ऑनलाईन शाळेची बखर १

ऑनलाईन शाळेच्या बखरींची पानं मुलांनी लिहायला सुरूवात केली आहे बरं का! आज त्यातलीच दोन पानं आपण प्रकाशित करतो आहोत. मुलं या प्रक्रियेत शाळेतल्या अभ्यासासोबत इतर गोष्टीही टिपताहेत. तुम्हीही असे अनुभव लिहून पाठवलेत तर आनंदच होईल. आपले अनुभव आम्हाला monitor.atakmatak@gmail.com या इमेल पत्त्यावर जरूर पाठवा.

Notebook

----लेखन आणि चित्र: गार्गी प्रसाद देशपांडे (इयत्ता: चौथी. पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर)

माझं नाव गार्गी देशपांडे. माझी ऑनलाईन शाळा आठ जून २०२०ला सुरू झाली. माझी छोटी बहीण गाथाची पण ऑनलाईन शाळा सुरू झाली आहे. आम्हाला रोज होमवर्क देतात. तो पण आईच्या मोबाईल वरच येतो. आमची ऑनलाईन शाळा सकाळी आठला असते. रोज तीन सेशन असतात, पण उद्यापासून दोनच सेशन असणार. मला माझे सगळे मित्र-मैत्रीणी भेटतात, पण मोबाईलवर भेटल्यावर मज्जा येत नाही. पण आज आम्ही खूप मज्जा केली, कारण आज सेशन ला टिचरच नव्हत्या. एकदा माझी शाळा संपल्यावर होमवर्क करून आम्ही बाहेर गेलो. आम्ही मला मोठी सायकल आणली आणि आता मला ती थोडी चालवता पण येते. शाळा सकाळी असल्यामूळे लवकर उठायला लागतं. खरं मला शाळेत जायला जास्त आवडतं.Notebook

-- --लेखन आणि चित्र: आरोही अतुल भामे (इयत्ता: 2 री. एस. पी.एम. पब्लिक स्कूल, पुणे)

शाळेचा पहिला दिवस खूप छान गेला, म्हणजे स्क्रिनवरच्या शाळेचा! मोबाईलवर का होईना पण शाळेत पोहोचले. हम्म, पण टिचरने सगळ्यांना म्युट केल्यामुळे मित्र-मैत्रिणींशी बोलताच आले नाही. फक्त त्यांना बघितलं. सगळ्यांची उंची मझ्यासारखीच वाढली होती. पहिला तास गणिताचा झाला. टिचर एकट्याच बोलल्या. पण आम्हाला वर्गातल्यासारखं वाटलच नाही. आई शेजारी बसून सारख्या सूचना देत होती. लक्ष दे, ताठ बस, अक्षर नीट काढ. इतक्यात पहिला तास संपला. दुसऱ्या तासाच्या सुरुवातीला जेव्हा टिचरचे नाव व पासवर्ड टाकला. तेव्हा चुकून चौथीच्या वर्गात पोहोचले. "अगं आरोही, हा चौथीचा वर्ग आहे, लिव्ह मीटिंग." आणि मी वर्गातून घाई घाईत बाहेर पडले. हुश्श!...