शब्दांची नवलाई: वाक्प्रचार १ (विषय: हात)

शब्दांची नवलाई
वाक्प्रचार १ (विषय: हात)
लेखनः एकनाथ आव्हाड 
चित्रेः प्रीता

आपला हात जगन्नाथ

दीनदुबळ्यांना नेहमीच ,
मदतीचा हात द्यावा .
माणुसकी जपेल त्याला,
मनापासुनी हात जोडावा.

ऊतू नये, मातू नये
हात आखडुनी खर्च करावा.
कामधाम करतेवेळी
भरभर आपला हात चालावा .

चूक झाल्यास कबूल करावी,
हात झटकुनी का बसावे ?
तुरी हातावरी देईल त्याच्या,
हात धुऊन पाठीस लागावे.

संकट धावून आले जरीही ,
हातपाय गाळून बसू नये.
संकटाशी दोन हात करावे,
संकटापुढे हात टेकू नये... !

दुस-यांच्या कष्टास जाणावे ,
आडवा हात त्यावर मारू नये
हातापाया पडुनी कधीही
फायदा स्वतःचा साधू नये

उगारण्यासाठी नाही बरं,
उभारण्यासाठी आहेत हात.
ध्यानात ठेवावे आयुष्यात
आपला हातच जगन्नाथ...!

 

---000----

मित्रमैत्रिणींनो,
कविता आवडली ना? या कवितेत 'हात' हा विषय घेऊन त्याच्याशी संबंधित कितीतरी वाक्प्रचार गुंफले आहेत. तुमच्या लक्षात आलेका? आपण हे शिकण्यासाठी एक गंमत खेळ करणार आहोत. हा खेळ संपेपर्यंत तुमचे हे वाक्प्रचार नीट तयार होतील बघा.

 

हे वाक्प्रचार नीट तयार झाल्यावर आणखी कोणत्या एका विषयावरचे वाक्प्रचार तुम्ही गोळा करू शकताय बघा बरं?