टेकडीच्या निमित्ताने १ः पावसाळ्यातील काम

टेकडीच्या निमित्ताने १ः
पावसाळ्यातील काम
लेखन व चित्रे: ओजस फाटक(इयत्ता ७वी, अक्षरनंदन)
 

आषाढ सुरू होता की श्रावण झाला होता हे आठवत नाही, पण मी, माझी आई, माझा छोटा भाऊ असे तिघं रेनकोट घालून स्कूटरवर टांग टाकून निघालो. सोसायटीच्या पश्चिमेस लगेच टेकडी. आम्ही पायथ्यापाशी स्कूटर वळवली. भर पावसात, बाकी कशाचाही विचार न करता, आम्ही थेट 'मोहा'च्या झाडापाशी जाऊन धडकलो. काल-परवाच माउंटनिअर ‘उष:प्रभा पागे’ यांची गाठ पडली होती. त्यांचा वनस्पतींबद्दलही भरपूर अभ्यास आहे. त्यांनी आम्हाला मोहाची झाडे दाखवली. मोह आणि चारोळीच्या झाडामध्ये खूप साम्य असते, पण मोहाच्या खोडावर रेघा असतात.

मोहाच्या बिया काहीश्या मला बदामासारख्या वाटतात, फक्त थोड्या गडद व टप्पोऱ्या असतात. झाडाखाली आम्ही बिया वेचल्या. सुमारे १६० बिया सापडल्या. त्या आम्ही एका पिशवीत घातल्या. पहिल्या दिवशी आम्ही पेरल्या नाहीत. पण, दुसऱ्या दिवसापासून पेरल्या, वेचल्या, पेरल्या, वेचल्या, पेरल्या.

मोह, ऐन, आंबा अश्या बऱ्याच बिया आम्ही पेरल्या. वनविभागाने खड्डे खणून ठेवले होते, पण अजूनतरी झाडे लावली नव्हती. त्यातल्या काही खड्ड्यांमध्ये पाणी साचायचं. आम्ही त्यात जरा जास्त पाणी लागतं, म्हणून बाठी टाकायचो (आंब्याचा).

पावसाळ्यात पावसामुळे भरपूर चिखल व्हायचा. जिथे जास्त लोक जात नाहीत, तिथे जास्त चिखल व्हायचा. आम्ही जेव्हा तिथे जायचो, तेव्हा आमचं सँडविच व्हायचं. खाली आख्खा बूट रुतेल इतका गारगार चिखल व वरून धो-धो पाऊस! चढ-उतारावर असताना घसरू नये म्हणून, मी कधी कधी बांबू पडलेला मिळाला तर तो वापरून चढायचो. खूप मजा यायची. एकदा तर मी एक अवघड चढ चढत होतो. चिखलामुळे तो अवघड बनला होता. (तो आधीपासूनच थोडासा अवघड होता). मी ज्या ठिकाणी काठी रुतवली, तिथला चिखल फार भयानक होता. काठी निघेचना! मी ताकद लावली. ती काठी मला हवीच होती कारण पुढे जास्त चिखल होता. खूप ताकद लावली पण काठी निघालीच नाही (बाकी दोघं या वाटेने यायचे नाहीत). मी अंगातील सर्व शक्तीच्या दसपट जास्त शक्तीनिशी काठी खेचली आणि काय गम्मत! मी सटकून, पार २ फूट खाली!!

(क्रमश:)

या लेखनाचे डिजिटल टंकन करण्यास मदत केल्याबद्दल उदय क्षीरसागर यांचे आभार