एकदा दुपारी.. (बडबडगीत)

एकदा दुपारी...

लेखन: अमोल करंदीकर 
चित्र रेखाटन: वज्रसारा अभयवीर, ७वी, अक्षरनंदन | रंगकाम सहाय्य: सई तासकर,  ५वी, अक्षरनंदन
या दोघींना उद्युक्त केल्याबद्दल गौरी औलकर यांचेही आभार
टिप: कवितेत जुई हे नाव वापरलं असलं तरी लहान मुलांना वाचून दाखवताना त्यांच्य ओळखीचे / त्यांचे स्वत:चे नाव घालून वाचल्यास त्यांना अधिक मजा येईल

----------------------

एकदा दुपारी आबा
उघडत होते डबा..

डब्यात लाडू खुप्खूप
आबांची होई भूक्भूक..

झाकण बसले घट्ट
आबांचा जाई ना हट्ट..

लावला पुरता जोर
आजीच्या जिवाला घोर..

आजीने चालवलं डोकं
जुईला मारली हाक..

जुई आली धावून
'टाईमप्लीज' घेऊन

तिघांनी लावला जोर
झाकण उडाले वर

कवळी निसटली सटकन
चश्मा उडला खटकन

लाडू झाले घरभर
मुंग्या आल्या भरभर

नस्ता झाला व्याप
आजीच्या डोक्याला ताप

जुईला आले रडू
तोंड झाले कडू

आजीने दिला लाडू
आबांना मात्र झाडू..

जुई शिरली कुशीत
आबा आजी खुशीत !