शब्दांची नवलाईः 'की'ची करामत

शब्दांची नवलाई
नादमय शब्द
लेखनः एकनाथ आव्हाड 
चित्रेः सुवर्णा धर्मराज भदाणे

 

 

खेळ खेळूया शब्दांचा
शब्दांवर सा-यांची मालकी
तीन अक्षरी शब्दांची ही
'की' ची करामत बोलकी

दाराची बहीण कोण
तिला म्हणतात खिडकी
मातीची भांडी कसली?
ही तर आहेत मडकी

स्वतःभोवती फिरण्याला
घेतली म्हणतात गिरकी
कापसाच्या बी ला येथे
सारेच म्हणतात सरकी

लावणीच्या ठसक्याला
घुंगरांच्या सोबत ढोलकी
झोप डोळ्यावर आली की
जो तो घेतो डुलकी

ढोंगी मनुष्य दिसताच
आला म्हणतात नाटकी
एखाद्याची परिस्थितीसुद्धा
असते बरं फाटकी

नाकातला छोटा अलंकार
त्याला म्हणतात चमकी
छोट्याशा तालवाद्याला
म्हणतात खरं टिमकी

खेळात शब्दांची अशी
जेव्हा बसते अंगतपंगत
शब्दांचा वाढतो साठा
खेळाला चढते रंगत

 

आता अशाच की ने संपणाऱ्या शब्दांचा एक खेळ खेळून बघणार का?