली, “अगं माझ्या ताईचं लग्नं ठरलंय. आज तिच्या सासरची मंडळी बोलणी करायला येणार आहेत, त्यामुळे घरात गडबड आहे. तू बस, मी आलेच.” असं म्हणून ती हॉलमधे अदृश्य झाली. मी लीनाने दिलेल्या संदर्भ पुस्तकांमध्ये थोड्याच वेळात बुडून गेले. वॉव! किती इंटेरिस्टिंग माहिती होती ती. मी तर आजूबाजूचं जगच विसरले. एकीकडे पटापट नोट्स घ्यायला लागले. तेवढ्यात लीनाची आई पाणी घेऊन आली. मी ते बाजूलाच ठेवून दिलं. लीनाच्या घरी शक्यतो काही खायचं-प्यायचं नाही असंच मी ठरवलं होतं.

थोड्या वेळाने लीना आली. तिने वहीत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही सांगण्याचे कष्ट मी घेतले नाहीत. मग ती हळूच उठली आणि समोरच्या कपाटातून तिने एक मोठी ड्रॉईंग बुक काढली. “हे बघ, मी काय काढलंय.” ती जरा लाजतच म्हणाली. मी एक ओझरती नजर टाकली आणि उडालेच. मधुबनी चित्रकलेचे एकाहून एक सुंदर अविष्कार समोरच्या वहीत होते. मी माझी नोट्सची वही बाजूला ठेवून टाकली. “तू काढलंस हे?” तिची ड्रॉईंग बुक हातात घेत मी म्हणाले. तिची सगळी चित्रं मी अगदी नीट पाहिली. “तुझ्या चित्रांमुळे आपला प्रकल्प आणखी भारी होईल.” मी पहिल्यांदाच मनापासून काहीतरी चांगलं बोलले लीनाशी. आता ‘या चित्रांचा प्रकल्पात कसा उपयोग करू या’ याविषयी आम्ही काही बोलणार तोच लीनाचा मोठा भाऊ आत आला. “ऐकू येत नाही का तुला? काकू आणि आई हाक मारताहेत. जा लवकर.” तो खेकसला आणि दुकानाच्या दिशेने निघून गेला. मी लीनाकडे पाहिलं. ती रागारागाने त्याच्याकडे पहात होती, पण ती बोलली काहीच नाही. मुकाट्याने ती स्वयंपाकघरात गेली आणि त्याच्या मागोमाग चहाचा ट्रे घेऊन तीही दुकानाच्या दिशेने गेली. मी खांदे उडवले.

मग थोड्या वेळाने तिची धाकटी काकू गरमागरम कचोरी आणि शिऱ्याच्या बश्या घेऊन आली. तिच्या पदराला धरून तिचं दीड-दोन वर्षांचं छोटं बाळही आलं. “बश् इथंच. बघ ताई काय गंमत करतीये ती. लीना बघ जरा त्याच्याकडे थोडा वेळ.” ती म्हणाली आणि त्या बाळाला तिथंच सोडून निघून गेली.
कचोरी आणि शिऱ्याचा वास इतका खमंग आणि टेम्टिंग होता, की माझा काही न खाण्या-पिण्याचा निश्चय साफ ढासळून पडला. आम्ही बश्या हातात घेऊन खाताखाता बाळाशी खेळायला लागलो. बाळ गब्दुल, गोडू-गोडू होतं.
तेवढ्यात मी लीनाला विचारलं, “लीना तू आता आपल्या कबड्डीच्या टीममधे का गं नाही खेळत?”
लीनाचा चेहरा उतरला, ती म्हणाली, “अगं, त्याची प्रॅक्टिस शाळा सुटल्यावर असते ना, मग आई-बाबा नको म्हणतात. घरी यायला उशीर होतो म्हणतात. तनपुरे बाई म्हणाल्या, तू चांगली खेळतेस पण प्रॅक्टिसला यावं लागेल तुला. मग कसं करणार?”
“अगं, पण आपल्या कबड्डी टीममधली रेश्मा खाणीवाले तुझ्याच घराजवळ राहते ना? मग तिची सोबत नाही का तुला?” मी म्हणाले.
लीना काहीच बोलली नाही. तेवढ्यात तिचा दुसरा चुलत भाऊ खेळत-खेळत आला. असेल पाचवी-सहावीत. अचानक लीनाच्या बशीतली कचोरी उचलून तो खाऊ लागला.
“माझी आहे ती.” लीना ओरडली.
“पण मला हवीये. मला आवडलीये कचोरी.” तो दात विचकत निर्लज्जपणे म्हणाला आणि त्याने ती कचोरी खाऊनही टाकली.
मला वाटलं, लीना आता त्याच्या अंगावर धावून जाणार, त्याच्याशी मोठ्ठ्या आवाजात भांडणार. पण मला धक्काच बसला. ती चक्क गप्प राहिली आणि आमच्या कामाकडे वळली. मला अचानक फार वाईट वाटायला लागलं. मी माझ्यातली थोडी कचोरी तिला देऊ लागले. पण तिने ती घेतली नाही.
“नको मुक्ता. हे नेहमीचच आहे. माझ्या आवडीचे पदार्थ मला मनसोक्त खायला मिळतच नाहीत कधी.” ती म्हणाली आणि मग पुढे ती जे पुटपुटली त्याने मी चमकलेच. ती म्हणाली, “म्हणूनच मला शाळा आवडते.” त्यानंतर कचोरी आणि शिरा खाण्यातली मजा संपलीच माझ्याकरता. एव्हाना ते काकूचं बाळंही आमच्या कागदांवर हात मारू लागलं होतं, त्रास देऊ लागलं होतं. मग लीना त्याला घेऊन बाहेर गेली.


जवळजवळ तीन तास लागले आम्हाला प्रकल्प पूर्ण करायला. पण या तीन तासांत लीना क्वचितच नीट लक्ष देऊन काम करू शकली. ठेवणीतल्या कपबश्यांचा सेट धुण्यासाठी, वस्तू इकडून तिकडे नेऊन देण्यासाठी, कधी ताईला तयार होण्यासाठी काही आणून देण्यासाठी, तर कधी कोणाला दार उघडण्यासाठी तिला सतत बोलावलं गेलं. लीनाने खरंच प्रकल्प केला का? प्रकल्पाबद्दल बोलायला सांगितलं तर तिला बोलता येईल का? तिची चित्रं मी जशी वापरली तशीच ती वापरली जावी असं तिला वाटत होतं का? असे कितीतरी प्रश्न मनात घेऊन मी घरी आले.

सोमवारी मी शाळेत जायची तयारी करत होते आणि आई माझा डबा भरत होती. माझ्या आवडीचं थालिपीठ, वर लोण्याचा घसघशीत गोळा आणि लिंबाच्या लोणच्याची फोड. बस्स, नुसत्या विचारानेही तोंडाला पाणी सुटत होतं. अचानक माझ्या मनात काहीतरी चमकून गेलं.
मी आईला म्हणाले, “आई अजून एक थालिपीठ देशील का गं डब्यात?”
“अजून एक?” तिला आश्चर्यच वाटलं. “माझ्या मते हे एक पुरेसं आहे तुला.” ती म्हणाली, पण तरी तिनं अजून एक थालिपीठ साग्रसंगीत डब्यात भरलं.
मी आणि लीनाने टीचर्स रूममधे जाऊन आमचा प्रकल्प बाईंकडे जमाकेला. परत वर्गाकडे जात असताना मी लीनाचा हात धरला आणि म्हणाले, “आज आपण एकत्र डबा खाऊया? मी तुझ्यासाठी एक गंमत आणलीये.”