ऐका ना हो ताई! (कविता)

========
ऐका ना हो ताई
मुळ कविता: प्लीज मिसेस बटलर
========

ऐका ना हो ताई
हा जोश्यांचा अरू
सारखा अभ्यास माझा ढापतो
मी काय बरं करू?

हॉलमध्ये जाऊन बस
गड्या, मोरीत लप नैतर
अभ्यास पसर गच्चीवर
वा जम्मेल ते तू कर


ऐका ना हो ताई
हा जोश्यांचा अरू
सारखा 'लब्बर' माझा घेतो
मी काय बरं करू?

घट्ट धरून ठेव, बाळा
नैतर खिशात भर
जमलं तर टाक गिळून
वाटतं भलं ते कर


ऐका ना हो ताई
हा जोश्यांचा अरू
सारखा चिडवत बोलतो
मी काय बरं करू?

कोंडून घे कपाटात,
नैतर जंगलात जा पळत!
काय वाट्टेल ते कर पण
मला नक्को पिळू परत!

-----------------

मुळ कवी: ॲलन आह्ल्बर्ग
स्वैर अनुवाद: ऋषिकेश
चित्र: अनय क्षीरसागर, भारतीय विद्या भवन, पुणे, इयत्ता पहिली-ए

-----------------

मुलांकडून सतत येणारे प्रश्न आणि तक्रारी ऐकून वैतागलेल्या शिक्षिका (ताई) जेव्हा विचित्र उत्तरं द्यायला लागतात तेव्हा काय होतं हे सांगणारी "प्लीज मिसेस बटलर" ही कविता आधुनिक बालसाहित्यातील महत्त्वाची कविता मानली जाते. जगभरातील मुलांना आणि शिक्षकांना खूप आवडणारी, हसवणारी नि वर्गातील व्यवस्थापन पद्धतीवर एकेकाळी अनेकांना विचार करायला लावणारी कविता आम्ही मराठीत आणण्याचा प्रयत्न करतोय. मुळ कवीने स्वत: वाचलेली इंग्रजी कविता ऐकण्यासाठी पुढिल चित्रफित (व्हिडिओ) पाहू शकता.