शब्दांची नवलाई: नादमय शब्द

शब्दांची नवलाई
नादमय शब्द
लेखनः एकनाथ आव्हाड 
चित्रेः वृषाली गटणे

शब्दांची नादमयता

चला मुलांनो आज आपण
शब्दांचे गाणे गाऊ
ध्वनिदर्शक शब्दांचा अर्थ
नव्याने जाणून घेऊ

पाण्याचा खळखळाट
पानांचा सळसळाट
ऐकलाय का सांगा
चिमण्यांचा चिवचिवाट

ढगांचा गडगडाट
चाकांचा खडखडाट
ऐकलाय का सांगा
पंखांचा फडफडाट

घंटेचा घणघणाट
शस्त्रांचा खणखणाट
ऐकलाय का सांगा
टाळ्यांचा कडकडाट

पक्ष्यांचा कलकलाट
बांगड्यांचा किणकिणाट
ऐकलाय का सांगा
ढोलताशांचा दणदणाट

शब्दांचा हा नाद जसा
घुमत जाई कानात
शब्दच जणू फेर धरून
मग गुणगुणती मनात

---000---

मित्रमैत्रीणींनो,
कविता आवडली ना? वेगवेगळे नादमय शब्द त्यात आले आहेत. आता आपल्याला त्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. बघा बरं किती कमीत कमी वेळात तुम्ही सगळ्या जोड्या जुळवू शकताय?