लेखांक - १: उघडा डोळे, बघा नीट!

उघडा डोळे, बघा नीट!
लेखन - आल्हाद महाबळ

तर मुलांनो आज आपण या ठिकाणी फोटोग्राफी या विषयावर बोलणार आहोत.

जाऊ दे, हे फारच शाळेत भाषण द्यायला आल्यासारखं होतंय. पण आपण फोटोग्राफीवर गप्पा मारणार आहोत हे खरंच आहे बरं का. आईबाबांच्या फोनवर, दादाच्या डीएसेलारवर तुम्ही एव्हाना फोटो काढून बघितलेच असणार. पण मी जर म्हटलं की फोटोग्राफी करायला कॅमेरा कंपलसरी नाहीये तर विश्वास बसेल? खरंच! मस्करी नाही. अगदी खरं.

फोटोग्राफी शब्दाचा अर्थ माहितीये का? छायाचित्रण किंवा प्रकाशचित्रण हे भाषांतर झालं. अर्थ काय? फोटो म्हणजे उजेड आणि ग्राफी म्हणजे लिहीणे. प्रकाशाच्या सहाय्याने एक प्रतिमा उमटवणे म्हणजे फोटोग्राफी. कॅमेरा लागतो ती प्रतिमा जतन करण्यासाठी. मग आता प्रकाशाच्या सहाय्याने लिहायचं तरी कसं?

प्रकाशाच्या सहाय्याने लिहीणं म्हणजे नक्की काय? सोप्पं उदाहरण देऊ? तुम्ही उन्हात भिंग वापरून कागद जाळला असेलच. ते ही एक प्रकारे प्रकाशाच्या सहाय्याने लिहीणंच. फक्त लिहीण्या लिहीण्यात कागद जळून गेला एवढंच काय ते. प्रकाशाने लिहीता लिहीता तुमचा कागद जरी जळून गेला असला तरी तुमचाच एक अवयव मात्र अगदी रोज उठून प्रकाशाने लिहीत असतो. कोणता बरं असेल हा अवयव? करा विचार.

डोळे. आश्चर्यचकित झालात ना? तुमचा माझा सगळ्यांचाच, डोळा हा एक सुंदर अवयव आहे. डोळा प्रकाशाने लिहीतो म्हणजे नक्की कसा त्यावर विचार करा. मी सगळं सांगेनच. मात्र पुढच्या भागात. तोवर तुमच्याकडे विकीपेडीया आहे आणि भिंगही आहेच. लॅपटॉप किंवा कॉंप्युटर जवळ नसेल तरी हरकत नाही. आईबाबा एकवेळ भिंग देणार नाहीत पण मोबाईलमधे विकीपेडीया ऍप, नक्कीच इंस्टॉलून देतील.

पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोवर फोटो काढा!

 

या भागातील छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे. क्रियेटीव्ह कॉमन्स या प्रताधिकारात हे चित्र बांधील आहे.