ऊब (कथा)

ऊब
लेखनः फारूक एस. काझी
चित्रेः ओंकार महामुनी

“बाऊऊ बाऊउ औऊऊऊ”
“बाऊऊउ ऊऊऊ ह्ह्ह...”
त्याच्या ओरडण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज आला तसा विपुल जागीच चुळबुळला. अंगावरची चादर दूर करून उठून बसला.
सगळं लक्ष बाहेर.
अजूनही त्याच्या ओरडण्याचा आवाज येतच होता.


आईला बोललो होतो, त्याला नको बाहेर ठेऊ. अजून लहान आहे तो. पण, आई ऐकेल तर जग इकडचं तिकडं होईल.
दोनच दिवस झालेत त्याला आणून. गुब्बू गुब्बू. पांढरा आणि थोडा करडा. “मोठा झाला की रंग बदलेल त्याचा” आईने भविष्यवाणी केली होती. त्याचं नावही अजून फायनल झालं नव्हतं.
तो कसा का दिसेना, पण भारी होता. गुब्बू गुब्बू आणि इवलुसं नाक. जवळ येऊन छोटक्या जिभेने हात आणि पाय चाटायचा. मज्जा येत होती.


त्याला हात लावला तेव्हा मऊशार टेडी बिअरला हात लावतोय असं वाटलं. इवलीशी शेपटी लुटुलुटू लुटुलुटू हलत होती. इकडून तिकडे, तिकडून इकडे हिंडत होतं ते. वास घेत, चाटत आणि मधूनच गुरगुरत. विपुल सारी मज्जा बघत होता.
पहिला दिवस त्याला घरात एका कोपऱ्यात झोपवलं, पण त्याने तिथंच घाण केली. त्या वासाने घर भरून गेलं. आई जोराची भडकली.


मग त्याची रवानगी झाली बाहेर. एक पोतं अंथरून त्यावर त्याला बसवलं.
पण, तो आता खूप ओरडत होता. ‘त्याला माझी आठवण येत असणार’, विपुलला उगीचच वाटून गेलं.
त्याने इकडे तिकडे पाहिलं. आई-बाबा दोघे गाढ झोपलेले. तो हळूच उठला.
दारची आडवी कडी आता त्याच्या हाताला येऊ लागली होती. त्याने टाच उंच करून कडी काढायचा प्रयत्न केला. आवाज जर झाला, तर आपली धडगत नाही, हे त्याला पक्कं माहीत होतं.

अजिबात आवाज न करता त्याने कडी काढली. दरवाजा उघडला. तरी दरवाजा थोडा कुरकुरलाच. दरवाज्याचा आवाज ऐकून तो एकदम उठून बसला. खूश झाला. लुटलुटत जवळ आला. जीभ बाहेर काढून पाय चाटला. लाडात येऊन पायाशी गोलगोल फिरला. मग मान वर करून पाहू लागला.
“आठवण येत होती ना माझी?” असं विचारताच तो हलकेच कुईकुईला.
विपुलने त्याला वर उचलून घेतलं.
त्याने विपुलचा गाल चाटला. विपुलला ओलसर गुदगुल्या झाल्या.


बाहेर अंधार होता याची आठवणही विपुलला राहिली नाही.
विपुल आत आला. हळूच दरवाजा लावला. कडी लावली.
“हे बघ, आता अजिबात बोलू नको. नाहीतर दोघांना फटके पडतील. समजलं का? हम्म.”
विपुलने त्याला कोपऱ्यात झोपवलं आणि स्वत: आपल्या जागेवर येऊन झोपला.
थोडावेळच गेला असेल एवढ्यात आपल्या गालाला काहीतरी ओलसर लागतंय असं वाटून विपुल झोपेतच चुळबुळला. पुन्हा तोच ओलसर स्पर्श. विपुल घाबरून उठून बसला आणि एकदमच हसायला लागला.
“अरे लबाडा, तुला सारखी गडबड करायची असते, होय ना? माझ्याजवळ झोपायचंय ना तुला? ये. पण गुपचूप झोपायचं. चुळबूळ अजिबात नको. आणि सूसू तर अजिबात नको” असं म्हणून विपुल स्वत:शीच मोठ्याने हसला. आई-बाबा उठतील असा विचार येताच एकदम गप्प झाला.

पिल्लू त्याच्या कुशीत शिरलं आणि थोड्यावेळात गाढ झोपी गेलं. अगदी आईच्या कुशीत झोपल्यासारखं.


....................................................
ऐकलीस/वाचलीस का गोष्ट? आवडली? आता या गोष्टीत दोन गमती आहेत बरं का:
   यातल्या कुत्र्याच्या पिल्लाला नावच नाही दिलेलं. तू देशील का एखादं नाव त्याला? तुझ्या आवडीचं.
   यात ‘ऊब’ हा शब्द आलाय. तुला काय वाटतं त्याचा काय अर्थ असेल बरं?