शब्दांची नवलाई: समूहदर्शक शब्द

शब्दांची नवलाई
समूहदर्शक शब्द
लेखनः एकनाथ आव्हाड
चित्रेः नीलम कर्ले

वर्गावर आल्या एकदा
आमच्या मुळेबाई
समूहदर्शक शब्द म्हणे
शिकूया आज काही

 

मेथी,पालक,शेपूची
असते म्हणे जुडी
आंबे पिकवण्यासाठी
आंब्यांची अढी

गच्च बांधून ठेवतात
जशी उसांची मोळी
डोंगराळ रानात दिसे
करवंदांची जाळी

टोपलीत रचून ठेवतात
भाकरींची चवड
घराच्या कोपऱ्यात दिसे
मडक्यांची उतरंड

 

लुकलुक करुन हसे
तारकांचा पुंज
झाडाला वेढून बसे
वेलींचा कुंज

जमिनीवर फुलून येई
फुलांचा ताटवा
आकाशी विहरत राही
पाखरांचा थवा

जंगलात फिरताना दिसे
हत्तींचा कळप
खुळखुळ खिशात वाजे
नाण्यांची चळत

कवितेतून समूहाचा
बोध कळून आला
समूहदर्शक शब्दांचा
अभ्यास छान झाला !

----000---

मित्रमैत्रिणींनो,
कविता आवडली का? या कवितेत ज्या गमतीबद्दल आपण बोलतोय त्याच्याशी निगडित एक खेळ आपण खेळणार आहोत. या खेळात वस्तू आणि समूहदर्शक शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. यातील सगळ्या जोड्या कवितेत असणाऱ्याच असतील असं नाही. किती जलद सोडवू शकता पाहूया.