शब्दांची नवलाईः वाक्प्रचार २

शब्दांची नवलाई
वाक्प्रचार - २
लेखनः एकनाथ आव्हाड 
चित्रेः नीलम कर्ले 

या मालिकेतील सर्व भाग इथे वाचता येतील

 

बाबांच्या आमच्या बोलणे
आहे फारच वेगळे
शब्दश: अर्थ घेतला तर
गोंधळात पडतील सगळे

आम्हाला ते म्हणतात
घर डोक्यावर घेऊ नका
डोळ्यांत धूळ फेकणे
लवकर थांबवून टाका

हातावर तुरी देण्याच्या
मारू नका बाता
जिभेचा पट्टा चालवणे
बंद करा आता

नाकाने कांदे सोलणे
शहाणपणाचे नाही
पोटात कावळे ओरडले की
जेवायची घाई

कुणाचे कान फुंकणे
हे काम नाही भले
तोंडाची वाफ दवडण्यात
श्रम व्यर्थच गेले

खांद्याला खांदा भिडवून
काम करण्यात मजा
बोटावर कुणाला नाचवून
देऊ नये सजा

बाबांच्या बोलण्यात शरीराचे
अवयव हमखास असतात
भाषेचे सौंदर्य खुलवून ते
वाक्प्रचार होऊन बसतात

--------------------------

आता अशाच की ने संपणाऱ्या शब्दांचा एक खेळ खेळून बघणार का?

बघुया तुम्ही कमीत कमी किती वेळात हे पूर्ण करता. अनेकदा खेळालात की कमी वेळात करू शकाल.